Mar 01, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

खमंग फोडणी - गोष्ट छोटी डोंगराएवढी

Read Later
खमंग फोडणी - गोष्ट छोटी डोंगराएवढी
खमंग फोडणी

अविस्मरणीय प्रसंग सांगायचा म्हंटलं की मनात खूप आठवणी गोळा होतात. कारण काय सांगू? माझ्या आयुष्यात तशी अविस्मरणीय प्रसंगांची कमतरता नाहीये. एक एक असे प्रसंग घडून गेले; की तुम्ही कितीही सांगितले तरी ते प्रसंग विसरणे शक्य नाहीये मला. लहानपणी मी धडपडले; की आजोबा म्हणत, "पडे झडे तो वाढे." पण ही म्हण सुद्धा माझ्याबाबतीत थोडी वेगळी म्हणजेच; \"चुके, फसे तो अनुभव मिळे\" अशी काहीशी आहे.

काय सांगता? सांगू का त्यातील एखादा अविस्मरणीय प्रसंग?

बरं सांगते हा तुम्हाला. माझे अविस्मरणीय अनुभव तुमच्याही स्मरणात राहतील असे आहेत. तुम्हीही त्यांच्या आठवणीने हसाल.

अविस्मरणीय प्रसंग खूप असले, तरी त्यातील बरेचसे प्रसंग हे फजितीचेच आहेत. त्यामुळे आता तुम्हीच बघा या प्रसंगात फजिती होतेय माझी; की मी तो निभावून नेतेय ते.

तर मी सांगत होते एक प्रसंगाबद्दल.

लहानपणी भातुकली खेळताना इवलुशा टोपात पाणी घेऊन ते नखाएवढ्या झाऱ्याने ढवळताना मज्जा वाटायची. भारी हौस मला स्वयंपाकाची.
आईच्या मागे मी सतत असायचे. "मला तुझ्याकडे असलेली मोठी मोठी भांडी दे. खोटं खोटं जेवण बनवायला खरा खुरा खाऊ दे."

आईकडून कुरमुरे, चणे घेऊन ते टोपात ठेवून ढवळत असे. घरभर माझ्या स्वयंपाकाच्या खुणा उमटत. जेवण म्हणजे खूप साधी सोपी गोष्ट वाटायची तेव्हा.

त्या छोट्या कपातून चहा दिला बाबांना की बाबा खूप कौतुक करायचे. एकदा बाबांनी तर विचारले सुद्धा...

"चहा छानच झाला आहे ग. कसा बनवलास?"

"पहिलं पाणी ओतलं, मग ते खूप खूप ढवळत बसले. मग त्यात एक चणा टाकला आणि मग मीठ घातलं. मग चहा कपात ओतून तुम्हाला दिला." चहाचं रसभरीत वर्णन ऐकून बाबांनी माझी पाठ थोपटली आणि माझ्या चहाची सीक्रेट रेसिपी ऐकायला हॉलच्या दारापाशी आलेली आई मात्र हसू कंट्रोल न होऊन परत किचनमध्ये गेली.

माझं झालेलं कौतुक ऐकून मी आईच्या फुलक्याहून अधिक फुगायचे. आईला चिडवायचे; की बघ बाबांना माझ्या हातचा चहा खूप आवडतो. मी जेवण करायला लागले; की त्यांना माझ्या हातचंच जेवण खूप आवडेल. माझा बालिशपणा बघून आई मनातच हसे.

आणि मग एक दिवस.......

अहो, एक दिवस मी मोठी झाले आणि उगाचच आईच्या मागे मागे अधिक लुडवूड करू लागले. तिला दाखवून द्यायचे होते ना मला; की मी किती सुगरण आहे ते.

जिला मी गोंडस निरागस भासायचे तिला आता माझा उपद्रव वाटू लागला. तिचं काम वाढवून ठेवायचे मी.

कुठे तेलच सांड, कुठे डब्ब्याचं झाकण लपवून ठेव, कुठे नवीन आणलेलं वाणसामान दडव, कुठे गपचूप जावून गॅसवर काही ठेवलं असताना गॅस बंद कर, कुठे मीठाचा डब्बा लपव. पकडीचा दांडा वाकडा करून ठेव (ज्यांच्याकडे नवीन पद्धतीची चार बोटांसारखी पकड आहे त्यांना ही गंमत माहित असणार, पकड सरळ करेपर्यंत नाकी नऊ येतात). माझ्या पराक्रमांचा पाढा संपता संपण्याऐवजी वाढत जाई.

अशातच एक दिवस आई वैतागली आणि तिने मला तिथे यायला सक्त मनाई केली. मनाई करणार नाही तर काय बिचारी माझ्या उपद्व्यापामुळे बेजार झाली होती.

मी सुद्धा तिची आज्ञा शिरसावंद्य मानून जी तिथून बाहेर पडले ते सरळ.... नाही नाही.... युद्धावर नाही गेले, मी अभ्यासात रमले.

असेच दिवस गेले आणि मग आला तो एक दिवस.

जेव्हा आईने स्वतःहून मला बोलावले.

अहो काय सांगू त्या दिवसाची गंमत.

आईने मला थोडं थोडं जेवणाचं काम द्यायला केली सुरुवात.

अगदी बेसिक शिक्षण स्वयंपाकाचे पीठ मळण्याने सुरू होते.

मग काय बसले हातात घेऊन परात. पहिला दिवस म्हणून आईने पीठ काढून दिलं, मीठ घालावं लागतं नाही सांगितलं. पाणी हळू घाल म्हणाली तर पीठ एकत्र येईना; अडून बसलं. आईचा तोवर आदेश आलाच, "अगं, पाणी कमी झालंय." मी घाबरून भसकन सगळंच ओतलं.
पिठाचा गोळा होण्याआधी आईचा चेहरा बघून माझ्या पोटात गोळा आला. तरीही त्या पिठाचा गोळा काही माझ्याने झाला नाही.

असेच छोट्या मोठ्या चुका करत मी स्वतःपुरता स्वयंपाक करायला शिकले हो.

पण त्या प्रवासात केव्हा तव्याने मला गरम टाळी दिली.

तर केव्हा फोडणी माझं सौंदर्य पाहून जळून गेली.

कधी भाताची शिते कच्ची राहून त्यांची भुते मला भेडसावत राहिली.

तर कधी त्याच्या जागी पेज माता प्रकटली.

भाकरी माता तर अजूनही मला हवी तशी प्रसन्न झाली नाही. किती यत्न केले, नवस केले, गुरू केले, जप - तप - यज्ञ तेवढे करायचे राहिले.
पण अजूनही फुलणाऱ्या सडपातळ लुसलुशीत भाकरी माता माझ्यावर रुसुनच आहे. तिला म्हटलं रुसून का होईना तेवढ्यासाठी तरी फुग.
तरी काही नाही; एकवेळ करपेन पण फुगणार नाही असं ब्रीद घेतलं होतं तिने.

असे अनेक छोटे मोठे पराक्रम झाल्यावर शेवटी तो दिवस उजाडला जेव्हा मी कृतकृत्य झाले.

त्याच झालं असं; की आई आणि बाबा मला सोडून गेले एका कार्यक्रमाला.

अहो, मला अभ्यास होता ना म्हणून.

नाहीतर मी जातेच नेहमी.

आणि अचानक आले घरी पाहुणे. बरं, येऊन येऊन आले कोण तर काका आणि चुलत भाऊ. म्हणजे स्वयंपाकात मदत करू शकेल असे कोणीच नाही. तसे पाहुण्यांकडून काम करून घेत नाहीत पण थोडेफार मार्गदर्शन मिळाले असते तर.... पण आता आई घरी येईपर्यंत जीवाची बाजी लावून खिंड लढवणे आवश्यक होते. लगोलग जाऊन आधी आईला फोन केला.... जो लागलाच नाही. मग फोनचा नाद सोडला आणि नसलेला पदर कल्पनेत खोचून किचनच्या दिशेने पावले वळवली.

किचनमध्ये आले मात्र मग माझी उडाली तारांबळ, कारण एकट्याने जेवण करायचे नव्हते माझ्यात बळ.

का हा दिवस माझ्याच नशिबी आला, हा विचार ही मनात डोकावून गेला.

काय बनवायचे हे ठरवण्यातच गेला थोडा वेळ, भाजीचा आणि आमटीचा बसेना एकमेकांशी मेळ.

कुकर आधी लावला आणि डाळ ठेवली शिजत.
भाजी चिरायच्या आधी कणिक ठेवली भिजत.

इतक्यात कुकरची चौथी शिटी वाजली.
कुकरचा गॅस बंद करून मी बाजूच्या गॅसवर कढई ठेवली.

मी \"भाजी कुठली बनवूया\" या विचारात असताना भेंडी मला खुणावू लागली.
कढईत तेल गरम करत ठेवून, पटापट घेतली चिरून.
गरम तेलात माझी फोडणी जशी चुरचुरली.
बाहेरून दर्दी चाहत्यांची एक शाबासकी मिळवली.
कढईत ठेवली भाजी शिजत, तिंबून तयार पोळ्यांचं पीठ हळू हळू मळत.

कोशिंबिरीसाठी सुद्धा काकडी चोचवून घेतली. इतर सगळी तयारी करून मस्त दाण्याचं कूट (आईने तयार ठेवलं होतं हो) घातलं.

सराईतपणे तवा ठेवून दुसरा गॅस पेटवला.
पोळपाट आणि लाटण्याने पिठाच्या छोट्या गोळ्यांचा समाचार घेतला. हलके - फुलके फुलके गॅसवर फुलू लागले. त्यांना पाहून मला माझे बालपणीचे रुसणे आठवले. आठवणीने तयार भाजी खालचा गॅस बंद केला. तिच्या जळकेपणाचा अनुभव जो होता मला.

एक एक करता करता झाले सगळे तयार.
गोडाचे काही करायला मात्र मन नव्हते होत तयार.

फ्रीजमध्ये डोकावून मग गेले आईला शरण, आईच्या दुरदृष्टिपणाचाचे कौतुक करत श्रीखंडाचा डब्बा काढून ठेवला आणि आमटी करून जेवणाची तयारी करायला घेतली.

काका आणि चुलत भाऊ दोघांनीही जेवणाचे यथेच्छ कौतुक केले, माझ्यासोबत आईच्या शिकवणीचेही तेवढेच कौतुक झाले. जेवण झाले तसे दोघेही निघून गेले. मी ही ऐटीत आईची वाट बघत बसले. आई आणि बाबा आले तेव्हा त्या दोघांना सगळे इतिवृत्त रंगवून सांगितले, अगदी तसे जसे तुम्हाला आता सांगतेय. बाबांची शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडली. आई मात्र स्वयंपाक घरात जाऊन जोरात किंचाळली.

"अगं, जेवण बनवलंस की युद्ध खेळलीस इथे. किती हा पसारा? किती ती भांडी? कौतुक सगळं नंतर आधी हे सगळं आवर." आई ती आई शेवटी. शब्दात जरी जरब होती. डोळ्यात कौतुक लपवत होती. कौतुकाने मी फुशारून जाऊ नये हेच तिचे सुप्त कारण होते.

या सगळ्या अनुभवातून एक गोष्ट कळली जी मला आज तुम्हाला सुद्धा सांगावीशी वाटते. मुळात आपल्याला अगदी हॉटेलमध्ये मिळते तसे जेवण बनवता आले नाही तरी चालत असते परंतु बेसिक जेवण हे आलेच पाहिजे. कारण माझ्यासारखा हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो.

       अनुभवातून शिका, तोच मोठा गुरू.
       त्याची शिदोरी घेऊन, जाल संकटी तरून.


- © मयूरपंखी लेखणी

Copyright notice:

वरील साहित्याचे संपूर्ण कॉपीराईट्स मयुरपंखी लेखणीकडे रिझर्व्ह्ड आहेत. हे साहित्य वा या साहित्यातील मजकूर, भाग वा साहित्याचा आशय कोणत्याही प्रकारे (ऑडिओ, विडिओ, कॉमिक) व कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करण्याआधी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

साहित्यचोरी हा कॉपीराईट ॲक्ट, १९५७ अंतर्गत दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी दंडात्मक कारवाई होऊ शकते.

fb.me/mayurpankhilekhani

[email protected]


Disclaimer:

ही एक काल्पनिक कथा आहे. या कथेचे कुठल्याही सत्य घटनेशी साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कथा लिहिताना कथेच्या स्वरूपाचा विचार करूनच लिहिलेली आहे. या कथेत प्रसंगानुरूप लेखकांनी व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत आणि आवश्यक ते प्रसंग जोडले आहेत.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//