खळखळता प्रवाह !

Imaginary story of struggle n hope.


स्पर्धा - गोष्ट छोटी डोंगराएवढी (२८)

विषय - नवी दिशा , नवी आशा !

शीर्षक - खळखळता प्रवाह!

साहित्य प्रकार - ललित ( रूपकात्मक - काल्पनिक लिखाण)

एक प्रवाह होता. खळखळत वाहणारा झरा, त्याला ना कोणाची चिंता ना कोणाची भिती!

वाहणे हा एकच गुणधर्म , तेच कर्म व तोच धर्म!

त्या प्रवाहात असलेल्या स्वशक्तीपासून तोच अनभिज्ञ होता . . . अगदी कस्तुरीमृगागत!

जगाशी काहीही देणं घेणं नसलेला झारा पण मनात खुपशा सुंदर आठवणी साठवून ठेवलेल्या!

एकदा नजर पडली एका निसर्ग प्रेमी पारख्याची . . . त्याला या झर्‍यात अप्रतिम सौंदर्य आढळलं, तो गुंतला तिथेच . पाहून पाहून त्या झर्‍यावर प्रेम करायला लागला . त्या झर्‍याला हे सारं खूप खूप विचित्र वाटलं .
माझ्यामधे एवढं प्रेम करण्याजोगं काय आहे ? प्रश्नच पडला.

तो याचाच विचार करायला लागला , स्वतःचंच प्रतिबिंब स्वतःतच न्याहाळायला लागला. पारखी त्याला पहात राह्यला.
काही दिवसांनी तो पारखी तेथून निघून गेला. जेथे जाईल तेथे त्याने केवळ या झर्‍याची स्तुतीच सुरू केली. हे ऐकणारे सगळेजण भारावले. मनात त्या झर्‍यांला पाहण्याची इच्छा जागृत झाली.

आता त्या झर्‍याला पाहण्यासाठी लोकांची रिघ लागली, गर्दीच गर्दी! सर्वमुखी फक्त प्रशंसा, सौंदर्याचं वर्णन !

मग काय कवी त्यात विरह कविता, मिलनबेला शोधू लागला, चित्रकार हरवले रंग अन त्याचा ओघ शोधू लागले, गायक त्यांचे हरवलेले सुर शोधू लागले किंवा संध्याकालीन रागात हरवू लागले!
प्रसिद्धी वाढतच गेली आणि या झर्‍याच्या मंजूळ निनादात, खळखळाटात, अवखळ ध्वनीत संगीतकार संगीत शोधू लागले अन लय जपू लागले. प्रेमी युगुलं हवाहवासा एकांत शोधू लागले.

एकंदर काय तर झर्‍या भोवती ही तोबा गर्दी !

झरा या गर्दीने , एकटाच बावरून गेला.

डोळ्यात तराळलेले आनंदाश्रू.. काहीच बोलू देत नव्हते. जवळचंही कुणीच नव्हतं मनातला आनंद वाटून घेण्यासाठी...!

पण यानंतर एक मात्र झालं . . . मुक्तमणी नावाने प्रसिद्धी पावलेला हा झरा आता सावधपणे वागू लागला, वाहताना काळजी घेऊ लागला.

प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा विचार करू लागला.

या सगळ्याची जणु चटक लागली होती त्याला , व्यसनच जडलं.

आता प्रेक्षकांशिवाय त्यालाही करमेना, त्याचं सौंदर्य आता त्याला उमगत होतं , त्याच्या मंजूळ प्रवाह ध्वनीच्या मधुरतेची जाणीव त्याला झाली होती.
त्याच्या अस्तित्वाचा आताशा त्याला अभिमान वाटायला लागला.

झर्‍याचा मूळ भोळा साधा नैसर्गिक स्वभाव काही काळ लुप्त राहीला , काही गुण जणु त्याने स्वतः झाकले अन् स्वतः कडे खूप खूप लक्ष देऊ लागला .

त्याला पाहणारा प्रत्येक व्यक्ति हल्ली त्याच्यासमोरच त्याची अतोनात प्रशंसा करू लागला व माघारीही!
प्रसिद्धी वाढतच गेली ... पण अहंकार त्या झर्‍याजवळ फिरकलाही ही नाही.

काही काळ गेला आणि. . .

एकदा लांबून वाहत येणार्‍या नदीने आपला रस्ता वळवला व नदीने त्याला आधार दिला , जणु दत्तकच घेतलं.

वाहता वाहता नदीने त्याला स्वतःतच सामावून घेतलं, तरीही त्या झर्‍याचा वेगळेपणा त्या नदीतही जाणवत होता. झर्‍याच्या सामावण्याने त्या नदीला एक वेगळं रूप -स्वरूप प्राप्त झालं होतं.

उत्सुकतेने नदीला भेट देणारा प्रत्येकजण त्या झर्‍याच्या वेगळेपणाचं , त्याच्या उच्छृंखलतेचं , त्याच्या गतीचं कौतुक करायचा . . . पण त्या आधार देणार्‍या नदीला, त्या झर्‍याचं कौतुक नको होतं, तिला हवं होतं तिचं कौतुक, तिची प्रशंसा!

दरम्यान ऋतु बदलला अन झर्‍याचे चाहते पुन्हा यायला लागले , त्या हरवलेल्या झर्‍याला शोधू लागले.
त्याचे चाहते कवी, चित्रकार, गायक , संगीतकार सगळेच शोधू लागले, बोलावू लागले. तो अखेर त्यांना नदीत वाहताना दिसला , त्यांनी त्याचं वेगळे पण तिथेही हेरलं. ते सारे त्याला वेगळे होण्यास प्रोत्साहीत ही करू लागले. काहीजण त्याला त्याच्या जुन्या आठवणी सांगून , त्याचं जुनं सौंदर्य वर्णन करून त्याला फितुर करण्याचा प्रयत्न करू लागले.

पण

नदीला तो झरा हवा होता कारण त्याच्यामुळे तिचं सौंदर्य वाढलं होतं.

चाहत्यांना तो मुक्त हवा होता , अगदी पूर्वी सारखाच हवा होता.

चाहतेच त्याला हलकेच त्याच्या मोठेपणाची जाणीव करून देऊ लागले .

नदी त्याचवेळी प्रेमाच्या शपथा देऊ लागली. झरा गोंधळला. काय करावे समजेना ?

दोन्हीही हवं वाटत होतं, नदीचा आधारही व प्रसिद्धी ही!

खूपच विचाराअंती शेवटी झर्‍याला स्वतःची शक्ती कळाली आणि तो जोर लावून वेगळा झाला नदीपासून!

वेगळे झाल्यावरचे दिवसच निराळे. . . आताही तो विलोभनीय दिसत होता, खळखळाटातली मधुरता ही वाढली होती. त्याची प्रसिद्धी पुन्हा परत मिळाली.

प्रसिद्धी च्या झोतात असताना, आनंदाने खळाळताना, त्याच्या आप्तांनीच त्याला विरोध करायला सुरू केला!

त्याला ते बोचलं.

मग वाटेत अडथळे आणले गेले, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रवाह हा पुढेच वाहतो ना मग हा देखील कर्तव्य म्हणून वहात गेला , न जुमानता!

अडथळ्यांनी तो नमला नाही , त्याचं खळाळणं आणि मुक्त विचरण थांबेचना मग त्या आप्त रूपी विरोधकांनी जणु युतीच केली . यावेळी त्याचं वाहणं थांबवायचंच होतं म्हणून अडचणींचे भले मोठाले खडक, मोठ्या शिळांचा असा अडथळा उभा केला की प्रवाह विचारात पडला . . . यांचा सामना करू की थांबूनच जाऊ? आपलेच आप्त स्वकीय आहेत म्हणून त्याने नमतं घेतलं , गति कमी केली, मग जोर कमी केला आणि नमून हळूहळू वाहायला लागला. . . पण कितीवेळ करेल हे?
आता हळू वाहूनही तो थकला होता आणि त्याने एकदम वेग वाढवला पण जलराशीतषंथपणा आला होता. त्याच वेळी तो समोरचे अडथळे वाढत गेले आणि त्यांनी जणु मोठ्या बांधाचं किंवा धरणाचं स्वरूप घेतलं.

बस्स! झर्‍यांचं वाहणं पूर्णतः थांबलं. पलीकडे कोरडी ठक्क जमीन व अलिकडे झरा व त्याचा खळखळाट होता पण त्याचं सौंदर्य नष्ट झालं होतं .

झर्‍याचा अवखळपणा त्यागून असा अंत झालेला बघून प्रेक्षक हळहळायला लागले . गर्दी ओसरली. त्याचे डोळे अश्रूंनी उबडबले , तो दुखी होवून अश्रूत न्हाऊ लागला पण कुणालाच पर्वा नव्हती. त्यावेळी जवळचंही कुणी नव्हतं, कुणाच्या कुशीत शिरून रडायला किंवा खांद्यावर मान टेकायला. . . दुःख किती गिळणार?


सगळं संपत आलं होतं . . . पण अचानक ... त्या दुःखाने वेगळंच वळण घेत़लं. दबलेली किंवा दाबलेली मुक्त वाहण्याची इच्छा एकदम बळावली , सगळा जोर उफाळून आला.

जणु आकाशाने आवाज दिला- वाहणं हा तुझा स्वाभाविक गुणधर्म आहे ना . . . मग संग्रहीत करतोयस स्वतःला असा? का बलिदान देतोयस तुझ्या आनंदाचं? दुसर्‍यांच्या इच्छेखातर की दबावाखातर ?

"हे झर्‍या तुला प्रवाहित होण्याचा पूर्ण अधिकार आहे. . . पुकार मग बंड!"

बंड! बंड!
प्रतिध्वनी कानात व आसमंतात घोळू लागली.
झर्‍याने आतला वेग वाढवला, सगळे बळ एकत्रित केले अन् जोर लावला, झटक्यात वीज चमकावी तसा झर्‍याने बांध पार केला आणि मुक्तपणे कोसळू लागला.

दृश्य असं दिसत होतं की . . . .पूर्वी ठेचकाळत वाहणारा तो नाजूक प्रवाह थोडासा मधे थांबून उग्र रूप घेवून कोसळत होता. . . हे त्याचं रूप अप्रतिम दिसत होतं.

त्याच्या लुप्त होण्याने निराश होवून परत जाणारे त्याचे चाहते दुपटीने परतले. पुन्हा गर्दी व्हायला लागली.

त्या छोट्या प्रवाहाचा तो झरा झाला होता आणि आता झर्‍याने विलोभनीय धबधब्याचे रूप घेतले होते!

आता तो खूप आनंदी होता.

त्याचं सौंदर्य कैक पटींनी वाढलं आणि मनातला विश्वासही!

समाप्त

@स्वाती बालूरकर , सखी
कथाबीज - ३ मार्च १९९३
पुनर्लेखन - ०७. ०१ .२०२३

साहित्य प्रकार - ललित ( रूपकात्मक - काल्पनिक लिखाण)

(नोट- जवळ जवळ तीस वर्षांपूर्वी कॉलेजच्या रजिस्टर मधे लिहून ठेवलेलं हे ललित आज पुन्हा लिहून प्रकाशित करावं वाटणं म्हणजे माझीच मला दिलेली थाप आहे. )