खाली मुंडी आन पाताळं धुंडी
नर्मदा त्येपल्या यका हातात पाण्याचा हांडा आन दुसऱ्या हातात बारकुश्या पिंट्याचा हात घिवून घरातनं पाणी आणायला बाहीर पडली. दोन दिसामागं गावच्या आडावरली मोटार जळल्यामुळं गावच्या नळांस्नी पाणी यत नव्हतं. तवा रोज वापरायं लागणारं पाणी हापशीवरणं आणाय लागायचं. तशी ती रोज सकाळी सा वाजता उठूनचं पाणी भरून ठिवायची. पर आज तिला पाणी आणायला जराकसा उशीरचं झाला व्हता. धा वाजल्या आसतील. हापशीचा रोड गावच्या पारावरणं जायाचा. पारावं बरीचं माणसं बसल्याली आसायची. पाक आगदी वयात आलेल्या पोरानंपास्नं त्ये वयातनं गेल्याल्या म्हातारड्यांपातूर समदी जमात तथंचं चकाट्या पिटत बसल्याली आसायची.
तथं बसूनशान समदी पोक्ती माणसं गावच्या सरपंचापास्नं त्ये पाक देशाच्या पंतपरधानापातूर सर्व्यांची मापं काढायची. आन वयात आल्याली यंग पोरं गावात चालणाऱ्या लफडयांचा पाठपुरावा करायची. ह्येजी बायकू त्येज्यासंग, त्येजी बायकू ह्याज्यासंग, त्यो निम्म्या रातचा तिज्याकडं जातो, ही फोन करून त्याला बोलावती, उसात धरलं, ज्वारीत धरलं समदं आसलंच इशय त्या पाजण्यांचं. कामाधंद्याचा काय पत्ता न्हाई पर ह्ये आसलं कायबाय बोलायं लय त्वांड गाबड्यांस्नी. त्येदिशी बी आसाचं त्येंच्या चर्चेला उत आल्याला. तेवढ्यात नर्मदा तिज्या पोरासंग म्हंजी पिंट्याबराबर चालत तथनं निगाली.
तिला बगून बाब्या पाटदिशी कुजबाजला , “ ही बाय तेवढी यगळी हाय बगा. कुणाच्या आद्यात न्हायी मद्यात न्हायी. आपलं काम भलं आन आपली पोरं भली. नवरा इथं न्हाय तरी कुणाच्या उंबऱ्याला जात न्हाई बाय ही. सासूचा धाकचं हाय म्हणा तसा. हां पर मला जेवढं माहत्ये कनाय... लगा... ही लय यगळी बाय हाय. बाय कुठली ? गरीब गाय हाय गाय. मी बगतुय लगीन झाल्यापस्नं... वागणं बोलणं आक्शी समदं मापात. ”
“ हंम... यगळी म्हणं यगळी. आरं यक नंबरची हेंगाड़ी बाय हाय ही. खाली मुंडी आन पाताळ धुंडी... हां. खालच्या आळीचा किश्या माहत्ये ना ?... त्येज्याबरं चालू हाय ही धोंड. सारखं आपलं भावजी भावजी करून बोलवून घिती की घरी त्या किश्याला. कदी हिजा टीवीचं बिगाडतुयं तर कदी हिजा मिक्सरचं बिगाडतुयं. कदी हिज पोरगं उलाततंय तर कदी हीचं उताणी पडतीया. " इक्या नाक फुगवत म्हणला.
“ आं... उताणी पडतीया ? ” पव्या जरा डबल मिनींग सुर लावत म्हणला.
“ आरं म्हंजी आजारी पडतीया रं. आजारी पडणार ही... आन ह्येनला दवाखान्यात गाडीवनं न्येला त्यो किश्या डायव्हर. जणू त्येला ठिवलायचं हिनं. ” इक्या पुना राग राग करत बोलला.
“ आरं हो... आरं हो. किती तापशील लगा. पर मी काय म्हंतो...? तुज्या का पोटात दुखतंय यवढं. का तुला भेटना म्हणून. आं...” आसं म्हणून कमल्या पव्याच्या हातावं टाळी देत दात इचकत बोलला.
“ हंम... न्हाय पर यक दिवस हिला दाबणारंचं हाय म्या. तसं बी समदं गाव जेवतंयचं की. मंग आपलाचं का उपास त्येज्या मायला.” पाण्यानं भरल्याला हांडा डोक्यावं घिवून पिंट्यासंग मागारी यणाऱ्या नर्मदेकडं बगत सवताच्या छातीवं हात फिरवत फिरवत इक्या म्हणला.
“ त्येजा नाय इशय. बरं का. तू काय... तू बाबा हाय इमरान हाशमी गावचा. आणिक वरनं तुज्या तिथं तिळ. त्येज्यामुळं पाखरू कसं आपसूक तुज्या जाळ्यात वडलं जातंय. का वं ? आन यकदा का आंगाला आंग लागलं का गप बसावतंय का माणसाला. आवं त्येला सपनात बी लगटंच दिस्तीया. ” बाब्या आपलं इक्याला हारबाऱ्याच्या ढाळ्यावं चढवत म्हणला. बाब्याच्या बोलण्यामुळं समद्यास्नी हासायं आलं. मंग व्हय व्हय म्हणून समदी आपलं दात काढत, यकामेकाला टाळ्या देत तथंनं आपापल्या घराला निगुन गेली.
नर्मदा राजारामाची बायकू हुती. त्येंच्या लग्नाला चार वरंस झाली हुती. नर्मदा दिसायला लय देखणी हुती. आगदी सर्गातली आप्सरा. गोरंपान आंग, लाल लाल हॉटं, काळभॉरं क्यास, सडपाताळ बांदा, गोबरं गोबरं गाल, मोरावानी चाल, कोकिळेवानी आवाज, वागण्यात लाज म्हंजी समदं कसं परफेक्ट. एखाद्यासंग हासून बोल्ली तर त्येला दोन राती झोप लागायची न्हाय. ह्या कुशीवणं त्या कुशीवं फकस्त. समदं गाव म्हणायचं राजारामानं नशीब काढलं म्हणून. काढणार की वं ! ममयला गोदीत कामाला हुता आन त्ये बी मुकादम...हां...सादसूद काम न्हाय.
नर्मदा लय मोकळ्या मनाची हुती. जास्ती माणसांत मिसळायची न्हाई पर ज्यांच्यात मिसळायची त्येंला लय जीव लावायची. त्ये आपुन म्हंतो कनाय मनमोकळ्या सबावाची का काय...आंग तशी व्हती जरा. वळकीच्या माणसांसंग हासून खेळून बोलायची. मनात जास्त राग रुसवा ठिवायची न्हाई. पर तिज्या ह्या वागण्याचा गाववाले आता यगळाचं अर्थ काढायला लागले व्हते. त्येंला वाटायचं का ही बी तसलीचं हाय. पर नर्मदेला काय अजून याची कानोकान खबर नव्हती. ती आपलं तिज्या जगात खुश व्हती. समद्यांसंग बोलून चालून ऱ्हायाची. राजाराम ममयला आसल्यानं इथं गावाला फकस्त ती, तिजी सासू अन तिज पोरगं यवढीचं जण ऱ्हायाची. आडीनडीला मदत लागली तर त्येनं किश्याला सांगून ठिवल्यालं का घरी मदतीला यत जा म्हणून. किश्या राजारामाचा ल्हानपणापास्नं दोस्त व्हता ना.
यक दिवस गावात अफवा उठली का राजारामाची बायली आन इक्या संजबाच्या उसात रेडहँड गावले म्हणून. ह्यात काहीचं तथ्य नव्हतं ही गोष्ट इक्याला माहीत व्हती पर आता मागार घितली तर पोरांच्यात आपली काय इज्जत ऱ्हाणार न्हाई ह्या भ्यानं त्येनं बी नकळत ह्या गोष्टीला दुजोरा दिला. ज्यो कुणी इक्याला ह्येज्या बद्दल इचरायचा त्याला इक्या लाजून हसून उत्तर द्येचा. त्येज्यामुळं लोकांचा ह्या गोष्टीवरला इस्वास आजून पक्का व्हतं गेला. इतका की नर्मदेकडं लोक अधाशी नजरेनं पाहू लागले. तिला माणसांत, गावांत, रानामाळात फिरणं आशक्य व्हयाला लागलं. गावात तिज्या बद्दल फक्त यकच वाक्य बोलू जाऊ लागलं. खाली मुंडी आन पाताळ धुंडी म्हणून.
ही बातमी पाक ममयला पोचली. आन यक दिवस राजाराम ममय सोडून गावाला आला. गावात लोक चर्चा करू लागले का राजाराम हांडगा हाय म्हणून. त्येज्या गांडीत दम न्हाई त्येज्या बायलीला अवसानात ठिवयाचा. आन म्हणून ही बया रोज गावजेवाणं घालतीया. राजारामाला रोजरोज ह्ये आयकून वैताग यला लागला. किती बाऱ्या इशय टाळून न्येचा म्हणला तरी रोज त्येला नवीन फाट फुटतंच व्हतं.
मंग यक दिस त्येला ह्ये समदं असह्य झालं. त्यो रातचाच उठला आन धार लावून आणल्याली कुऱ्हाड त्येनं यका आंगावं झोपलेल्या नर्मदेच्या नरड्यावं हाणली. यका घावातंचं नर्मदेचं शीर धडायगळं झालं. आंगावं रगात उडल्याला राजाराम सकाळ हुईस तवर तसाच तिज्या उशाला बसून राहिला. सकाळ झाल्यावं राजारामाच्या आयनं आरडून वरडून गाव गोळा केला तवा समद्यास्नी ह्ये परकरंण कळलं. किश्याला जवा ह्ये कळलं तवा त्यो धावत पळत आला आन त्येनं “ तायी ” म्हणून मोठ्यानं हांबरडा फोडला. मंग तवा बाब्या, पव्या, इक्या आन कमल्या सवाली नजरंनं यकामेकाच्या तोंडाकडं बगायला लागली. आपुन कायतरी मोठी चूक केली आसं त्येंच त्येंलाचं मनापास्नं वाटाय लागलं.
------- विशाल घाडगे ©™✍️
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा