Oct 22, 2020
स्पर्धा

केतकीच्या वनी, नाचला ग मोर भाग-८

Read Later
केतकीच्या वनी, नाचला ग मोर भाग-८

केतकीच्या वनी,नाचला ग मोर भाग-८
मुकुंदा सुखरूप घरी परतला म्हणून अक्काबायने गणरायास नैवद्य म्हणून नाही उकडीचे मोदक केले होते जेवताना मुकुंदाने दोनच मोदक खाल्ले पाहून.
"काय मुकुंदा तुमच्या खास आवडीचे मोदक आहेत आणि दोनच मोदकात पोट भरले आज?आनंदात भूक तहान हरली का वाटते."

 "होय आक्काबाय तसंच समजा हवं तर , एवढ्या लांबच्या प्रवासाचा शीण ही क्षणात विरला आमचा.त्वरित उत्साहाने कामाला लागलोदेखील आम्ही."

"चिरंजीव जगातली सगळी सुख एकीकडे आणि पिता होण्यासारखं अवर्णनीय सुख एका बाजूला असतं.आपण जबाबदार पुरुष झालो ते तेव्हाच उमगते.हळुहळु कळेलच  तुम्हास ".

 "तात्या वाड्यात दिंडी दरवाजाच्या बाजूने उघडणाऱ्या खोलीतच रुग्णालयास प्रारंभ कराव
याचा मानस आहे. आमचा निर्णय योग्य आहे ना?

शीघ्र चांगला मुहूर्त काढून वैद्यकशास्त्राचे आराध्य धन्वंतरी पूजन करून रुग्णसेवेस प्रारंभ करावयास काही हरकत नाही,त्यासोबतच सुनबाईंचीही काळजी घ्या. नाहीतर रुग्णसेवेत आपल्या मंडळींची सेवा विसरायला.

वेणूस प्रातकाळी एक प्रहर जास्तच उसाचे येत.आतडी पिळवटून उदरात साधे जल सुद्धा ठरत नसे.त्यामुळे मलूल होऊन माडीवरच्या खोलीत निजून राही. थोडे बरे वाटले, अंगी तरतरी आली की सैपाक घरात येऊन जमतील तशी कामे करीत असे. उमाबाई अक्काबाई तिला जमेल तेच कामे करायला सांगीत. दोघी वेणूची सर्वोतपरी काळजी घेत होत्या आक्काबायने तर वेणूच्या खास आवडीचा पदार्थ बनवण्याचा सपाटाच लावला होता.दुपारच्या वेळी मन रमावे म्हणून उमाबाई पुराणातील ,रामायण ,श्री कृष्णाच्या बाललीला अशा विविध गोष्टी वेणूस सांगत असत.

शुभ मुहूर्तावर मुकुंदाच्या रुग्णालयास प्रारंभ झाला होता ज्ञान, उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर योग्य उपचार मुकुंदा रुग्णावर करीत असे . संपूर्ण पंचक्रोशीत मुकुंदाने कमी कालावधीतच नावलौकिक मिळवला होता .मुकुंदाचा  आता निष्णात वैद्यक तज्ञ मुकुंदराव झाला होता .

उमाबाईंनी वेणूचे चोर ओटी भरली ,हाती हिरवा चुडा चढविला .मग पाटनकरांकडे आनंदाच्या बातमीचा सांगावा धाडला.निरोप ऐकताच नाना-सुलभाताई लगबग करत खाऊच्या दुरड्या घेऊन देशमुख वाड्यात हजर झाले.

वेणूस सुलभाताईंनी मायेने जवळ घेतले. आरोग्याची विचारपूस केली.वेणूने आईच्या मांडीवर डोके ठेवले.
वेणूच्या केसात हळूच हात फिरवत सुलभाताई बोलू लागल्या..." हेच खरे जीवन सार्थकी लागण्याचे  क्षण असतात.आई होणं हे देवाने दिलेले वरदानच असतं. उद्याचा भविष्यकाळ आज गर्भात हुंकार भरत असतो. आपल्याच गर्भात आपल्याच रक्त मांसाचा गोळा आकार घेत असतो म्हणून आनंदी हसती खेळती रहा.तू जर आनंदात राहिले तर गर्भातील जीवही सुखावेल.काळजी घे तशी तुला मायेने जपणारे घरातली माणसे आहेतच पण स्वतः देखील जपून वागावे. देशमुखांच्या रिवाजानुसार तुझे बाळंतपण इथेच होईल आम्ही अधूनमधून येतच राहू".
वेणूचे लाड कौतुक ,चार हिताच्या गोष्टी सांगून पाटणकर मंडळी परत गेली.

वेणुचा बऱ्यापैकी त्रास कमी झाला होता.औषधी मात्रा, योग्य काळजी चालू असल्याने तब्येतही सुधारत होती. जमतील ते कामे करत असल्याने अंगी तरलता ही होती.कलाकलाने गर्भ वाढत होता.तशी वेणू मोहरत होती.

मुकुंदा माडीवरच्या खोलीत येण्याआधीच आज वेणू गाढ झोपी गेली होती. गर्भार वेणूचा निरागस चेहरा पाहून मुकुंदास भरून आले.आपण वडील होणार ही भावना हृदयात उचंबळून आणत होती.तात्या म्हणत होते तेच खरे पिता होण्याचं सुख साऱ्या सुखपुढे फिके आहे. किती आनंदाला मुकलो असतो आपण ?काय वेडेपणा होता आमच्या मस्तकात.?सुदामा तर आम्हाला पळपुटा म्हटला होता ..मर्मावर लागले होते त्याचे बोलणे.पण सत्य तेच होते .पण आता नाही.येणाऱ्या बाळाची, देशमुख घराण्याची जबाबदारी योग्य रीतीने आपण पार पाडू. घराण्याच्या मानसन्मान उंचीवर नेऊ.किती अवघडल्या आहेत या नीटसे चालताही येत नाही खरेच किती सहनशील असतात स्रिया ?जणू हा गुण उपजतच असतो त्यांच्यात ....कदाचित म्हणूनच स्त्री अधिकच कणखर बनत जात असेल .काही दिवसात डोहाळे जेवणाचा थाट  होईल .आपण काही,कसले कमी पडून द्यायचे नाही.सगळे आनंदाने करूयात.भावी आयुष्याचे इमले रचत मुकुंदा निद्राधीन झाला.

 वेणू उदरास आधार देत संथ पावले टाकीत सैपाक घरात आली.उमाबाई भाजी निवडत बसल्या होत्या. वेणूही मदतीस बसली."सुनबाई काय खावेसे वाटते आहे? इथे सगळी आपलीच माणसे आहेत,हक्काने सांगा ह" कालच गौरीस करंज्या घेऊन गेलो होतो आम्ही .तिला म्हणे सारखे आंबट-गोड खावेसे वाटतेय.करंज्याचा डबा पाहून हरखली तीे लगेच एक तोंडात टाकली देखील तिने.

आम्हास सगळेच खावेसे वाटते असे काही विशेष नको. गौरीसाठी तुम्ही करंज्या घेऊन गेलात खूप आनंदी झाली असेल ती.तेे दोघे उभयंता पोरकी आहेत. कोणी मोठी माणसे नाही घरात.बऱ्याच वेळा मनातली खंत बोलून दाखवायची आम्हाला.आता कधीची भेट नाही आमची.

आक्काबाय सैपाक घरात येत म्हणाल्या काही काळजी नका करू आपल्या सखीची ...आम्ही सगळे लाडकोड पुरवतो आहेतच गौरीचे.सतत काय हवं-नको विचारपूस करीत असतो. तू तशी ती आहे आमच्यासाठी.मनाची खंत सोडा बघू ,आनंदी राहा. कोणता पदार्थ बनवायचा  तुमच्यासाठी?
    "आम्हाला अंबाडीची कणेरी खावीशी वाटते आहे."
"अगबाई! उमाबाई तुमच्या सुनेचे डोहाळे तुमच्या सारखेच दुसरा मुकुंदा येतो की काय जन्माला."

" होय बाई, मुकुंदाच्या वेळी दिवस भरते आले तेव्हा आम्हासही अंबाडीची कणेरी खावीशी वाटायची  पण त्या ऋतूत आंबडीची ओली भाजी मिळणार कुठून.. मग आमच्या स्वारीने बागेतील एक संपूर्ण भाग अंबाडीची बी पेरली.अन त्यास रोप कधी येईल याची आतुरतेने वाट पाहत तेथेच रोज घटका घालवीत. मुकुंदा एक महिन्याचा झाला तेव्हा त्या पेरलेल्या बी मधून इवली दोन पानांची रोपे उगवली.आम्हा सगळ्यांना हे असे होणार ठाऊक होते पण स्वारींचा उत्साह पाहून आम्ही कोणी बोललो नाही. पण पदराआड हसू मात्र दाबीत होतो."
 आमच्या सासूबाईंनी वाळलेली भाजी पाण्यात भिजवून अंबाडीची कणेरी करून दिली होती आम्हास. पण आता मिळेल ताजी भाजी.गड्याकरवी शेतातून मागवून घेतो. आज दाणे भिजवून उखळात कांडून घेतो.उद्या सकाळी आंबडीची कणेरी मनसोक्त खा.

 "उमाबाई थांबा गड्याकरवी नाही तर तात्यांना सांगूया अंबाडीची भाजी आणावयास. बघूया भाजी आणतो की बी पेरतो?"
असं अक्काबाई बोलताच तिघी खळखळून हसल्या.
 क्रमशः
 ©
आपल्या परिचयाच्याच
चौधऱ्यांच्या सुनबाई(गायत्री)
भेटू पुढच्या भागात,
छान छान वाचत राहुया आणि आनंदी राहू.