केतकीच्या वनी,नाचला ग मोर भाग-2

Story of aafter married love life.

    केतकी च्या वनी,नाचला ग मोर- भाग २

कथेचा पार्श्वभाग थोडक्यात ...
   अक्काबायच्या बोलण्यान वेणूने लाजून मान खाली घातली ,आम्ही आलोच म्हणत स्वयंपाक घरातून काढता पाय घेतला.
     थोड्याच अवधीत वेणू च्या हुंदक्यांचा आवाज येताच अक्काबाय आणि उमाबाई लगबगीने स्वयंपाक घरातून बाहेर आल्या.
     आता पुढे...

मुकुंदा चढ्या स्वरात वेणूस बोल लावत होता.
वेणू घाबरून खाली मान घालून अश्रू गाळत थरथरत होती उमाबाईंनी दोघांच्या समक्ष येत विचारले "मुकुंदा, झाले तरी काय एवढे संतापायला?"
   आम्ही ज्ञानसाधनेस माडीवर निघालो होतो, या कोणत्या धुंदीत असता काय माहित?धावत येउन धडकल्या आम्हास. आमच्या हातातील वैद्यकशास्त्राचे साहित्य ,पुस्तके पडले ना भुईवर, काहींची तर मोड मोडतोड पण झाली बघा. मग आम्ही संतापू नाहीतर काय करू?
   असे झाले होय!.हे बघ मुकुंदा चूक प्रत्येक माणसाकडून होते.आपण माफ करून मोठेपणा दाखवायचा. त्या चुकून धडकल्या असतील. तुम्ही समोर आहात हे लक्षात आले नसेल त्यांच्या, त्या काय स्वतःहून करणार आहेत का असे? 
   चला जा बघू तुम्ही माडीवर .वैद्यकशास्त्राचे नवीन साहित्य मागवून घ्या. हवं तर सुनबाई कडून व्याजासह वसूल करून घ्या. उमाबाई गालात हसत म्हणाल्या.    आईच्या बोलण्याचा रोख मुकुंदास समजला.
पुढे  काही न बोलता मुकुंदा गुपचूप माडीवर निघून गेला.

  अक्काबाई ने वेणुस जवळ घेतले. प्रेमाने डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाल्या जरा पुढे बघून चालाव .पुरुषांची याबाबतीत सहनशक्ती बायकांपेक्षा जरा डावीच असते म्हणून ते शीघ्र संतापी असतात. एखादा असतो वाळ्याच्या थंड जला सारखा शांत आणि हे काय भित्री ससुली झाली आहेस?पती आहे तुझा. भांड्याला भांड लागून आवाज होणारच आपण फक्त वाजणार भांडण अलगद बाजूला ठेवायचं म्हणजे होणारा आवाज थांबतो.आवरा बरे तुमचे ते अश्रू.
  अक्काबाई ने वेणूस समजावून शांत केले. मला कापसाच्या वाती वळण्यास मदत करा .दिवेलागणीच्या आधी वाती वळून झाल्या पाहिजेत.


  सूर्यनारायणाच्या तांबडया किरणासह सुगीचा दिवस उगवला .
आज आम्हास फक्त फक्त चहाच द्या उमाबाई न्याहारी नको. काल खाल्लेल्या भोगीच्या भाजीने अजून मन तृप्त आहे.आहा... काय चविष्ट रुचकर झाली होती कालची भाजी.खरेच अक्काबायच्या हाताला सुरेख चव आहे .
    "नाही हो कालची भाजी सूनबाईनी बनवली होती खरंच छान झाली होतीे. अगदी मनापासून बनवतात त्या. काल तर वेगळ्याच रीतीने भाजी बनवली सूनबाईंनी . वांगी ,गाजर ,पोपटी, सोलाने, वाटणे ,तुरीचे दाणे एका माठात भरून जमिनीत पुरून वरतून खडखडीत निखारे ठेवले वाफ आल्यावर ओला मसाला घालून मस्त तीळीची खमंग फोडणी घातली अन चटकदार भोगीची भाजी बनवली.
  आम्ही आणि अक्काबाय हे सारं पाहून भारावूनच गेलो. पोरीला भारी हौस आहे नवनवीन जिन्नस बनवण्याची, शिकण्याची .

    माणसाचं मन जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातून शिरतो माहिती आहे वाटत सूनबाईंना ?तात्या चहाचा घोट घेत म्हटले .
 सूनबाईंचाही तोच प्रयास चाललाय सध्या.
"प्रयासाचे लवकर योग्य फळ मिळावे म्हणजे झाले".तात्या सुस्कारा सोडत उद्गारले. 

असो आज जरा उशिरानेच येऊ आम्ही घरी.तुमच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात आम्हा बापड्याचं काय काम?निदान सुनबाईंना आशिर्वाद देण्यासाठी तरी अंमळ वेळेत या आणि हो त्यांच्या माहेरचे मंडळी पण येणार आहेत काल सांगावा आलाय.
 असं असं पाटणकर मंडळी येणार आहेत तर ,मग तर वेळेत यावच लागेल.


  आक्काबाय सुनबाईंच्या हातची भोगीची भाजी खूप आवडली हो ह्यांना .मघाशी कौतुक करत होते .उमाबाई आक्काबाय जवळ येत म्हणाल्या.
   हो का !आपल्या हाताने कष्टाने बनवलेल्या पदार्थ खाणाऱ्याने समाधानी होऊन आनंदानं कौतुक केलं म्हणजे बनविताना आलेला शीण क्षणात विरघळून जातो बाईचा आणि पुन्हा उभारी येते हं. दुसरं काय हवं असतं बाईच्या जातीला .पण कौतुक मूर्ती सुनबाई कुठे आहेत सकाळपासून फिरकल्या नाही इकडं ....?
     बागेतील मोगऱ्याची फुलं काढायला पाठवले आहे आम्ही मंजू आणि त्यांना, छान फुलांचा गोफ बनवूया म्हटलं .परवाच्या प्रकाराने पोर हिरमुसलीय जरा. हौस झाली तर बरे वाटेल आणि त्यांच्या माहेरची मंडळीही येणार आहेत म्हणून सध्यातरी आनंदी आहेत.
सकाळीच आज नेसावयाची साडी हाती दिली त्यांच्या. साडी पाहून खूप हर्षित झाल्या सुनबाई.


 दिवाणखान्यात उत्सवमूर्ती वेणूस बसण्यासाठी खास व्यवस्था केली होती .आक्काबाय अन उमाबाईंनी मोठ्या हौसेने दिवाणखाना सजवला होता .
वेणू चे नाना,आई सुलभाताई , तसेच जवळच्या नात्या- गोत्याततल्या बायका हळदीकुंकवासाठी जमल्या होत्या. सोनेरी काठाची काळी चंद्रकळा साडी,अक्काबाय आणि उमाबाई ने बनवलेले हलव्याच्या पाटल्या, दोन पदरी मंगळसूत्र, शाही हार, नाकात नाजूक नथ,कानाशी शोभणाऱ्या कुड्या, कमरेस सुंदर मेखला, पायातील पैजणाने वेणूच रूप खुलून दिसत होतं .वेणू चंद्रासारखी साजिरी दिसत होती. मुकुंदा ची नजर कधी नव्हते वेणुच्या  रूपावर खिळली होती    
अक्काबाय आणि उमाबाईंनी बनवलेले हलव्याचे दागिने घालून वेणु चांगलीच हरखली होती .

 सुलभा ताईंना लेक जावयाचा मानपान-पूजा करावयाची होती म्हणून वेणू जवळ बसा अशी विनंती त्यांनी मुकुंदरावांस केलीे. काही अंतर राखत मुकुंदा वेणु जवळ बसला.स्वारींच्या निकटच्या बसण्याने वेणु मोहरली. सुलभाताईंनी लेक जावयाचे औक्षण केले .जावयास उपरणे, हलव्याची भीकबाळी, एक पदरी हार आणि हलव्याचेच नारळ देऊन मानपान केला. मग दोघांनी थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले. हलवा काटेरी होता पण क्षण सोनेरी देत होता उभयतांच्या जीवनात.
 नमस्कारासाठी नानांच्या पायावर दोघ झुकले सूर्यदेवतेचे मकरायन ,कणाकणाने उतरणारे उतरनिचे हे दिवस, अंधाराकडून ज्योतिर्मय होणारा हा सुगीचा काळ तुम्हास संसारात फलद्रूप पावो. नानांनी मन भरून आशीर्वाद दिला .
   छान पुरणावरणाचा स्वयंपाक होता. पाहुणे मंडळी भोजनास बसले.

   परतीस निघताना सुलभाताई विहिणबाईस म्हणाल्या तुमची परवानगी असेल तर दोन-चार दिवस माहेरपणाला घेऊन जाऊ का वेणूस? पहिल्या मूळानंतर ती माहेरी आलीच नाही ना ?दोन दिवसांनी आमची ज्येष्ठ कन्या पण येतेय माहेरी ,दोघी बहिणीची गाठभेट होईल म्हणून म्हटले हो .
    हे उतरणीचे दोन दिवस जाऊ देत मग खुशाल न्या.तस ही दोन-तीन दिवसांनी मुकुंदा ही वैद्यकशास्त्राच्या परीक्षेसाठी दोन वार पुण्यास जात आहे तो परतीस येईपर्यंत राहू देत माहेरी सूनबाईंस.
  उमाबाईंच्या बोलण्याने सुलभाताई सुखावल्या. लेक माहेरपनास येईल याचा आनंद त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता.

  हळदी-कुंकू ,संक्रांत सण कसा मनासारखा, डोळ्याचं पारणं फेडलं असाच पार पडला .उमाबाईंनी मीठ-मोहऱ्यांनी वेणू-मुकुंदा ची नजर उतरवली. 
   तिळीच्या कणा एवढा का होईना मुकुंदाच्या मनात वेणू विषयी गोडवा निर्माण झाला होता. नववधूचे हलव्याच्या दागिन्यांनी सजलेली ते रूप बघताक्षणी मोहीत करणारच होत. हलव्याच्या गोडव्यानेे दोघांच नातं फुलणयास सुरुवात झाली होती...


      मुकूंदा आहेस का रे घरी ?...बालसवंगडी सुदया चा आवाज ऐकताच मुकुंदा माडीवरून धावतच खाली आला. हर्ष उल्हासाने दोघ सवंगड्यांनी एकमेकांना मिठीच मारली.काय कसं काय चाललंय नवीन संसार मित्रा ?सुदाम्या ने विचार विचारले. 
     बर झालस तू आला आहेस, सांगतो तुला माझी दुवीधा
मनस्थिती. काय करावे कळत नाही रे.?...एकिकडे.......

क्रमशः
लेखिका ,
आपल्या परिचयाच्याच,
चौधऱ्यांच्या सुनबाई(गायत्री)

भेटीगाठ :
  सस्नेह वाचक,
      आजच्या भागात वेणूचा पहिला संक्रांतसण साजरा झाला.आपल्याही अशाच काही आठवणी असतील ना?लग्न झाल्यानंतर च्या पहिल्या सणाच्या?
बरे .
भेटू पुन्हां.
छान- छान वाचत राहा अन आनंदी रहा .