केतकीच्या वनी,नाचला ग मोर भाग -४
कथेचा पार्श्वभाग थोडक्यात:-
सुलभाताई ,नाना ,सुमा ,वेणू गप्पा मारत बसले होते .
वेणूच्या बालपणीच्या आठवणीने चौघ खळखळून हसले.
दोघी लेकींना असे हसताना पाहून नानांच्या डोळ्याच्या पाणकडा ओलावल्या.त्यांनी वेणूस विचारले "सुखी आहेस ना पोरी"? सोन्यासारखी पोर दाववणीला तर नाहीना बांधली आम्ही ?
नानांच्या अवचित प्रश्नाने वेणू विचारात पडली.स्वारिंची अट, विलायतेस जाण्याचा मानस याबद्दल नानांना कळाले तर नसेल ना?विचाराने ती स्तब्ध झाली.
वेणूला असे शांत पाहून सुमाताई तिला कोपर मारत म्हणाली,
"आहो देशमुख बाई कुठे हरवलात?आत्ताच पोचल्या वाटते देशमुख वाड्यात?नाना त्वरित सोडा बाई ह्यांना सासरी.
"हो...हो भगवान श्रीकृष्णा कडून गरुडयान या मागवायचे का प्रस्तानासाठी आपण? म्हणजे देशमुखांच्या सुनबाई घटकेत सासरी पोचतील." सुलभाताई वेणूस चिडवत म्हणाल्या .
जा बाई तुम्ही सारेच आमची थट्टा करताय.आम्ही जातोच आता येथुन.
प्रातः काळी पहिल्या प्रहरी सुलभाताईंनी वेणूचीे
नारायणपेठी साडी, खणा-नारळाने माहेरवाशीण म्हणून ओटि भरली.देशमुख घराण्याला शोभतील अशा काही भेट वस्तू,जिन्नसांनी भरलेल्या दुरड्या सारे काही बांधून दिले.
सासरची ओढ असली तरी माहेरून जाताना डोळे भरून येतातच.वेणूची टपोरे अश्रू पुसत सुलभाताई म्हणाल्या. "पाटणकरांची आबा आणि देशमुखांची शान सांभाळ. सुखाने संसार कर".
वेणूने सुमाताई ची गळाभेट घेतली आणि नानांसह बग्गीत जाऊन बसली .
सुखी संसाराची गुलाबी स्वप्ने घेऊन वेणू सासरी निघाली होती खरी पण नियतीने पुढे आयुष्याच्या तबकात काय वाढून ठेवले हे याची धास्ती मनाने घेतली होती.
पंधरा दिवसात देशमुखांच्या घरी बरेच काही घडून गेले होते . वाड्यात शिरता क्षणी मंजूवन्सनी सारी इथंभूत माहिती वेणुस दिली.आनंदाची गोष्ट म्हणजे मंजू वन्स चा विवाह ठरला होता. विवाह मुहूर्त काही दिवसातच असल्याने सगळे कंबर कसून कामाला लागले होते.
गोड लगीन घाई ची कामे चालू होती .वेणूच्या येण्याने उमाबाई ना हायसं वाटलं. जणूकाही त्या तिचीच वाट पाहत होत्या.
वेणू मात्र स्वारिंच्या वाटेकडे डोळे लावून बसले होती. सुदामा-गौरी मधून मधून घेऊन विचारपूस करून जायचे वेणू आणि गौरीचे चांगले गुळपीठ जमले होते त्यांच्या लहानग्या विनायक ने तर सगळ्यांनाच लळा लावला होता
वेणू चातकासारखे मुकुंदाच्या आगमनाची वाट पाहत होती.रात्री निजावयास गेेले तरी डोळ्याला डोळा लागण्याचे नाव घेत नव्हते.
असेच आज पहाटेच्या पहिल्या प्रहरी सडा-सारवण, रांगोळी काढून झाली,अंगणातल्या तुळशीवृंदावनात दिवा लावून डोळे मिटून तुळशीला मनातले भाव सांगून वेणू आळवत होती. तोच बगीच्या घोडे टापांची चाहूल लागली. वेणूच्या चेहऱ्यावरचे भाव सर सर बदलू लागले कारणही तसेच होते .आज सूर्य देवतेच्या आधी साक्षात पती देवांचे दर्शन तिला झाले होते .वेणू सैरभैर झाली .
वेणूला पुतळ्यासारखे उभे पाहून उमाबाईनीं आवाज दिला "सुनबाई अशाच न्याहाळत बसल्या तर तुमच्या स्वारिंच्या च्या अंगावरून भाकरतुकडा कोण उतरवणार?" सासूबाईंच्या बोलण्याने वेणू भानावर आली .लाजून पटकन भाकरतुकडा आणावयास घरात गेलीे.
मुकुंदा आल्याने लग्नकार्याच्या कामात जोरात उत्साह संचारला. रुखवत तयार झाले, हळद उखळात कुटून झाली, जात्या-मुसळची पूजा झाली. सगळीकडे मान मरातबिने आमंत्रण गेले.
एका संध्याकाळी तात्यांनी मुकुंदास दिवाणखाण्यात बोलवले उमाबाई ,अक्काबाय आधीच उपस्थित होत्या .
"हे बघा चिरंजीव आता तुमची वैद्यकशास्त्राचीे परीक्षा झाली.त्यात तुम्ही यशस्वी व्हालच खात्रीच आहे आम्हाला. परीक्षेचे प्रमाण आल्यावर आपल्या धान्यपेढी जवळच अथवा वाड्याच्या एका खोलीत चिकित्सालय उघडून रुग्णसेवा सुरू करावी असे वाटते.आता संसाराच्या कर्तव्याकडे बघा जरा."
मध्येच अक्काबाई बोलल्या," माझ्याकडे बघून तरी जाण्याचे खूळ डोक्यातून काढ बाबा. माझे यजमान अर्धवट संसार सोडून विलायतेस गेले ते अजूनही परतिस आले नाहीत. भरल्या कपाळाची असनाही विधवे सारखे मी जीवन जगते आहे.काय अर्थ आहे असे जगण्याला तूच सांग? वेणूच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून आम्ही समजावतोय तूस. तू तिकडे गेला तर आम्ही कोणाकडे पहावयाचे "म्हणत आक्काबाय ने डोळ्याला पदर लावला.
विलयात का जवळ आहे बाबा तिकडे गेलेल्या माणसाचा ना निरोप, ना सांगावा, ना काही थांगपत्ता लागतो उमाबाई करुण स्वरात उद्गारल्या.
असंच बराच वेळ तात्यांनी मुकुंदास महत्त्वाच्या गोष्टी समजून सांगितल्या.
देशमुख वाड्याच्या अंगणी सनई -चौघड्यांचा मंगलसूर दुमदुमू लागला.मंजुच्या चेहऱ्यावर हळदीचे तेज दिसू लागले .
मंजू वन्सचे लग्न बघतांना वेणुचा डोळ्यासमोर स्वतःचा लग्नसोहळा चलचित्रासारखा तरळला.
मुकुंदाची भिरभिरती नजर वेणूला शोधत होतीे.
आज वेणू छान गुलबक्षी रंगाच्या तलम पैठणीत सगळा साज लेऊन सजली होती .स्वारिंची नजर आम्हास पाहण्यासाठीच भिरभिरते याची जाणीव होताच वेणू नखशिखांत शहारली .
तात्यांनी समजवल्या पासून मुकुंदाच्या वागण्या-बोलण्यात बराचसा फरक जाणवत होता.
"आम्हास जरा उपरणे शोधून द्या बरें ." मुकुंदान वेणूस हळूच आवाज दिला.
सकाळीच तर उपरणे मेजावर वर काढून ठेवले होते. स्वारिंना कसे सापडत नाही? विचारात वेणू खोलीत आली. उपरणे समोरच दिसले ते उचलून देण्यास वळाले तर समोर डोळे विस्फारून ,पापणी अनिमिष नेत्रांनी पाहणे होत होते .वेणून लाजून मान एकीकडे वळवली.
"अहो डोळे भरून पाहून तरी द्या तुमचं हे मोहिनी रूप. खूप अतीव सुंदर दिसताय गुलबक्षी रंगाची ही पैठणी शोभून दिसते आहे तुम्हास. मंडपात भारी वर्दळ आहे बुवा तुम्हाला मन भरून पाहताच येत नव्हते म्हणून उपरण्याचे निमित्त करून बोलावले "
वेणूच्या मुखातून शब्द फुटेना सा झाला,श्वासांची लय जोरात वाढली , पण स्वारिंचे बोलणे कानास गोड वाटत होते.
"पुण्याहून येताना आम्ही तुमच्यासाठी भेटवस्तू आणली आहे. तुमच्या सौंदर्य साजात थोडा आमचाही वाटा असू देत."वेणूच्या हाती लाकडी डबी देत मुकुंदा म्हणाला.
वेणूने हळूच डबी उघडली आत सुंदरसा गुलाबी मोत्यांचा नाजूक बाजूबंद होता .डबीतून काढून नाजूक बाजुत अलगद माळला .
"खूप सुरेख आहे.आम्हास आवडला दागिना ".
आणि आम्ही?
प्रश्नाचे उत्तर टाळीत वेणू : "आता आम्हास मंडपात जाऊ देत सासुबाई शोधत असतील"
वेणु मान वर न करताच खोलीतून बाहेर आली.
खरेच गुंतलो आम्ही तुमच्यात. तुमचं असंण आम्हास हवेहवेसे वाटतेय. मुकुंदा पाठमोऱ्या वेणू कडे बघत मनाशी म्हणाला .
वेणू नंतर मुकुंदा खोलीतून बाहेर पडताना उमाबाईंनी पाहिलं आणि त्या समाधानाने हसत आक्काबायला म्हणाल्या शास्त्रीबुवांकडून लवकरच ऋतूशांती पूजनाचा मुहूर्त काढावयास हवा आता.
वाजंत्री च्या स्वरात मंजू सासरी गेली .दोन दिवसात मांडव परतणीही झाली.
आज घरात ऋतू शांती होम असल्याने नैवेद्यासाठी वेणू पुरणपोळ्या करत होती. पोळी लाटताना तिला आईचे बोल आठवले. उभयतांचे सहजीवन हे या पुरणपोळी सारखेच असते.कणकेच्या आवरणाने पुरण घट्ट धरून ठेवले तर पुरणपोळी सुरेख होते.तसंच सहजीवनात एकमेकांना धरून संसार फुलत असतो म्हणून दोघांनी कधीच आपल्या माणसाचा साथ सोडावयाची नसते .एकदा का आवरण सोडून पुरण बाहेर निघाले की संसार चव्हाट्यावर यायला वेळ लागत नाही . आपणही स्वारिंची आजन्म सावलीसारखी साथ देऊ. वेणू ने मनाशीच ठरविले .
ऋतू शांती होम सुरू झाला .शांतीमंत्राने वातावरण मंगलमय झाले.उमाबाईंनी पाच फळे आणि सुकामेव्यानि वेणूची ओटी भरली .
आज मुकुंदा -वेणू चा भारी थाट होता . पिवळया धम्मक नऊवारीत, कपाळी रेखीव कुंकूवात नववधू अगदी शोभून दिसत होती .मुकुंदा तलम शुभ्र सोवळ्यावर भरजरी शेला घेऊन दिमाखात वेणूच्या शेजारी पूजेस बसला होता .
उमाबाईंनी हळूच सुदामा -गौरीस माडीवरची खोली सजविण्यात पाठविले होते.
आज जेवणात पंचपक्वान्न केलेली होती. जेवताना सुदामा ची नजर गौरी कडे रोखलेली पाहून मुकुंदाने त्यास चिडवले. "काय नव्यासोबत जुने ही आठवणीत रमले वाटतं ".
"आम्ही जुने कुठे आहोत आमच्या विवाहास काही वर्षे झाली असली तरी प्रेमाचा पूर्णविराम होत नाही.खरेतर विवाहानंतरच संसारीक जीवनात प्रेम हळूहळू अधिकच उलगडू लागते."सुदाम ऐटीत बोलला.
"बरे ,बरे प्रेमयोगी आता सध्यातरी पंचपक्वान्नांचा आस्वाद घ्या,जी काही साधना असेल ती स्वगृही गेल्यावर करा .हे वाक्य वाढत असताना गौरीच्या कानी पडले. गौरी लाजून गोरी मोरी झाली.
थट्टा मस्करीत जेवणे आटोपले.
तिन्हीसांजेला जवळच्या मंदिरात जाऊन जोडीने दर्शनही देवदर्शन ही झाले.
केशर दुधाचा पेला वेणूच्या हाती देत उमबाई बोलल्या संसारतील गोडगुलाबी क्षण वेचून घ्या.कसलीही काळजी न करता जा माडीवर ...
वेणू लज्जा आणि भीती दोघी संमिश्र भावना मनात घेऊन हळूहळू पावले टाकीत माडीवर खोलीत आली .
वेणू च्या पैजणांच्या चाहुलीने मुकुंदास खोडकरपणा सुचला.खोलीतील गडद रंगाच्या पडद्यामागे तो दडून उभा राहिला.
वेणूला खोलीत स्वारी दिसली नाही म्हणून ती कावरीबावरी झाली.सगळीकड मान वळउन वळवून पाहून झाले पण स्वारिंचे दर्शन काही होईना.वेणूच्या कावऱ्याबावऱ्या नजरेला पाहून मुकुंदाने पाठीमागून जोरात भो....केले.
वेणू दचकली .कसला हा बाळबोधपणा ?किती घाबरलो आम्ही लटक्या रागात वेणू म्हणाली," हातातला दुधाचा पेला भुईवर सांडला असता तर ."
"सांडला असता तर बरेच झाले असते .आमचा आणि दुधाचा छत्तीसगड आहे बुवा ,तुम्हाला तर माहीतच आहे. आम्ही नाही घेेणार."
"मग या दुधाचं काय करू ?"
" वाघाच्या मावशी डोळे मिटून पिऊन घेईल की .
"मग वाघाचे मावसा काय पितील? खोचक स्वरात वेणू म्हणाली .
मुकुंदास हसू आले."हजरजबाबी आहात आमचा शब्द खाली पडू द्यायच्या नाही तुम्ही.आजच्या अशा सुगंधी क्षणी आम्ही तुम्ही बनवलेले सुगंधी जल घेऊ."
"आता या वेळेला सुगंधी जल"? कसे तयार करू ...आणि त्यासाठी फुले लागतात.."
"मग आहेत की खोलीत फुलेच फुले आहेत त्यातीलच थोडेस घ्या ."
बोलण्याच्या नादात आपण खोली न्याहाळलीच नाही हे वेणूच्या लक्षात आले ती चौफेर नजर फिरवून पाहू लागली .केतकी,निशिगंध, मोगरा फुलांच्या लांबचलांब माळा लावलेल्या होत्या .शिसवी लाकडाच्या दिवाणावर तलम अंथरुणावर गर्द लाल गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या.चौफुली चौरंगावर गुलाबी फुलांचा गुच्छ ठेवलेला होता.खाली मखमली गालीचा अंथरलेला होता ,संपूर्ण कक्ष फुलांच्या सुगंधाने दरवळून निघाला होता सुगंधित मोहवणार वातावरण आणि समोर स्वारी. सर्वांगावरून मोरपीस फिरल्याचा भास झाला तिला.
वेणूने एक माळेतील मोगऱ्याची फुले ,गुलाब पाकळ्या सज्जातं जाऊन स्वच्छ धुवून घेतल्या आणि तांब्यातील गार पाण्यात टाकून गुलाबाच्या काडीने छान ढवळून घेतले मुकुंदा समोर तांब्या धरत वेणू उद्गारली" सुगंधी जल ग्रहण करून घ्या"
सुगंधित जलतांब्या धरलेल्या वेणूच्या हातांसह तांब्या मुकुंदाने स्वमुखाशी लावला स्वारिंच्या हातांच्या अलगद स्पर्शाने वेणूच्या गाली गुलाबी रंगली... आणि प्रीतीच्या हिरवाईत,आनंदाच्या क्षणात युगल रममाण झाली....तुर्तास तरी पुढे.....?
क्रमशः
लेखिका :
आपल्या परीचयाच्याच,
चौधऱ्यांच्या सुनबाई(गायत्री)
गाठ-भेट
सस्नेह वाचक,
कथेतील शृंगार रस पूर्ण भाग बहुतांश वाचकांच्या आवडीचा असतो. कथेच्या शीर्षकानुसार कथेचा अविभाज्य भाग म्हणून क्षण शब्दात गुंफायचा प्रयत्न आहे बघा जमलंय का?.....
आवडल्यास लाईक,कमेंट जरूर करा.
भेटू पुन्हा ,
छान छान वाचत राहू आनंदी राहुया.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा