Login

केतकीच्या वनी, नाचला ग मोर भाग-३

Story of aftar married life.

   केतकीच्या वनी ,नाचला ग मोर भाग-३ 
कथेचा पार्श्वभाग थोडक्यात-
वेणूची पहिली संक्रांत छान पार पडली.मुकुंदा चा बाल सवंगडी त्यास भेटावयास आला .दोघांच्या गप्पा सुरु झाल्या.

आता पुढे-
    सुदामा इतक्या वर्षांनी इकडे कसा ?
   हो रे आई बाबा गेल्यावर मामाकडे गेलो. शिक्षण पूर्ण झाले आणि शिक्षकाची नोकरी लागली, आता इथल्याच शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे ,म्हणून कुटुंबासह आलो.
   म्हणजे तुझा विवाह पण झालाय ?

  मग मित्रा आणि ते पण तुझ्या आधी .मामाच्या गावातलीच गौरी मनात भरली. ती पण माझ्यासारखी पोरकीच .विनाआई बापाची . मामानं रीतसर मागणी घातली. तीच्या चूलत्यान लग्न लावून दिलं माझ्याबरोबर. आणि एकदाचा सुटला बिचारा कर्तव्यातून. मग काय सगळेच आनंदी आनंद .पाच वर्षाचा गोंडस विनायक आहे आम्हाला.एकंदरीत सुखाचा संसार चाललाय. इकडे आल्या आल्या समजले तुझा पण विवाह झालाय .इकडची खूप आठवण यायची रे , पण येण काही झालं नाही.

   बरं झालं तू आलास मी पण एकटा पडलों होतो .निदान तुझ्याजवळ तरी मनाच मळभ काढता येईल.
     काय रे मुकुंदा तुझ्या बोलण्यावरून तर वेगळाच अंदाज येतोय?
   तुला तर माहिती आहे बालपणापासून विलायतेस जाण्याचा मानस बाळगळाय मी .तिकडे जाऊन मला गोर्‍या साहेबासारखे  मस्त डोक्यात पसरट टोपी घालून ठेपेत राहायचं आहे. आणि इकडे तात्या- आईनं बळजबरीने बोहल्यावर उभे केले.आता कर्तव्य की मनातली मानस पुर्ती ?दोघं विचारात भरडला जातोय . म्हणून वेणू सोबतही अंतर राखून आहे मी. कारण एकदा गुंतलं पाय निघावयाचा नाही इथून.

अरे मुकुंदा ते गोऱ्यांचं भूत स्वार आहेच का अजून ? डोक्यातून ते भूत उतरव आधी. ज्ञान आपल्या मायभूमीत घेतोय आणि चाकरी त्या गोऱ्यांच्यादेशाची ?आता काही वरिस झाली सुटलीय आपली मातृभूमी त्यांच्या तावडीतून तुझ्यासारख्या पळकुट्यायांमुळे त्या गोऱ्यांचा फावत .आपल्याच माणसाच्या बुद्धिमत्तेवर ऐटीत राहतात ते लोक.आणि तिकडे गेलेला माणूस परत येणे नाही.
      काय रे एवढा शिकलास ना तू ?शिक्षण हे जबाबदारी खंबीरपणे शिरावर घ्यावयाला शिकवते.असा पळकुटेपणा नाही .आपल्या कर्तव्यातून अंग झटकायला नाही.आपल्या मातृभूमीची मनःपूर्वक सेवा करून खारीचा वाटा उचलू शकतो ना आपण. भरल्या घरातला तू , सोन्यासारखी बायको आहे.मायेची माणस आहेत आणि सर्व सोडून निघाला होय तू.
    या ,या पोरक्या माणसाला विचार आपली माणसं दूर गेल्यावर काय काय भोगावं लागतं ते .गहिवरल्या आवाजात स्वतःच्या छातीवर हात ठेवून सुदामा बोलत होता.

    आपण आपल्या तेजस्वी अस्मितेने  जगणारे माणसे आहोत.लाचारीचा एकही किंचितसा कण अंगावर बसला  की माणूस होरपळतो रे .रात पहाट एक करून प्रामाणिक पणे ज्ञानसाधना करतो आहेस ते काय कोणापुढे विकण्यासाठी?आपली शाही पगडी घालून, स्वकीयांची सेवा करत इथे या मातृभुमीचीे शान वाढवत सन्मानानं ताठ मानेने जगू शकतोच की.

   सुदामाने स्वतःचे अश्रू मान वळवून लपवले . फक्त एकदा प्रेमळ नजरेने बघ, तुझ्या बायकोकडे दोन आपुलकीचे शब्द बोल, मग बघ तुझ्यावरती स्वतःचा जीव ओवाळून टाकायला कमी करणार नाही. असो कधी जातोय परीक्षेसाठी? अभ्यासाची तयारी झाली असेलच ना?  

खरंतर सुदामाने वर्मावर घाव घातला होता .त्याचं बोलण काही अंशी पटू लागलंय असं मुकुंदाच्या चेहऱ्यावरून
 भासत होतं .पण किती काळ तग धरेल हे सत्य येणाऱ्या काळाच्या गर्भातच दडलं होतं . 
उद्या रामप्रहरी च निघायचे म्हणतोय.
बरं आल्यावर भेटतो सुदामाने गळाभेट घेतली .आणि घरी जाण्यास निघाला पण मुकुंदा विचारात गर्क झाला .


  प्रात काळी दिंडी दरवाजात बग्गी उभी राहिली.उमाबाई, वेणू ने  मिळून तहानलाडू ,भूकलाडू बनवले.मंजु ने खर्डा वाटून दिला. आक्काबाय ने गरम-गरम गूळ पोळ्या केल्या .उमाबाईंनी सारे सुती कापडात बांधून मुकुंदापाशी दिले .मुकुंदा देवघरात जाऊन गणरायास नमस्कार करून आला . तात्या- आई ,आक्काबाय च्या पाया पडला .
  व्यवस्थित आणि चांगली द्या परीक्षा. आपल्या घराण्याची सारी भिडस्त तुमच्यावर आहे याचे भान असू द्या.  तात्या मुकुंदाच्या माथ्यावर हात ठेवत म्हणाले .

    वेणून मुकुंदाच्या हातावर पळीभर दही ठेवले .हळूच आर्त नजरेने मुकुंदा कडे पाहिले त्याक्षणी मुकुंदा च्या  नजरेची एकच गाठ पडली .नजरेतच संवाद साधत मुकुंदाने निरोप घेतला .


  पाराजवळ बग्गी आली तिथे सुदामा उभा होता .
मुकुंदाने बग्गीवाल्यास बग्गी थांबवण्यास सांगितली .
दोघ गडी बोलू लागले .

मनापासून चांगली दे परीक्षा .तसं तू जिगरबाज आहेसच नक्की बाजी मारणार. त्यात काही शंकाच नाही .हा घे तुझ्या आवडीची शाईची लेखणी आणि दौंत.
  वा ...लेखणी हातात घेत आनंदाने मुकुंदा बोलला . आता बघच वैद्यकित आपला झेंडा फडकउनच येतो .अशी शाईची लेखणी शोधूनही गवसत नाही रे आता.
  हो ठावूक आहे मला म्हणूनच तुझ्यासाठी घेऊन आलोय बरं निघ तू आता . नाहीतर आपल्याला वेळ काळाचा  विसर पडायचा.


वेणू आणि थोरली बहीण सुमाताई माहेरपणास आल्या होत्या .सुलभा ताईंना काय करू आणि काय नाही असे झाले होते .रोज दोघींच्या आवडीच्या पदार्थांची नवनवीन बेत चालले होते .नानांचे घर कसं उत्साह,आनंदाने भरलं होतं.लेकींच्य, नातवंडांच्या येण्याने घरात कसं चैतन्य संचारलं होतं.

  सांजोऱ्या ,बोडे लाडवाची न्याहरी झाली आणि वेणू तिच्या आवडीच्या जागी पारिजातकाच्या झाडाखाली निवांत येऊन बसली .पण मन कसलं माहेरी थांबतय फुलपाखरासारखं देशमुख वाड्या भोवतीच भिरभिरत होतं निरोप घेताना स्वारींची ती नजर आठवली वेणू रोमांचित झाली .

 एका माणसाला कुणाची तरी आठवण सतावते वाटतं? सुमाताई वेणूजवळ येत म्हणाली .
   नाही हं सुमा ताई तुझं काहीतरीच भलते .
 बर सांग ऋतुशांती पूजा होम, गर्भदान सोहळा कसा झाला? 
 झाला नाही अजून. व्हायचांय. 

  म्हणजे? दोन मास झाले ना तुमच्या विवाहास? मग काय सोहळ्याच्या खर्च पाण्याची चिंता करताय  काय देशमुख मंडळी? माणसं तर चांगलं वाटली तशी . काही छळ-बीळ नाही ना करत तुझा ?
  नाही ग सुमाताई माझं नशीब थोर म्हणून खूप प्रेमळ माणसं भेटली मला.सासुबाई लेकी सारखीच माया करतात माझ्यावर.मंजू वन्स आणि माझ्यात कधीच भेदभाव करीत नाही.मंजू वन्स आणि माझी तर छान गट्टी जमली आहे. अक्काबाई मुखाने आहेत फटकळ पण पोटात मायाच भरलीये त्यांच्या. त्या दोघींनी मिळून हलव्याचे सुरेख दागिने बनवले होते आमच्यासाठी.सगळ्या हौशी कर्तव्य म्हणून नाही तर मनापासून पूर्तता करणार माझं आमचं सासर आहे.
     बरं झालं बाई दुसरं काय हवं असते आपल्याला. मुकुंदराव यांचं काय ?सोहळा का नाही झाला अजून?

  खरेतर तूर्तास विवाह करावयाचा नव्हता त्यांना ,आणि तात्यांना आमचे स्थळ हातची जाऊ द्यायचे नव्हते,म्हणून तात्या आणि सासूबाईंनी बळेबळे गळ घालून विवाहास तयार केले . मोठ्या अनमनीने ते तयार झाले खरे पण एक  अट ठेवली.

  अट?कसली अट ?विवाहित ब्रह्मचारी बनायचे आहे  की काय ?आश्चर्यचकित स्वरात सुमाताई उद्गारली.
  नाही ग ताई ! वैद्यकशास्त्राचा अभ्यास, परीक्षा पूर्ण होईपर्यंत वैवाहिक जीवनास सुरुवात करणार नाही अशी अट ठेवली.
    "आणि वेणू तू ही ते मान्य केलसं? "
          हो ,आमच्या विवाहानंतर लगेच तात्या आणि सासूबाईंनी याविषयी आम्हाला सविस्तर सांगितले होते आम्हास .त्यांचं म्हणणं पटलं मला .वैद्यकशास्त्राचे ज्ञानार्जन खूपच क्लिष्ट ,कठीण असते .त्यात कमालीची एकाग्रता असावी लागते .ठावूक आहे आम्हाला म्हणून आम्ही ठरवले की त्यांच्या ज्ञानसाधनेत कधीही व्यतय  आणावयाचा नाही म्हणून आम्ही माडीवर त्यांच्या खोलीतही जाण्याचे टाळतो.थोड्याच दिवसांची तर गोष्ट आहे.नाही तरी धीराचे फळ नेहमी गोड असते आणि आता प्रतीक्षा काही अवधीतच सरेलही .हळूहळू आमचं नातं फुलेल यात कण मात्र संदेह नाही.  सुमाताई हे सारे नाना-आईंना सांगू नकोस हं.ते उगाचच चिंता करत बसतील.
    बरे नाही सांगणार. चल आत मध्ये जाऊया. आई- नाना सोबत गप्पा मारू या .
  तुझ्या पोटात गोष्ट राहणार नाही ताई ,हे आम्ही चांगलं जाणतो म्हणून स्वारीचा विलायतेस जाण्याच्या इच्छे बद्दल तुला सांगणे आम्हास उचित वाटले नाही.मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होती.


    नाना ,सुलभाताई, वेणू ,सुमा चौघांचा गप्पांचा फड रंगला.
  वेणूने हळूच विषय काढला.उद्या सासरी निघावयाचं म्हणतो आम्ही .
     अजून दुसरा वार संपावयास दोन दिवसाचा अवधी आहे एवढी घाई कशाला ?सुलभाताई म्हणाल्या .

    आहो सुलाबाई वेणूस सासरचे  वेध लागलेले दिसतात .त्यांच्या स्वारिंच्या  स्वागताला त्या नको का तिथे नाना हसत-हसत बोलले.

  "तसं नाही हो नाना."

       तसं नाही मग कसं
      झऱ्यात डुंबे  म्हस 
      रुचकिनचा गळे रस 
      तुमच्या डोईवर......
      तुमच्या डोईवर गडूल जस ......
    नाना, सुलाभाताई, सुमा एका सुरातच बोलले
      नानां नि हाताची मूठ वाळत ,अंगठा वर करत वेणूच्या डोक्यावर गडूल केलं.
सगळ्यांचा एकच हशा पिकला.
    वेणू आज आम्ही नाही झालो गडूल . तुम्ही झालात.
 पुन्हा सगळे जोर जोरात हसायला लागले .
वेणू तू तुझ्या बालपणी दिवसभरात सगळ्यांना असं गडूल करून सोडी .सुमाताईला तर दिवसभर नुसतं भंडावी.

   खरेय हो नाना .बालपण किती रम्य असत ना ?काही विषय नसताना अर्थ न लागत असताना आनंदानं काहीबाही बडबडत राहायचं.
   दोघी लेकींना अस मनमुराद हसताना पाहून नानांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या .
 त्यांनी वेणू ला विचारले सुखी आहेस ना पोरी? सोन्यासारखे पोर दावणीला तर नाही ना बांधली आम्ही?
    नानांच्या अवचित प्रश्नाने वेणू विचारात पडली. स्वारीचे विलायतेस जाण्याच्या ईच्छा, त्यांची  अटीबद्दल नानांना कळले तर नसेल ना ? .............
क्रमशः 


 लेखिका:
आपल्या परिचयाच्याच,
चौधऱ्यांच्या सूनबाई (गायत्री)

भेट -गाठ:
   सस्नेह वाचक,
       माझ्या प्रत्येक ब्लॉग मधून काहीतरी सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न करत असते.मनातले एकून घेणारा,चुकीचं पाऊल पडण्याआधी कान पिरगळुन योग्य मार्ग दाखवणारा.अशी एखादि मैत्री असावी जीवनात .आवर्जून पुरुष मंडळी ना तरी ..करण बायका तर शेजारणिजवळ ,मैत्रिणी जवळ भरा भरा बोलतच असतात जे नाही सांगण्यासारखे तेही सांगतच असतात ,पण माणस डोक्यात काही अन प्रत्यक्षात काही चालू असल्याने कोलमडण्याची जास्त संभावना असते .म्हणून एखादा असावा मैत्र जिवाचा...
असो भेटू पुन्हा ,
छान छान वाचत राहा,आनंदी रहा.