Oct 30, 2020
स्पर्धा

केतकीच्या वनी, नाचला ग मोर भाग-५

Read Later
केतकीच्या वनी, नाचला ग मोर भाग-५

केतकीच्या वनी,नाचला ग मोर भाग-५ 
     मंद रुणझुण करत पहाटआली उदया तील केशरी सूर्य क्षितिजावर विवीध रंग परत आला.उभयंता च्या जीवनातील नवीन पर्वास सुरुवात झाली होती .नवीन पर्वास प्रारंभ झाला असला तरी मनात काहूरचे पडसाद असतेच तसेच वेणू च्या मनी उमटले होते आणि दुसरीकडे आपण सर्व यथायोग्य निभावून नेऊ असा विश्वासही दुणावला होता.प्रतीक्षेनेे पापणीत साचलेले ,दिन प्रति दिन अंतरंगात न्हाऊन निघत होते.

    मुकुंदाची तृप्त नजर आणि सहवासाने खुललेला वेणुचा चेहरा पाहून उमाबाई निश्चिंत झाल्या.परीक्षेचा निकाल येईपर्यंत सज्जात बसून अवांतर ग्रंथवाचन करून ज्ञानार्जन करण्याच्या हेतूने मुकुंदा वाचनात गढून गेला होता. वाचनात आलेला,आवडलेला मुद्दा आवर्जून वेणूस पुन्हा वाचून दाखवित असे त्या अनुषंगाने दोघांमध्ये नेहमीच चर्चासत्र झडत असत.

  वेणू ला वाचनाचे आवड होतीच. सखोल वाचनाने आणि नाना-आईने दिलेल्या सुयोग्य संस्कारांनी ती परिपक्व झालेली होती.दोघातील संवादात तिला न आवडलेली टिपणे,मुद्दे ती चतुराईने ,हजरजबाबीपणाने खोडून काढत असे.तिच्या अशा परखड बोलण्यातच मुकुंदा आणखी गुंतत जात होता.

   तसच आज विलायतेस गमन विषयावर तारा छेडल्या गेल्या होत्या.
"आमचं स्वप्न आहे विलायतेस जाऊन यशस्वी व्हावं. मानसन्मान मिळवावा. तेथेच स्थायिक व्हावं".
"विलायतेस कसे स्थाईक व्हाल?तेथे कुटुंबास नेण्यास अजून तरी परवानगी नाही."इथे मन गुंतलेले असताना यशस्वी होऊ शकाल तुम्ही?मुळात तुमचा स्वभाव हळवा आहे.आम्हास तर संदेह वाटतो ."

   "आपण मनाशी ठरविले तर सारेकाही संभव होऊ शकते वेणूबाई"

    "एकाच वेळी दोन नौकांवर स्वार होऊ पाहत आहात तुम्ही. दोघींपैकी एकच नौका किनारी लागू शकते याचे भान ठेवावे स्वारिंनी.आपले शब्द कोणा हृदयावर घाव घालीत आहेत याची जाणीव असावी."

   हृदय शब्द ऐकटाच मुकुंदाच्या डोळ्यात प्रेम-माया दाटून आली.

    "तुमच्या स्वप्नांचा आम्हास आदर आहे.पण पतंग्याने दिवा भेटीचे स्वप्न बाळगू नये.शेवटी दिव्याच्या प्रखर  ज्योतीने त्यास जीवास मुकावे लागते.आपल्या देशात स्वातंत्र्य मिळून काहीच वर्ष झाली आहेत पराभवाच्या ज्वालेत ते लोक अजुनही जळत आहेत.स्वकीयांना भुरळ घालून परकियात नेऊन गुलामगिरी चालवली जातेय. म्हणून विलायतेस जाणे तितकेसे योग्य वाटत नाही आम्हास.आपल्या ज्ञानाचा फायदा स्वकियांना होऊ नये म्हणूनही असेल कदाचित... ही तुमच्या स्वप्नाचे दुसरी बाजू आहे तिच्याकडे दुर्लक्ष होऊ नये.काही वर्षाने विलायतेस जाणे सुकर होईलही .वाहतूक साधनांचा,दळणवळणाचा जसजसा विकास होईल तसे जाणे येणे सोपे होईल. एकेठिकाणी अडकून न राहता प्रवाह सुरू राहील.पण सध्या मात्र नाही."

    "मग आम्ही उराशी बाळगलेल्या स्वप्नांची काय करू म्हणता?" मुकुंदा काहीसा चिडून म्हणाला.

  " तुमच्या मनातले मानस पुडयात बांधून गुंडाळून ठेवा असे आम्ही कदापिही म्हणणार नाही फक्त स्वप्नांचीपूर्तीची वाट बदला. आपल्याच स्वकियांमध्ये राहून असे काही उत्तुंग कार्य करावे की परकियांनाही तुमचा सन्मान वाटेल आणि आपल्या देशाला तुमचा अभिमान. मग बघा ज्या विलायतेस जाण्याचा तुमचा बेत आहे तीच लोक तुमच्या ज्ञान,कौशल्यापुढे नतमस्तक होतील आणि हे सगळे एकाच नौकाविहार होईल बाकी तुम्ही  सुज्ञ आहातच."


  खरेच किती छान बोलता या. किती मार्मिकपणे वर्षानुवर्षे पडलेली गाठ सहज उलगडून दाखविलीे तेही आमच्या इच्छांचा कुठलाच अवमान न करता ,बोलता बोलता चार हिताच्या गोष्टी गळी उतरवल्या देखील.अशी सहचारिणी लाभावयास भाग्य लागते.आम्ही खरेच भाग्यवान आहोत. कलेकलेने वाढणाऱ्या चंद्राप्रमाणे रोज नव्याने वेणूच्या प्रेमात मुकुंदा पडत चाललोय आपण. मुकुंदा अधिकच विचारमग्न झाला होता.
 वेणू कधी सज्जातून खाली गेली त्यास कळलेच नाही.

   ताज्या ताकाचा पेला वेणू पुढे करत अक्काबाई म्हणाल्या "हे घेे पिऊन घे आरोग्यासाठी हितकारक असते मुकुंदा तर काही प्यावयाचा नाही त्यास लहानपणापासून आवडतच नाही.त्याच्या अंगात उष्णता जास्त आहे म्हणून त्यास बळजबरीने द्यावयाचा खूप प्रयास केला आम्ही ,पण ताका कडे ढुंकूनही पाहत नाही."
     "अक्काबाई आहे का शिल्लक ताक?ताकापासून बनलेला एक चटकदार पदार्थ येतो आम्हास स्वारिंना आवडेलच..."
     "पेला भरेल इतके शिल्लक आहे .पुरेल का तूस?मी काही मदत करू का?"

       "तुम्ही आम्हाला फक्त ओले नारळ खऊन द्या.बाकी आम्ही बघतो".
   वेणूने ताकात मीठ,हळद, डाळीचे पीठ मोडून,हळूवार आचेवर रवीच्या दांड्याने फेटून घेतले.ताटात पसरत खवलेल्या नारळाची चटणी भुरभुरली .उलथनीने एकसारखे काप करून गोल गुंडाळी तबकात ठेवून त्यावर        मोहरीचे फोडणी तेल ओतले निगुतीने केलेल्या खांडवडयाचे सुबक सजलेले तबक पाहून अक्काबायने तिच्या डोक्यावरून हात फिरवत कौतुक केले .

    उमाबाईंनी जेवताना दोन -दोन वड्या पानात वाढल्या. तात्या खुश झाले ,मुकुंदा मिटक्या मारून खाऊ लागला.       "वा .....काय चविष्ट झाला आहे पदार्थ .आधी कधी बनवला नाही तुम्ही आक्काबाय?"

    "आम्ही नाही तुमच्या मंडळींनी ताका पासून बनवल्या आहेत वड्या.ताकही गेले तुमच्या पोटात आणि पदार्थही आवडला आहे तुम्हास"... हसत आक्काबाय म्हणाल्या.

   "सुनबाई तुमच ईप्सित साध्य झाले आहे बर का... हुशार आहात"उमाबाई कौतुकाने बोलल्या.
  " सासुबाई आमचं ईप्सित साध्य करण्यासाठी आम्ही फक्त वाट बदलली. बाकी काही नाही".मुकुंदाकडे तिरकी नजर करत वेणू उद्गारली.
     वेणूची शब्द कोपरखळी मुकुंदास बरोबर बसली.त्याने गालात गूढ हसत खांडवडी तोंडात टाकलीे .


      सैपाक घर आवरून झाल्यावर वेणू माडीवर जायला निघाली पण अंगात कणकण भासली . शरीरात गरम लाह्या फुटत असल्यासारखे जाणवले.पायऱ्या चढायचेही त्राण उरले नाही,म्हणून पहिल्याच पायरीवर मटकन खाली बसली......

 


  क्रमशः
 लेखिका -
 आपल्याच परिचयाच्या,
 चौधऱ्यांच्या सुनबाई(गायत्री)

 गाठ भेट .
 सस्नेह वाचक,
     वेणूने दाखवलेली स्वप्नपूर्तीची वाट कशी वाटली? 
 काही वाचकांना प्रश्न पडला असेल विलायती जाणे काळया पाण्याच्या शिक्षेसारखे का दर्शविले आहे. तर ते काळा नुसार वर्णन आहे. विलायतेस जाणे म्हणजे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून जाण्यासारख मानले जायचेे. सध्या परदेशात जाणे,स्थायिक होणे अभिमानाचे वाटत असले तरी कुठेतरी पालकांच्या मनात आपले लेकरू आपल्याजवळ नाही ,आपल्या शेवटच्या क्षणी भेट होईल का,निदान त्याच्या हातून भडाग्नी तरी मिळेल का.?
आशी हुरहूर, अस्पष्ट भावना कुठेतरी तळाशी असतेच. पुन्हा भेटू,
छान छान वाचत राहू आनंदी राहू.