Oct 21, 2020
स्पर्धा

केतकी च्या वनी,नाचला ग मोर.

Read Later
केतकी च्या वनी,नाचला ग मोर.

            केतकीच्या वनी  ,नाचला गं मोर.

भाग १

      चुलीला हळद कुंकू लावून अक्काबायाने मनोभावे अन्नपूर्णा मातेस नमस्कार केला .हलके सरपण पुढ सरकवत हळूच चूल पेटवली ,चहाच आंदणं ठेवलं. वेलदोडी चहाचा सुगंध देशमुखांच्या वाडाभर दरवळला.

       काकडा आरती आटोपून अभंग गुणगुणत तात्या दिवाणखाण्यात टेकून बसले होते .उमाबाई न्याहारीसाठी वाफाळलेला चहा आणि गरमागरम उपीठ घेऊन आल्या.
      गरम उप्पीट चा स्वाद घेत तात्या म्हणाले "काय मग उमाबाई झाली का संक्रांतीची तयारी? दोन दिसावर सण आला."
      नाही हो ,आज  साडी पेठेत जावयाचे आहे .सुनबाईचा यंदा पहिलाच संक्रांति सण आहे ना ..म्हटलं छान सोनेरी काठाची चंद्रकळा घेऊयात, हलव्याचे अलंकारही बनवूया छान हौस होईल.
      हूं , उमाबाई हौसेला मोल नसते.भारी घ्या साडी सूनबाईंसाठी...
     खरंय हो तुमचं. हौसेला मोल नसते आणि हौसेला आवडीची जोड दिली की नात्यात गोडवा वाढतो.

     पण उभयंता च्या नात्यात गोडवा भिनलेला दिसत नाही अजून... तात्या चिंतीत स्वरात म्हणाले.
   होईल हो ...मोरावळयाला नाही का पाकात मुरायला वेळ लागत .एकदा का चिरंजीवांच्या डोक्यातलं  विलायतेस जाण्याचे खूळ निघाले ना ...की गोडव्याचा घट्ट पाक होईल बघा.

     कधीकधी अपराधी वाटते आम्हास सुनबाई कडे पाहून. आपल्या हट्टाने बाशिंग भाळी बांधले चिरंजीवांनी, आता पुढची जबाबदारीची जाणीव त्यांना स्वतःहून व्हावयास हवी.
    सुनबाई  तशा धीराच्या आहे हो.. आपल्या माणसाच्या अशा वागण्याने त्यांनाही त्रास होत असेलच की ,पण तोंडातून हुं नाही की चुं नाही  हो , उलट  मनात शिरण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा.
    या विषयावर आपनासाच मुकुंदा सोबत एकदा समजुतीने बोलावं लागेल असं वाटतंय आम्हास. तुम्ही ,मी अक्काबाई बसून बोलू ,चांगली समज देऊ आज सांजवेळी बोलायचे का?
     एवढा महिना जाऊ देत .त्यांची वैद्यकशास्त्राची परीक्षा होऊन जाऊ देत. मग बोलणे इष्ट ठरेल .बरं आम्ही निघतो आता धान्यपेढीवर.

      आम्ही पण येतो तुमच्या सोबतच बग्गीतून .तुम्ही आपल्या पेढीवर उतरल्यावर आम्ही पुढे जाऊ साडीपेठेत साडी  घ्यायला.     आलोच अक्काबायला सांगून....


   अक्काबाय.....मी जरा जाऊन येते साडीपेठेत .
    हूं .सासूबाईलाच वेध लागलेले दिसताय संक्रांती सणाचे. आक्काबाय मंद हसत म्हणाल्या.
    तसे नाही हो ,आपण नाही करणार तर कोण करणार सूनबाईंची हौस मौज?
      बरं ये जाऊन मग हलवा फुलवू .आज दिसभरात वाळेल तो.मग  उद्याच्याला हलव्याचे सुंदर दागिने बनवण्यास सोपे जाईल .पण  सुनबाईस समजू द्यायचे नाही हो. गुपचुप अलंकार बनवायचे.

 "आम्ही पण घालणार हलव्याचे दागिने "स्वयंपाक घरात येत मंजु बोलली.
   हो घाला की मंजुबाई जरूर घाला पण तुमचा विवाह झाल्यावर हुं .सासबाईंकडुन पुरवून घ्याल हौस तुमची .आता मुंडावळ्या बांधण्याची तुमचीच पाळी आहे. अक्काबाई हसत म्हणाल्या.
हे काय ग आक्काबाय तुलाच घाई झालीये मला सासरी पाठवायची .कंटाळले वाटत तुम्ही सगळे या मंजुला .
ही आई पण बघ सुनेचेच लाड करते ...

        बरं का आक्काबाय कोणीतरी तोंडात रागाचा अख्खा लाडू धरून बसलेय वाटतं ?आता आपण केलेल्या तिळगुळाच्या लाडवाची गरज नाही  एका माणसाला. तिळगुळाच्या लाडवाच नाव ऐकले आणि मंजू चा चेहरा मोगऱ्यासारखा फुलला ..
      एखादा लाडू द्या ना आम्हास ; 
      मग आता तर गोबरे गाल दोन-दोन लाडवांना अजूनच फुगतील .एक रागाचा अन दुसरा तिळ गुळाचा.
       तिघी खळखळून हसल्या.  

      अग मंजू गणरायास नैवेद्य दाखवून झाला की मग खा
  आता परसदरी जाऊन तुमच्या वहिनीस मदत करा.
   पाठमोर्‍या मंजू कडे पाहून उमा बाई म्हणाल्या अक्काबाय आता हे चैतन्य काही दिवसांपूर्वी राहील हो आपल्या घरात.

     हो ग उमा ,लेकीचा जन्म म्हणजे नदीचा उगम असतो. बालपण, माहेर,सासर तिचा प्रवाह आणि हा प्रवाह थांबला तर साचलेपण येतं. हे साचलेपण शेवटी एक डबकच बनवून राहत माझ्यासारखं. 
    असं काय म्हणता हो आक्काबाय तुम्ही  ,या देशमुख वाड्याचा  आधार आहात  तुम्ही .
      तो तुमचा मोठेपणा ग .संसाराचा डाव अर्ध्यावर सोडून नवरा गेला विलायतेस निघून, सासरच्या लोकांनी माहेरी आणून सोडलं .माहेर पण काय ते फक्त बापू. ते गेल्यावर राहिले एकटीच . भाव बंदतिच्या वादात आजकाल कोण ओळखतो चुलत्या चुलतीला ?पण तात्याने मायेने आधार दिला आणि इथे देशमुख वाड्यात घेऊन आला.

    अक्काबाय कमीपणा वाटून घेऊ नका हो तुम्ही आहात म्हणून देशमुखांचा एवढा मोठा डोलारा सुरळीत चालू आहे तुमच्या आधारे.

    मी काय बोलत बसले ?तिकडून वाट पाहणे होत असेल .मी निघते जायला. 
      बरे बरे जा तात्या ताटकळ ला असेल.


 अक्काबाय केला का हलवा तयार सासूबाईंनी?विचारताच वेणु  स्वयंपाक घरात आली. आम्हास पहावयाचा होता.
    नाही हो सूनबाई ,उमा काही कामासाठी आत्ताच  पेठेत गेली आहे.तोवर आपण सैयपाकाचं पाहू.सारेआवरल्यावर मग बसू निवांत .आम्ही तिखट मिठाच्या अख्या गवार शेंगा ची भाजी करतो ,तुम्ही लोणकढया ताकाची कढी बनवून घ्या, सकु आयत्यावेळी गरम गरम भाकरी टाकून देईल.

  जेवणावळी पाटपाणी आवरून झालं आणि उमाबाई चुलीच्या पाशी बसल्या.
     बर का सुनबाई ,हलवा बनवणे जरा नाजूकच काम असतं.
   आम्हास उत्सुकता आहेस .आमच्या माहेरी सकाळी शेतातील हरभऱ्याची हिरवीगार झाडे उपटुनआणतात त्याचे घाटे सोलून दाणे , किसलेला गूळ,जाडभरडी वाटलेली तीळ घालून तयार होणार मिश्रण संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना देतात .

     कसंय प्रत्येक घराण्याची रीतभात वेगवेगळी असते. मंजू आणि तुम्ही तीळ निवडा, आम्ही तोवर निखारे जमवतो. 

   उमाबाईंनी चुलीवर पाणी, साखर, थोडे दूध टाकून पाक बनवून घेतला. मंद निखार्यावर तव्यावर पितळी परात ठेऊन त्यात तीळ टाकली ,बोलत बोलत पळीपळी ने पाक तीळ वर टाकीत निगुतीने एकसारखा हात फिरवत होत्या .हळू हळू हलवा काटे लेऊन फुलू लागला. हलव्या चे फुललेले काटे पाहून वेणू आणि मंजू ला  गम्मत वाटत होती. उमाबाई तयार झालेला हलवा तबकात काढीत म्हणाल्या...

     पोरींनो हलवा म्हणजे गोड संसाराचं गुपीत बर का!तीळ म्हणजे कणाकणाने जमवून मांडलेला संसार, त्यातील गारी-खडे  म्हणजे हेवेदावे ,मत्सर, हट्टीपणा निवडून दूर फेकून द्यायचे असतात , मुरत जाणारा गोडवा हळूहळू संसारात ओतला आणि सहनशक्तीच्या निगुतीने कुटुंबातील साऱ्यांवर माया करत राहिले की झालाच तयार सुखी संसाराचा हलवा......
    मधेच आक्काबाय खुसखुस हसत वेणू कडे बघत उदगारल्या ...तिळपाका सारख संसारात एकरूप व्हायचे असतं ....तेव्हाच संसार गोड होतो .. ...आणि गोड बातमीही मिळते...
     आक्काबाय च्या बोलण्याने वेणू ने लाजून खाली मान घातली.आम्ही आलोच बाहेरून म्हणत सैपाक घरातून काढता पाय घेतला.


     थोड्याच अवधीत वेणू च्या रडण्याचे अस्फुट हुंदके ऐकू आले ...अगबाई  काय झाले ?हा तर सूनबाईंचा आवाज ...उमाबाई अन आक्काबाय लगबगीने सैपाक घरातून बाहेर आल्या.............
    
क्रमशः 
काय झाले असेल बरं वेणु ला?का रडत असावी? 
पुढच्या भागात पाहू या
    
लेखिका..
आपलीच 
चौधऱ्यांची सूनबाई (गायत्री )
      

   भेट- गाठ..
     सस्नेह वाचक,
संसाराचा गोड गोड हलवा कसा वाटला आपल्याला?
तसेच कथेचा पहिला भाग  कसा वाटला?नक्की कळवाल.आवडल्यास लाईक, कमेंट ,फाँलो करा. 

छान-छान वाचत रहा आणि आनंदी राहा.
     भेटू पुन्हा ........