किडा

रत्नालाबाई साधारण फास्ट त्रेसष्ट वर्षांच्या होत्या.....
रत्नाबाई साधारण बासट त्रेसट वर्षांच्या होत्या. गोल गोरटेला चेहरा. वेगवेगळ्या ट्रीटमेंटस घेऊन चेहेऱ्यावरच्या सुरकुत्यांवर विजय मिळवलेला होता. मुद्दाम कोरलेल्या भुवयांमध्ये लहानशी टिकली लावलेली होती. रत्नासारखे चकचकीत पाणिदार डोळे. इतके पाणिदार की खरोखरीच डोळ्यात पाणी आहे की काय असं वाटावं.कदाचित विनायकरावांनी त्यांच नाव डोळे पाहूनच ठेवलं असावं. विनायकरावही त्यांच्यापेक्षा दोन तीन वर्षानी मोठे होते. कमावलेली शरीरयष्टी. अर्ध डोकं टकलानं व्यापलेलं आणि उरलेलं अर्ध केसांनी. अजूनही व्यायाम सोडलेला नव्हता. रत्नाबाई जुन्या काळातल्या असल्या तरी पुरोगामी विचारांच्या होत्या. त्यामुळे त्यांच्या प्रगतीच्या आड कोणतेही पारंपारिक विचार आले नाही. त्या आणि विनायकराव एकाच कॉलेजात लेक्चरर म्हणून लागले होते. दोघांची ओळख झाली . ओळखीचे रुपांतर अर्थातच प्रेमात आणि यथावकाश लग्नात झाले. रत्नाबाई अत्यंत टापटीप होत्या. कोणतेही काम त्या प्लान करुनच करीत असत . विनायकरावाचेही तसेच. त्यांचही सगळं कसं आखीव होतं. त्यामुळे त्यांचे सूर जुळले. लग्नही धूमधडाक्यात झालं. बिनविरोध.लग्नानंतर दोन वर्षानी श्रीकांतचा जन्म झाला.
श्रीकांतच्या जन्मानंतर दोघानाही प्रोफेसरशिप मिळाली. सगळं कसं छान चाललं होतं. पैसा कमी नव्हता. आयुष्यातलं प्रत्येक सूख दोघेही पूर्णपणे भोगत होते. असं ते सुखी त्रिकोणी कुटुंब होतं . श्रीकांतही अतिशय हुशार होता. एम. ई ‍. झाल्यावर त्याला एका फॉरीन कंपनीची ऑफर आली आणि तो यू‌. एस. ला गेला. काही वर्षातच त्याचं तिथे लग्न झालं.विनायकरावांच्या पत्नीसह यू. एस̮ला बऱ्याच वाऱ्या झाल्या. मुलाचा संसार थाटला गेला.मुलाला अमेरिकन लाइफ स्टाइलची एवढी सवय झाली कीतो परत यायला तयार होईना. दोघांनी खूप समजावलं . पण तो मानायला तयार होईना. उलट त्याचं म्हणणं होतं की आईवडिलांनी पण भारत सोडून इकडेच सेटल व्हावं व आपण सगळ्यांनि एकत्र राहावं वगैरे. पण विनयकरावांना ते पटलं नाही. असो. श्रिकांतनी मग एक बंगला घेतला सेकंड होम म्हणून खास आईवडिलांसाठी. विनायकराव त्या वेळी म्हणाले होते, अरे आता दोन तीन वर्षच तर राहिल्येत आणि इथे आम्ही दोघेच तर आहोत. काय करायचं सेकंड होम. पण श्रिकांतनी ऐकलं नाही. तो नाराजीनेच म्हणाला, \"\"तुम्हाला वाटलं, मुंबईतल्या गर्दीपासून लांब जावं, म्हणून घेतलाय हा बंगला.\"\" अशीच एक दोन वर्ष गेली.
वर्षातून दोन वेळा विनायकराव आणि रत्नाबाई माथेरानच्या जवळ जंगल भागात असलेल्या बंगल्यात राहत असंत. बंगला वाईट नव्हता. वास्तूशास्त्राला धरून बांधलेला असल्यामुळे कोणताही वास्तूदोष नव्हता. रस्ता मात्र डोंगराळ होता. साधारणपणे अर्ध्या फर्लांगाचं अंतर दोन बंगल्यांमध्ये होतं. आजूबाजूला डोंगर दऱ्यांनी वेढलेले बंगले म्हणजे सृष्टीसौंदर्याचे नमूने होते. मोठमोठया वृक्षांची जंगले होती. अधून मधून माकडांच्या वस्त्याही होत्याच. पण गावापासून लांब असलेल्या या बंगल्यात कोणतेही शहरी आवाज पोहोचत नव्हते. एखाद्याला काही साधना किंवा ध्यानधारणा वगैरे करायची असेल तर जागा उत्तम होती. इथे पाऊस आणि थंडी मात्र भयंकर होती. छोटेखानी असला तरी बंगल्याला एक मोठा हॉल, त्याच्यापुढे किचन आणि दोन्ही अंगाला लागून एकेक बेडरूम होती. वरच्या मजल्यावर पण एक बेडरूम होती. तिथे हॉलच्या कोपऱ्यातून जाणारा एक लोखंडी गोल जीना होता. वरच्या बेडरूमला लागून एक मोठी बालकनी होती जी बंगल्याच्या पुढच्या बाजूला उघडायची. बालकनीत उभं राहून पाह्यलं की उगवता सुर्य दिसायचा आणि जंगालांनी भरलेले डोंगर दिसायचे.
इथे पावसाळ्यात फिरलं की जंगलात वेगवेगळे रंग दिसंत. एकच एक हिरवा रंग नव्हता. कधी निळसट, कधी पोपटी तर कधी पिवळसर हिरवा असे रंग दिसत. माणसं कमी असतील तर सर्व खोल्या जणू खायला उठत. आवाजही घुमायचा. त्या वर्षीच्या जुलै मध्ये ते दोघेही एक दोन आठवडे राहण्याच्या इराद्याने निघाले होते. राहायला जायचं म्हणजे, तिथला एक लोकल माणूस त्यांनी हाताशी धरला होता. त्याला आधी फोन करून सांगावं लागे. मग तो तिथे जाऊन भाजी दूध किराणा वगैरे सर्व व्यवस्था करायचा. तसंच गॅस सिलिंडर आणि इतर लागणाऱ्या जुजबी वस्तू तो आणून ठेवायचा. हॉल मध्ये एक मोठा डबल दोअर फ्रीझ होता त्यात सर्व काही ठेवलेलं असायचं. विनायकराव सगळंकाही नीट ठरवून तयारी करीत. आता त्यांनी एक दोन आठवडे राहण्यासाठी सामान आणून ठेवले होते. मुंबईला पाऊस एक दोन वेळा पडून गेला होता. हवा तशी बरी होती. पण बंगल्यात राहायला पावसाळ्यात प्रथमच ते जात होते. दोन तीन दिवसांपेक्षा जास्त मुक्काम ते करीत नसत. आत्ता सुद्धा वाटलं तरच ते दोन आठवडे राहणार होते. टेलीफोन होताच. कॉंप्युटरही होता. पण त्या दोघांना त्याची जुजबी माहिती होती. श्रिकांतशी त्यांचं क्वचितच चॅटिंग होत असे. बरेच वेळा ते जाऊनच यायचे.
किचनमध्ये एक गणपतीचा फोटो टांगलेला होता. त्याला प्लॅस्टिकचा जास्वंदीचा हार घातलेला होता. विनायकराव वं रत्नाबाई तसे तंदुरुस्त होते. नियमीत व्यायाम आणि योग्य आहार यामुळे ते स्वस्थ होते. त्यांचं ब्लडप्रेशर मात्र कधी कधी वाढत असे. गोळ्या मात्र ते नियमीत घेत नसत हे आश्चर्यच होतं. एवढं नियमीत वागणं आणि एवढं दुर्लक्ष असं कोणालाही वाटेल. स्वतः ड्राईव्ह करीत विनायकराव बंगल्याजवळ पोचले तेव्हा संध्याकाळचे सहा वाजत होते. बंगला जरा टेकाडावर होता. गाडी पार्क करून त्यांनी पुढचे दार उघडले. आत शिरल्यावर दिवे लावून ते दोघे विश्रांती
घेत होते . विनायकरावांना चहाची तलफ आली. रत्नाबाई कंटाळून चहा करायला उठल्या. बाहेर पिवळसर लालसर संधिप्रकाशात काळे ढग जमा झालेले दिसत होते. वारा वेडावाकडा वाहत होता. चहा घेऊन रत्नाबाई हॉलमध्ये आल्या. दोघेही चहाचा कप तोंडाला लावणार एवढ्यात फोनची बेल वाजली. त्या शांत वातावरणात् बेल ऐकून विनायकराव दचकले. ते फोन उचलून हॅलो म्हणाले. पलीकडे श्रीकांत होता. \""बाबा तुम्ही घरी नाही
आहात का ? तुमचा मोबाइल पण लागत नाही. "त्यावर ते म्हणाले, "\"अरे इथे येण्याचं आमचं अचानक ठरलं. इथे रेंज मिळत नाही. बर बोल. कशाकरता फोन केलास? "\" आईला द्या जरा. "\" रत्नाबाईंच्या खाणाखुणा चालूच होत्या. त्यांनि फोन घेतला. थोडावेळ बोलणं झाल्यावर ते दोघेही
आजोबा आजी होणार असल्याची बातमी श्रीने दिली. रत्नाबाईंनी घाईघाईने त्यांना सांगितलं. त्या म्हणाल्या, \"\"अरे आजच आम्ही इथे आलोय. जमलं तर पुढच्या महिन्यात येऊनच जाऊ. \"\" फार बरं होईल \"\" श्री म्हणाला आणि त्याने फोन बंद केला.
विनायकरावांना सुटल्यासारखं वाटलं. एक काळजी संपली म्हणायची. नाहीतर ती एक काळजीच असते. रत्नाबाईंना म्हणाले, \"\" चला पुढच्या फॉरमॅलिटीज करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे एक दोन महिन्यात जाता तरी येईल. \"\" रत्नाबाईंनी खुशीत मान डोलावली. मग दोघांनी बाहेरून नाश्ता आणून ठेवला होता तो गरम करून खाऊन घेतला. थोडीशी पावसाला सुरुवात झाली होती. आत पावसाळी किडे येतील म्हणून त्यांनी खिडक्या लावून घेतल्या. टिव्ही लावून पाह्यला पण सगळे चॅनेल बंद होते. त्यांची ती रात्र लहान सहान गप्पा मारण्यात आणि वाचण्यात गेली. दोघेही नातवाचं स्वप्न रंजन करण्यात गुंतले . इतक्या वर्षानी लहान मूल घरात येणार म्हणून रत्नाबाई अगदी हळव्या झाल्या होत्या. विनायकरावांनी त्यांना मूल इथे जन्माला येणार नसून अमेरिकेत जन्माला येणार असल्याची जाणीव करून दिली. मग ते झोपी गेले. सकाळी केव्हातरी सात साडेसातला त्यांना जाग आली. अंघोळी वगैरे उरकून ते चहा घेत बसले होते. रत्नाबाईंनी गणपतीपुढे समई आणि उदबत्ती लावली. मनोभावे नमस्कार केला. तशा त्या पुजा बिजा करित नसत. त्यांना इथून निघून लगेचच विमानात बसावसं वाटलं. श्री कडे जाऊन त्याच्या पोटुशी असलेल्या बायकोचं कौतुक करावसं वाटलं . पण हे इतकं सोपं थोडच होत ? त्यांना एकदम इथे राहण्यात मजा वाटेनाशी झाली. बाहेर पावसानी फेर धरायला सुरुवात केली . पावसाळची अंधारी पसरली. सकाळचे जेमतेम दहा वाजत होते. पण संध्याकाळ झाल्यासारखी वाटू लागली. घड्याळाने पण आळसटल्यासारखे साडेबारा वाजवले. साधारण स्वयंपाक करून दोघांनी जेऊन घेतले.
विनायकराव वरच्या बाल्कनीत येउन उभे राह्यले. पावसाच्या झडीने उभं राहणं फ़ारकठीण गेलं. वारा घू घू ...... आवाज करू लागला. वातावरणात थंडी निर्माण झाली. त्यांनी शाल अंगाभोवती घट्ट गुंडाळून घेतली. समोरचे डोंगर दिसेनासे झाले. हिरवं जंगल नाचण्याचा ताल धरू लागलं. त्यांनी आत येऊन एक पुस्तक न बघता काढलं. आज एकदम त्यांना मोकळं आणि बंधनं तोडून वागावसं वाटत होतं. मधून मधून त्यांना आपणही हवेसारखे हलके झालो तर काय मजा येईल असं वाटलं. ते स्वतःशीच हसले. त्यांनी हातातलं पुस्तक उघडलं.ते होतं प्रो. चंदनशिवे यांचं. पुस्तकाचं नाव होतं, \"\"माणसाच्या हातात नसलेल्या गोष्टी. "" त्यांना आपण निवडलेल्या पुस्तकाचं आश्चर्य वाटलं.
सध्याच्या परिस्थितीशी ते त्या शीर्षकाची सांगड घालू लागले. त्यांना ते काही जमेना. मग त्यांना डुलकी लागली. आणि ते झोपले. साधारण तासाभराच्या झोपेनंतर ते जागे झाले. हातातलं पुस्तक छातीवरून पोटावर आलं होतं. कसेतरी चार वाजले. रत्नाबाई झोपून उठल्या. वेळ जात नव्हता. म्हणून त्यांनी चहा केला. विनायकराव खाली आले. दोघांचा चहा झाला. अर्धा पाऊण तास त्यात गेला. पावसाची अंधारी कमी व्हायला तयार नव्हती. पावसाचा जोर मात्र कमी जास्त होत होता. सूर्यानी बहुतेक सुटी घेतली असावी. किंवा तोही त्याच्या सेकंड होममध्ये राहायला गेला असावा. अशी एक कल्पनाही विनायकरावांना चाटून गेली. त्यांना सगळ्या गोष्टींच कसं नवल वाटलं.माणसानी गजबज नको , गर्दी नको असं म्हंटलं तरी आवाजाची त्याला एवढी सवय असते की त्याला शांतता बोचू लागते. गर्दीबद्दल आणि कोलाहलाबद्दल तक्रार करणारी माणसं अशा ठिकाणी हतबल होतात. ही म्हणजे त्यांना नजरकैद वाटते. तशी बाहेर आल्यावर कोणाचही बंधन नाही. पण बाहेर येऊन करणार त्तरी काय, असल्या वातावरणात. शांतता हवी , शांतता असं म्हणण्याची नुसतीच फॅशन आहे कि काय अस वाटेल अशा ठिकाणी. माणसाला कुठल्याही गोष्टीचा अतिरेक मान्य नसावा. अशी अतिरेकी शांतता नकोशी होते. हिला स्मशान शांतता पण म्हणता येत नाही. ती आणखीन वेगळीच असते.
विनायकरावांचं विचारचक्र शांततेच्या पुढे जाईना. ते कंटाळले.. कशाला घेतला हा बंगला? विकू या का ? असो. आस्ते आस्ते संध्याकाळचे सहा वाजत आले. विनायकरावांना इथे येऊन चोविसतास झाले.रत्नाबाई उठल्या. गणपतीच्या तसबिरीपुढे त्यांनी उदबत्ती लावली. समई लावू लागल्या. पण वारा एवढा होता की पेटलेली समई विझू लागली. दोन चार वेळा प्रयत्न करूनही समई लागली नाही. तेवढ्यात विनायकरावांचा हॉलमधून आवाज आला. \"\"रत्ना, मी जरा पडतो. मला थोडसं अस्वस्थ वाटतय गं. \"\"सव्वा सहा होत आले. बाहेर पूर्ण काळोख झाला होता.हॉल मधील एकच खिडकी उघडी राहिली होती. ती वाऱ्याने दाणकन आपटली‌. मग त्यांना विनायक्रराव काय म्हणाले ते आठवलं. त्यावर त्या म्हणाल्या, \"\"गोळ्या घेऊ नका म्हणजे स्वस्थता येईल तुम्हाला . जरा थांबा की पाच मिनिटं. देवापुढे दिवा लावून होऊ दे . मग पडा
शेवटी एकदाची समई लागली. .पण विनायकराव सोफ्यावरच आडवे झाले होते. रत्नाबाई आतमध्ये आता जेवायला काय करायचं म्हणून विचार करित होत्या. मग फ्रिज मध्ये काय आहे ते बघायला त्या हॉलमध्ये आल्या. विनायकरावांना सोफ्यावरच आडवे झालेले पाहून त्या म्हणाल्या, \"\" जरा धीर नाही तुम्हाला\"\" असं म्हणून त्यांनी फ्रिज उघडला. आतल्या वेगवेगळ्या भाज्या पाहून त्या ठरवू लागलया. त्यांनी पालक घेतला आणि पनीरचा डबा घेतला. आज विनायकरावांच्या आवडीच पालक पनीर करण्याचा त्यांचा बेत होता. आत जाऊन त्या पालक निवडून चिरू लागल्या. मग मोठ्याने विनायकरावांना ऐकू जाईल असं म्हणाल्या, \"\"आपण असं केलं तर? उद्याच इथून निघू या. सकाळी ड्रायव्हिंग करणं तुम्हालाही जड जाणार नाही. काय म्हणते मी ऐकताय ना ? \"\"पण त्यांच्या कडून काहीच प्रतिसाद आला नाही. म्हणून पालक धुण्यासाठी एका चाळणीत घालून हॉल मध्ये आल्या. स्वतःशीच म्हणाल्या, \"\" अगदी लाइट लावे पर्यंत धीर निघाला नाही तुम्हाला? \"\" बाहेरची ट्यूब त्यांनी लावली. हॉलमधल्या उघड्या खिडकीतून वारा सैताना सारख आत घुसत होता. प्रथम रत्नाबाईंनी ती खिडकी बंद केली . ती करताना त्यांच्या तोंडावर झडीचे पाणी उडले ते पुसत त्या मागे सरल्या. मग स्वतःशीच म्हणाल्या, \"\" ह्यांना उठवायलाच हवं. काही गोड कराव का ते विचारलं पाहिजे. नाहीतरी श्रीकांतनी गोड बातमी दिलीच होती. \"\" त्या सोफ्याजवळ आल्या. विनायकरावांचे डोळे अर्धवट उघडे होते. त्यांचे डोळे झोपेत अर्धवट उघडे राहात असत. त्याचं रत्नाबाईना काहीच आश्चर्य वाटल नाही.
\"\"काय ही झोप? काळ झोप नुसती. उठा.... \"\" म्हणून रत्नाबाईंनी त्यांच्या खांद्याला धरून हालवलं. तो त्यांचं सोफ्याच्या पाठी कडे असलेलं तोंड समोर आलं आणि एका बाजूला निर्जिवपणे पडलं. ते उघडं होतं.चेहरा आक्रसलेला होता. कसली तरी वेदना झाल्याचं रत्नाबाईना स्पष्ट दिसलं. छातीवरचा उजवा हातही हळू हळू खाली आला आणि सोफ्याच्या कडेवरून लोंबू लागला. रत्नाबाईंना भयानक शंका चाटून गेली. हे.... काय असावं ? त्यांना कळेना . ही झोप नक्कीच नाही. मग त्यांनी त्यांच्या कपाळाला आणि छातीला हात लावून पाहिला.धडधडणारं हृदय बंद झालं होतं. पण सगळे भाग तर गरम होते. छातीची काहीच हालचाल दिसत नव्हती. हळूहळू त्यांना परिस्थितीची जाणिव झाली. सगळा हॉलच त्यांच्या भोवती फिरू लागला. आणि त्या सोफ्या शेजारीच मटकन खाली बसल्या् . हे बहुतेक गेले असावेत अशी थंड जाणीव त्यांच्या मनात येऊ लागली. पण मनातलं ओठावर यायला भीत होतं. त्यांनी परत एक दोन वेळा त्यांना हालवून पाहिलं. पण छे..... काहीच हालचाल झाली नाही. त्यांच्या तोंडाला कोरड पडली. श्वास जड झाला. ..... हळू हळू त्यांना लक्षात आलं की त्या या एकाकी बंगल्यात आत्ता अगदी एकट्या .... पूर्णपणे ए क ट्या आहेत. बाहेरच्या पावसाशिवाय आणि छातीच्या धडधडण्या शिवाय त्यांना कुठलाच आवाज ऐकू येत नव्हता.
काय करावं?.... ‍. काय करावं ? ..... त्यांना एकदम सुचेना. कोणाला बोलवावं.? आजूबाजूचे बहुतेक बंगले बंद होते. बाहेर जाऊन उपयोग काय? त्यांची नजर सारखी सोफ्यावरच्या विनायक रावांकडे जात होती. सगळ्याच्या पलिकडे गेलेले ते. आणि एकट्या पडलेल्या त्या, याची बोचणारी जाणीव. जवळ जवळ अर्धा पाऊण तास त्या अंगाची जुडी करून , घाबरून त्या स्वस्थच बसल्या होत्या. त्यांना रडवेना की ओरडवेना. मग त्याना थोडीशी जाणिव झाली, आणि \"\"डॉक्टर\"\"हा एक विचार त्यांच्या एकाकी मनात आला. त्या कशातरी उठल्या. भयाने मागे सरत त्या फोन जवळ आल्या. त्यांना जवळच पडलेला विनायकरावांचा मोबाईल दिसला. मोबाईलवरून त्यांनी थरथरत्या हातानी डॉक्टर शिधयांचा नंबर शोधला. डायलही केला. पण \"\" प्लीज चेक द डायल्ड नंबर\"\" असं ऐकू आलं. त्यांनी घाईघाईने तोच नंबर पुन्हा पाहिला आणि पुन्हा लावला. पण उत्तर एकच, \"\"प्लीज चेक द डायल्ड नंबर. \"\"परत परत लावल्यावर एकच वाक्य नवीन आलं. \"\"द नंबर यू हॅव डायल्ड इज नॉट रीचेबल. "
मग त्यांनी तोच नंबर लँड लाईन वरून लावला. पण \"\"ये नंबर मौजूद नही है. \"\" असं निर्जिव उत्तर आलं. त्यांनी चार पाच वेळा फोन लावल्यावर एकदाचा नंबर लागला. पलिकडून डॉक्टर शिधयांचा आवाज येत होता.\"\" हॅलो , हॅलो , बोला... बोला... कोण बोलतय ? \"\" पहिल्यांदा तर रत्नाबाईंच्या तोंडातून आवाजच येईना. कसातरी प्रयत्न केल्यावर त्यांनी कोण बोलतय ते सांगितलं. विनायकराव गेले असावेत आणि डॉक्टरांनी लवकर यावं. मग त्या फोनवरच विचित्र दबक्या आवाजात रडू लागल्या. पलीकडून डॉक्टरानी ताबडतोब निघण्याचे आश्वासन दिले . रत्नाबाईंनी त्यांना पत्ता सांगितला. डॉ‌‌. शिधये , विनायकरावांचे वर्गमित्र. त्यामुळे ते डॉ. कमी पण मित्र जास्त, असे होते. ते राहायला ठाण्याला होते. आता ते यायला निदान तीनचार तास तरी लागतील. ते येणार याची खात्री असल्याने रत्नाबाईना जरा बरं वाटलं. पण तीनचार तास हा मोठा अवधी असल्याची त्यांना जाणीव झाली नाही. आता आठ वाजायला आले होते.
रत्नाबाईना अचानक तहान लागल्याची जाणीव झाली . पण उठून कीचनमध्ये जाऊन पाणी पिण्याचं त्याना धाडस होईना़. उलट त्यांच्या मनातून एक जुनाच डायलॉग वर आला. \"\"घोंगडीवर काढून ठेव . ... ̱घोंगडीवर काढून ठेव. \"\" त्यांना कळेना , हे कोण बोलतय‌. श्वास रोखून त्यांनी सोफॅवरच्या विनायकरावांकडे पाह्यलं. ते जसे होते , तसेच होते. शांतपणे झोपल्यासारखे. मग रत्नाबाईंना आईच्या तोंडून हे वाक्य ऐकल्याच आठवलं.त्यांना काय झालं कोणास ठाऊक . पण आईची आठवण येऊन त्या ओरडल्या.\"\".... आई.... आई गं ...\"\"\"\" बाहेरच्या पावसाच्या आवाजात त्यांचा आवाज विरला. ऐकायला होतच कोण ? मग त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. थोडावेळ विव्हळल्यानंतर त्यांना जरा बरं वाटलं. मग त्यांना आठवलं. त्यांच्या लहानपणी असच कोणीतरी शेजारी गेलं होतं. आणि आईला त्यांनी बाकीच्या बायकांशी बोलताना ऐकलं होतं. \"\" काय माणसं आहेत? घोंगडीवर काढून नको का ठेवायला ? लहानग्या रत्नाला त्याचा अर्थ काही कळला नाही. पण शब्द तेव्हापासून मनात शेवाळ्यासारखे चिकटून राहिले. ते इतक्या वर्षांनी वर आले. त्या शहारल्या . हे... हे... असलं मी काही करणार नाही. त्या मनातल्या मनात शहारल्या. एकदा का माणूस गेला की त्याचं शरीर म्हणजे, \"\"अस्पर्श \"\" वाटतं. जिवंत असेपर्यंत त्याचं काल्पनिक अस्तित्व सुद्धा महत्त्वाचं असतं. पण एकदा का तो गेला की त्याचं उरतं फक्त \"\" प्रे..... त\"\" , अस्पर्श , अमंगळ , भीतीदायक, वगैरे, वगैरे, . असले विचार रत्नाबाईंच्या मनात थैमान घालू लागले.

मध्येच पाऊस कमी व्हायचा. कमी झाला की पागोळ्यांचा आवाज यायचा. मग बाहेर पडलेल्या पाला पाचोळ्यावर पाण्याचा \"\" टर्रर र र....... टप टप...... टर्रररर...... टप.... आवाज व्हायचा. तोही त्यांना विचलित करू लागला.थोड्यावेळाने पावसाने पुन्हा धिंगाणा घालायला सुरुवात केली. एका जागी बसून त्यांना तासभर तरी झाला असावा. समोरच्या घड्याळात पाह्यलं , जवळ जवळ नऊ वाजत आले होते. डॉक्टर आता येतीलच. पुन्हा चुकीचं वेळेच गणित त्यांना आशा दाखवू लागलं. ठाण्याहून यायला तीनचार तास सहज लागतील हे त्या विसरल्या. कोणाचाही फोन नाही. काही नाही्. हळू हळू त्या भिंतीच्या बाजूने सरकत सरकत किचनमध्येगेल्या. पाण्याचा जग शोधून थोडं पाणी प्यायल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. चिरलेला पालक चाळणीत तसाच पडून होता. ताटलीत काढलेल्या पनीरच्या तुकड्यांना आता पाणी सुटलं होतं. त्या पुन्हा दबकत दबकत हॉलमध्ये आल्या. जणू काही विनायक्ररावांची झोप मोडली असती.कसंतरी सोफ्यावरच्या खुर्चीत त्यांनी अंग टाकलं. जरा वेळानी त्या घड्याळाकडे पाहू लागल्या. पण त्यांना ते थिजल्यासारखं वाटलं. नऊवाजत होते. अशी मिनटं मिनटं वाट पाहण्याची त्यांना अजिबात सवय नव्हती. त्यांच्या आयुष्यात जे काही व्हायचं ते फटाफट व्हायचं. आणि सोबत यशही यायचं. फार कशाला , आत्ता जे काही झालं तेही फटाफटच झालं . पण त्याला जोडून यश मात्र आलं नव्हतं. विचार करून त्यांचंडोकं दुखायला लागलं.घड्याळात नऊचे ठोके पडू लागले. पहिल्याच ठोक्याला त्या केवढ्या घाबरल्या. अंगावरची शाल घट्ट आवळून त्यांनी डोळेमिटून घेतले. मग त्यांना इतक्या वेळच्या शिणामुळे म्हणा किंवा ताणामुळे म्हणा, पेंग आली . ग्लानीसारखी झोप लागली . त्यात त्यांना स्वप्नपडलं....
स्वप्नात त्या एका कड्यावर उभ्या होत्या. बाजुला खोल दरी होती. विनायकराव दरीच्या बाजूला तरंगत होते. ते म्हणत होते, \"\" रत्ना , अगं मी जरा कुठे बाहेर फिरायला गेलो तर किती घाबरलीस तू ? रडतेस काय? वेडी कुठली. येईन मी लवकरच. \"\" आणि ते खळाळून हसत वाऱ्यावर निघुनही गेले. रत्नाबाई खडबडून जाग्या झाल्या. कपाळावरचा घाम टिपत त्या बराच वेळ स्वस्थबसल्या. त्यांना परत एकदा डाँ. ना फोन करावासा वाटला. जड अंतःकरणाने त्या उठल्या आणि त्यांनी फोन उचलला. डायलटोन जेमतेमचयेत होता. नंबर फिरवला, तर \"\"बरररर...... फुर्र र्रर्रर्रर्र.... चिर्रर्रर्ररररर..... असले आवाज येऊ लागले. मग कसंतरी डाँ. नि फोन घेतल्याचे त्याना जाणवले. \"\" हॅलो.. हॅलो..... फुर्रर्र.. मी ..... बर्रर्रर्र... पायात ... चिर्रर्रर्र.... अडकलोय....... फुर्रर्र..... आवाज जास्तच वाढला.कंटाळून रत्नाबाईंनि फोन ठेऊन दिला. हे काय उत्तर आहे ? मी पायात अडकलोय ? नक्की काय आहे? मग त्यांच्या दमलेल्या मेंदूला अर्थलागला.\"\" पाण्यात अडकल्येत वाटतं.\"\" त्या पुटपुटल्या. याचा अर्थ सगळीकडे पाऊस पडतोय म्हणायचा. बाप रे... म्हणजे आता इथे अजूनमी एकटीनी किती तास काढायचे ? मध्येच त्यांची भीती थोडी कमी झाली. गणपती पुढची समई केव्हाच विझली होती. त्यांनी तसबिरीकडेपाह्यलं. त्यांच्या मनात आलं . म्हणजे गोड बातमीच्या बदल्यात वाईट.... ̱घटना? आपला देवावर काहीच हक्क नाही, असं त्यांना वाटलं.आपण क्धी देवदेव केलंच नाही. ना आपण देवभोळेपणा केला. जे आहे ते वास्तव आपण बुद्धीच्या कसोटीवर घासून स्वीकारत गेलो. विनायकरावहो तसेच होते. पण आपण देवदेव करणाऱ्यांना कधी नावही ठेवली नाही . त्यांची आई देवाचं फार करायची. वडील मात्र तिची चेष्टा करायचे. एकटीने बसून आता वेळ तरी कसा काढायचा? त्यांनी स्वेटर विणायला घेतला होता तो त्यांनी टेबलाच्या खणातून काढला.त्या पुन्हा खुर्चीत बसल्या.
मग त्यांना काय वाटलं कोण जाणे. त्यांना श्रीकांतला फोन करावासा वाटला. पण लँडलाईनवर \"\"ही सुविधा आपल्या फोनवर उपलब्ध नाही. \"\"असं उत्तर आलं. मोबाईल काय आऊट ओफ रेंजच होता. त्यानी स्वेटर विणायला सुरुवातकेली . सुमारे अर्धा तास त्या विणत होत्या. पिंगत आणि निळसर रंगाच्या लोकरीचे धागे यांत्रिकपणे पुढे सरकत होते. आता त्यांना त्या \"\"डेड बॉडीची \"\" सवय झाली. पण एक गोष्ट नक्की होती की थोड्या थोड्या वेळानी नजर सोफ्यावर पडलेल्या विनायकरावांकडे जात होती. काही वेळानी त्यांना विणण्याचाही कंटाळा आला. त्या डोळे मिटून बसून राहिल्या. मध्येच वीज चमके. आणि कुठेतरी ती पडल्याचा\"\"धडामधूम धड धड\"\"असा आवाज होई. पाऊस \"\"अगदी सिन्सीयरली \"\" नाईट ड्यूटी करीत होता. मध्येच पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. बाहेरजणू पाऊस , रात्र आणि वीज मन मुराद खेळत होते . खिडक्यांमधून दिसत काहीच नव्हतं.आणि बघणार तरी कोण होतं ? एरव्ही ते सर्ववातावरण मादक वाटलं असतं. कुठून तरी , कदाचित वरच्या बाजूने वारा घरात शिरत होता. काय माहित? बाल्कनीचा दरवाजा उघडा होता तिथून तो शिरत असावा . पण रत्नाबाईंना वर जाऊन बाल्कनीचा दरावाजा बंद करण्याचा धीर झाला नाही. मग त्यांनी घड्याळाकडे पाहिलं. सव्वाबारा होत होते. पुन्हा एकदा त्यांच्या अंगातून भीती ची लहर गेली. आणि आपण इथे एकट्याच अस्ल्याची त्यांना जाणीव झाली. त्यांच लक्ष नकळत विनायकरावांकडे गेलं. मग त्यांना एक वेगळीच गोष्ट दिसली . विनायकरावांच्या उघड्या तोंडाच्या उजव्या कोपऱ्यातून एक लालसर द्रव वाहत येत होता. आणि त्याच बरोबर काहीतरी हालणारं, ओंगळवाणं, दिशाहीन हालचाल करणारं, लोकरीच्या रंगाचं बाहेर येत होतं. त्यानकळत जवळ जाऊन पाहू लागल्या. त्यांचे डोळे भीतीने विस्फारले गेले. करड्या पिंगट रंगाचा वळवळणारा किडा लहानसाच होता. जेमतेम बोटाच्या पेराएवढा. त्यांच्या तोंडावर तो रेंगाळत होता. त्यांनी पटकन हातातली लोकर अर्धवट विणलेल्या अवस्थेत टाकून दिली. आणि तोंडाशीयेणारी मळमळ पदराने दाबली. त्यांना भयंकर किळस आली. मग त्यांना आपण काय पाहतो आहोत याची जाणीव होऊन , भीतीने किंकाळीफोडली. त्यांची किंकाळी ऐकायला होतच कोण ? त्या शुद्ध हरपून सोफ्याच्या खुर्चीजवळ पडल्या. घड्याळात एक वाजून गेला होता. मध्येचएकदोन वेळा फोनची बेल वाजली. पण त्या शुद्धीत होत्याच कुठे? आणि फोनवरून काही ऐकू तरी येणार होतं कां? कोण होतं ते ?.... डॉक्टर?....... का श्रीकांत ? ..... का आणखी कोणी ? जवळ जवळ अर्धा पाऊण तास त्या बेशुद्धीत होत्या. हळूहळू त्या शुद्धीवर येत होत्या. त्यांना प्रथम आवाज आला वीज पडल्याचा. मग डोळे उघडता उघडता प्रकाशाची सवय करून घेतली. प्रकाश पूर्वी एवढाच होता.
त्यांनी तोंडावर पदर दाबून लांबूनच विनायकरावांकडे पाह्यलं. मघाशी एकच वळ वळ दिसत होती.आता त्यांना बऱ्याच लहान लहान वळवळी दिसू लागल्या. बरोबर लालसर लाळही बाहेर येत होती. आत काही तुटलं फुटलं असेल कि काय?त्या घाबरून मागे मागे येत होत्या. मग त्यांना वाटलं बॉडी \"\" डि टि रि ऑ रे ट "होत होती की काय ? त्यांनी असं वाचलं होतं. पण त्रयस्थपणाने असं वाचणं आणि आपल्याच माणसाच्या बाबतीत असं घडणं यात फरक होता. आता त्या फ्रंट डोअरशी आल्या आणि त्यांनी एकाकोपऱ्यात बसकण मारली. आत शिरणाऱ्या वाऱ्याने विनायक्ररावाच्या अर्धवट उघड्या पापण्याही हालत होत्या. जणू काही ते जिवंत होते. बाप रे हे काय आणखीन ? त्यांच्या मनात आलं. आपण इतक्या वेळात लक्षात आल्याबरोबर त्यांचे डोळे मिटले असते तर बरं झालं असतं.मध्येच घड्याळात दोन ठोके पडले. कसंतरी बळ धरून त्या विनायकराव पडले होते सोफ्याच्या मागे अस्लेल्या वॉर्डरोब कडे जाऊ लागल्या. त्यात चादरी होत्या. एखाद चादर त्यांच्या डोक्यावरून घातली असती तरी पुढचं काही दिसणार तरी नाही या विचाराने त्या सोफ्यामागे आल्या.
त्यांनी वॉर्डरोब उघडण्यासाठी हात वर उचलला आणि तेवढयात दरवाजावरची बेल वाजली ‌. सबंध गूढ वातावरणाचा भंग करणारी बेल. खरं तर तिचा आवाज अगदीच वाईट नव्हता. एरव्ही भीती वाटलीच नसती. पण त्या दचकून मागे सरकल्या.दरवाजा बाहेर कोण आहे ? त्यांना थरथर सुटली. त्यांना आपल्या भीतीचा रागही आला. रागाने भीती जरा दबली. मग त्यांनी बिचार केला. कोणीका असेना . मी त्याला सगळं सांगीन . पण कोण आहे विचारणारे शब्द काही त्यांच्या तोंडून बाहेर आले नाहीत. त्यांनी विचारायच्या आतच बाहेरून आवाज आला. \"\"मी , डॉक्टर शिधये. रत्नावहिनी दार उघडा लवकर. "\" वहिनींनी सुटकेचा निश्वास सोडला. थरथरत त्यांनी भिंतीचा आणि सोफ्याचा आधार घेत दरवाजा उघडला. दारातून डॉ. आत आले. ते भिजले होते̮ त्यांच्यामागे दोन माणसंही होती. कदाचित त्यांचे मदतनीस असतील असं वहिनींना वाटलं. डॉ. सरळ विनायकरावांकडे गेले. दुसरे दोघे दाराजवळच रेंगाळत होते.थोड्या वेळाने ते दोघेही आत आले. डाँ . नि वेगवेगळे प्रयत्न करून पाह्यले. मग खात्री झाल्यावर, त्यांन प्रथम बॉडी साफ केलीं . नाका तोंडात बोळे घातले.काही औषधं लावली. त्यांचा हॉल मध्ये वास पसरला. मग बॉडी आलेल्या दोघांच्या मदतीने त्यांनी व्यवस्थित पॅक केलि. आणि ते आत गेले. रत्नाबाई आत होत्या. त्यांना म्हणाले, "श्रीकांतला फोन लागला का? \"\" त्या नाही म्हणाल्या . ते पुढे म्हणाले, \"\"सात आठ तास उलटून गेलेले आहेत. बॉडीचीअशी अवस्था होते कधी कधी. तुम्ही धीरानं या सगळ्याला तोंड दिलत, खरच कमाल आहे तुमची. झालं ते वाईटच झालं . मला तुम्ही तरी सांगायच ना कुठे जाणार आहात ते. नेहेमी सगळं सांगतो हा . यावेळेला कसा विसरला ? रत्नाबाईंच्या डोळ्याला धार लागली. म्हणाल्या, \"\"\"सगळंआयुष्य नीट गेलं हो. पण हे कसं झालं काही कळलच नाही. \"\" डॉ . नि समजाबले, \"\" आपल्या हातात या गोष्टी नाहीत्. हा सगळा परमेश्वराचा खेळ आहे. आता मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही अगदी स्वस्थ राहा. मी आधी तुमच्यासाठी कॉफी करतो. ती घ्या. तुम्हाला त्याची गरज आहे. माझ्या बरोबर दोघेजण आहेत ते गाडी घेऊन गावात जातील. पुढची व्यवस्था करतील. तो पर्यंत मी श्रीकांतला फोन करतो. \"\"
वहिनींची समजुत काढता काढता त्यांना गोड बातमीही समजली. त्यांना परमेश्वरी खेळाचं आश्चर्य वाटलं. त्या दोघांना सूचना देऊन त्यांनी गावात पाठवलं. उरलेली रात्र बसून काढावी लागली. सकाळ झाली. पाऊस पूर्ण थांबला होता. चकचकीत कोवळ्या उन्हाने सगळं जंगल , डोंगरमाथे उजळून निघाले. नैसर्गिक सौंदर्याची नुसती लयलूट होती . पण त्याचं कौतुक कोण करणार? श्रीकांतला फोनलागला. त्यावर तो म्हणाला , \"\"लवकरात लवक्रर म्हंटलं तरी चार पाच दिवस लागतील. मी आईशी काय बोलणार ? \"\" विनायकरावांना तीन भाऊ होते. पण एक नागपूरला, एक अमरावतीला आणि तिसरा भोपाळला.. पण डॉक्टर म्हणाले की सध्या कोणाकरताही थांबता येणार नाही.लवकरात लवकर बॉडी डिस्पोझ केली पाह्यजे. सकाळी आठ वाजे पर्यंत अंब्युलन्स आली. काही माणसंही आली. बॉडीघेऊन ते गेले. मग डॉक्टर रत्नाबाईंसाठी थांबले. त्यांनी कशी तरी सगळी आवरा आवर केलि. आणि बंगल्याला कुलुप लावून निघाल्या. त्यांनी मागे देखील वळून पाह्यल नाही.

( संपूर्ण)