Feb 24, 2024
वैचारिक

कधीतरी समजून घ्यावे

Read Later
कधीतरी समजून घ्यावे

"काय रे शशांक, तुझी बायको उठली की नाही अजून? म्हंटल आज रविवार, सुट्टीचा निवांत मिळणारा एकच दिवस.." पुष्पाताई आपल्या मुलाला म्हणाल्या.

"आई, असे काय करतेस? आठवडाभर किती काम असतं? मग एक दिवस मनासारखा घालवला तर काय हरकत आहे? आणि मृण्मयी कधीची उठली आहे. विहानचे आवरते आहे ती." शशांक वैतागून म्हणाला.

"आवरा म्हणावं. आम्हाला कधी मुलं झालीच नाहीत..त्यांचं आवरून आम्ही घरातली सगळी कामं करत होतो. थांब. मीच बघून येते. आज सकाळचा नाश्ता मिळणार आहे की नाही ते."
पुष्पाताई गडबडीने आत निघाल्या आणि
विहानच्या पसरलेल्या खेळण्यावर त्यांचा पाय पडून चांगलाच मुरगळला. त्यांचा आरडाओरडा ऐकून शशांक पळत आला.

"शशांक, ती खेळणी आधी आवर. काय ती मेली खेळणी, सगळ्या घरभर पसारा नुसता." पुष्पाताई ओरडून म्हणाल्या.

"अगं आई, मगाशी तुझ्याच धक्क्याने पसरली ती
खेळणी." शशांकने पटापट सारी खेळणी आवरून ठेवली.

पुष्पाताई पायाला औषध लावायला बेडरूममध्ये निघाल्या, तेव्हा मृण्मयी तिच्या आईसोबत फोनवर बोलत होती. नकळत तिचे बोलणे पुष्पाताईंच्या कानावर पडले.

"आई, अगं हा एकच दिवस निवांत मिळतो मला. त्यात विहान अजिबात पाठ सोडत नाही. सकाळचं आवरायला वेळ लागतो मग. त्यात शशांकची काही मदत होत नाही गं आणि आईंना सकाळचा नाश्ता लागतो. मग सगळीच धावपळ होते. कधी कधी चीड येते. पण त्यांच्या जागी तू आहेस असे समजून मी आईंचे बोलणे मनावर घेत नाही. तरीही आई फार बोलत नाहीत. समजून घेतात गं."
पुष्पाताईंना मृण्मयीचे बोलणे ऐकून कसेतरीच वाटले. पायाला औषध लावून त्या पुन्हा हॉलमध्ये येऊन बसल्या. विचार करता करता त्यांचे पायाचे दुखणे पार पळून गेले.

काही मिनिटांतच मृण्मयी हॉलमध्ये आली.
"आई नाश्त्याला काय करायचं?"

"कर काहीही." नेहमीच्या सवयीप्रमाणे पुष्पाताई म्हणाल्या.

"नको..अगं आज नाश्ता राहू दे. स्वयंपाकच करू. कणिक मळून ठेव. बाकी मी पाहते. जा तू तुझे आवरून घे." हे ऐकून मृण्मयीला आश्चर्य वाटले.

आपल्या आईचे हे वेगळेच बोलणे ऐकून शशांकने पेपरमधून आपले डोके बाहेर काढून परिस्थितीचा अंदाज घेतला आणि सारं काही ठीक आहे म्हणून, हायसे वाटून पुन्हा त्याने पेपरमध्ये डोके खुपसले.

थोड्याच वेळात मसाल्याचा मस्त वास घरभर पसरला. स्वयंपाक तयार झाला आणि सारे उत्साहाने जेवायला बसले. पुष्पाताईंनी सर्वांना स्वतः हाताने जेवायला वाढले. एरवीपेक्षा निराळी चव असल्याने सारेजण पुष्पाताईंची स्तुती करत पोटभर जेवले.
इकडे पुष्पाताईही खुश झाल्या, कारण आज खूप महिन्यांनी त्यांनी आपल्या माणसांकडून स्वतःची स्तुती ऐकली होती!

पोटभर जेवल्याने दुपारी सारे झोपी गेले.
साडेचार वाजले तशी मृण्मयीला जाग आली. चहाची वेळ झाल्याने ती गडबडीने उठली. बाहेर येऊन पाहते तर हॉलमध्ये सासू -सासरे चहा पीत बसले होते. तिला पाहताच सासुबाई म्हणाल्या,
"मृण्मयी अगं, चहा उकळून ठेवला आहे. फक्त गरम करून घे."
एरवी चहा वेळेत हवा म्हणून गडबड करणाऱ्या पुष्पाताईंमधला हा बदल मृण्मयीला सुखावून गेला.

"दोघे फिरायला जाणार असाल तर विहानला घरी ठेऊन जा. त्याला इथे खाली बागेत घेऊन जाऊ आम्ही. खेळेल तो लहान मुलांत. आता त्यालाही सवय व्हायला हवी." पुष्पाताई स्वयंपाक घरात येत म्हणाल्या.

"नको आई. त्रास देईल तो तुम्हाला." मृण्मयी काळजीने म्हणाली.

"काही होत नाही गं. जा तुम्ही निवांत. आम्ही आहोत ना? आम्हालाही सवय होऊ दे जरा." पुष्पाताई हसत हसत म्हणाल्या.

शशांक आणि मृण्मयी फिरून आले तेव्हा विहान जेवून झोपला होता. आज कितीतरी दिवसांनी मृण्मयीला असा मोकळेपणा मिळाला होता. लग्नानंतर वर्ष जात नाही तोपर्यंत विहानचा जन्म झाला. नोकरी, बाळ सांभाळता सांभाळता वेळ कसा जाई हेच तिला कळत नसे. त्यात पुष्पाताईंनी घरची जबाबदारी मृण्मयीच्या हाती देऊन टाकली. त्यामुळे मृण्मयी अगदीच बिझी झाली.
आज आपल्या सासुबाईंमधला अचानक झालेला बदल तिला खूप सुखावून गेला.

"आई, आजचा हा बदल कायमस्वरूपी आहे की तात्पुरता?" शशांक हसत हसत पुष्पाताईंना म्हणाला.

"शशांक, असे काय बोलतोस?" मृण्मयीने आपले डोळे मोठे केले.

"असू दे गं. खरंतर सकाळी मृण्मयी आणि तिच्या आईचे बोलणे सहज माझ्या कानावर पडले. मृण्मयी मला 'आईच्या जागी' पाहते हे ऐकून मला खूप बरं वाटलं. मी तिच्याकडून सून म्हणून अपेक्षा करते, तसेच तीही माझ्याकडून सासू म्हणून अपेक्षा करत असेल याचा विचारच कधी केला नाही मी. मग वाटले आपणही सुनेला कधीतरी समजून घ्यावे..
मला इतकेच माहिती होते, सून आली की सासूने सगळी जबाबदारी तिला सोपवायची असते. माझ्या सासुबाईंनी तेच केलं. अर्थात तो काळ वेगळा होता.
पण आज दिवसभर मी मृण्मयीच्या चेहऱ्यावरचे समाधान निरखत होते. रोजच्या बिझी दिनक्रमातून आपल्याला स्वतःसाठी थोडा निवांत वेळ मिळाला की खूप आनंद होतो! तोच आनंद होता तिच्या चेहऱ्यावर.
आजपासून मला झेपेल ती मदत मी रोज करेन मृण्मयी. शेवटी संसार तुम्हा दोघांचाही आहे." आपल्या सासुबाईंचे बोलणे ऐकून मृण्मयीला खूप बरं वाटलं. कुठलेही भांडण, तंटा न करता आपल्या सासुबाईंनी आपल्याला समजून घेतलं म्हणून तिला समाधान वाटलं.

समाप्त.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//