काय हे आई होण्याचे सुख...!!!

Aai Honyache Sukh


आज चतुर्थी असल्यामुळे रमा नगरातील बायका आणि मुली गणपतीच्या दर्शनाला येत जात होत्या..

मंदिरात खूप गर्दी झाली होती

देवाच्या दर्शनाला खूप मोठी रांग होती

नवसाला पावणारा सिद्ध गणपती तो..मनात असेल ते मिळत असते ही ख्याती होती त्याची..


लांब लांबून लोक त्याच्या पाया पडायला येत..

माहेर वासीनी ही मुद्दाम येत...


आज तृप्ती ही दर्शनाला आली होती...तिला खूप दमल्या सारखे होत होते, वरतून ऊन चटकत होते...पायावर खूप ताण येत होता तसा पाय लटपटत होता...तिला तोल सांभाळता येत नव्हता...आणि त्यात कडेवर लहान बाळ ही होते ...


नवऱ्याने तिच्या हातातले बाळ घेतले आणि तिला बाजूला बसवले...तिला पाणी पाजले ,तर ऊन लागू नये म्हणून स्वतः सूर्याच्या दिशेत आडवा उभा राहिला...मग तिच्यावर सावली आली...


तृप्ती ,समीर खूप आनंदी जोडपे, त्यांचे लव्ह marriage ,तिला घरच्यांचा विरोध होता तरी फक्त तो चांगला मुलगा आहे तसा चांगला नवरा सिद्ध होईलच हे माहीत होते आणि तसेच झाले... तो तिला खूप जीव लावत असे...घर सोडून आल्यावर त्याने ठरवले होते ,आता तृप्ती माझी जबाबदारी आहे.. तिला सुखाच्या सावलीत ठेवेन तिच्यावर दुःखाचे ऊन ही येऊ देणार नाही...ते मी झेलून घेईल...


या असल्या प्रेमात ती नाहून निघाली होती, नवरा चांगला, त्याची परिस्थिती ही चांगली होती ,म्हणून तिला माहेरची आठवण ही येत नव्हती जणू...आई वडील आठवायचे , आणि आठवले की तो तिला तिच्या माहेरच्या जवळ असलेल्या ह्या गणपती मंदिरात मुद्दाम घेऊन यायचा, म्हणजे ह्या निमित्ताने तिला तिची आई दिसेल...आणि तिला लांबून का असेना ती बघून खुश होईल...हे त्याचे नित्याचे असायचे...आई दिसली की खुश होत आणि पुन्हा 20 किलोमीटर आपल्या घरी ती परत निघून जात...


समीरला ही तिच्या आनंदात आंनद होत...

इकडे आज मंदिरात बसलेली असतांना तिची चुलत बहीण तिला तृप्ती दिसते आणि तृप्तीला बघून तिला आंनद कमी आणि तिची दया येते...


तृप्ती ची दया का यावी मधुराला... असे का व्हावे...


मधुरा सोबत तिची मैत्रीण ही होती ,तिला मधुरा म्हणाली ,अग पाहिले का तुला मी सांगत होते ना ती माझी चूलत बहीण जिने लव्ह marrige केले ती ,पळून गेली होती ती त्या भैया सोबत ती ...आठवते का मी तुला सांगत होते तिच्या बद्दल ती खूप सुंदर ,गोरी, उंच जणू मिस इंडिया दिसायची...ती बघ तिकडे कशी हत्ती झाली आहे ,किती जाड झाली आहे...कुठे मिस इंडिया वाटायची ती आणि कुठे फॅट बाई ही...ओळखू ही येणार नाही ती अशी झाली आहे...


तिच्या मैत्रिणीने तृप्तिकडे वळून पाहिले ,आणि तिला तसे काही वावगे वाटले नाही, उलट ती म्हणाली अग लग्न झाले आणि सुख मानवले की मुली जाड होतातच ,तशी ती तिच्या नवऱ्यासोबत खूप खुश दिसते..आणि तो ही खूप जीव लावणारा आहे असे जाणवते ,तू बघ तो फक्त तिच्यासाठी स्वतःच्या अंगावर ऊन घेत आहे...तिला गरम होत आहे म्हणून तो पेपर ने हवा ही देत आहे...ह्यातून इतकेच दिसते ती खूप सुखी आहे त्याच्या सोबत...


तू पण मूर्ख आहेस, जाड झाली किती ते बघ, सगळे सौंदर्य घालवून बसली आहे ह्यात काय सुख दिसते तुला, आता तर तो आखीव रेखीव चेहरा ही कसा भोपळा झाला आहे...तिला तर बघावे ही वाटत नाही...अशी दिसत आहे...मधुरा रागात बोलत होती..


तरी सुख हे सौंदर्यात नसते...आणि तसे ही भाग्यात असावे लागते नवऱ्याचे असे प्रेम, मग स्त्री सगळ्या दिखाऊ गोष्टी सहज त्याग करायला तयार होते...ती वाटले आणि ठरवले तर पुन्हा पहिल्या सारखी दिसेल...त्यात ती एका छोट्या मुलाची आई आहे..तिला आपल्या बाळासाठी खाऊन पिऊन स्वस्थ रहाणे गरजेचे आहे...तिला मिस इंडिया होण्यातील सुख नको असेल ह्या सुखापुढे...


मधुरा ला जणू हा टोमणा वाटला, तिने फक्त ह्या सौंदर्याच्या नसत्या अभिमाना पोटी आई होण्याचे सुख नाकारले होते, आणि त्यामुळे नवऱ्या मध्ये आणि तिच्या मध्ये वाद झाले होते, परिणामी त्याने तिला divorce दिला होता...आणि मधुरा पुन्हा माहेरत आली होती...तिला कधी स्वतःची चूक वाटली नाही...ना तिने आपला हेका सोडला होता...तिला फक्त तिचे दिसणे महत्वाचे होते...


अश्या मधुरा खूप आहेत ज्यांना आपल्या दिसण्याचा खूप अभिमान असतो आणि त्यामुळे मुलं होण्याचे ते सुख ही नको असते...दिसणे ही बाब तात्पुरती असते तरी किती तरी अश्या मधुरा आपले सुखी संसार आणि मुल होण्याचे सुख त्यागायला ही तयार होतात...
©®अनुराधा आंधळे पालवे