कवितेच्या शोधांत..

कविता वाचून समजते का..? ती उमजत नाही पण..कवी मनाचा तळ गाठणं एका अंधाऱ्या विवरांत प्रकाश किरणांचा अंधुकसा कवडसा शोधण्या सारखं आहे..सापडते ती समजते ती पण उमजते केंव्हा ..


सृजनसूक्तातलं एखाद्या कवितेचं गर्भ धारण करणं.. अनंतकोटी प्रकाश वर्षांचा प्रवास फक्त कल्पना शक्तीच्या गर्भदाणीत असावा...प्रतिभावंतांची लेखणी प्रसवतांना त्या वेदना वृश्चिकदंशाच्या वेदनां सारखी असावी..मरण यातनांचा अंत एक सृजनसोहळा..
जे डोळ्यांना दिसतं,स्पर्शानं अनुभवु शकतो ,कर्णेंद्रीया मार्फत ऐकु शकतो.. या पलीकडे आहे काहीतरी..
घनगर्द तमातलां अंधार झेलत प्रसवणारी कविता... ज्ञात अज्ञाताच्या पलीकडलं काहीतरी..
सांगू शकणारी..अथर्व वेदांत वेन ऋषींच्या ब्रम्हसाक्षात्कारसूक्तांत
तीन भाग अज्ञानात ठेवून फक्त एका भागांत ब्रम्हचैतन्य उत्पन्न करणारा आदित्य हा ब्रम्हसाक्षात्कार देतो..
नेणिवेच्या पलिकडलं जग पहाणं कवी जमवतो.. आदिम उर्जांचे स्त्रोत हे अर्ध जागृत वैयक्तिक आणि सामूहिक नेणीवेतून जागवतो.
ज्ञाताच्या कुंपणावरुन
धीरत्व धरुन उड्डाण करुन
चितघव चपला ही जाते
नाचत तेथे चमचमते
अंधुक आकृती तीज दिसती
त्या गाताती निगूढ गीती
त्या गीताचे ध्वनी निघती
झूपर्झा गडे झूपर्झा.
केशवसूतांच्या कविते पाशी मी थांबते असं अरुणा ताई ढेरे म्हणतात..
झूपर्झा ही अवस्था नक्की कोणती..?
सुखाची अनुभुती देणारा क्षण की असूनही नसणं ,नसण्यातलं असणं
या संपृक्ततेतलं भारावलेपण.. अनिश्चित नक्कीच नाही.. अस्वस्थ
मनाच्या अथांगतेत उसळी मारणारं चैतन्य.. तिमिरांतला अंधार शोषलेलं .. कधी स्वप्नावस्था कधी सुप्तावस्थेतलं कधी दोन्हीं मधलं अंतर सहज कापणारं काहीतरी....कविता निर्मितितली सृजकता..

दोन पोक्त पानं
एक हिरवंगार एक पिवळ धम्मक
बाजू बाजूला दोघांचे देठ एकत्र थेट
एका वरल्या रेघा दुसरं वाचतंय
स्वतःच्या रेघांतून पसरतंय
पहिल्याच्या अंगात....
दोनच ती.. इतरांत ही अशी एकत्र दोन कित्येक
वारा आला की एकत्र सळसळाट सर्वांचा
पिवळ्या उन्हांत पोपटी पानं
पोक्त झाड उभच्या उभं....

खानोलकरांच्या या कवितेतल्या ओळी .. मनातल्या अंतर्गर्भी संवेदनांचा उल्लेख करतात का..?
न जाणवणारं काही ते एक पान आणि नेणीवांतून उमजत जाणारं एक पान ..दोन्हींचे देठ एकच..नवनिर्मीती साठी लागणाऱ्या जाणीवा शोषून घेणारं.. ते झाडं कल्पनेच्या भरारीचं सळसळत रहातं .. नेणीवेच्या हिरव्या रेघांतून पसरत जातं..पोक्त पणा घेऊन आलेलं. पिवळं धम्म.. पडझड अनेक अनुभवांचे पावसाळे पाहिलेलं..
कवीची कविता त्याच्या मनाचा ठाव घेणं केवळ अशक्य.. कविता वाचून समजते का..? ती उमजत नाही पण..कवी मनाचा तळ गाठणं एका अंधाऱ्या विवरांत प्रकाश किरणांचा अंधुकसा कवडसा शोधण्या सारखं आहे..
सापडते ती समजते ती पण उमजते केंव्हा ..

घटका घटका काळोखांत बसून असतो असा
उरातला गोंजारत नवखा शब्दांचा कवडसा..
बोरकर म्हणतात इथे अंधार हा मनासक्तीचा आहे..
भोगलालसेच्या तृप्ततेचा.. अंकुरीत होणारा.. सळसळती चितघनचपला चमकून जाणारी .. लखलखती..
कवितेला अनुभवाकार देणारी.
©लीना राजीव.
हा लेख "कवितेच्या शोधात " या अरुणा ताई ढेरेंच्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन लिहीलेला आहे..
याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.. मोहांत पाडणारं लेखन आणि दिलेले कवितांचे अंश .. कविता लिहीतो म्हणजे काय..? तो प्रवास या दिग्गज साहित्यिकांच्या नजरेतून कसा असावा .. हे इतकं भावल मला.. ते लिहीण्याचा , समजून घेण्याचा माझा हा प्रयत्न ..
©लीना राजीव.

काहीवेळा कविता आणि त्याचे संदर्भ हे अनाकलनिय असतात..
कवी ला कवियत्रीला नेमकं काय सांगायचंय याची आणि आपल्या समजुतीची गल्लत होते..

माझ्या अक्षर यात्रेतल्या प्रवासात
स्पदनांचं धुकधुकणं थांबलंय
अफाट वेगाची मर्यादा
भोवाळतीय मनाला
सतत धावणं ,सतत गुरफटणं वळणांचा ससेमिरा
ही फार ..
पायाखालचा रस्ता भुलवत नेतो
त्या सांदी कपारीतून
अव्यक्ताचं देणं असल्या सारखं
शोध कुठवर घ्यायचा ..?
मग माझ्या मनातले गहींवर
ओंथंबून येतात..
एकेक शब्द लयींचा किनारा होतो..
निळ्याशार शाईचा समुद्र होतो..
बुद्धी भ्रष्टतेचे फासे दोन ,चार सहा
कसे ही पडतात..
पण एक अधांतरी असणारा विचार
स्थिरावतो ,त्या गुलाबी कागदी नभावर
माझी कविता सहत्रावर्तनात
अवतरते अलगद,हळुवार त्या
त्या मेघमालांचा साक्षात्कार घडवत
तूफान कोसळतो विचारांचा नभ
एका उन्मुक्त कवितेचा
जन्म होतो .. माझ्याच अश्रुंच्या
उधाणलेल्या तांडवात...
©लीना राजीव.