कविता फुलेल काय?

व्यावहारिक जीवनात मनाची सर्जनशीलता विसरून जात चालली असताना जुन्या आवडी निवडी मधेच डोकावतात.

आज मी ठरवूनच लिहायला बसले                         

पण.. विषय नाही आठविले आणि

शब्दच जणू संपले....

कपाटातून मग खास वही

नि पेन काढले

बघते तर काय पाने पडली पिवळी

आणि पेनही नाही चालले...

विचार केला मग

असे कसे झाले?

शब्द, वही , पेन

सारेच रुसले....

जमाखर्चाची आकडेमोड

आणि व्यवहाराचे ठोकताळे

मतभेदांचे नाजूक जाळे

जीवन थोडे रुक्षच झाले

कोरड्या या जमिनीवर

अंकुर नवा उमलेल काय ?

शब्द रुजून मनामध्ये

कविता माझी फुलेल  काय ?