Mar 01, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 10.0

Read Later
कावेरी 10.0


कावेरी

भाग 10


"आई, मला उशीर होतोय. किती वेळ बसू?" कावेरी कॉलेजला निघण्यासाठी सकाळीच आवरून निघाली होती पण जोशी गुरुजी येणार म्हणून तिला आईने थोपवून ठेवलं. आता ती सोफ्यावर बसून अगदी बोअर झाली होती.

"कुठं कडमडले जोशी बाबा देव जाणे!" तोंडातल्या तोंडात पुटपुटली. तेवढ्यात जोशी गुरुजी दत्त म्हणून दरवाजात हजर झाले.

"नमस्ते काका! फार लवकर आलात! जरा आरामात यायचं होतं ना." कावेरी त्यांना बघून उठून उभी राहत म्हणाली. आईने डोळे मोठे करून कावेरीकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला.

"अहो या गुरुजी. कसे आहात? कावू जा पाणी घेऊन ये." कावेरी मात्र ढिम्म हलली नाही. आईने गुरुजींच्या हातातली थैली तिच्या हाती घेऊन त्यांचं स्वागत केलं आणि ते आत येऊन सोफ्यावर बसले.

"काय, काय म्हणतेय कावेरी बाळ? कशी आहेस?" काकू पाणी घेऊन आली नि गुरुजींनी पाण्याचा पेला हातात घेऊन कावेरीला विचारलं.

"पहिलं तर मी बाळ नाही... त्यामुळं प्लिज तुम्ही मला बाळ नका म्हणू आणि तुमचा अभ्यास, नक्षत्र ग्रह तारे सांगतात की मी कशी आहे ते. वेगळं का सांगत बसू?" कावेरीला खूप वाट बघावी लागली म्हणून तिने वचपा काढण्यासाठी गुरुजींवर कुरघोडी केली.

"शनी... शनी वक्री नसता ना तुझा, तर सरस्वती स्वर्गातून आली असती जिभेवर! पण दुर्दैव आमचं..! दुसरं काय..? " जोशी गुरुजींनी त्यांच्या नाकातल्या वक्र भाषेत कावेरीच्या वर्मी बोट ठेवलं. कावेरीच्या डोळ्यात शनी मंगळ बुध, जणू काही सगळी सूर्यमालाच अवतरली! ती आईकडे बघू लागली.

आईला गुरुजींचा रोख बरोबर समजला.

"कावू, तुला उशीर होतोय ना? मग गुरुजींना त्यांचं काम लवकर आटोपतं घेऊ देत." आई जरा प्रेमाने पण कावेरीला दटावत म्हणाली. कावेरी पण गप्प बसली.

जोशी गुरुजींनी निवांत पाणी घेतलं. मग काकूने चहा आणून दिला तो ही आईसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत फुरके मारून झाला पण ज्या कामासाठी आले त्याचा काहीही पत्ता नव्हता. कावेरीचा अक्षरशः तीळपापड होत होता. अर्थात तिची ही अवस्था बघून आईसुद्धा चिंतेत होती.

"आई चहापाणी झालंय. काकू पोहे बनवतेय. माझ पाहिलं लेक्चर बुडलं. थोड्या वेळात काकूचं वांग्याचं भरीत आणि बट्टी पण तयार होईल. तरीही मी कॉलेजला जाणार नाही आणि त्यानंतर मला रेडिओ सेंटरला पण जायचंय. आज नवीन थीम आहे त्याची प्रॅक्टिस पण करायचीय. ऐनवेळी गडबड नको व्हायला. पूर्ण शहर माझा आवाज ऐकतं दोन तास. पण घरात... काळ कुत्रं सुद्धा ऐकत नाही!"

"ह्म्म्म... दाखव बाळा तुझा हात..!" गुरुजींनी कावेरीची काळजी समजून घेऊन चहाचा कप खाली ठेवला आणि कावेरीचे दोन्ही हात बघितले. थोड्यावेळ डोळे मिटून चिंतन केलं आणि आपला अंगठा डोक्याच्या मध्यावर ठेवून बोलू लागले.

"जोरदार आगमन झालंय पावसाचं. जरा जोर धरू लागला की त्याचा लगाम खेचला जाईल तेव्हा विश्वासाची खूप गरज आहे. अवघं विश्व् सामावून जाईल अंधारात तेव्हा उजेड बनशील आणि तेवत राहशील. पण जवळ असणाऱ्याला जास्त चटके बसतील. तेव्हा प्रेम हाच रामबाण उपाय असेल."

गुरुजी सांगू लागले तशी काकूसुद्धा स्वयंपाक घरातून बाहेर आली. राधिकाही गुपचूप येऊन ऐकू लागली. अर्थात तिला मोठ्यात बोलण्याची परमिशन नसल्याने तिने चोरून ऐकायचं ठरवलं होतं.

"ताई, हिची कुंडली अभ्यासली भल्या पहाटे आणि थोडे कठीण दिवस सुरु होणार आहेत. जपून राहावं लागेल. सगळे मित्र ग्रह वक्री फिरलेत पण मित्रच साथ देतील हेच सांगतेय कुंडली. आई म्हणून आजवर तुम्ही सगळी कर्तव्य पार पाडलीत तिच्याबाबत पण आता तुम्हाला खूप महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे." डोळे उघडून गुरुजी म्हणाले.

"अय्या म्हणजे लग्नाची.?" काकूने अत्यानंदाने विचारलं.

"ताई साहेब, पुढील चार वर्षे लग्न योग नाही तिच्या कुंडलीत. तुम्ही अन्नपूर्णा आहात आणि ती तुमच्या हातावर यथेच्छ ताव मारूनच जाईल इथून. काळजी नसावी. "  जोशी गुरुजी काकूला म्हणाले.

"थँक गॉड..!" कावेरीने सुखाचा श्वास घेतला. पण आई मात्र काळजीत पडली.

"लग्न नाही मग कसली जबाबदारी..? "

"वेळ त्याचे फासे त्या त्या वेळेवरच पाडतो. पण तुम्ही खमक्या आहात आई भवानीसारख्या. परंतु स्वतःची देखील काळजी घ्या येत्या दिवसात." गुरुजी गंभीर नजरेने म्हणाले. आई आणि काकू त्यांचं बोलण ऐकून काळजीत पडल्या.

"डोन्ट वरी. मी घेईन मोठी आईची काळजी." राधिका आईच्या मागून मिठी मारत जवळ आली.

"राधा, किती वेळा सांगितलंय मोठ्यांत बोलू नकोस." काकू म्हणाली.

"असू द्या ताई, मुलांना ह्या गोष्टीची कल्पना असली की ते मनाने तयार होतात पुढ्यात वाढून ठेवलेल्यासाठी. " गुरुजी म्हणाले.

"म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला?" कावेरीने विचारलं.

"प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात आणि यावेच. त्याशिवाय माणूस प्रबळ होत नसतो. "

"तुम्ही असं कोड्यात का बोलतात काका?" कावेरी आता विचारात गुरफटून अस्वस्थ झाली.

"भगवंताचं प्रत्येक चक्र हे असंच कोडं असतं पण ते फिरलं की उलगडत जातं. तसंच आयुष्याचं असतं बाळ. तुला आई भवानी उदंड आयुष्य, सुखं संपत्ती आरोग्य आणि लढण्यास बळ देवो."

"बाकीचं ठीक पण बळ भरपूर आहे तिच्यात लढायला.!" राधिका कावेरीला हसू लागली.

"यामुळेच काकू तुला मोठ्यांत बोलू देत नाही. शहाजूक कुठली." कावेरी रागावून म्हणाली.

"येणाऱ्या काळात प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल. प्रेमाची साथ आणि सारथी आणि साथीचं प्रेम महत्वाच ठरेलं आणि नेहमीप्रमाणे सत्याचा विजय हा होतोच पण विजय नेहमी बलिदान मागतो तर त्यावेळी देण्यासाठी आपला राग अहंकार जपून ठेव. अहंकार त्यागला नाहीस तर सारथी साथ सोडून देईल. आयुष्याचं एक नवीन पर्व सुरु होते आहे. शतायुषी हो. यशस्वी हो. रणरागिणी हो. ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः!"

आता मात्र आई आणि काकू दोघीही चिंतेत पडल्या. नेमकं आपल्या लेकीच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय ह्याची धास्ती घेतली होती. कावेरीला तर कळतच नव्हतं कोण सारथी, कोण साथी, कसलं प्रेम कोणाचं प्रेम. पण प्रेम म्हटल्यावर तिच्या डोळ्यासमोर तिला जबरदस्तीने डॉक्टरकडे घेऊन जाणारा कुणाल तरळला. तिच्या अंगात एक थंडगार शहारा दौडला. डोक्यात विचारांचं चक्र सुरू होणार होतं पण तेवढ्यात गुरुजी बोलू लागले.

"काळजी नसावी ताई साहेब. सगळं काही ठीक होईल. तुम्ही धुमावती तीर्थ सुरु करा आजपासून पुढील काही दिवस, श्रीसूक्ताचे पाठ आणि रामरक्षा पठन न विसरता. म्हणजे सगळं ठीक होईल." गुरुजींचा प्रत्येक शब्द जणू आईला आधार देत होता.

"होय गुरुजी. मी न चुकता करेन." आई म्हणाली.

"रक्षा धागा देतो. दंडाला बांधायचा आणि तो कधीच काढायचा नाही. हे तुम्हा चौघांचे आणि हा लाल रंगाचा कावूचा." गुरुजी म्हणाले.

"येन बद्धो बलि राजा
दानवेन्द्रो महाबल:
तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे मा चल मा चल!!" असे म्हणून त्यांनी तो लाल रक्षा धागा कावेरीच्या दंडाला बांधला.

कावेरीचा खरंतर ह्यावर विश्वास नव्हता पण तिने ही आढेवेढे न घेता आईची काळजी बघून निमूटपणे बांधून घेतलं. ती गुरुजींना नमस्कार करून घराबाहेर पडली.


©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  10
जिल्हा:  नाशिक
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//