Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 8.0

Read Later
कावेरी 8.0


कावेरी

भाग 8


कावेरीच्या घरी तिची आई, काकी आणि लहान बहीण म्हणजे तिच्या काकीची मुलगी राधिका तिघेही तिची वाट बघत हॉल मधेच बसल्या होत्या.

"काकू ताई आली बघ." राधिका म्हणाली.

"किती वेळ लागतो गं तुला..! आणि कुठे लागलं बघू.? सावंत भावजींनी फोन करून सांगितले मला." आई काळजीने विचारू लागली.

"वाह छान..! नाही म्हटलं तरी केलाच का काकांनी फोन..!" कावेरी उत्तरली.

"ते सोड..! पाय बघू आधी तुझा." काकू तिच्या जवळ येत म्हणाली.

"अगं काकू फार नाही लागलं. ठीक आहे मी." कावेरी उत्तरली.

"ए ताई आलीस ना आता..! चल आधी जेवूया. कधीपासून वाट बघतोय आम्ही! भूक लागली आहे मला आणि जेवताना सांग सर्व काय झाले ते ओके.!" राधिका म्हणाली.

"हो, चल ना आई. मला पण खूप भूक लागलीये." कावेरी म्हणाली.

"बरं… तू फ्रेश होऊन ये. मी जेवायला वाढते." आई म्हणाली.

थोड्या वेळाने सगळे जेवायला बसले आणि जेवताना कावेरीने घरच्यांना आज झालेला सगळा प्रकार सांगितला.

"ओSSS तो वो तुझे छोडने घर तक आया..!  क्या बात है ताई ..! पण तू त्याला घरात का नाही बोलवलं? आम्हालाही त्याला बघता आलं असतं ना की तो दिसतो तरी कसा."

"राधा..!" आईने दरडावलं. " पण खरंच तू त्याला घरात तरी बोलवायला हवं होतं. तुझी एवढी मदत केली त्याने. कसा आहे काय आहे ओळख तरी झाली असती. "

आईचा रोख कावेरीला योग्य उमगला.

"ह्म्म्म.. मांडव घाल लगेच दारी. अरे अजून अठरा झाली नाही मी आणि तुम्हाला माझं वाजवायची घाई झालीय. आणि सुकडी तू..! जरा अभ्यासात लक्ष घाल. बोर्डाची परीक्षा आहे तुझी. नसते उद्योग बरोबर जमतात तुम्हा बायकांना."

"तू काय पुरुष आहेस का?" राधिका फिदिफिदी हसत म्हणाली. तसा कावेरीचा पारा चढून डोळ्यात उतरला.

आई आणि काकू हलकेच गालातल्या गालात हसत होत्या.

"काय..? जेवू की नको मी?" कावेरीने लटक्या रागात विचारलं.

"नको म्हणलं तर तू थांबणार थोडीच आहे." काकू हसत म्हणाली.

"ए यार थोडं तर घाबरत जा राव मला. कॉलेजमध्ये पोरं माझं नाव घ्यायला टरकतात आणि घरात काडीची किंमत नाय राव." कावेरी म्हणाली.

"ह्म्म्म.. पुरे. ताटावर फुगाफूगी नको. जेव नीट. सांडतंय बघ. व्यवस्थित जेव आणि परवा होशीलच अठरा पूर्ण." आई म्हणाली.

"ह्म्म्म. आयताच बळीचा बकरा मिळालाय तुम्हाला..! कापल्याशिवाय गप्प बसतील त्या सारिका सोनार कसल्या." ताटातला वरणभाताचा शेवटचा घास गोळा करून तिने तोंडात कोंबला आणि ताटाला धावता नमस्कार करून जेवणाचं ताट उचलून बेसिनमध्ये ठेवून हात धुतला.

"आईसाहेब, माझा एवढ्यात विवाह करण्याचा विचार नाही. मला शिकायचंय, स्वतःच्या पायावर उभ राहायचंय. कृपया परवानगी हवी आणि एक मनःपूर्वक विनंती आहे की जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत माझ्या विवाहाचा विषय काढू नये. अन्यथा गंभीर परिणाम होतील."

"आईला धमकवतेय कावू?" आई रागाने म्हणाली.

"आई, कावू कावू बोलून कायम अशीच कावते माझ्यावर! पण प्लिज, तुला वाटतं ना तुझ्या मुलीने सुखाचा श्वास घ्यावा तर प्लिज माझं मन बनेपर्यंत हा विषय नको." कावेरी हात जोडत म्हणाली.

"मोठी आई, हिचं मन बनेपर्यंत मी वयाची सत्तरी गाठेल." राधिका मध्येच टपकली.

"इतकी घाई झालीय तुला तर तूच का नाही बालिका वधू बनत चोमडे?" कावेरी रागातच तिला छेडणाऱ्या राधिकाला म्हणाली.

"मी तर आता काही बोलणंच सोडून देणार आहे. पण उद्या गुरुजी येणार आहेत. लवकर ये जरा. " आई शेवटच्या वाक्यावर जोर देत म्हणाली. कावेरी हू की चू न करता तिचा खरचटलेला पाय घेऊन उत्तर न देता रूममध्ये पोहोचली सुद्धा.

"कसं होणार हिचं हे त्या भगवंतालाच ठाऊक. " आई जाणाऱ्या कावेरीला बघून चिंतेने म्हणाली.

"ताई आपली कावू अगदी खमकी आहे. तुम्ही अजिबात काळजी नका करू. सगळं सांभाळते ती. वरवर कडक असली तरी आतून अगदी फणस आहे आणि लाखात एक आहे माझी कावू. तुम्ही उगाच काळजी करताय." काकू आईच्या खांद्यावर हात ठेवून दिलासा देत म्हणाली.

"तुम्ही दोघींनी मला तर रस्त्यावरून उचलून आणलंय." राधिका मात्र जेवताना त्या दोघींना टक्क बघत म्हणाली.

"ताई काही जळतंय का?" काकू हसत म्हणाली.

"जळतयं कसलं? मला तर राखेचा ढीग दिसतोय." कावेरीची आई तिच्या गमतीला दुजोरा देत म्हणाली.


****

तूर्तास विषय तिथेच संपला. जेवणानंतर सर्व आवरून चौघीही झोपायला गेल्या. कावेरी आणि राधिका एकाच खोलीत राहत असल्याने राधिकाला तिच्या बडबडपासून गत्यंतर नव्हतं.  तसे तर दोघींनाही गप्पांचा भारी छंद होता. रोज रात्री दोघीही दिवसभराच्या साऱ्या गप्पांची कसर भरून काढायच्या पण आज कावेरीचा मूड ऑफ होता.  तरी सांगणार कुणाला? आजही राधिकाची बडबड चालूच होती आणि आज तर तिला एक फ्रेश विषय मिळाला होता. तिला कुणालबद्दल बरेच प्रश्न होते पण कावेरीकडे तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते आणि त्यात इंटरेस्टही नव्हता. तिने कसंबसं राधिकाला गप्प करून झोपायला लावलं होतं आणि आता पडल्या पडल्या स्वतःच्या फेव्हरेट रायटरचं नव्याने पब्लिश झालेलं पुस्तक वाचायला घेतलं. पण तिला कधी झोप लागली हे तिलाही कळलं नाही.

कावेरीचा स्वभाव म्हणजे कधी कशाचा काही नेम नसायचा. ती वेंधळी होती, बडबडी होती, स्वप्नाळू होती, बालिश होती, भोळी होती, तशीच जबाबदार होती, समंजस होती, तटस्थ होती, रागीट होती. एखाद्याला मनात जागा दिली तर शेवटपर्यंत त्याला पाकळीसारखं जपणारी आणि एखादा जर नीतीने नाही वागला तर जन्माची अद्दल घडवायलाही मागे पुढे न पाहणारी!

आर जे... होय आर जे कावेरी! जिल्ह्यातल्या एकमेव रेडिओ स्टेशनची अत्यंत लोकप्रिय आर जे! जिल्ह्यात तिच्या आवाजाचे, तिच्या बोलण्याच्या स्टाइलचे बरेच चाहते होते. पार्ट टाइम म्हणून अवघ्या चार तासांसाठी तिने जॉब जॉईन केला होता. सकाळी कॉलेज, दुपारी रेडिओ स्टेशन आणि रात्री घर असं तिचं रोजचं रुटीन होतं.

खरं पाहता ती अगदी सामान्य होती. पण म्हणूनच ती लोकप्रिय होती. कारण तिच्या श्रोत्यांना ती आपल्यातलीच वाटायची आणि ती अगदी सामान्य असली तरीही ती स्वतःची फेव्हरेट होती. पण तिच्यासाठी राधिका, आई आणि काका - काकू हेच तिचं खरं विश्व होतं. त्यांच्या सुखासाठी ती काहीही करायला तयार असायची.


©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  08
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//