Mar 01, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 6.0

Read Later
कावेरी 6.0
कावेरी

भाग 6


तिच्या तोंडून “आईच्या गावात ” हे ऐकून गाडीतून उतरणाऱ्या कुणालला अचानक कावेरीची आठवण झाली. पण जर खरोखरच कावेरी असेल तर एक क्षण वाटले की झाले...  आता ही थेट आपल्याला खान्देशीत शिव्या द्यायला सुरुवात करेल! पण कसलं काय? ही स्वत:शीच बडबडत होती. रस्त्यात एका मुलीकडून शिव्या ऐकण्यापासून वाचलो या गोष्टीने सुखावून लगेच मदतीसाठी हात द्यायचं म्हणून तो गाडीतून खाली उतरला आणि बघतो तर काय! ती खरोखर कावेरीच होती!

त्याने घाईने तिला उठण्यासाठी हात दिला आणि एक हाताने सायकल उचलून घेऊ लागला.
"आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी कावेरी..! मी फोनवर बोलण्याच्या नादात न बघताच सरळ दार उघडलं. तुला बरंच लागलेलं दिसतंय. चल, मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो."
तिच्या हाताला खरचटलं होतं आणि ढोपरही आपटलं होतं.

"नो नो नो..! नाही नको. मला डॉक्टरची गरज नाही. मी ठीक आहे. मी सायकल रिपेअरवाल्याकडे जाईन आता. त्याची जास्त गरज आहे आणि डोळे कुठं दत्तक दिलेत का.? एवढी मोठी पाचफुट चार इंच कावेरी तुला दिसली नाही का?"

"सॉरी डिअर. ओके. मी नेतो रिपेयरवाल्याकडे."

"नाही..! माझी सायकल आहे तर मीच घेऊन जाईन!" कावेरी थोडं उद्दामपणेच बोलली.

कुणाल खूप खजील झाला.

"इतकं वाईट वाटतं तर थोडं बघून चालायचं ना. तुम्ही कारमधली लोकं आम्हा रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना अगदी चिरकूट मुंग्या समजतात."

" कावू खरच सॉरी...!" तो तिची सायकल पकडत म्हणाला.

"आय नो, पण ती माझ्यामुळे तुटली आहे आणि अंधार पडतोय.  त्यात हे असलं निर्जन ठिकाण, नीट गाडी नाही मिळाली तर अजून प्रॉब्लेम होईल. प्लीज़ ट्रस्ट मी, माझं ऐक... आणि सायकल रिपेरला टाकल्यावर तो ही काही ती लगेच देणार नाही ना." कुणाल तिला समजावत म्हणाला.

स्वतःची अवस्था बघता तिला कुणालचं म्हणणं पटत होतं पण असं कुणाकडून मदत घेणं तिला कधी आवडायचं नाही. स्वाभिमान प्रॉब्लेम... दुसरं काय..!

"ओके. चल. तू इतकं रिक्वेस्ट करतोय तर मी जास्त आढेवेढे घेण्यात काहीच पॉईंट नाही." काहीसा विचार करत कावेरी म्हणाली. ती गाडीत बसण्यासाठी जाऊ लागली तेवढ्यात तिच्या पायात कळ आली.

"आह..! आई ग..!!" कावेरी वेदनेने चित्कारली.
पायाला सरबटल्याने जखमेतून आता थोडं रक्त बाहेर डोकावू लागल होतं. कुणालने तिला धरलं. त्याला तिच्या जीन्सवर रक्ताचे डाग दिसू लागले.

"पायाला ही लागलंय का..?" कुणालने काळजीने विचारलं.

"हो थोडंसं..!" कावेरी उत्तरली.

कुणालने सावकाशपणे तिला गाडीजवळ नेलं. गाडीचा दरवाजा उघडून त्यात तिला व्यवस्थित बसवलं. आणि सायकल गाडीच्या डिक्कीत नीट ठेवून ड्राइविंग सीटवर येवून बसला. त्याने कार स्टार्ट केली. आज त्याची क्रश त्याच्यासोबत त्याच्या गाडीत त्याच्या शेजारी बसली होती यामुळे तो भलताच खुश होता.

कुणाल जरी सतत मस्ती करणारा, शांत स्वभावाचा नसला तरीही प्रसंग बघून वागणारा होता. त्यात त्याची क्रश त्याच्यासोबत ते ही अशा अवस्थेत, त्यामुळे थोडं काळजीत होता. दोघेही काहीच बोलत नव्हते. कावेरीचा सतत गुडघ्यावर जाणारा हात, तिची प्रत्येक हालचाल, चेहऱ्यावर शांत पण वेदनेच्या छटा तो बरोबर टिपत होता.

"वाटेत कुठे रिपेअरिंगवाला दिसत नाहीये माझ्या साइडला..! तुझ्या बाजूनेही नीट बघ हा प्लीज." कावेरी शांती भंग करत म्हणाली.

" हो.. येस. शुअर..!" कुणाल म्हणाला.

थोड्या वेळात गाडी थांबली.

"इथं कुठंय गॅरेज.?" कावेरीने विचारलं.

"तू आधी बाहेर तर ये. थांब मी दरवाजा उघडतो. हळूच उतर." कुणाल स्वतः गाडीतून उतरत म्हणाला.

कुणालने गाडीचा दरवाजा उघडून अदबीने कावेरीला हात दिला आणि उतरवलं. ती उतरून इकडतिकडं बघू लागली.

"आत जाऊयात." एका क्लिनिक समोर हात करून कुणाल म्हणाला. बोर्डवर

"डॉक्टर! ओह गॉड हे तर सावंत काकांचे क्लिनिक आहे! मी म्हणाले ना तुम्हाला की मला डॉक्टरकडे नाही जायचे  तरीही तू..!" आता मात्र कावेरी चिडली होती.

"माझी सायकल काढ. मी जाईन माझा मार्गाने..! थॅंक्स फॉर हेल्प, पण केलीत तेवढी पुरे..!" तिच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. ती मागे वळून जायला निघाली.

पण पायावर लगेच ताण पडल्याने वेदनेची एक तीव्र कळ आली.

"आहsss!"

"तुला कळत कसं नाही कावू की डॉक्टरकडे जाण जास्त गरजेचं आहे! जखम किती खोल आहे हे आपण मघाशी नीट पाहिले नव्हतं पण आता रक्त फार वाहतंय ." कुणाल काळजीने म्हणाला.

"फार खोल नाहीये आणि घरी माझी आई घरगुती उपचार करेल सो प्लीज़..!" कावेरी मात्र ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती.

कुणालकडे आता तिला डिवचून बोलण्याव्यतिरिक्त कोणताच मार्ग उरला नव्हता आणि त्याने तेच केले, "ओह, अच्छा... आत्ता समजलं मला... तुला डॉक्टरची भिती वाटते तर..!" तो तिला मुद्दाम चिडवत म्हणाला.

"मी माझी आई सोडली तर कुणाचा बापाला ही घाबरत नाही." कावेरीच्या वर्मी बोट ठेवल्याने ती भडकली.

या वाक्यावर पुन्हा एकदा कुणाल अजूनच गोंधळला. कसली वाक्य टाकते ही मुलगी! म्हणे “कुणाच्या बापालाही घाबरत नाही” आणि त्यात हे ही सांगते आहे की आईला घाबरते. या अशा भाषेवर आश्चर्य करावं की हसावं तेच कळत नाहीये. भलतंच विचित्र कॅरक्टर दिसतंय! असो, पण कसं का असेना, माझं आहे आणि माझं खूप प्रेम आहे ह्या अँटिक पीसवर.

"हो ना. नाही घाबरत ना. पण मग मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर की तू खरंच घाबरत नाहीस डॉक्टरला?" कुणाल तिला वेढत म्हणाला.

"चल तर मग. स्वतःच्या डोळ्यांनीच बघून घे."

"मला नाही वाटत तुझ्यात डॉक्टरला फेस करण्याची हिंमत असेल."

"अच्छा? आता तर तू बघच!" कावेरी हट्टाने म्हणाली.

दोघही क्लिनिकमध्ये गेले. फार कुणी जास्त पेशंट नव्हते. काही वेळाने ते दोघे डॉक्टरांच्या रूममध्ये गेले.

क्रमशः
©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  06
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//