Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 3.0

Read Later
कावेरी 3.0

कथामालिका : कावेरी

भाग 03दोघी बॅगमध्ये नोटबुक कोंबून वर्गाबाहेर निघून गेल्या. कावेरी आता रिकाम्या वेळात काय करायचं म्हणून विचार करू लागली.

"कॅन्टीनला जाऊ..!" नीलम म्हणाली.

"नाही...! प्रशांत सरांनी बघितलं तर घरी सांगतील." कावेरी काहीसा शून्यात बघत विचार करत म्हणाली. "चल तू.."

कावेरी चल म्हणल्यावर नीलम तिच्या मागोमाग निघाली. आणि दोघीही टेरेसवर आल्या. एक मुलगा टेरेसच्या कठड्यावर उभा होता. कावेरीला वाटलं तो आत्महत्या करायचा प्रयत्न करतोय त्यामुळं जोरात \"अये भेंडी \" ओरडून तिने त्याला खस्सकन मागे ओढलं आणि ती खाली पडली नि तो तिच्या वर! आणि दोघेही एकमेकांना पाहतच राहिले. पण आपल्या धीट कावेरीने लगेच त्याला लाथ मारून अंगावरून दूर केलं आणि कपडे झटकून उभी राहिली.

" हाय...sss..! कधी तू माझ्यावर कोसळतेस कधी मी तुझ्यावर... मला असं आयुष्यभर आवडेल..!" तो मुलगा म्हणाला.

"अय रताळ्या..! कधी मजनू बनतो कधी विरु बनून आत्महत्या करायला जातोस..! तुझा प्रॉब्लेम काय आहे..?" लगेच निलमकडे वळून वैतागून म्हणाली, "आणि सगळे सटकेल लोक माझ्याच राशीला का आलेत..!"

"मी, आणि आत्महत्या..?" तो मुलगा म्हणाला. "ओह, आता समजलं, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी कुणाल.."

"तू कुणी का असेना, मला काय करायचंय, चल निलू.." कावेरी टेरेसवरून कॉरिडॉरच्या दिशेने निघाली.

"अहो मिस, मी कुणाल, आय मीन माझं नाव कुणाल..!"

"मग मी काय करू..?" तुला आवडत नाही का तुझं नाव की पुन्हा बारसं करायचं..!" आणि निलुच्या हातावर टाळी देत कुचकटपणे हसून पुढे निघून गेली. पण ह्या धडपडीत कावेरीची हातातली डायरी मात्र तिथंच पडली होती.

कुणालच्या हातात चुकून कावेरीची वही लागली. अगदी दुग्धशर्करा योगच ! त्यात तिच्या आवडीच्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. कावेरीचं हस्ताक्षर अगदीच काही वाईट नव्हतं. म्हणजे जर योग्य जुळवाजुळव केली, थोडा विचार केला तर शब्द नक्की लागणार ,याची गॅरंटी! कुणालला पहिलं वाक्य कळायला जवळजवळ तीन तास लागले पण त्याला त्या कोड्याची चावी सापडली. त्यात तिच्या आवडत्या गोष्टींची यादी होती पण ती अजबगजब होती.

काय तर आवडती भाजी -पडवळ, आवडता प्राणी- गेंडा, आवडता पक्षी -घुबड, आवडता रंग- काळाकुट्ट, आवडती भावना- निपचित पडून राहणे, आवडता पदार्थ -दगड, आवडती वजनदार वस्तू -ओंडका आणि आवडता पिक्चर काय तर ‘प्यासी डायन’. कावेरीच्या चॉईस जबरच होत्या पण उदार मनाच्या कुणालनं तिच्या आवडी-निवडींना वाचता वाचताच मानेने होकार दिला होता आणि एक भन्नाट आयडिया त्याच्या डोक्यात आली. आपण तिला स्पेशल प्रपोज करू म्हणजे जुन्या पद्धतीने पत्र लिहून वगैरे आणि जर या आवडत्या गोष्टी पत्रात टाकल्या तर?

अखेर चार पाच दिवसांनी पत्र पूर्ण झालं आणि कावेरीला समोरासमोर पत्र द्यायचं त्यानं ठरवलं.  त्याने दुसऱ्याच दिवशी तिला जेवणाच्या सुट्टीत क्लासच्या बाहेर गाठायचं ठरवलं. त्याचा कॉन्फिडन्स आता एकदम पिकवर पोहोचला होता. पण काही धीर होईना. मग तिची डायरी तिच्या बेंचच्या खालच्या पट्टीवर ठेऊन त्यात पत्र ठेवलं आणि आपली डायरी अचानक सापडल्याने कावेरी खूपच खुश झाली आणि हातात घेताच त्यातून एक घडी केलेला गुलाबी पेपर खाली पडला. तो तिने वाचला आणि अगदी हर्षवायू झाल्यागत हसू लागली. कारण त्यातला मॅटरच असा भारी होता. कावेरीला वेड लागलंय का असं वाटून नीलमने तिच्या हातातला तो गुलाबी पेपर हाती घेतला आणि तीही वेड्यागत हसू लागली. नंतर इमा, नितीन, पल्लवी, रुद्र, विनय, मेघा, प्रणिता, कीर्ती ह्या सगळ्यांनी वाचलं. आधी कावेरीला नितीनच्या मस्करी वर संशय आला पण नंतर तिच्याच मनाने कौल दिला की नितीन कितीही बावळट असला तरीही तो स्वप्नातसुद्धा इमा शिवाय दुसरा कुणाचा विचार नाही करणार. (बिचाऱ्याला मोठ्या नशिबाने एवढी सुंदर गर्लफ्रेंड भेटली होती!) रुद्र ते पत्र हातात घेऊन अजून मोठ्याने वाचू लागला आणि अगदी लोळून लोळून हसू लागला.

"गेंड्याच्या कातडीची तू, जेव्हा माझ्याकडे घुबडासारखे डोळे करून बघतेस तेव्हा मी काही क्षण दगड होतो. रोज काळ्याकुट्ट रात्री, तू प्यासी डायन सारखी माझ्या स्वप्नात येतेस आणि स्वप्नात जेव्हा तुझे हात जेंव्हा माझ्या मानेभोवती गुंफतेस तेव्हा मला तुझ्या गळ्यात निपचित पडून रहावसं वाटतं. माझ्या ओंडक्या तू माझी होशील का..?

तुझाच पडवळ,
के. आर.

प्रत्येक आवडीच्या गोष्टी खाली अंडरलाईन केलेली होती. आता हे नेमकं कुणी लिहिलं हे मात्र समजत नव्हतं. पण आजचा दिवस ह्यांचा जबरदस्त झाला होता. सगळे कॅन्टीनला बसून विचार करू लागले कि, कुणी लिहिलं असेल हे अतरंगी पत्र..! नितीन आणि प्रणिता मात्र पुन्हा पुन्हा त्या पत्रातील ओळी बोलून कावेरीला चिडवू लागले होते. तिचं डोकं तर सपशेल तापलं होतं. तिने ठरवलं, आता सगळ्यांचं एकच मिशन... ते म्हणजे तो पत्र लिहिणारा मुलगा शोधायचा.

सगळ्यांनी त्या पत्राचा फोटो काढला आणि जो सापडेल त्याची वही उचकून अक्षर तपासून बघू लागले. पण असलं अतरंगी पत्र लिहिणाऱ्याच हस्ताक्षर पण अँटिक होतं. ते कुणासोबतच मॅच होईना. सगळं कॉलेज धुंडाळल पण कुणीच गावलं नाही.

पुन्हा एकदा कॅन्टीनमध्ये मिटिंग भरली. सगळे अगदी शून्यात नजर लावून बसले होते. नितीन इमा तर त्यांच्या वेगळ्याच विश्वात होते तरीही त्यांना कावेरीचं टेन्शन बघून खूप टेन्शन आलं होतं. आधी त्यांनी गमतीत घेतलेली ही गोष्ट. मात्र आता त्यांना त्याचा राग येत होता. नीताने तिची बेस्ट फ्रेन्ड त्रिवा, जी सिनियरला होती तिला देखील सांगितलं. शेवटी कावेरी आणि पल्लवी दोघीही टेरेसवर निघून गेल्या.

टेरेसवरून संपूर्ण कॉलेज चा मागचा हिरवळीचा भाग बहरून आला होता आणि काही मुलं माती उकरून तिथे वृक्षारोपण करत होते. त्यात कुणाल देखील होता.

"तो बघ, त्यादिवशी सुसाइड करत होता आणि आज झाड लावतोय.." कावेरी पल्लवीला म्हणाली.

"हा कुणाल आहे, तो आणि सुसाइड.. इम्पॉस्सीबल..! तो कॉलेजमध्ये नवीन असला तरीही मी लहानपणीपासून ओळखते. आपल्या त्रिवा दि चा बेस्ट फ्रेन्ड आहे. त्याचे वडील इथं ट्रस्टी आहेत म्हणून इथं ऍडमिशन नाही घेतली त्याने. खूप स्वाभिमानी आहे. त्याच्या कॉलेजला पी एल सुरू आहेत म्हणून इकडे आलाय. आमची पण कोचिंग क्लास मध्ये ओळख झालेली. त्रिवा दी आणि तो सेम इयर आहे आणि सिनियर आहे आपल्याला." पल्लवी सांगू लागली.

त्याचं कौतुक ऐकून कावेरीचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. "मालकीचं कॉलेज असून इथं न शिकता बाहेरच्या कॉलेजमध्ये? इंटरेस्टिंग..! आणि कॉलेज आपलं तर झाडं लावण्याच काम पण आपलं आहे तर तो लावतोय आणि आपण काय करतोय तर.. टाईमपास..! चल, त्याला मदत करू." कावेरी म्हणाली.

क्रमशः


©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  03
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//