"कावेरी"

एका स्त्री ची प्रेरणादायी कथा

सोसायटीत नवीन राहायला आल्याने घरी कामासाठी एखाद्या मावशी हव्या म्हणून आमची खूप शोधाशोध चालली होती. पण कोणी तयार होईना आणि झालेच तर पगार मात्र भरपूर हवा ही अट. इतका पगार आमच्या बजेट मध्ये बसत नव्हता, म्हणून मी शोध थांबवला. अचानक एक दिवस मी गडबडीत असताना बेल वाजली. पाहते तर दारात एक साधारण तीस -पस्तीस वर्षांची बाई हसतमुख चेहऱ्याने उभी होती. ताई..कामाला बाई हवी ना? त्या नेने आजीने पत्ता दिला म्हणून आले. आली ती एकदमच घरातच आली. आल्या आल्या ती आपली माहिती सांगू लागली. इथे काय- काय काम करायचे याविषयी माझ्या सासूबाईंशी चर्चा करू लागली आणि मी पाहात होते तिचा गोरा चेहरा, केसांचा गच्च अंबाडा, कपाळावर ठसठशीत कुंकू, गळ्यात छोटंसं मंगळसूत्र, हातभर बांगड्या, चापून -चोपून नेसलेली नऊवारी साडी...आणि पायात मोठया जोडव्या.
बोलता बोलता तिने सारं घर डोळ्यांखालून घातलं.. आणि उद्यापासून येते म्हणून जायला निघाली.
अगं पगार किती घेशील ग?? मागून सासुबाई जवळ जवळ ओरडल्याच तिच्यावर. माझं काम बघून द्या काकी, येतो बघा.. म्हणून ती हसून निघून ही गेली.

'कावेरी 'आली की भरभरा कामाला लागायची. ती जितकी सुंदर होती तितकेच तिचे काम ही एकदम स्वच्छ आणि टापटीप होते. कामाचा उरक ही जास्त होता. तिच्याविषयी फारशी माहिती सोसायटीमध्ये कोणालाच नव्हती. तिचा नवरा गावाकडं असतो. शेती बघतो. येतो इथं अधून मधून.. हे मात्र सतत सांगायची ती. तिच्या घराचा पत्ता ही, हाय इथंच चार गल्ल्या सोडून...इतकाच काय तो आम्हाला माहीत होता. आपल्या दोन लहान मुलांना कधीतरी घेऊन यायची. मुले ही आपल्या आईचे काम होईपर्यंत अगदी शांत बसून राहात. कावेरी कधी या घरात काय घडलं, त्या घरात काय घडलं असं कधीच काही सांगायची नाही. तशी ती वागायला, बोलायला एकदम शांत होती. लवकरच माझ्या सासूबाईंशी तिची छान गट्टी जमली. सासूबाईंना तिची इतकी सवय झाली की कावेरी शिवाय त्यांचे पान ही हलेना. घरात  कुठली ही गोष्ट आणली की त्यातला कावेरीचा अर्धा वाटा ठरलेला असायचा.

एके दिवशी जेवणाला 'सवाष्ण ' बोलवायची होती, म्हणून सासुबाई म्हणाल्या ,आपल्या कावेरीलाच बोलावं. तिला बोलवताना तिने फार आढे -वेढे घेतले. मला जमत नाही म्हणाली. सासूबाई जास्तच आग्रह करू लागल्या तिला आणि अचानक ती रडायला लागलेली पाहून पटकन तिच्या जवळ धावल्या. मायेने पाठीवरून हात फिरवत राहिल्या. तसं तिला जास्तच भरून आलं..एकदमच ती आईंच्या कुशीत शिरत म्हणाली.." नवरा न्हाय ओ माझा.. कशापायी आग्रह करताय? आम्ही दोघी अवाक् झालो.
बराच वेळ शांततेत गेल्यावर कावेरी म्हणाली.. नवरा जाऊन दोन वर्ष झाली. काही ध्यानी मनी नसताना अचानकच गेला तो.. लई चांगला होता व... तो गेला आणि आमचा आधारच गेला. मुलगा गेला तसा आमच्या म्हाताऱ्या सासूबाई कुणाशी बोलत न्हाईत.. नुसतं गप बसून असतात दिसभर. पदरात दोन लहान मुलं बघून कशी तरी म्या सावरले बघा. आता तुम्ही म्हणाल.. सवाष्णी सारखी राहते म्या..पण नाईलाजानं राहावं लागतंया.. नाहीतर बाहेरची दुनिया लई वाईट हाय.. कुणाची नजर कशी असल काय सांगता येत नाय. मन घाबरत बघा.. गावाकडं असे लई अनुभव घेतले वाईट- साईट. घरातून बाहेर पडता यायचं नाही. माझे आई -बाप हायेत मागं. त्यांनीच शहरात धाडलं. मग सासूबाईंना घेऊन आले इथं. अन् मग असं सोंग घेतलं. 
चार घरची धुण-भांडी केली की पोट भरतं.. आणि काय हवं सांगा? तुमच्या पुढं मन मोकळं केलं..येते म्या.. म्हणून कावेरी निघून गेली.

कावेरी गेली ती मनाला अस्वस्थ करूनच. आम्ही  दोघी बराच वेळ तिच्याविषयी बोलत राहिलो. इतके दिवस ती इथे काम करते, पण असे काही असेल याची कल्पनाच नव्हती आम्हाला. सासूबाई म्हणाल्या.. खरंच किती धीराची बाई आहे ही! पदरात दोन लहान मुलं आणि आपल्या मुलाच्या अकाली जाण्याने खचलेल्या आईला- आपल्या सासूला सांभाळून घेत ,आपले दुःख बाजूला सारून हिंमतीने उभे राहणे..खूप कठीण आहे.

दोन दिवस कावेरी न बोलताच काम करीत राहिली. पुढे ती आठ दिवस गावाला जाणार असल्याने येणार नाही असा कुठून तरी निरोप पाठवला तिने. आमच्या मनात अनेक शंका प्रश्न निर्माण झाले. असे अचानक काय झाले असेल ? तिची तब्येत बरी असेल का ? की तिच्या सासूबाईंना काही...? मुले बरी असतील ना तिची? काय घडले असेल नक्की?

आठ दिवसांनी कावेरी पुन्हा हसत मुखाने घरी आली आणि म्हणाली "ताई माझ्या आईनं माझं दुसरं लगीन ठरवलं हाय.. माझा होणारा नवरा एका कंपनीत कामाला हाय बघा. त्याचं बी दुसरचं लगीन हाय हे. त्याची पहिली बायको अपघातात गेली म्हणे. त्याच्या पदरात एक मुलगीच.. बाकी त्याच्या घरी कोणीच नाय. अन् आमची सासू बी आमच्यासोबतच राहणार हाय बघा..नाहीतरी त्यांना बघायला कोणच नाय ना पुढ.. लगीन झाल्यावर आम्ही आमच्या गावाकडच राहणार. आलो तस इथं दोन दिस काम करून जाणार. बाकी कुणाला बोललो नाही, मात्र लग्नाला तुम्ही दोघींनी नक्की यायचं बघा..

आम्हा दोघींना ही बातमी ऐकून फार आनंद झाला आणि वाईट ही वाटलं.. कारण आता कावेरी पुन्हा कधी इथे येणार नव्हती. आठ दिवसांनी 'कावेरी आणि सतीश 'च्या लग्नाला आम्ही हजेरी लावली. अगदी आठ -दहा माणसांच्या उपस्थितीत लग्न पार पडले. कावेरीच्या सासुबाई ही उत्साहाने तेथे काम करीत होत्या. एक वेगळाच आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर. तिची दोन्ही मुलं आपल्या नव्या बहिणीसोबत घरभर बागडत होती आणि तिचे आई - वडील समाधानाने उभे होते आपल्या लेकीबरोबर.

निघताना कावेरीला माझ्या सासूबाईंनी मायेने जवळ घेतले. साडी- चोळी देऊन तिची ओटी भरली. तशी कावेरी आईंच्या मिठीत शिरून खूप रडली.. आईंनी मात्र तिचे डोळे पुसत पुन्हा 'सवाष्ण' म्हणून जेवायला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण देत भरभरुन आशीर्वाद दिला..'अखंड सौभाग्यवती भवं '.