Jan 29, 2022
नारीवादी

स्त्री मनाची गुरूकिल्ली - कौतुकाची थाप

Read Later
स्त्री मनाची गुरूकिल्ली - कौतुकाची थाप

 

 

"शी बाई! आज काय करू जेवायला. वैताग अाहे नुसता. सगळ्यांची आवड एक असेल तर शप्पथ. ह्याला हे आवडतं, त्याला ते आवडतं, हा अमकीच भाजी खात नाही, तो तमकीच भाजी खात नाही. माझ्या घरी बरं आहे. आईने सर्वांना सवयच लावली होती जे असेल ते खायचं. जसं झालं असेल त्याला नावं नाही ठेवायची. बाबा नेहमी सांगायचे, करणार्‍याची मेहेनत लक्षात घ्यावी. इथे तर काय, काहीही केलं तरी नावडतीचं मीठ अळणीची गत अाहे." रोजच्या कामाला कंटाळलेली मीरा स्वत:शीच बोलत होती.


खरं तर मीरा खूप छान जेवण बनवायची. तिच्या कामाचा आटोपही छान होता. पण तिच्या सासू सासर्‍यांना ती कधी  रुचलीच नाही. परजातीतली त्यामुळे तिने काहीही बनवले तरी त्यात नेहमी खोट काढली जायची. मीराला या गोष्टीचं नेहमीच शल्य होतं. पण आपलं हे दु:ख ती कोणाला सांगणार. मीरा आणि कल्पेशचा प्रेमविवाह. आपणच आपल्या आवडीनुसार कुटुंबं निवडलंय, सासू सासर्‍यांबरोबेच्या कुटुंबाची तिची व्याख्या अगदी काही मालिकांमधे आदर्श कुटुंबं दाखवतात तशी होती पण प्रत्यक्षात अनुभव मात्र तिला फार वेगळा येत होता. तसंच आपलं दु:ख आई बाबांना सांगून त्यांना का दु:खी करायचं असाही विचार सतत तिच्या मनात डोकावत असे. त्यांच्या दृष्टीने आपण सुखी आहोत यातच ती आपलं सुख माने.


लग्नाला जसजशी वर्ष सरत होती मीराला परिस्थिती हाताळणं आणि स्वत:वर संयम ठेवणं कठीण जात होतं. तिने कितीही केलं तरी तिच्या कामात फक्त चुका काढल्या जात. हल्ली तर मीराला असं वाटू लागलं होतं की खरच आपण एवढ्या बेजबाबदारपणे वागतो का? आपल्याला काहीच येत नाही का?. लग्नानंतरच्या सुरूवातीच्या काळात मीराने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं. पण हल्ली ती ठरवूनही दुर्लक्ष करू शकत नव्हती. कधी कधी तर तिला वाटे की आपण सासू सासर्‍यांबरोबर राहायचा आदर्शवादी निर्णय घेऊन खूप मोठी चूक केलीय का? पण एक मन तिचं तिला सांगे, नाही! आपल्या आई बाबांपासून लांब राहताना आपल्याला जो त्रास होतोय तो कल्पेशला का व्हावा? तसंच आपल्या मुलांना जर जवळून आजी आजोबांचं प्रेम मिळतंय तर त्यांना त्यापासून मी का वंचित ठेऊ?


आज तिने ठरवलेलं, आज कल्पेशशी बोलायचं. सांगायचं त्याला सासूबाईंशी बोलायला, नाही सहन होत आता. मी एवढं सगळं करूनही का माझं का कौतुक केलं जात नाही? मी खरंच एवढी कुचकामी आहे का? काहीच जमत नाही का मला? दरवेळी नेमकं मी जे केलं नाही त्याच गोष्टींना उजाळा देणं गरजेचं आहे का? आणि असं जर असेल तर घरात मी कामं तरी का करू? मुलांनी काही चुकीचं केलं की उद्धार माझा आणि काही कौतुकास्पद केलं की कौतुक तुझं असं का? माझं, माझ्या वाट्याचं श्रेय मला कधी मिळणार?


मीरा हा सगळा विचार करतच होती तेवढ्यात कल्पेश ऑफिसमधून आला. आल्या आल्या त्याने एक मस्त स्माईल देत मीराला म्हंटलं,


"मीरा यार काय चिकन बनवलेलं तू? माझे सगळे मित्र आज पागल झाले तुझ्या हातचं चिकन खाऊन. मला प्लीज रेसिपी लिहून दे, लिहून म्हणजे व्हॉट्सअॅप कर. मला फॉरवर्ड करायचीय आमच्या गृप मधे."


असं म्हणून कल्पेश गेला फ्रेश व्हायला. कल्पेशच्या एवढ्या वाक्यांनीच मीरा पुन्हा एकदा अंतर्बाह्य फ्रेश झाली आणि कामाला लागली.


खरंच! किती छोटीशी गोष्ट आहे ना. एक मुलगी जी वीस पंचवीस वर्ष एका घरात राहते, त्यानंतर लग्न करून ती ज्या घरात जाते तिथे ती तिचं सर्वस्व पणाला लावते. खरं तर तिचं नातं त्या घरातील कुणा एका व्यक्तीशी नाही तर त्या अख्ख्या कुटुंबाशी जोडलं जातं. जिथे ती सासूमधे आपली आई, सासर्‍यांमधे आपले वडील, नंडेमधे आपली बहिण, दिरामधे आपला भाऊ शोधत असते. नवरा कायम आपला सखा असावा अशी तिची अपेक्षा असते. ती तिच्या नवीन घरात तिने लहानपणापासून अनुभवलेलं वातावरण शोधत असते. जिथे बर्‍याचदा तिच्याच समवयस्क व्यक्तींचे कौतुक होते पण तिच गोष्ट तिने केल्यावर त्याची दक्षता सुद्धा घेतली जात नाही. घरातील मोठ्या व्यक्ती सुद्धा या सर्व मार्गांवरून गेलेल्या असतात तरीही घरी आलेल्या मुलीने यातून स्वत:चा मार्ग स्वत: शोधावा अशीच अपेक्षा असते. नव्याचे नऊ दिवस तसे सुरूवातीचे थोडे दिवस तिचं कौतुक होतं आणि मग चालू होतो आयुष्याचा रामरगाडा! आदर्शवादी अपेक्षांचं ओझं तिच्यावर लादलं जातं. ती त्या अपेक्षाही कर्तव्य समजून पूर्ण करण्याचा प्रयत्न करते पण त्या प्रयत्नांना फलित करण्यासाठी लागणारी कौतुकाची थाप मात्र बर्‍याचदा हरवलेली असते आणि ही वेडी त्या एका कौतुकाच्या थापेला कायमच आसुसलेल्या नजरेने पाहात राहते. ही कौतुकाची थाप थोडी दिलखुलासपणे देऊन तर बघा, सासू-सुनेच्या नात्याची व्याख्या बदलून कदाचित प्रत्येक घरात फक्त आणि फक्त मायलेकीचंच नातं बघायला मिळेल.


वाचकांनो, वरील कथेत मांडलेला मुद्दा हा विषयाला अनुसरून निव्वळ एक उदाहरण म्हणून घेतला आहे. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा अथवा कोणत्याही नात्याचा दुस्वास मांडण्याचा हेतू नाही. खरं तर स्त्री, मग ती कोणत्याही भूमिकेतली असो, सासू, सून, आई, बहिण, मुलगी ती आपल्या कुटुंबासाठी कायम झटत असते. आणि योग्य वेळी मिळणारी कौतुकाची थाप तिला खूप मोठे उत्तेजन देते ज्यातून ती आपला थकवा घालवते. आपल्याला लेख कसा वाटला ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.आपला अभिप्राय महत्वाचा ????????

- आरती शिरोडकर

----------------- समाप्त ----------------

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Aarti Shirodkar

Business Analyst

साहित्य माझा आवडीचा विषय. असंच काही साहित्य, माझ्या मानातलं, माझ्या लेखणीतून.