कौतुक.. अंतिम भाग

व्यथा एका सुनेची


कौतुक.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की घरात आपल्याला डावलले जाते म्हणून कनिका निराश झाली आहे. त्यावर निशांत तिला केटरिंग सुरू करायचे सुचवतो. बघू आता पुढे काय होते ते..


" आज मिळणार की नाही काही खायला?" समीर वैतागला होता.

" अरे हो.. आणते आहे.. जरा धीर तर धर." सुजला चहा बिस्किट्स घेऊन बाहेर आली.

" आज नाश्त्याला बिस्किट्स?" समीरने आश्चर्याने विचारले.

" मग काय करू? पोहे, उपमा, शिरा तुला आणि तुझ्या मुलाला नकोसा झाला आहे ना?" सुजला पण चिडली होती.

" हो.. मग रोज काय तेच खायचे? कधीतरी तर वेगळं काही कर ना?"

" वेगळं, वेगळं, वेगळं.. ही कनिका आल्यापासून ना तुम्हा दोघांची नाटकं फार वाढली आहेत. आधी कसं जे असेल ते खायचात. आता मी काही केलं तरी तुमचं समाधानच होत नाही.."

" तुझी ते काहीची यादी मर्यादित आहे ना म्हणून.. आणि आम्हाला नावे ठेवण्यापेक्षा तिच्याकडून काही चांगले शिक ना? येताजाता फक्त हिला नावं ठेव नाहीतर आमच्या डोक्यावर खापरं फोड. पण नाही ते कसं जमेल तुला? ते केलं तर तुझे नाक नाही का खाली जाणार? द्या तो गारगुट्ट चहा द्या. त्यालाच अमृत मानून पितो आणि बाहेर जाऊनच काहीतरी खातो."


" काय रे काय सकाळी सकाळी वाद चालू आहे?" शोभाताईंनी विचारले.

" काही नाही आई.. नाश्त्याला चहाबिस्किटे आहेत आज." समीर रागाने सुजलाकडे बघत बोलला. तेवढ्यात या सगळ्याशी अनभिज्ञ कनिका हातात मोठा डबा घेऊन आली.

" काय ग, काय आणले आहेस हे सकाळी?"

" आई, गरमागरम इडली सांबार आणि चटणी आहे. आज नाश्त्याची ऑर्डर होती. मी मग आपल्यासाठी पण केली होती. खाणार का?" कनिकाने विचारले.

" हो.. सततच्या बिस्किटांपेक्षा ते खायला नक्कीच आवडेल.." समीर सुजलाकडे रागाने बघत बोलला.

" समीर, सुजलाला एवढे बोलायची गरज नाही. कनिका तू दे नाश्ता सर्वांना.." शोभाताई मध्ये पडल्या.

" मला नको.. मी बघते माझे.." सुजला फणफणत म्हणाली.

" अरे काय घर आहे की मासळीबाजार ? बाहेर पर्यंत आवाज ऐकू येतो आहे." बाबा घरात येत बोलले. तो आवाज ऐकून सगळेच उठले. मुलांनी जाऊन त्यांना नमस्कार केला. शोभाताईंच्या चेहर्‍यावर हास्य आले.

" बाबा, यायच्या आधी कळवायचे तरी?" निशांत बोलला.

" कळवले असते तर हे कसे ऐकायला मिळाले असते? काय ग शोभा , काय चालू आहे हे सगळे? ही सुजला का एवढी चिडली आहे?"

"ते.. ते.." शोभाताईंचे ततपप झाले.

" म्हणजे इतके दिवस माझे घर छान आहे हा जो माझा समज होता तो खोटा ठरला की काय?" त्याच आशेवर तर मी माझे समाजकार्य करत होतो." बाबा निराश झाले होते.

" अहो, तसं काही नाही. संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच. तुम्ही नका लक्ष देऊ.." शोभाताई सावरून घेत बोलल्या.

" बाबा, मी थोडं बोलू?" कनिकाने अचानक विचारले. सगळे आश्चर्याने कनिकाकडे बघत राहिले.

" बोल. आपल्या घरात सगळ्यांना बोलायचे स्वातंत्र्य आहे."

" बाबा, मी वहिनींच्या तुलनेत नवीन आहे. घरातल्यांच्या आवडीनिवडी समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. पण हे सगळे मी वेगळ्या पद्धतीने करते आहे, यात माझे काही चुकते का?"

" जर तू केलेले घरातल्यांना आवडत असेल तर चूक बरोबरचा प्रश्नच येत नाही."

" नाही बाबा येतो.. मी कितीही प्रेमाने केले तरी आई आणि वहिनींना ते आवडत नाही. त्यांना अजुनही वाटते की मला स्वयंपाक येत नाही. खरंतर मी जो व्यवसाय करते आहे त्याला मिळणाऱ्या प्रतिसादावरून मला तो जमतो आहे हे मला समजते. पण हे मन वेडं आहे ना.. त्याला बाहेरच्यांनी कितीही कौतुक केले तरी घरातल्यांचे दोन शब्दही हवेहवेसे वाटतात.. पण आपल्या घरात या दोघींनाही ते बोलावेत असे कधीच वाटले नाही." निशांत आणि शोभाताई कनिकाला गप्प बसायच्या खुणा करत होते. ती लक्ष देत नव्हती.

" शोभा, बोलू दे तिला. तुला असं वाटत असेल की मला हे काही समजत नाही तर तसे नाहीये. आदीचे आणि माझे नेहमी बोलणे होते. तेव्हा अनेकदा घरातल्या कुरबुरी त्याच्याकडून मला समजायच्या. तुझ्यावर घर सोडले होते म्हणून मी मध्ये पडत नव्हतो. पण आता जर कनिकाला बोलायचे आहे तर तिला बोलू दे. अडवायचा प्रयत्न करू नकोस." बाबा बोलले.

" बाबा, मला कोणाची तक्रार नाही करायची. हे एक कुटुंब आहे. प्रत्येकाची मते, आवड वेगळी असणार हे मान्य करायलाच हवे ना? मला वेगवेगळ्या पद्धतीचा स्वयंपाक येतो , ती माझी आवड आहे. याचे कौतुक करायचे सोडून वहिनी माझा रागराग करतात, टोमणे देतात. यावर आई त्यांना काहीच बोलत नाही. या गोष्टीचे नाही म्हटले तरी मला वाईट वाटते. आपले स्वयंपाकघर जसे माझ्यासाठी उघडे आहे तसेच त्यांच्यासाठीही आहे. मी काही त्यांना तिथे जाऊ नका, असे म्हणत नाही. किंवा तुम्ही काही करू नका असेही म्हणत नाही. पण स्वतः काही करायचे नाही आणि मलाही करू द्यायचे नाही हे मला नाही पटत. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते.. पण जर त्यांना आवडत नसेल तर माझी वेगळे रहायची तयारी आहे.."

" कनिका.. काय बोलतेस तू?" आश्चर्याने शोभाताईंनी विचारले.

" हो आई.. मला हे सतत कुरकुर, कटकटी नाही आवडत. गेल्या काही दिवसांपासून मी घरात फक्त कामे करत होते, काही बोलतही नव्हते. पण ते तुमच्या लक्षातही आले नाही. मग काय फायदा एकत्र राहण्याचा? जिथे मायेचा ओलावा नसेल तिथे मारून मुटकून राहण्यात काय मतलब?" कनिका खिन्नपणे म्हणाली.

" बरोबर आहे तुझे कनिका.. जिथे आपुलकी नसेल तिथे मन उबते. हे घर मला एकसंध ठेवायचे होते.. पण आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतीलच असे नाही. बाळा तू हो वेगळी. त्यामुळे नात्यात कडवटपणा तरी राहणार नाही.." बाबा निर्णय जाहीर करत बोलले.



एकत्र कुटुंबात येणारे काही अनुभव.. कधीकधी लोकांचा अहंकार, इर्षा एवढी वाढते की त्यामुळे अनेकदा घरे तुटतात.. माणसे दुखावतात. अशावेळेस व्यक्तीच्या क्षुल्लक भावना महत्त्वाच्या की कुटुंब? काय वाटते ते नक्की सांगा.. अभिप्रायाच्या प्रतिक्षेत..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all