कौतुक..

व्यथा एका सुनेची
कौतुक..



" हे घ्या गरमागरम पॅटिस.." कनिकाने ताटलीत छान सजवून पॅटिस आणले होते. दिवाणखान्यात बसलेल्या सगळ्यांनी एकेक उचलले.

" काकू, मस्तच.. छान झाले आहेत. मी अजून एक घेऊ का?" आदीने विचारले.

" हो.. मी खूप केले आहेत.. हवे तेवढे खा." खुश होत कनिका बोलली.

" हे पॅटिस म्हणजे नक्की काय केलेस ग? वेगळीच चव आहे." शोभाताईंनी विचारले. कनिका काही बोलणार तोच सुजला तिची मोठी जाऊ बोलली..

" आई, आपण बटाटेवडे करतो, तशीच तर चव लागते आहे."

" वहिनी नाही.. हे वेगळे आणि वडे वेगळे." कनिका अजून पुढे काही बोलणार तोच शोभाताई बोलल्या..

" कनिका, आपल्या घरात मोठ्यांना दुरूत्तरे करायची पद्धत नाही हे गेल्या वर्षभरात समजले नाही का तुला? तू बनवलेला पदार्थ बरा झाला आहे.. सांगितले ना मग उगाच फाटे फोडत बसू नकोस.. सुजला, तू काय केले आहेस आज?"

" आई, हिने तिखट केले म्हणून मी गोडाचा शिरा केला आपला.. अगदी तुम्ही करता तसाच.. आणू का?" सुजलाने नम्रतेने विचारले. ते ऐकून शोभाताई सुखावल्या.

" आण हो.. बघू कसा झाला आहे. चांगलाच झाला असणार. शेवटी माझ्याच हाताखाली तयार झाली आहेस तू. मुलांना पण दे वाटीभर.." शिरा हे नाव ऐकूनच आदीने नन्नाचा पाढा सुरू केला.

" आई, प्लीज.. तसाही तू डब्यात नेहमी शिराच देतेस. आज काकूने जरा छान काहीतरी वेगळे केले आहे तर खाऊ दे की." आदीचीच री समीर आणि निशांतने ओढली.

" मलापण नको शिरा. मला पॅटिसच दे. कुठे शिकलीस ग कनिका?" समीरने विचारले.

" दादा, मी पाककलेची अनेक पुस्तके वाचली आहेत. अनेक प्रयोग करून बघितले आहेत. कुकिंग क्लासेस पण केले आहेत. तिथेच शिकले हा पदार्थ."

" मजा असते बाबा, तुम्हा मुंबईच्या लोकांची.. नाहीतर आम्ही बघा.. पॅटिसला बटाटावडा म्हणतो.." समीर सुजलाकडे बघत बोलला.

" इतके वर्ष खातो आहेस ना?" सुजलाने रागाने विचारले.

" हो.. पण चवीत बदल नको का? सतत तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो. आणि बटाटावडा काय आजकाल आपल्या गावातला पण प्रसिद्ध आहे." समीर तिला अजून चिडवत म्हणाला.

" मग खा हेच.." सुजला चिडून आत निघून गेली. ते बघून कनिकाचा चेहरा उतरला.

" तू लक्ष नको देऊस तिच्याकडे. तू अजून पॅटिस घेऊन ये.. काय रे आदी?" समीर बोलला. कनिका गुपचूप आत गेली. शोभाताई फक्त बघत होत्या. खाणं झाल्यावर संध्याकाळचे फिरायला म्हणून निशांत आणि कनिका बाहेर पडले.

" वहिनींना मी आवडत नाही का?" कनिकाने निशांतला विचारले.

" असा का विचार करतेस? वहिनी तर किती चांगली आहे." निशांत वहिनीची बाजू घेत बोलला.

" हो पण तो चांगुलपणा तुझ्यासाठी. मला तो चांगुलपणा कधी दिसलाच नाही. सतत टोमणे. आताही बघितलंस ना, मी जेव्हा दुपारी खपून हे सगळं करत होते तेव्हा त्या डाराडूर झोपल्या होत्या.. आणि बटाटेवडे म्हणे. तो जो आणि शिरा केला ना तो रवा मी भाजून ठेवला होता. त्यांनी फक्त दोन मिनिटात तूपावर परतला. दूध, साखर घातली.. झाला शिरा. आणि मी भाज्या निवडून, चिरून केलेले काम यांच्या खिजगणतीतही नाही." कनिका निराश झाली होती..


कनिकाची नाराजी निशांत करू शकेल का दूर? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all