कौशल्यानंदन ! पार्ट 6 ( अंतिम भाग )

.
महालात समस्त राजपरिवार जमला होता. राणी कैकेयी , राणी सुमित्रा , राणी कौशल्या , राजा दशरथ , युवराज राम , युवराज लक्ष्मण आणि देवी सीता , देवी श्रुतकीर्ती , देवी उर्मिला , देवी मांडवी , आर्य सुमंत , गुरू वशिष्ठ अशी अनेक महत्वाची मंडळी जमली होती. सर्वांची नेत्रे सजल होती. माता कौशल्याची तर वाचाच गेली होती. माता सुमित्रा त्यांना धीर देत होत्या.

" कैकेयी , आजवर तुला कधी सवतीप्रमाणे वागणूक दिली नाही मग माझ्या मुलासोबत इतका मोठा अन्याय का करत आहेस ? तुला मी नेहमीच लहान बहिणीचा दर्जा दिला आणि तू माझ्याच मुलाला वनवासाला पाठवत आहेस ? तुला थोडीशीही दया नाही आली माझ्या मुलावर ? भरतासाठी राज्य मागितले असते तर मला आनंदच झाला असता. पण माझ्या रामासाठी वनवास का मागितला ?" माता कौशल्याने मनातल्या मनातच माता कैकेयीला प्रश्न केले.

" राम , बाळा नको रे वनवासाला जाऊ. विरोध कर माझ्या निर्णयाचा. मला कैद कर. मी हसत हसत ती कैद स्वीकारेल. पण तूच राजा बन. " राजा दशरथ म्हणाले.

" पिताश्री , पित्याला कैद करून मला काय प्राप्त होणारे ? अपकीर्ती आणि कलंकित जीवन. पण पित्याचे वचन पूर्ण करून जे समाधान आणि गौरव मी अनुभवेल त्याची तुलना कशाशीच नाही. " प्रभू नम्र स्वरात म्हणाले.

सर्वाना प्रणाम करत कौशल्यानंदनाने आपले राजमुकुट काढले. रत्नजडित दंडाभूषणे , कवचकुंडले , अंगावरील सुवर्णहार काढले. रेशमी वस्त्रांचा त्याग केला. वल्कले घातली. वडाच्या झाडाचा चीक केसांना लावून जटा बांधल्या. युवराज लक्ष्मण यांनीही कौशल्यानंदनचेच अनुकरण केले.

" सीता , मी वनवास फक्त रामासाठी मागितला. तुला वनवासाला जाण्याची गरज नाही. " राणी कैकेयी म्हणाली.

" माते , विवाह झाल्यावर जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला भेटले तेव्हा तुम्ही मला म्हणाल्या होतात की राम तुम्हाला सर्वात जास्त प्रिय आहे. त्याला कधीही एकटे सोडू नकोस. मी तुमचाच शब्द पाळत आहे. " देवी सीता म्हणाली.

राणी कैकेयी स्तब्ध झाली. राणी कैकेयीच्या मुखावरील भाव ओळखून मंथरा पुढे आली आणि तिने वल्कले वस्त्रे राणी सीतेच्या हातावर ठेवली.

" मला ही वल्कले वस्त्रे घालता येत नाहीत. " देवी सीता निरागस स्वरात म्हणाली.

" सीता ही वस्त्रे घालणार नाही. ती राणीच्या थाटातच वनात राहील. " राजा दशरथ रागाच्या स्वरात म्हणाले.

" क्षमा पिताश्री. पण पतीने वनवास पत्करल्यावर मी राजसी वस्त्रे तरी कशी परिधान करू ? ते स्त्रीधर्माला अनुसरून नाही. " देवी सीता म्हणाली.

" देवी सीता , मी तुझी समस्या दूर करते. मी तुला शिकवते ही वस्त्रे कशी घालायची ती. " मंथरा कुत्सितपणे हसत म्हणाली.

" अवश्य. मला आनंदच होईल. " देवी सीता नम्रपणे म्हणाली.

मग मंथरा देवी सीतेच्या जवळ गेली. तिने देवी सीतेच्या अंगावरील राजसी वस्त्रे काढायला लावली.

" थांब सीता. दागिने काढू नको. सवाष्ण स्त्रीने अशुभ असते ते. " राणी सुमित्रा म्हणाली.

हे सर्व पाहून देवी श्रुतकीर्ती हळहळली. चारही बहिणींमध्ये ती सर्वात लहान होती. ती रडू लागली. देवी मांडवी व देवी उर्मिलाने तिला धीर दिला. देवी सीतेने वल्कले घातली आणि ती देवी श्रुतकीर्तीजवळ आली.

" कीर्ती , सावर स्वतःला. " देवी सीता म्हणाली.

" ताई , आपल्या लहानपणी पिताश्रींनी जेव्हा नवीन राज्य जिंकले तेव्हा मला आणि मांडवीताईला जनकपूर सोडून नवीन राज्यात जायचा प्रसंग आला. मी खूप रडले. मग तू पिताश्रींना समजवले आणि मला व मांडवीताईला जाऊ दिले नाही. आम्ही दोघीही जनकपूरलाच राहिलो. तसच आजही माझा हट्ट स्वीकारून थांब ना अयोध्येतच. " देवी श्रुतकीर्ती म्हणाली.

" कीर्ती , तुझ्या सुखासाठी मी स्वर्गही त्यागेल. पण तू आता या इक्ष्वाकू वंशाची सून आहेस. आपल्या कुळाच्या गौरवाचा , कीर्तीचाही विचार कर. मी माझ्या पतीच्या कर्तव्यात साथ देण्यासाठी जात आहे. प्रत्येकजण आपापली कर्तव्ये पूर्ण करत आहेत. तुही तुझी कर्तव्ये जाणून पूर्ण कर. " देवी सीता म्हणाली.

" ताई पण लग्नात तुला कितीतरी दागिन्यांनी मढवून आणि राजसी वस्त्रे घालून पाठवले गेले होते आणि आता सर्व राजसी वस्त्रे उतरवले गेले. तू तापसी वेशभूषेत जाणार ? " देवी श्रुतकीर्ती म्हणाली.

" कीर्ती , स्त्रीचा खरा दागिना तिचा स्वाभिमान आणि पतीचे प्रेम असते. त्यानेच तिची शोभा वाढते. बाकी शृंगार दागदागिने , वस्त्रे तर भौतिक वस्तू असतात." देवी सीता म्हणाली.

" आर्य सुमंत , या तिघांसोबत अयोध्येची चतुरंग सेना पाठवा. मुबलक अन्नधान्य आणि खजिना पाठवा. यांना वनात कसलीच उणीव भासणार नाही याची काळजी घ्या. हा आमचा आदेश आहे. " राजा दशरथ म्हणाले.

" सर्व खजिना जर यांच्यावरच उधळला तर माझा भरत कशावर राज्य करेल?" राणी कैकेयी विजेप्रमाणे गर्जली.

" पिताश्री , तुम्ही काळजी नका करू. आम्हाला वनवासात कसलाच त्रास होणार नाही. " प्रभू म्हणाले.

***

युवराज राम युवराज सौमित्र व देवी वैदेहीसमवेत वनगमन करत आहेत ही बातमी अवधेत वणव्यासारखी पसरली. अयोध्येत गोंधळ माजला. लोक महालाबाहेर जमले. राजा दशरथाविरोधी वाईट साईट बोलले जाऊ लागले. अखेरीस तो दुःखाचा क्षण आलाच. सर्वांचे आशीर्वाद घेऊन युवराज राम , युवराज लक्ष्मण आणि देवी सीता रथावर विराजमान झाले. अयोध्येचा अवघा जनसागर दर्शन करण्यासाठी लोटला होता.

" युवराज , आम्ही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही राजा दशरथाविरोधात विद्रोह करू. आमचे राजा आता तुम्हीच. " एकजण म्हणाला.

" वाह , किती लवकर तुम्ही आपल्या राजाला दोषी ठरवून मोकळे झाले. पितामहाराज राजा दशरथाने आजपर्यंत तुमच्यावर संतानाप्रमाणे प्रेम केले. आज त्यांनी आपल्या पत्नीने मागितलेली दोन वचने पूर्ण केली तर तुम्ही विद्रोहाची भाषा करत आहात ? हे तुम्हाला कदापि शोभून दिसत नाही. जर तुम्हाला माझ्या सुखाची चिंता असेल तर भरतचा राजा म्हणून स्वीकार करा. मी भरतला ओळखतो. तो तुमची आदर्श राजाप्रमाणे सेवा करेल. आता मला आज्ञा द्या. " प्रभू म्हणाले.

आर्य सुमंत स्वतः त्या रथाचे सारथ्य करत होते.

सुखाला आमच्या ग्रहण लागले
कोणते जुने पाप आडवे ते आले
भूपदशरथाचे पुत्र युवराज आमुचे
कौशल्यानंदन वनवासाला निघाले

सोबत युवराज सौमित्र देवी वैदेही
सजल झाली नेत्रे भावुक होई नगरी
दुःखाचा डोंगर कोसळला या प्रहरी
कसे सावरावे स्वतःस निघे दूर हरी

कालपर्यंत उत्सुकता ती राज्याभिषेकाची
आम्ही आनंदी स्वप्ने पाहुनी रामराज्याची
पण रातोरात काय अगतिक असे घडले
मुकूटाऐवजी मस्तकी जटा बांधले गेले

सुर्यासारखे तेजस्वी आमचे राजकुमार
निघाले वनाला होऊनि ते रथावर स्वार
जनकनंदिनी लक्ष्मीस्वरूपा देवी मैथिली
त्यागूनि राजसी वस्त्रे पतीस साथ दिली

सीताविन श्रीहीन आमची अयोध्या
जणू दुष्काळ पडे आटूनि जाई नद्या
आसवे इतके गळे जणू नवी शरयू वाहे
प्राणनाथ चालले आम्ही मूकपणे पाहे

अनाथ आम्ही प्रजाजन रघुनंदनविना
दर्शनाविना त्यांचे श्वासही घेता येईना
मायेचे छत्र नाहीसे झाले वाली तो गेला
साकेतनगरी शोकाकुल चुलही जळेना

वचन निभावूनि पित्याचे
युवराज आदर्श पुत्र बनले
जनमत नाकारले धर्म जाणले
कौशल्यानंदन वनवासाला निघाले !

( काही वैयक्तिक कारणांमुळे कथा इथेच थांबवत आहे. सिझन 2 लवकरच येईल. )

समाप्त





🎭 Series Post

View all