कौशल्यानंदन ! पार्ट 5

.
सकाळी सकाळीच मंथरा आपली काठी आपटत देवी मांडवीच्या महालात गेली.

" अवधेच्या नव्या राणीला माझा प्रणाम. " मंथरा हसत म्हणाली.

" वेडी झाली आहेस का मंथरा ? काय बडबडत आहेस ?" देवी मांडवी म्हणाली.

" आज युवराज राम , युवराज लक्ष्मण आणि जनकनंदिनी देवी सीता वनवासाकडे प्रस्थान करणार आहेत. " मंथरा म्हणाली.

" काय ? ही बातमी माझ्यापर्यंत इतक्या उशिरा कशी पोहोचली ?" देवी मांडवी म्हणाली.

" मीच मुद्दाम पोहोचू दिली नाही. कारण मला ही गोड बातमी माझ्याच मुखातून द्यायची होती. " मंथरा म्हणाली.

" गोड बातमी ? इतकी अशुभ वार्ता करताना तुझी जीभ कशी नाही जळाली मंथरा ?" देवी मांडवी म्हणाली.

" हे कुशध्वजनंदिनी , तुला आनंद नाही झाला ? तू अवधेची महाराणी बनणार. संसाराचे सर्व वैभव तुझ्या पायाशी लोळण घालणार. " मंथरा म्हणाली.

" अवधेची महाराणी बनण्यापेक्षा मी माझ्या लक्ष्मीस्वरूपा असलेल्या वैदेहीताईची दासी बनेल. तेच माझ्यासाठी अधिक भूषणावह असेल. मंथरा , तू तर माता कैकेयीचे पालनपोषण केलेली स्त्री. तुला कैकेयीनंदन आर्य भरत ओळखता आले नाही ? भाऊजींना वनवासाला पाठवून आर्य भरत कदापि स्वीकार करणार नाहीत हे स्वर्णसिंहासन. राजानंतर ज्येष्ठ पुत्रच राजा बनतो. अयोध्येच्या सिंहासनावर युवराज रामच विराजमान होतील. " देवी मांडवी म्हणाली.

तेवढ्यात एक सेविका देवी श्रुतकीर्ती महालात येण्याची परवानगी मागत असल्याचा समाचार घेऊन आली. देवी मांडवीने इशाऱ्यानेच अनुमती दिली. देवी श्रुतकीर्ती महालात आली. मंथराला पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने रागाचा एक कटाक्ष मंथरावर टाकला आणि मूठ आवळून म्हणाली ,

" मंथरा , आर्य शत्रुघ्नच्या समोर नको येऊस. ते तुझा वध करतील. " देवी श्रुतकीर्ती म्हणाली.

हे ऐकून मंथरा थरथरू लागली आणि ती घामाघूम अवस्थेत महालाबाहेर पडली.

" मांडवीताई , जी गोष्ट कानावर आली ती सत्य आहे का ?" देवी श्रुतकीर्ती म्हणाली.

" होय श्रुतकीर्ती. चल आपण उर्मिलाताईला सोबत घेऊन वैदेहीताईला भेटू. काहीही करून आर्य येईपर्यंत आपण हे वनगमन होऊ द्यायचे नाही. एकदा आर्य आले की तेच सर्व सांभाळतील. " देवी मांडवी म्हणाली.

***

देवी मांडवी , देवी श्रुतकीर्ती , देवी उर्मिला या तिघी देवी सीतेच्या महालात जातात.

" ताई , तू हा वनवास थांबवू शकतेस. " देवी मांडवी म्हणाली.

" होय ताई. हे खूप मोठे राजकीय षडयंत्र आहे. माता कैकेयीने मुद्दाम चौदा वर्षे वनवास मागितला. नियमानुसार जर चौदा वर्षे एखाद्या व्यक्तीने आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवर दावा केला नाही तर त्या संपत्तीवर त्या व्यक्तीचा हक्क उरत नाही. जर भाऊजींनी चौदा वर्षे वनवास पत्करला तर ते पुन्हा कधीच राजसिंहासनावर आपला हक्क नाही सांगू शकणार. " देवी श्रुतकीर्ती म्हणाली.

" ताई , जर भरतभाऊजी येईपर्यंत वनगमन टाळता आले तर ?" देवी उर्मिला म्हणाली.

" होय ताई. माता कैकेयी इतक्या कपटी असतील याची कल्पनाच नव्हती. " देवी श्रुतकीर्ती म्हणाली.

" मौन रहा श्रुतकीर्ती. माता कैकेयीविषयी अपशब्द वापरणे तुला शोभा देत नाही. माता सुनैनाने काय उपदेश केला होता इतक्या लवकर विसरलीस ? आणि वनगमन टाळायचे ? मग अर्थ काय राहिला वचनांचा ? कौशल्यानंदनने आजच वनगमन करण्याचे वचन दिले आहे. या वंशाची एक थोर परंपरा आहे. प्राण गेले तरी चालतील पण वचन तुटता कामा नये. " देवी वैदेही म्हणाली.

" ताई , तू वनवासाला जाणार तर आम्ही एकट्या पडू ना ? लहानपणी आपण एकमेकांना वचन दिले होते की एकत्र राहायचे. चौघींची लग्ने एकाच घरात झाली तेव्हा किती आनंद झाला होता आपल्याला. आणि आता तूच आम्हाला सोडून जात आहेस ?" देवी श्रुतकीर्ती म्हणाली.

" लहानपण सरले श्रुतकीर्ती. आता प्रत्येकाने आपापली कर्तव्ये पूर्ण करायची. आपल्या कुटुंबावर गृहकलहाचे मोठे संकट कोसळले आहे. दशरथस्नुषा आहोत आपण. त्या नात्याने हे घर एकत्र जोडून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. मला तुम्ही तिघीही वचन द्या की आमच्या वनगमनानंतर तुम्ही मातापित्याची सेवा कराल. आमची उणीव कधीही भासू देणार नाही. या राजकुटूंबाचे विभाजन होऊ देणार नाही. " देवी वैदेही म्हणाली.

देवी सीता यांनी एक हुंदका दिला. त्यांच्या सुंदर नेत्रांमध्ये आसवे दाटली. मग बाकी बहिणींनाही रहावले नाही. तिघींनीही देवी वैदेहीला मिठी मारली.

काही वेळाने एक सेविका समाचार घेऊन आली.

" महाराजांची तब्येत बिघडली आहे. त्यांना देवी सीतेला भेटायचे आहे. " ती सेविका म्हणाली.

" मी आलेच. " देवी वैदेही म्हणाली.

***

देवी वैदेहीने महाराज दशरथाच्या दालनात प्रवेश केला. महाराज निद्रा घेत होते. पण देवी वैदेही येताच त्यांची निद्रा क्षणार्धात भंग पावली.

" प्रणाम पिताश्री. " देवी वैदेही म्हणाली.

" पुत्री वैदेही , मी जे ऐकले ते खरं आहे का बाळा ? तू माझ्या रामासोबत वनवासाला जात आहेस ?" महाराज म्हणाले.

देवी वैदेही महाराज दशरथांच्याजवळ आली. राजा दशरथाने मोठ्या मायेने देवी वैदेहीच्या मस्तकावरून हात फिरवला. देवी वैदेहीने राजा दशरथचा हात आपल्या हातात घेतात.

" बाळा , मला ठाऊक आहे तू वनवासाला का जात आहेस. कैकेयीसारखी सासू तुझा जाच करेल हे भय तुला सतावत आहे ना. पुत्री , तू जनकपूरला निघून जा. पण वनवास नको पत्करू. तुला आठवत असेल तुझ्या पाठवणीवेळेस राजा जनक किती भावुक झाले होते. लग्न होऊन कितीतरी दिवस उलटून गेले तरी तुला पालखीत बसवण्याची त्यांची इच्छाच होत नव्हती. हृदयावर पाषाण ठेवून त्यांनी तुझी पाठवणी केली. मी त्यांना वचन दिले होते की ज्या सीतेला तुम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ती सीता अवधेत महाराणीप्रमाणेच राहील. पण नियतीची दुष्टचक्रे अशी फिरतील याची मला कदापिही कल्पना नव्हती. पुत्री वैदेही , लग्नानंतर जेव्हा तू सासरी आलीस तेव्हा पहिल्यांदा तू आम्हा सर्वांना खीर वाढलीस. तेव्हा गवताची एक सुकी काडी त्या स्वादिष्ट खिरीत उडून पडली. तू क्रोधाने एक कटाक्ष त्या काडीवर टाकला आणि ती काडी लगेच भस्म झाली. हा चमत्कार इतर कुणीच नाही पाहिला तरी मी प्रत्यक्ष नेत्रांनी पाहिला. पुत्री , तू तर साक्षात लक्ष्मीचा अवतार आहेस. तुला वनवासाला पाठवून घोर पाप घडेल माझ्या हातून. माझे राज्य श्रीहीन होऊन जाईल. नक्षत्रासारखा सुनेला वनात पाठवलं म्हणून इतिहास माझी निंदा करेल. वंशाच्या गौरवाला कलंक बसेल." महाराज दशरथ म्हणाले.

" पिताश्री , प्रत्येक सून ही घराची लक्ष्मीच असते. तुम्ही व्यर्थच स्वतःला दोष देत आहात. या सर्वांमध्ये तुमची काहीच चूक नाही. तुमच्यासारखे पिता तर मोठ्या भाग्याने मिळतात. तुमच्यात मला माझे पितामहाराज मिथिलानरेशचेच चित्र दिसते. मी वनवास माझ्या स्त्रीधर्मामुळे पत्करत आहे. आर्यांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी त्यांच्या सोबत राहणे माझे कर्तव्य आहे. सीतेने कठीण प्रसंगी पतीची साथ सोडली असे लोकांनी बोललेले तुम्हाला आवडेल का ? तुम्ही स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. अवधेची पूर्ण प्रजा तुमची संतानसमान आहे. मला आशीर्वाद द्या. मी निघते. तुम्ही विश्रांती घ्या. " देवी वैदेही म्हणाली.

देवी वैदेही वळून दालनाबाहेर जाऊ लागली आणि महाराज दशरथाला ती पाठमोरी आकृती पाहून साक्षात लक्ष्मीच अयोध्या सोडून जात आहे असा भास झाला.

क्रमश....

🎭 Series Post

View all