Feb 25, 2024
पुरुषवादी

कौशल्यानंदन ! पार्ट 4

Read Later
कौशल्यानंदन ! पार्ट 4
" आर्य , मीही तुमच्यासोबत वनगमन करेल. " देवी उर्मिला म्हणाली.

" नाही उर्मिला. मी वनगमन केवळ दादा आणि वहिनीची सेवा करण्यासाठी करत आहे. जर तू आलीस तर मी पूर्ण समर्पणाने ती सेवा नाही करू शकणार. " युवराज सौमित्र म्हणाले.

" मी तुमच्या सेवेत अडथळा आणनार नाही आर्य. तुम्ही भाऊजी आणि ताईची सेवा करा आणि मी तुमची सेवा करेल. " देवी उर्मिला म्हणाली.

" नाही उर्मिला. जर पत्नी सोबत असेल तर माझे लक्ष विचलित होईल. जर तू इथे राहिली तर मी निश्चिन्त होऊन वनवासात दादा आणि वहिनीची सेवा करू शकेल. दुसरे म्हणजे इथेही कुणीतरी पाहिजे. माझ्या माता-पित्याची सेवा करण्यासाठी. दादा आणि वहिनी यांच्या वनगमनानंतर माता कौशल्यावर आभाळ कोसळेल. त्यांची काळजी कोण घेणार ? जनकनंदिनी उर्मिला , माझ्यासाठी एक त्याग कर. मला वनवासाला एकटेच जाऊ दे. " युवराज सौमित्र म्हणाले.

" तुमच्याविना मी कस जगू आर्य ?" देवी उर्मिला म्हणाली.

" उर्मिला , रडू नकोस. तुझ्या सुंदर नेत्रांमध्ये अश्रू शोभत नाहीत. मला वचन दे तू रडणार नाहीस. मी वनवासाला जाताना तुझा हसरा चेहरा डोळ्यात साठवणार. मग मला चौदा वर्षे तोच चेहरा बळ देत राहणार. " युवराज सौमित्र म्हणाले.

" दिले वचन. मी तुमच्यासाठी जेवण वाढते. तिथे वनवासात चांगले जेवण भेटेल किंवा नाही ?" देवी उर्मिला म्हणाली.

देवी उर्मिला इतके बोलून धावतच गेली. उत्साहाने पाट ठेवले. पाटासमोर चौरंगा ठेवला. त्याभोवती रांगोळी काढली. मग स्वतःच्या हाताने जेवण बनवून ते सुंदररित्या ताटलीत सजवून चौरंगावर ठेवले. युवराज लक्ष्मण जेवायला बसले.

" आज मी तुला भरवतो. " युवराज सौमित्र म्हणाले.

" नको. कुणीतरी बघेल. " देवी उर्मिला लाजत म्हणाली.

" बघू दे. पुढे चौदा वर्ष सोबत जेवायची संधी भेटणार नाही. तुही मला घास भरव. " युवराज सौमित्र म्हणाले.

देवी उर्मिलाच्या हातून एक घास घेतल्यावर युवराज सौमित्र उद्गारले ,

" खरच किती चविष्ट जेवण बनवते तू. प्रेम , त्याग , समर्पण सर्वकाही मिसळले आहे त्यात. आता चौदा वर्ष ही चव जिभेवर रेंगाळत राहील. त्यामुळे अरण्यातील कंदमुळेही मला स्वादिष्ट लागतील. " युवराज सौमित्र म्हणाले.

थोड्या वेळाने युवराज सौमित्रला निद्रा आली. देवी उर्मिला पंख्याने हवा देऊ लागल्या. महालातील दिवे विझवले गेले नाहीत. देवी उर्मिला जागीच होत्या.

" आर्य , आज रात्री मला किंचितही निद्रा येणार नाही. आज मी तुमचे तेजस्वी रूप नेत्रांत साठवणार. चौदा वर्षे त्याच्याच आधारावर जगायचे आहे. " देवी उर्मिला मनातल्या मनात म्हणाली.


पुत्री पुण्यश्लोक राजा जनकाची
सुनयना माता बहीण ती सीतेची
देवी वैदेहीची जणू होती सावली
मिथिलेच्या संस्कारात ती वाढली

झाला विवाह सुमित्रानंदनाच्या संगे
रंगली मिथिलाकुमारी अवधेच्या रंगे
पती तो लक्ष्मण आदर्श भाऊ होता
याचा तिला अभिमान वाटत होता

नियतीचे चक्रे विरुद्ध दिशेने फिरली
कैकेयीने वनवासाची वचने मागितली
राघव सिया निघाले ते वनवासाला
सौमित्र म्हणे मीही येतो सोबतीला

पाहुनी त्याग देवीउर्मिला भावुक झाली
पतीने तर बंधूप्रेमाची सीमा ओलांडली
आर्य धन्य आहात तुम्ही धन्य हे समर्पण
माझेही जीवन तुमच्यासाठीच हो अर्पण

मीही येईन वनात करेल सेवा तुमची
वन परवडले शिक्षा नका हो विरहाची
वैदेहीताई जर वनवासाला येऊ शकते
मग मी का नाही?विश्वास मजवर ठेवणे

तरी नकार दिला सौमित्राने
वचन मागितले न रडण्याचे
सेवा कर इथे मातापित्याची
एवढा त्याग कर माझ्यासाठी

सर्वात मोठा त्याग उर्मिले तुझाच असेल
मला माहित असेल जरी संसार न जाणेल
तू जर संगे समर्पणाने सेवा न करता येणार
तुझी काळजी असेल लक्ष विचलित होणार

तू महालात राहिली तर मज चिंता नसेल
मी दादावहिनीची दिवसरात्र सेवा करेल
चौदा वर्षे बघ हसत हसत निघून जातील
विरहाच्या रुक्षभूमीवरी प्रेमश्रावणी पडतील

भाऊ म्हणून कितीही मी आदर्श
पती म्हणून मी कमी कुठेतरी पडतोय
सेवकधर्माचा अंगावरी घट्ट दर्प
उर्मिले आज सौमित्र तुझी माफी मागतोय

हसत हसत निरोप घेतला तिने पतीचा
हट्ट नाही धरिला सीतेसम तिने वनाचा
वनवासात लक्ष्मणास निद्रा छळू लागली
उर्मिलेच्या त्यागाची पुन्हा एकदा वेळ आली

चौदा वर्षे वनवासात लक्ष्मण जागी राहिला
निद्रेचा त्याग त्याला त्रासदायक न ठरीला
कारण अवधेत देवी उर्मिला निद्रेत होती
पतीच्या कर्तव्यात वाटा ती उचलत होती

संजीवनी घेऊन जाताना मारुती आले अवधेला
सांगितली परिस्थिती कसा बाण लागे सौमित्रला
ऐकुनी पतीची व्यथा खळखळून हसली उर्मिला
आश्चर्य वाटले हनुमानास कारण विचारे देवीला

साक्षात नारायणाच्या मांडीवर डोके टेकवले
आर्य लक्ष्मणाने तर मृत्यूसही नतमस्तक केले
ज्याची चिंता परमेश्वरास मग मी का घाबरू ?
पती माझे सर्वात सुरक्षित विनाकारण का रडू ?

परतले राम लक्ष्मण सीता वनवास भोगूनी
उघडली नेत्रे केले दर्शन ते पतीचे मनभरुनी
धन्य धन्य तो त्याग देवीउर्मिलेचा
चौदा वर्षे काळ कठीण विरहाचा

नागलक्ष्मीचा अवतार , शेषनागची संगिनी
महाभारतात निपजली बनूनि ती देवीरेवती
सीमेवरच्या सैनिकांच्या पत्नी उर्मिलाच भासतात
आजही कित्येक उर्मिला आजूबाजूला गवसतात

आपल्याहुनी जास्त बंधुस समर्पित पती
माहिती होते तिला तरी ईर्ष्या नव्हती मनी
बाधा न बनता कर्तव्यात मदतच तिने केली
आदर्श पत्नी ही सदैव उपेक्षितच राहिली !

क्रमश...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सुकृत

Engineer

जय श्री राम

//