Feb 25, 2024
पुरुषवादी

कौशल्यानंदन ! पार्ट 3

Read Later
कौशल्यानंदन ! पार्ट 3
प्रभूंनी राजा दशरथला आधार देऊन उठवले.

" पुत्र राम , हिचे काही ऐकू नको. ही स्त्री कपटी आहे. हे सर्व षडयंत्र आहे. " राजा दशरथ म्हणाले.

" जर असे असेल पुत्र म्हणून माझ्यासाठी ही लज्जास्पद बाब आहे की माझ्या मातेला माझ्याकडून काही मागण्यासाठी षडयंत्र करावा लागत असेल. मातेची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे तर पुत्राचे कर्तव्यच असते. पिताश्री , तुम्ही शौर्याने विस्तारित केलेले हे साम्राज्य मी घेऊ शकतो मग तुमचे वचन पूर्ण करण्यासाठी मी वनवासाचा भार का नाही उचलू शकत ? पुत्राने केवळ पित्याच्या संपत्तीचाच वाटा घ्यावा , पित्याचे दुःख , वचने यात वाटा घेऊ नये ? पिताश्री , तिन्ही लोकांमध्ये तुमची कीर्ती विद्यमान आहे. माझी अशी मुळीच इच्छा नाही की केवळ माझ्यावरील प्रेमापोटी तुमची वचने अपूर्ण राहावीत आणि तुमच्यावर बोट दाखवायची संधी लोकांना मिळावी. पित्याचे वचन पूर्ण करण्याचे भाग्य तर सौभाग्यशाली पुत्रालाच प्राप्त होते. पिताश्री , तुम्ही आता व्यर्थ विलाप करू नका. मी हसत हसत वनवासाला जाईल. चौदा वर्षे कधी निघून जातील कळणारही नाही. " प्रभू म्हणाले.

मग प्रभूंनी मातापित्याचे चरणस्पर्श केले आणि निघून गेले. राजा दशरथ त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसले.

***

राणी कौशल्या पूजा करण्यात व्यग्र होत्या. तेवढ्यात युवराज राम यांनी तिथे प्रवेश केला. पूजा आटोपल्यावर युवराज राम यांनी मातेचे चरणस्पर्श केले. राणी कौशल्याने युवराज राम यांच्या हातावर प्रसाद ठेवला.

" माते , मी चौदा वर्षे वनवासाला जाण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी तुझी आज्ञा मागायला आलो आहे. " युवराज राम म्हणाले.

" पुत्र.." राणी कौशल्येवर जणू आभाळ कोसळले.

" होय माते. " युवराज राम म्हणाले.

" पण का ? उद्या तर तुझा राज्याभिषेक आहे. अचानक वन जाण्याचा निर्णय?" माता कौशल्याने प्रश्नांचा भडिमार केला.

युवराजांनी सर्व वृत्तांत कथन केले.

" राणी कैकेयीने वनवासाला जाण्याचे सांगितले आणि तू ऐकले? कुण्या काळजाचा बनला आहेस तू राम ? दुसरा कुणी युवराज असता तर विद्रोह छेडला असता त्याने. " राणी कौशल्या म्हणाली.

" कुणाविरुद्ध विद्रोह करू माते ? स्वतःच्याच मातापिताविरोधात ?" युवराज राम म्हणाले.

" नाही. मला हा वनवास मान्य नाही. मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. मी स्वतः महाराजांशी बोलेल. भांडेल. पण मी जिवंत असेपर्यंत माझ्या सोन्यासारख्या मुलाला वनवासात नाही पाठवणार." राणी कौशल्या हुंदका देत म्हणाली.

" माते , तू फक्त माझीच माता नाहीस तर महाराजांची प्रथम पत्नी असल्यामुळे पूर्ण कोसल राज्याची माता आहेस. तू माझ्या वनवासाला विरोध करत आहेस कारण तू माता म्हणून विचार करत आहेस. पण तू आपल्या कुळाची कीर्ती आणि गौरवाचा तरी विचार कर. जर मी हे वचन पूर्ण केले नाही तर प्रजेत काय संदेश जाईल की राजाच्या वचनाचे काहीच मूल्य नाही ? भरत राजा बनला तर तुला आवडणार नाही ?" युवराज राम म्हणाले.

" भरत राजा बनला तर माझ्याहून जास्त आनंदी कुणी होणार नाही. भरतसाठी तर अशी शंभर राज्ये ओवाळून टाकेल मी. पण बाळा तुझे वनवासाला जाणे मला सहन होणार नाही. पुत्रवियोगाचे दुःख नको देऊ मला. तुझ्या जन्माच्या वेळेस गुरू वशिष्ठ म्हणाले की जर पुत्र मध्यान्हच्या पूर्वी जन्मला तर वनवास उपभोगणार आणि मध्यान्हच्या नंतर जन्मला तर वैभव उपभोगणार. मी महादेवाकडे प्रार्थना करू लागले की तुझा जन्म मध्यान्हच्या नंतर व्हावा. पण तुझा जन्म मध्यान्हचा सूर्य आपल्या पूर्ण तेजाने तळपत असताना झाला. त्यामुळे तुझे अर्धे जीवन वनवासात आणि अर्धे जीवन वैभवात जाणार असे भाकीत लोक बांधू लागले. कदाचित हा तोच क्षण आहे. " राणी कौशल्या म्हणाली.

" माते , शोक करू नको. माता कैकेयीच्या मनात कटुता असेल तर मी राजा म्हणून कसा विराजमान होऊ ? मला राजसत्तेचा किंचितही मोह नाही. पण मला माता कैकेयीच्या आनंदाचा आणि पित्याच्या गौरवाचा मोह आहे. त्यासाठी मी वनवास हसत हसत भोगणार. आता मी माता सुमित्राला भेटायला जातो. " युवराज माता कौशल्याचे चरणस्पर्श करत म्हणाले.

***

राणी सुमित्रा सर्वात समजूतदार राणी होती. सुमित्रा या शब्दाचा अर्थ होतो "चांगला मित्र" . सुमित्रा ही अतिशय बुद्धिमान होती. राजा दशरथाची अतिशय जवळची सल्लागार होती. श्रीरामाची आई म्हणून कौशल्या आणि भरतासाठी वचन मागणारी कैकेयी या दोघी अधिक प्रभावशाली ठरल्यामुळे सुमित्राचे चरित्र थोडे झाकोळले जाते. सुमित्रा ही काशीची राजकुमारी होती. पुत्रकामिष्ट यज्ञ होत असताना ऋषी वसिष्ठ यांनी महाराणी कौशल्या आणि महाराणी कैकेयी यांना ग्रहण करण्यासाठी प्रसाद दिला. दोघींना सुमित्राबद्दल आपुलकी वाटली आणि त्यांनी प्रत्येकी अर्धा प्रसाद सुमित्राला दिला. परिणामी सुमित्राला दोन मुले झाली. कदाचित कौशल्याने अर्धा प्रसाद दिला म्हणून लक्ष्मणची रामासोबत जास्त बांधीलकी होती आणि शत्रुघ्नची भरतसोबत जास्त बांधीलकी होती. इथे बऱ्याच कथा मिळतात. काहीजण अस म्हणतात की दशरथाने 1/ 4 प्रसाद ( किंवा खीर ) कौशल्याला ( कारण ती मुख्य पट्टराणी होती ) दिला. मग 1 / 8 हिस्सा सुमित्राला दिला. मग 1 / 8 हिस्सा कैकेयीला दिला. पुन्हा उरलेला 1 / 2 हिस्सा परत सुमित्राला दिला. सुमित्राबद्दल असेही सांगितले जाते की अयोध्येत ती पहिली व्यक्ती होती जिला राम विष्णूचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाला. असो. युवराज राम यांनी महालात प्रवेश केला. राणी सुमित्रा शिवलिंगावर दूध अर्पण करत होत्या. पूजा आटपून त्या युवराज रामकडे वळल्या.

" माते , मी वनगमन करत आहे. तुमची आज्ञा घ्यायला आलो आहे. " युवराज राम म्हणाले.

राणी सुमित्राच्या हातातील आरतीची थाळी पडली.

" पुत्र , अचानक वनवास ?" राणी सुमित्रा म्हणाली.

युवराजांनी सर्व हकीकत सांगितली. तेवढ्यात लक्ष्मणने पाय आपटत महालात प्रवेश केला. मागोमाग राणी कौशल्याही आली.

" दादा , मी तुमच्यावर हा अन्याय होऊ देणार नाही. मी विद्रोह करेल. अन्याय सहन करणे क्षात्रधर्मच्या विरोधात आहे. अवधेच्या सिंहासनावर फक्त तुमचाच अधिकार आहे. " युवराज लक्ष्मण म्हणाले.

" तो अधिकार मला कसा प्राप्त झाला ? राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या पोटी जन्म घेऊनच ना ? मग त्याच पित्याच्या वचनपूर्तीसाठी जर वनवास प्राप्त होत असेल मग का नाकारायचा ? पिताश्रींनी स्त्रीमोहात अडकून मला वनवासाला पाठवायचा निर्णय घेतला नाही तर त्यांनी माता कैकेयीनी मागितलेल्या वचनामुळे हा निर्णय घेतला. माता कैकेयींनी आजपर्यंत आपले इतके लाड केले तर त्यांच्या मनात आज असुरक्षितता निर्माण झाली तर आपण ती असुरक्षितता दूर करायला नको. पित्याविरोधात विद्रोह करण्यात कोणता पराक्रम आलाय ? आपले पिता प्रजेला पुत्रवत मानतात. केवळ आपल्या मोहापायी विद्रोह ? पित्याविरोधात बंड करून मिळालेले राज्य माझ्यासाठी मातीमोल असेल. " युवराज राम म्हणाले.

" दादा , जर काहीच मार्ग नसेल तर मला आपल्यासोबत वनवासात येण्याची परवानगी द्या. " युवराज लक्ष्मण म्हणाले.

" नाही. वनवास माता कैकेयीने केवळ माझ्यासाठी मागितला होता. तुला नाहकच मी त्या अग्नीत ढकलू शकत नाही. " युवराज राम म्हणाले.

" दादा , मी कोपीष्ट आहे. मला उचित अनुचित , धर्म अधर्म नाही कळत. मला फक्त इतके कळत जिथे राम तिथे लक्ष्मण. राम नसेल तर तो क्षण लक्ष्मणसाठी मृत्यू असेल. मला दूर नका करू. " लक्ष्मण रडत हात जोडून विनवणी करू लागला.

प्रभूंचे डोळे पाणावले. त्यांनी युवराज लक्ष्मणाला आलींगन दिले. तेवढ्यात महालात देवी सीता यांनी प्रवेश केला. जनकनंदिनी वैदेहीचे रूप साक्षात देवी लक्ष्मीसारखे होते. चेहऱ्यावर निर्मळ भाव , निरागसता , अपार करुणा , निष्कपट , तेजस्वी , बुद्धिमान. एक आदर्श नारी.

" आर्य , मीदेखील आपल्यासोबत वनगमन करणार." देवी वैदेही म्हणाली.

" सीते , असे सर्वजणच माझ्यासोबत येणार तर इथे कोण राहणार ? वनवास म्हणजे काही खेळ नव्हे. तिथे राजवाड्यात असणाऱ्या सुखसुविधा नसतील. तुला वनवास त्रासदायक जाईल. तुला सहन होणार नाही. " युवराज राम म्हणाले.

" आर्य , मी तुमची अर्धांगिनी आहे. मला दूर नका सारू. जर मी तुमच्यासोबत राजमहालात राहून ऐश्वर्य उपभोगू शकते तर मी तुमच्यासोबत वनगमन करून वनात का नाही राहू शकत ? मी वचन देते मी तुमच्यावर ओझे नाही बनणार. मी तुमची सेवा करेल. मी वनवासात असणार तेव्हा हे राजमहालपण माझ्यासाठी वनच असणार. मला माझ्या स्त्रीधर्माचे आणि पत्नीधर्माचे पालन करू द्या. " देवी वैदेही म्हणाली.

" सीता , तू मला सोडून नको जाऊ. मी राणी सुनैनाला काय मुख दाखवू ?" राणी कौशल्या म्हणाली.

" माते , ईश्वर न करो जर पितामहाराज वनवासाकडे प्रस्थान करत असते तर तुम्ही महालात एक क्षण तरी राहिल्या असत्या का ? नाही ना. मग आर्य वनवासात दुःख उपभोगत असताना मी महालात कशी सुखाने राहू शकेल? " देवी वैदेही म्हणाली.

प्रभूंनी मातेच्या नेत्रांमध्ये पाहिले. एक काव्य त्या नेत्रांमध्ये उमटू लागले.

नका दूर सारू मज श्रीरामा
येईल मीही वनवासी कामा
नाही हो बनणार तुम्हावर भार
तुमची सेवा हेच जीवनाचे सार

दोन देह आपुले एका प्राणाचे
जिथे राम तिथे पाऊले सीतेचे
रामविना बेचैन मन जानकीचे
निभावू द्यावे व्रत पत्नीधर्माचे

वनांचे ते काटे कोमल वाटतील
हिंसक पशू अहिंसक भासतील
भव्यदिव्य राजमहाल अवधेचा
भकास वाटेल भासेल जीवघेणा

सोबत जर असेल रघुनंदनाची
त्रास कसला अनुभूती स्वर्गाची
वनवासही हसत हसत संपेल
सौभाग्य हे पुन्हा कधी न मिळेल

" वहिनी उचित बोलत आहे. दादा , तुम्ही वनवासात असताना मीदेखील इथं राहू शकत नाहीत. " युवराज लक्ष्मण म्हणाले.

" माता सुमित्रा काय बोलेल ?" युवराज राम म्हणाले.

" काय बोलेल माता सुमित्रा ? मी परवानगी नाही देणार. मी तर लक्ष्मणला आदेश देणार. होय राम. लक्ष्मणालाही सोबत घेऊन जा. लक्ष्मण , वनवासात रामसीतेची मनोभावे सेवा कर. इतकी सेवा कर की भविष्यात दोन जिवलग भावांना रामलक्ष्मणाची उपमा दिली जाईल. आजपासून राम तुझा पिता आणि सीता तुझी माता. " राणी सुमित्रा म्हणाली.

" धन्य आहेस तू सुमित्रा. धन्य आहेस. " राणी कौशल्या म्हणाली.

धन्य धन्य ती माता सुमित्रा
पाठविले वनवासा सौमित्रा
शत्रुघ्नलक्ष्मण दोन पुत्र तिचे
सावली भासले राघवभरताचे

निर्मळ तिचे मन कपट नसे हृदयी
काशीकन्या सल्लागार ती पतीची
राजपरिवार अडकला गृहकलही
त्यागले पुत्र कुटुंब अबाधित ठेवी

उपदेश केला तिने पुत्र सौमित्राला
राघव पिता माता मान जानकीला
राम विष्णूअवतार तिने जाणिले
सर्व पुत्रांना एकसमान प्रेम दिधले

प्रत्येक कुटुंबात अशी असावी नारी
कुटुंब जोडून ठेवणारी प्रेम वाटणारी
स्वार्थ कसलाच मनात न आणणारी
मानवयोनीत देवीसम पूज्य भासणारी !

" माझे गतजन्माचे पुण्य असतील की मला अशी पत्नी आणि भाऊ भेटला. भविष्यात जेव्हा जेव्हा कौशल्यानंदनला पुजले जाईल तेव्हा तेव्हा जनकनंदिनी वैदेही आणि सौमित्रलाही पुजले जाईल. " प्रभू म्हणाले.

क्रमश...


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सुकृत

Engineer

जय श्री राम

//