कौशल्यानंदन ! पार्ट 1

.
सकाळचा प्रहर होता. राणी कैकेयीच्या महालात सेविकांनी गर्दी केली होती. कैकेय राज्यातून काही व्यापारांनी विविध आभूषणे आणि साड्या विक्रीसाठी आणल्या होत्या. राणी स्वतःसाठी खरेदी करणार होतीच पण महालातील सर्व सेविकांनाही त्यांच्या इच्छेप्रमाणे काही आभूषणे आणि वस्त्रे भेट देणार होती. कारणही तसेच होते. राजा दशरथ यांनी युवराज राम यांच्या राज्याभिषेकाची घोषणा केली होती. त्यामुळे राणी कैकेयी अतिशय आनंदी होती.

" कौशल्या ताई आणि सुमित्रासाठीही साड्या विकत घेते. " राणी कैकेयी मनातल्या मनात म्हणाली.

तेवढ्यात कुबडी असलेली , कुरूप , वृद्ध मंथरा आपली काठी वाजवत महालात आली. समोरचे दृश्य पाहून तिने रागाचा एक कटाक्ष कैकेयीवर टाकला. पण कैकेयीचे तिकडे लक्ष नव्हते. थोड्या वेळाने कैकेयी मंथराकडे वळली.

" आलीस मंथरा. उशीर केलास खूप. अग किती कामे खोळंबली आहेत. माझ्या रामचा राज्याभिषेक होणार आहे. तो अवधेच्या राजसिंहासनावर विराजमान होणार. भूतलावरचा सर्वात तेजस्वी राजा असेल तो. वैकुंठ सोडून विष्णूच पृथ्वीवर राज्य करायला अवतरलाय असे वाटेल. " राणी कैकेयी म्हणाली.

मंथराने तोंड वाकडे केले. राणी कैकेयीला जे समजायचे ते समजले. तिने एकांतचा आदेश दिला. मंथरा सोडून सर्वजण निघून गेले.

" काय झाले मंथरा ? तू प्रसन्न वाटत नाहीस. " राणी कैकेयी म्हणाली.

" मूर्ख आहेस तू राणी कैकेयी. " मंथरा म्हणाली.

" मंथरा..तुला समजत आहे तू कुणाशी आणि काय बोलत आहेस ? माहेरकडची आणि सर्वात जुनी दासी आहेस म्हणून मी तुझा आदर करते. त्याचा अर्थ असा नाही की तू मर्यादा ओलांडशील. " राणी कैकेयी म्हणाली.

" मर्यादा तर राजा दशरथ यांनी ओलांडली. तेही वचन मोडून. " मंथरा म्हणाली.

" कसले वचन ?" राणी कैकेयी म्हणाली.

" तुझ्यासोबत विवाह होताना ते तुझ्या पित्याला म्हणले होते की तुझा पुत्र अवधेचा राजा बनेल आणि आता राज्य देताय राणी कौशल्येच्या पुत्राला ?" मंथरा म्हणाली.

" मंथरा , तेव्हा ताईला पुत्र होत नव्हता. म्हणून महाराजांनी तसे म्हणले होते. " राणी कैकेयी म्हणाली.

" ठीक आहे. लक्षात ठेव उद्या राम राजा बनला तर भरत उपेक्षित राहील. राणी कौशल्येचे वजन वाढेल. तुला आणि तुझ्या पुत्राला काडीचीही किंमत राहणार नाही. " मंथरा म्हणाली.

" मंथरा , माझा राम असा नाही. कौशल्याताईपेक्षा तर मी जास्त लाड केलेत त्याचे. राम खूप जीव लावतो माझ्यावर. " राणी कैकेयी म्हणाली.

" कैकेयी , तुझ्यासोबत एवढे मोठे कपट झाले तरीही तुला कसे समजत नाही ? अवधेच्या गादीवर भरताचा हक्क आहे. भरत हळवा आहे. भोळवट आहे. त्याला राजकारण कळत नाही. रामाचा दास बनून राहील तो. राम त्याच्या बोटांच्या इशाऱ्यावर नाचवत बसेल भरताला. सत्तेसाठी भावाचे रक्तही सांडले जाते. उद्या जर रामाने भरताचे प्राण घेतले तर ?" मंथरा म्हणाली.

" मंथरा , हात जोडते ग. नको असे कटू शब्द बोलूस. अग रामाने काय बिघडवले आहे तुझं ? तो तर सर्वांशी नम्रतेने वागत असतो. भरत तर त्याला प्राणप्रिय आहे. लहानपणी एकदा भरत आजारी पडला असताना राम माझ्यासोबत रात्रभर जागला होता." राणी कैकेयी म्हणाली.

" ढोंग होते ते सर्व. गोड गोड बोलून सर्वांची मने जिंकली. राम कपटी आहे. एकदा राजा बनू दे सर्वात आधी तो भरत नावाचा काटा दूर करणार. राणी कौशल्या तर राजमाता म्हणून सगळीकडे ऐटीत फिरणार. तुला दासी बनवणार. " मंथरा म्हणाली.

" मी आणि दासी ? ताईने आजपर्यंत मला बहिणीसारखे वागवले. " राणी कैकेयी म्हणाली.

" सवत कधी मैत्रीण बनत नसते. सौंदर्य आणि शौर्य हे दोन्ही गुण असल्यामुळे तू राजा दशरथाची सर्वात प्रिय राणी होतीस. पण राज्याभिषेकाचा निर्णय तुला एकदाही न विचारता का घेण्यात आला ? राजा दशरथ हल्ली राणी कौशल्येच्य महालात जास्त जातात. भरत आजोळात गेला असतानाच का राज्याभिषेकाचा घाट घातला ? षडयंत्र आहे हे. तुला लहानपणी हातात खेळवले आहे पोरी. आता या म्हातारपणी तुझी आणि तुझ्या मुलाची दुर्दशा नाही पाहिली जाणार. " मंथरा म्हणाली.

मंथराने विविध गोष्टी सांगून राणी कैकेयीच्या मनात विष भरले.

" पण आता काही होऊ शकत नाही. राम ज्येष्ठ पुत्र आहे. गादीवर त्याचाच हक्क आहे. " राणी कैकेयी म्हणाली.

" राजा दशरथाकडे तुझे दोन वचन अजूनही शिल्लक आहेत. विसरली का देवासुर संग्रामात जेव्हा राजा दशरथ जखमी झाले तेव्हा तूच त्यांच्या रथाचे सारथ्य करत होतीस. तू त्यांना रणभूमीतून सुरक्षितपणे बाहेर काढले आणि जखमांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवले. प्रसन्न होऊन त्यांनी तुला दोन वचन मागायला सांगितले. पण तू नंतर मागते म्हणालीस. ते दोन वचन आता माग. एक रामला चौदा वर्षे वनवासाला पाठवणे दुसरे भरतला अयोध्येचा राजा बनवणे. " मंथरा म्हणाली.

कैकेयी हसली. तिने कपाळावरचे कुंकू अंगठ्याने तिरके केले. सर्व दागिने फेकले. महालात अंधार केला. काळे वस्त्र घातले. ती कोपभवनमध्ये गेली.

" आता बघच मी त्या कौशल्यानंदनला वनवासाला कसे पाठवते. " कैकेयी मंथराकडे बघत म्हणाली.

क्रमश...

🎭 Series Post

View all