कातिल् नजर

प्रेमात पडायला उत्सुक मुलाची व्यथा
कातिल नजर

बॅचलर मुलांचे प्रॉब्लेमच वेगळे असतात . त्यात थोडे फार काळे सावळे आणि अंगा पिंडाने बारीक असलं तर विचारायची सोयच नाही . एक मुलगी तरी ढूंकून बघेल तर शप्पथ . मला एक कळत नाही कि रंगच सगळं असतं का ? अगदी काळी कुट्ट मुलगी जरी असली तरी तिला पण गोरा पानच मुलगा हवा असतो . का ? अश्या मुलींना सांगावं वाटतं कि अग काळे तुला खूप गोरा पान मुलगा हवा पण तो गोरापान मुलगा तुज्या कडे का बघेल ? ते जाऊ दे . तर मी , अख्खा अठेचाळीस किलो चा देह . माझ्या कि काही भावना असतात ना ? मला हि वाटतं कि माझी पण गर्लफ्रेंड असावी . मी हि भरभरून रोमान्स करावा पण विधात्याने माझ्या नशिबी रोमान्स लिहिताना शिंक आली असेल आणि लिहायचे राहून गेले असणार . बघता बघता बारावी झाली आणि कॉमर्स देखील संपत आले होते . म्हणजे जवळ जवळ साडे चार वर्ष कॉलेज लाईफ सरली होती आणि माझ्या सहनशक्ती चा बांध फुटत होता . आणि एक दिवस ती घटना घडली ज्याने माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली .

मी असेच एक जुन्या किल्ल्या मध्ये एकांतात भटकत होतो आणि भटकून थकल्या वर एका ठिकाणी बसलो होतो . काही वेळाने एक मुलगी थोडी नीटनेटकी समोरून येताना दिसली . आमची नजरा नजर झाली . आणि ती गोड हसली . तिच्या एक स्माईल ने माझं काळीज जोर जोराने धडकू लागले . तरी मला शंका आली कि हि माझ्या कडेच बघून स्माईल करते कि आस पास दुसरा कोणी आहे का . म्हणून आजू बाजूला पाहिले . माझ्या शिवाय दुसरं कोणी नव्हतं . पहिल्यादा असे झाले होते कि एखादी सुंदर तरुणीने माझ्याकडे बघून स्माईल केले होते .

ती थोडे पुढे गेली . मी आजून हि तिच्याकडेच पाहत होतो . ती हलकेच मागे वळली आणि माझ्या कडे एकदम कातिल नजरेने पाहिले . मी थोडा चपापलो पण ती पुन्हा एकदा हसली . तिच्या नजरेचे गारुड माझ्या वर चालले आणि मी जागेवर उभा राहिलो . ती मंद मंद पावले टाकत पुढे पुढे चालली होती आणि मी तिच्या वशीभूत मागे मागे जात होतो . ती वळून माझ्या कडे पाहायची , हलकेच हसायची , लाजायची . तिच्या सगळ्या हालचाली मोहक होत्या आणि मी मोहित होतो . आज इतक्या वर्षाची मनोकामना पूर्ण होताना दिसत होते .

ती चालत चालत एका गुफे सारख्या ठिकाणी गेली आणि भिंतीला टेकून उभी राहिली . मी तिच्या जवळ गेलो आणि त्या नंतर जे झाले त्याचा मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. तिने आपली ओढणी समोर केली . मी आधाश्या सारखी माझ्या हातात घेतली आणि अचानक

चीरssssssssssssssssssssssssssssssssss

ती जोरात चिरकली . चारशे चाळीस चा करंट लागावा तसा मी स्वप्नांतून अस्तित्वात आलो आणि इतक्यात माझ्या डोळ्या समोर अंधारी आली . सगळं धुरकट होत गेलं . काही वेळाने माझे डोळे उघडले . मी जमिनी वर आडवा होतो . काही कळायला मार्ग नव्हता . मी आजू बाजूला पाहिले पण ती तरुणी कुठेच नव्हती आणि मग माझं लक्ष स्वतःकडे गेले . मी निर्वस्त्र होतो . मी चटकन उठलो तर मला चक्कर येत होती . मग कळले कि एक जोरदार फटका माझ्या डोक्याच्या मागच्या भागात बसला होता आणि मी बेशुद्ध पडलो होतो . गळ्यातली चैन हातातले घड्याळ बोटातली अंगठी एवढेच काय अंगावर एक चिंदा देखील नव्हता . ती मोहिनी तिने नुसतेच मला मोहले नाही तर लुबाडले लुटले होते . मी कसा बसा तिकडे पडलेला कागद एक पुढे आणि एक मागे लावून लाज वाचवत घरी आलो .

तेव्हा पासून कोण मुलगी माझ्या कडे पाहून हसली कि मी अंगावरचे कपडे घट्ट पकडतो .