कथा नितीनच्या संसाराची भाग - ३

Eka purushya tyagachi gosht


   #कथा नितीनच्या संसाराची भाग - ३

   मागच्या भागात आपण पाहिले नितीन आणि त्याचे मित्र नदीकिनारी जमले होते. नितीनने आपल्या लग्नाची कथा मित्रांना सांगितली. नंतर सगळे घरी निघाले. वाटेत नितीनला घरून फोन येतो. नितीन घाईने घरी निघून येतो. आता पुढे!.


   नितीन वाटेतून घरून फोन आल्यामुळे धावतच मित्रांची सोबत सोडून घरी परत येतो. दारात दोन मोठ्या गाड्या उभ्या असल्याचे त्याला दिसतात. 

   घरी कलेक्टर साहेब व त्यांच्या नात्यातील पाच सहा मंडळी मोठ्या गाडीत नितीनच्या घरी आले होते.

   नितीनने घरात पाऊल टाकताच, कलेक्टर साहेबांनीच त्याचे स्वागत केले. " या जावईबापू आपलीच वाट पहात होतो."

    नितीन थोडा भांबावला. संस्कारानुसार त्यांने दिवाणखान्यात बसलेल्या सर्वांना नमस्कार केला. आलोच म्हणून तो आतल्या खोलीत गेला.

    आतल्या खोलीत त्याच्या बहिणी त्याची वाट पाहतच होत्या. रेखाताई नितीनला म्हणाली, " नितीन अरे नुसतीच लग्नाची बोलाचाली चालू नाही तर लग्न पण पक्के झाले आहे  पण मुलगी आपण कोणीच पाह्यली नाही. तू विषयाला हात घातलास तर बरं होईल."

  नितीनला रेखाताईचे म्हणणे पटले. बोलतो ताई म्हणून नितीन बाहेर येऊन बसला.

      नितीन बाहेर आल्यावर साहेबांनी मुख्य विषयाला हात घातला. "आप्पा साहेब आता शेवटची बोलणी करूया. मी लग्न दोन्हीही बाजूने करून देईन. नितीनरावांच्या पुढील पदव्युत्तर शिक्षणाची जबाबदारी आमची आणि नोकरी लावण्याची जबाबदारी पण आमचीच बरंका."

     नितीन मध्येच त्यांना अडवत म्हणाला " नको, नको माझ्या पदव्युत्तर शिक्षणाची जबाबदारी माझीच आहे आणि नोकरी पण माझ्या बुध्दीमत्तेवर मिळवणार. मी पुढील शिक्षण माझ्या हिमतीवर घेणार आहे."

  "अरे व्वा ! मस्त अशाच हुशार व हिंमतवान जावयाच्या शोधात मी होतो. अभिमान वाटतो तुमचा नितीनराव." साहेब म्हणाले.

     " साहेब ! मला अहो जाहो नका करू मी लहान आहे." नितीनने नम्रतेने त्यांना सांगितले.

   " चालेल,चालेल चला पुढे." म्हणत कलेक्टर साहेब परत विषयावर आले.
           आता आपण साखरपुडा लवकरच करून घेऊ."

   " हो साहेब तुम्ही म्हणाल तसे." आप्पासाहेब म्हणाले.

        "आप्पा थांबा मला थोडं बोलायचे आहे." नितीन म्हणाला.

    "आता काय ?" इति आप्पासाहेब.

     " आप्पा मी लग्नाला तयार आहे. पण जिच्याबरोबर मला माझं आयुष्य घालवायचे आहे तिला एकदा मला बघायचे आहे. भेटायचे आहे चालेल ना ?" नितीन म्हणाला.

   आप्पा काही बोलण्याच्या आतच कलेक्टर साहेबांनी त्यांच्या बोलण्याची लिंक तोडली.

        " हे काय नितीनराव ? उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्यासारखं करता ? भेटायचे आहेच आता साखरपुड्याला."

    "हो पण...."नितीन बोलणार इतक्यात कलेक्टर साहेब म्हणाले," ती गावाकडची शेती एकदा पाहून घ्या आप्पासाहेब आणि ते काय तुमची मोठा कन्या काय शिकली आहे म्हणायची ?"

    " हो साहेब यंदा बी.ए.झाली. आप्पा म्हणाले. 

       "मग तिला जरा बॅंकेच्या, तलाठी खात्यातील परीक्षा द्यायला सांगा. लेखी परीक्षा झाली की तोंडी परीक्षा, मुलाखत सगळे, सगळे आम्ही पाहून घेऊ.
      लग्नाचा बार पण उडवूया झालाचं तर मग."

        कलेक्टरांच्या या बोलण्याला सगळ्यांनी री ओढली. आपला विषय चालू आहे हे पाहून नकळतपणे रेखाने पडद्यामागून बाहेर डोकावून पाहिले. समोरच बसलेल्या राजबिंड्या तरूणाबरोबर तिची नजरानजर झाली.

  " चला, चहा पाण्याचे तेवढे बघा म्हणत आप्पांनी मालतीबाई म्हणजेच नितीनच्या आईकडे पाहिले.

   " नको, नको ! लेकीच्या घरी आम्ही चहा पाणी पित नाही." असे म्हणत कलेक्टर बरोबरची मंडळी उठली.
  
   मालती बाईंनी आग्रह केला पण सगळ्यांनी नको म्हटलं. मालतीबाईंची पण अवस्था तळ्यात मळ्यात अशीच झाली होती. त्यांना पण आपल्या भावी सुनबाईंना एकदा बघायची इच्छा होती. पण का टाळत आहेत हे? हे त्यांनाही कळत नव्हते. असो शेवटी देवाची मर्जी.

   मग आलेल्या बायकांची मालतीबाईंनी खणा नारळांनी ओटी भरली. 

   " चला लवकरच भेटूया. म्हणत सगळी मंडळी बाहेर पडली. 
   "  तेवढी साखरपुड्याची तारीख ठरवून सांगा उरकून घेऊ. कारण जावईबापू फार उतावीळ झाले आहेत." म्हणत हसत हसत सगळे गाडीत बसले.

  पण तो तरुण मात्र मागे रेंगाळत होता. रेखापण खिडकीतून त्याला पहात होती.

    कोण होता तो तरूण ? नितीनला भावी वधूला भेटायला मिळेल का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अर्थातच पुढील भागात!..


    क्रमश:

🎭 Series Post

View all