कथा नितीनच्या संसाराची भाग - २

Eekya purushcya kudubasathi keleya tyachi kahani


#कथा नितीनच्या संसाराची 
            भाग - २

  मागील भागात आपण पाहिले चौघेही मित्र नदीकाठी जमतात आता पुढे :. 

  चौघेही नदीकाठी जमले. नेहमी प्रमाणे वाळूवर फतकल मांडून बसले. नदीकाठी नेहमीप्रमाणे चौघांच्या मस्त गप्पा रंगल्या पण नितीन मात्र कुठेतरी हरवल्यासारखा वाटला.

    शेवटी प्रकाशने हलवून त्याला जागे केले. " अरे नित्या बोल ना काय झाले ? अरे बोल आपल्या मित्रांना नाही सांगायचं तर कोणाला ? ठरले ना लग्न जाऊ दे आता. लग्नानंतर पण शिकू शकशील. 

      बायकोला पण शिकवू शकशील. जाऊ दे झाले ते झाले. पुढचे निर्णय मात्र तुझ्या हातात आहेत." प्रकाश म्हणाला.

   "हो खरंय तुमचे. पण एक सांगू का ? हे लग्न पण मला नको होते. आजचं सगळे कळले मला.
         आप्पांनी माझ्या लग्नाचा निर्णय वरिष्ठांच्या दबावाखाली येऊन घेतला आहे.
         कलेक्टरची मुलगी आहे. तिला पायाची दोन बोटे नाहीत. ती दहावी पण पुरती शिकली नाही. फक्त एवढीच माहिती. 

  " काय आप्पांवर दबाव? वरिष्ठांचा? पण का"? सुरेशने विचारले.

    " तुम्हांला माहिती आहे. आपली सगळ्यांची घरची परिस्थिती थोड्याफार प्रमाणात सारखीच आहे." नितीन म्हणाला.

  " हो रे पण का ?" परत सतिशने विचारले.

    " हो तेच तर तुम्हाला माहीती आहे ना मला दोन बहिणी आहेत. बाबांची नोकरी तलाठ्याची. एकटा कमावता खाणारी पाच तोंडे.

       एकापाठोपाठ एक दोन्हीही आता लग्न होतील. बाबांना कसं शक्य आहे हे सगळं ?

         माझं शिक्षण, त्या दोघी पण शिकत आहेत. स्वतःच्या पायावर ऊभे राहण्याचा त्या देखील प्रयत्न करत आहेत पण सगळा खर्च बाबांना पेलवणार नाही.

       आत्ताच कुठे आप्पा एक मोठा मुलगा या कर्तव्यातून मोकळे झाले आहेत. दोन आत्या व काकांची लग्न केली. आता परत आमचे सगळे?

     मी होतकरू, हूशार बघून त्या कलेक्टरने बाबांना गळ घातली. माझी मुलगी तुझ्या मुलाला करून घे. शेती देतो, हुंडा पण देतो. लग्न पण दोन्हीही बाजूने धुमधडाक्यात करून देतो.

      तुझ्या मुलाचे पुढील शिक्षण मीच करेन. तुझ्या मुलींना नोकरी पण लावेन. अजून काय हवं ? नाही केलेस तर लवकर रिटायर्ड करेन. 

        आप्पांचा होकार, नकार याचा प्रश्नच नव्हता. चक्क धमकी दिली गेली होती. आता घाबरून आप्पा आधीच होकार देऊन बसले आहेत.

      मला जेंव्हा हे समजले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आप्पांनी सगळे मला सांगितले व म्हणाले. शेवटी तुझा निर्णय आहे तूच ठरव. होकार, नकार आणि शेवटी तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. 

       काय ठरवणार होतो मी ? माझा एक नकार पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणार होता.

          म्हणून शेवटी मी होकार दिला. जिवनात असे काही प्रसंग येतात की, कधी कधी आपला युक्तीवाद देखील तिठा पडतो. 
         गरीबीमुळे माणूस मिंधा बनतो रे, हे मिंधेपण त्याची जीभ कापून टाकते आणि परिस्थितीशी तडजोड करायला भाग पाडते." असे म्हणत नितीनने शर्टाच्या बाहीने डोळे पुसले.

       बाजूचे आम्ही तिघेही निःशब्द झालो. फक्त त्याच्या पाठीवर थोपटत होतो. 

   आप्पा कुठेच चुकले नव्हते पण त्यांनी बरोबर पण केले नव्हते. ते ठामपणे  निर्णय घेऊ शकले असते. पण शेवटी त्यांची नोकरी गेली असती. सगळे कुटुंबच परिस्थिती पुढे हवालदिल झाले होते.

   शेवटी नितीन म्हणाला,"माझ्या त्यागाने कुटुंबाचे भले होणार असेल तर, मी लग्नाला तयार आहे.
           शेवटी लग्नाच्या गाठी देव स्वर्गातच बांधतो ना, तसंच काहीसं, एक गोष्ट तरी चांगली होते आहे ना माझ्या शिक्षणात खंड तर पडणार नाही.

        हं! तिलाही शिक्षणात गोडी असेल तर, शिकवेन मी तिला. नसेलच  तिला शिकायचे तर मी तरी काय करणार ? करेल रांधा वाढा उष्टी काढा.

     चला उशीर झाला निघायला हवे घरी." नितीनच म्हणाला.

 आम्ही सगळे उठलो काहीही न बोलता एकापाठोपाठ निघालो. संध्याकाळचा हवेतला गारवा देखील कडकडीत उन्हासारखा अंगाला टोचत होता.

  रस्त्याकडील भैया आम्हांला आवाज देत होता. सुट्टीत गावी आलो की आम्ही त्याचे ठरलेले गिऱ्हाईक. मस्त भेळवर ताव मारायचो.

 त्याला शहरातील गमतीजमती ऐकवायचो.आज तो बोलावतो आहे पण इच्छा झाली नाही. उद्या येतो आज उशीर झाला म्हणत आम्ही पुढे सरकलो. मनापासून कोणाला काही खायची इच्छा नव्हती.

   किती स्वप्न आम्ही रंगवली होती. प्रत्येकजण एक महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून शिकत होता. चुरस होती. आता नितीन काय करणार याचीच आम्हांला चिंता लागली होती.

   वाटेत असताना नितीनला घरून फोन आला. तो काय बोलला फोनवर ते कळले नाही. " चला निघतो मी भेटूया ऊद्या " म्हणत घाईने निघून गेला. काय झाले? नितीन का घाईने निघून गेला? पाहूया पुढील भागात.


  क्रमश :

🎭 Series Post

View all