कथा नितीनच्या संसाराची भाग - १

Nehami apan bayka aaplyaa kudubasathi tyag kartana pahato pun purushacha tyagachi gosha quachitcha disate tech ya kthetun daakhvanyachya prayatn


   #कथा नितीनच्या संसाराची!.. भाग- १ 

  नितीन त्याच्या लग्नाची घरात चाललेली बोलणी नव्हे तर, लग्न पण पक्के झाले हे सांगण्यासाठी सुरेशच्या घरी आला होता. 

  हे ऐकून सुरेश अवाक् झाला. " हे काय तू लग्न करतोस इतक्या लवकर ? अरे शिक्षण पण पूर्ण नाही आपले अजून. कमवायची अक्कल पण नाही. काय पोसणार बायकोला ? अति घाईने नको निर्णय घेऊ. ह्या वयात एक आकर्षण असते. जमिनीवर ये, नको आकाशात ऊडू."

 सुरेश भडाभडा बोलून नितीन बद्दलची कळकळ व्यक्त करत होता.

   पण नितीन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हताच. " सुरेश हा माझा निर्णय नाही. आई आप्पांचा निर्णय आहे. मी ती मुलगी काळी की गोरी हे देखील पाहिली नाही. "

  " मग होकार कसा दिलास ? कोणत्या जमान्यात वावरतोस नितीन ? अरे भानावर ये, नाही म्हणून सांग त्यांना.

     आपल्याला खुप शिकायचे आहे. आपल्याला ज्या सुखसुविधा या गावात मिळाल्या नाहीत त्या सगळ्या सुखसोईयुक्त गाव आपल्याला बनवायचे आहे. आपलं हे स्वप्न आहे हे विसरलास?

     आधी गावातील सगळ्या अडचणी सोडवू. आपल्या पुढील पिढीला आपल्याला जे मिळाले नाही ते सगळे या गावातच मिळेल याची सोय करू, शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही हे पाहू, गावातील मुली शिकतील, आपल्या पायावर उभ्या राहतील यासाठी आपण कार्य करणार होतो. मग आपल्या लग्नाचे बघायचे हे विसरलास का ?

    अरे कोणी जादू केली तुझ्यावर ? पहिल्या पाचात आपण आहोत. खुप मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला तुला तर इंजिनिअर व्हायचे आहे. मला प्राध्यापक, सतीशला डॉक्टर प्रकाशला कलेक्टर.हे सगळं आपल्याला आपल्या गावासाठी करायचे आहे. हे विसरलास ?

     नाही,नाही नितीन मी आत्ताचं आप्पांकडे येतो आणि
 सगळे सांगतो. त्या मुलीच्या आयुष्याशी खेळायचा तुला 
आधिकार नाही कारण लग्न केलेस तरी तू संसारात रमणारा नाहीस हे माझं मन मला सांगते आहे."सुरेश अतिशय
 तळमळीने बोलत होता.

   " नाही सुरेश त्याचा आता उपयोग नाही. आप्पांची सगळी बोलणी झाली.सुपारी पण फुटली.लवकरच साखरपुडा 
होईल." नितीन म्हणाला.

   "अरे हे सगळं परस्पर ठरवणार आप्पा आणि तुही तीच री ओढणार ? असं काय झालं म्हणून तडकाफडकी आप्पांनी तुझं लग्न ठरवले.

 अरे आधी रेखाताईचं  तरी लग्न ठरवायचे ना ? ती निदान लग्नाची तरी झाली. शिक्षण पण संपत आलं यंदा B. A.  होईल ना रे मग?

    खरंच काय चालले आहे हे सगळं? तू लग्न करणार म्हणजे शिक्षण अर्धवट सोडणार ?" 

     "नाही रे, सांगतो तुला नंतर." म्हणत नितीनने सुरेशच्या घरातून काढता पाय घेतला.

   सुरेश विचारात पडला.का बरं नितीनचे आप्पा इतक्या लवकर लग्न करता आहेत?

   नितीन हुशार आहे.नक्कीच तो पुढे काहीतरी करून दाखवेल. तसे आम्ही ठरवलं पण आहे.घरच्या बिकट परिस्थितीची जाणीव आम्हाला आहे. सरळमार्गी आहोत आम्ही. बिघडलेले नाही. 

  मग का? का मला पण आप्पांकडे  येऊ देत नाही हा नितीन ? मी विचारलं असतं त्यांना. सगळे सांगितले पण असते.आमची सगळी स्वप्नं पण त्यांच्या समोर मांडली असती.

  असं काय घडले असेल, म्हणून घाईघाईने आप्पांनी नितीनच्या लग्नाचा निर्णय घेतला असावा?नक्कीच काहीतरी मोठं कारण असावे.कारण नितीनच्या बोलण्यात म्हणजेच आमच्या बोलण्यात कधी हे लग्न, संसार असल्या गोष्टी नसायच्या. नेहमी अभ्यास,परीक्षा, नवीन काही तरी शिकणे यांकडे आमचे लक्ष.अभ्यासतला किडा असे म्हणून आम्हाला चिडवतात. 

  मग असे अचानक? नाही आधी बाबांशी बोलतो. कदाचित ते तरी नितीनच्या वडिलांना म्हणजेच आप्पांना समजावतील. नक्की इतक्या तडकाफडकी नितीनच्या लग्नाचा निर्णय का घेतला?

  त्यांनी नितीनला विचारले सुध्दा नाही. मुलगी कशी आहे? किती शिकलेली आहे? नितीनच्या तोलामोलाची आहे कि नाही? हे सुध्दा विचारात घेतले नाही.

   सुरेशचे आज घरात कशातच लक्ष लागणारच नव्हते. त्यानी शेवटी सतीशला फोन केला. सतीश येतोस थोडं फिरून येऊ.

    इकडे सतीश पण खुपच गोंधळलेला होता.कारण नितीन नुकताच प्रकाश  व सतीशकडे येऊन हेचं सगळं बोलून गेला होता.

 सतीश, सुरेश, नितीन आणि प्रकाश शाळेतील हुशार मुलांचा ग्रुप शाळेपासून ते कॉलेज पर्यंत एकत्रचं. नाव पहिल्या पाचातचं . 

 पुढील शिक्षणासाठी शहरात पण एकाच खोलीत एकत्र राहिले. सगळ्यांची घरची परिस्थिती थोडीफार सारखीच मुलांनी पण त्याचा कधीचं गैरफायदा घेतला नाही. 

   अगदी मनापासून सगळे अभ्यास करत आणि आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील असत. सुट्टीत गावी येत मस्त कुटुंबाबरोबर सुट्टी आनंदात घालवून परत ते चौघे आपल्या शिक्षणासाठी आपल्या शहरात जात. 

     आज देखील सुट्टीच्या निमित्ताने हे चौघेही गावी आले होते. खुप काही अपेक्षा बाळगून. पण गावी आल्यावर मात्र नितीनच्या घरी वेगळीच डाळ शिजत होती. याची सुतराम कल्पना नितीनलाही  नव्हती. 

 काय करायचं या विचारात सुरेश व सतीश भेटले. नक्कीच नितीनला पण हे लग्न व्हायला आवडणार होते का हे त्याला विचारू या म्हणून त्यांनी नितीनला बोलावून घेतले. प्रकाश नितीनला घेऊन आला. चौघेही नदीकाठी जमले. पुढे काय होणार हे पाहूया पुढील भागात. 

क्रमश:

🎭 Series Post

View all