शांता आणि सखाराम गावातून शहरात तपासणीला आले होते. शांता बाळंत होती. त्यांना आधीच एक मुलगी होती, पण पुढचा \"वंशाचा दिवा\"च हवा अशी सखारामच्या आईची इच्छा होती. शहरामध्ये पोटात मुलगा आहे की मुलगी हे जन्मायच्या आधीच कळते हे साखरामच्या आईला कोणीतरी सांगितले होते. आणि त्यामुळे तिने या दोघांना शहरामध्ये धाडून दिले होते.
खरं म्हणजे शांताला तिला इकडे का आणलं आहे, त्याची काहीही कल्पना नव्हती. तिला असच वाटत होतं, की ती पुन्हा आई बनणार आहे, म्हणून हवा बदलासाठी तिला शहरात घेउन आले आहेत.
ज्याने सखारामच्या आईला या टेस्ट बद्दल सांगितलं, त्यानेच सखारामला शहरात त्या डॉक्टरचा पत्ता दिला होता. आणि त्या डॉक्टरने त्यांना ही टेस्ट करणाऱ्या लॅबोरेटरीचा पत्ता दिला होता.
जेंव्हा तिची NIPT (NonInvasive Parental Test) केली, तेंव्हाही तिला सांगितलं गेलं, की पोटातील बाळ सुरक्षित आहे का नाही हे बघण्यासाठी टेस्ट करणार आहेत म्हणून. पण हे फक्त अर्धसत्य होतं, कारण या टेस्ट मुळे पोटात मुलगा आहे का मुलगी हे सुद्धा समजायचं.
टेस्ट करून झाली, आणि त्याचे रिपोर्ट्स सुद्धा मिळाले. डॉक्टरने पोटात मुलगी असल्याचे रिपोर्ट्स मध्ये बघून सांगितले. ते ऐकून सखाराम गडबडला. त्याला खर म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी, काहीही फरक पडत नव्हता. पण आईच्या दबावाखाली त्याला काहीही सुचत नव्हत. डॉक्टरांनी अबोर्शन बद्दल विचारलं, पण तो थोडा वेळ मागून दवाखान्याच्या बाहेर आला.
खर म्हणजे अबोर्शन म्हणजे काय हे त्या दोघांनाही माहीत नव्हतं. सखारामच्या आईला ज्याने या टेस्ट बद्दल सांगितलं, त्याने असही सांगितलं की पोटात मुलगी असेल, आणि अबोर्शन केलं, की त्याचे लिंगपरिवर्तन होते. म्हणजे मुलगी असेल तर त्याचा मुलगा होतो. गावाकडील असल्याने आणि मुख्यतः शिक्षणाशी काडीचाही संबंध नसल्यानं, सखारामच्या आईला हो गोष्ट खरी वाटली होती.
शांताला अबोर्शन म्हणजे काय वैगरे काहीही माहीत नव्हतं. तिला फक्त एवढंच समजलं होत, की रिपोर्ट्स बघून आपला नवरा अस्वस्थ झालाय. आणि म्हणून ती त्याच्यासोबत डॉक्टरांना शोधत होती. आणि थोड्या वेळाने त्यांना डॉक्टर देसाई गाडीतुन उतरुन दवाखान्यात जाताना दिसले.
डॉक्टर दवाखान्यात जायची त्यांनी वाट बघितली, आणि थोड्या वेळाने ते सुद्धा दवाखान्यात गेले. दवाखान्यात बऱ्यापैकी गर्दी होती. गर्दी बघून हे डॉक्टर आपल्याला योग्य सल्ला देऊ शकतील, असा विश्वास सखारामला वाटला. शांता मात्र दवाखान्यात लावलेल्या छोट्या बाळांच्या चित्रांकडे बघून हरकून गेली होती.
दोघांचा नंबर आला, दोघे आत गेले. प्रसन्न चेहऱ्याचे डॉक्टर देसाईंनी दोघांकडे बघून स्मितहास्य केले.
" बोला, काय अडचन आहे? कोण आजारी आहे? ", त्यांनी विचारले.
" कोणीबी आजारी नाय हाय डाकदर सायेब. ही माझी बायको शांता. ही पोटूशी हाय. "
" अच्छा, म्हणजे तुम्ही रुटीन चेकअप करायला आला आहात का? "
" रुतीन चेकप? त्ये काय असतंय? ", साखरामने गोंधळून विचारलं.
" अहो, रुटीन चेकअप म्हणजे दर थोड्या दिवसांनी करतात, ती तपासणी करायला आला आहात का? ", देसाईंनी सोप्प करून विचारलं.
" नाय नाय डॉक्टर सायेब, आमी तर अबरशन का काय ते म्हणत्यात, त्ये विचाराला आलो होत. "
देसाईंनी चष्म्यातून त्यांच्या कडे दोन सेकेंद निरखून बघितलं. चेहऱ्यावरून तरी दोघांना अबोर्शन म्हणजे काय, माहीत असल्याच दिसत नव्हतं. काही क्षणांच्या शांतते नंतर देसाईंनी बोलायला सुरुवात केली.
" तुम्हाला माहीत आहे का अबोर्शन म्हणजे काय? "
" नाय डाकदर सायेब "
" तुम्हाला अबोर्शन कस करतात, ते माहीत आहे का? "
" नाय डागदर सायेब "
" तुम्ही कधी कोणाकडून अबोर्शन बद्दल ऐकल आहे का? "
" नाय डागदर सायेब "
" मग तुम्हाला अबोर्शन का करायच आहे? "
" डागदर सायेब, माह्या माय ला कुनीतरी सांगितलं व्हत, की जर पोटात पोरगी असल, आणि ये अबरशन क्येल, की त्याचा पोरगा व्हतो. " सखारामने जे त्याला माहित होतं, ते सांगून टाकलं.
त्याच बोलणं ऐकून डॉक्टरांना हसावं का रडावं तेच कळेना. जिकडे \"मुलगी वाचवा, मुलगी शिकवा\" सारख्या मोठ्या मोठ्या योजना सुरू होत्या, तिथे एका गावाकडील अशिक्षित माणसांना फक्त पैसे कमवण्यासाठी खोटी स्वप्ने दाखवून लुबाडले जात होते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा