काटेरी वाटेवरून चालताना... भाग 33

Nishala tashya awsthet bghun tine jorat kinchali phodali

काटेरी वाटेवरून चालताना भाग 33


आधीच्या भागात आपण पाहिले की,

निर्मलाने बाजूच्या घरी स्वयंपाकाचा काम घेतलं होतं. ती रोज सकाळ-संध्याकाळ तिथे स्वयंपाक करायला जायची. एक दिवस बाजूच्या बाईने आपल्या छोट्याश्या बाळाला निशाकडे आणून ठेवलं. बाळाचे पाय जोराजोरात निशाच्या पोटाला लागले आणि तिचं पोट दुखायला लागलं. निर्मलाने त्या बाईला खूप काही ऐकवलं. 


एक दिवस सकाळी सकाळी निशा तुळशीला पाणी घालत होती, तितक्यात तिथे कुसुम आली. कुसुमला बघून निशाने सांगितलं की  मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. मेघानी मला तुमच्याबद्दल सगळं सांगितलं पण कुसुम बोलली की ती तिला त्रास द्यायला आलेली नाहीये.


तिचं सगळ छान व्हावं, तिचं बाळ आनंदाने या जगात यावं. यासाठी ती प्रार्थना करायला आली आणि तिला भेटायला आलेली आहे.

आता पुढे,

निशाने तिला बसवलं आणि पाणी दिलं. 


“खरच पोरी तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. तुझ्या आयुष्यात इतकी संकट आली पण तू धीराने सगळ्या संकटांवर मात केली. मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं. इतक्या लहान वयात तुझ्यावर किती ते संकट आले पण तू खचली नाही की हरली नाही. कसं काय करतेस गं हे सगळं? इतकं बळ कुठून आणतेस?” कुसुम

“मावशी परिस्थिती सगळ्यांना सगळं काही शिकवते. मी पण परिस्थितीतूनच शिकले. परिस्थिती माणसाला मरायला शिकवते तसंच जगायलाही शिकवते. फरक एवढा आहे की कुणी मरण पत्करतो. मी त्यातलं जगणं पत्करलं.” निशा


“निशा त्यादिवशी बंगल्यावर जर मी रोहितचा फोटो बघितला नसता तर मला कळलंच नसतं की मी त्याच्यासाठी काम करते. त्याचा फोटो बघितल्याबरोबर घरी येऊन मी मेघाला फोन केला आणि तिला सगळं सांगितलं.” कुसुम

“कुसुम मावशी तुम्ही रोहितला कसं काय ओळखलं.? निशा

“मला एकदा मेघाने फोटो दाखवला होता म्हणून मी ओळखलं.” कुसुम
दोघींचं बोलणं झालं आणि कुसुमने निशाला आशीर्वाद देऊन ती तिथून निघून गेली. 

निशा कुसुमशी बोलली खरी पण ती गेल्यानंतर निशाला टेन्शन आलं होतं की कुसुम आली तर तिचा काही वाईट हेतू तर नसेल ना? ती रोहितला जाऊन काही सांगणार तर नाही ना? माझ्या दुसऱ्या बाळाबद्दल त्याला काही माहिती नाहीये त्याला कळलं तर तो काही करणार तर नाही ना? असे प्रश्न तिला भेडसवायला लागले. तिने लगेच मेघाला फोन करून सगळं सांगितलं. तिच्या मनातली भीती ही बोलून दाखवली.


“मेघा तो काही करणार नाही ना गं? मला खूप भीती वाटत आहे.” निशा

“डोन्ट वरी निशा, असं काही होणार नाहीये. आता ती कुसुम असं नाही वागणार म्हणजे मला तरी नाही वाटत असं काहीतरी करेल ती.” मेघा

“ती नाही करणार पण रोहित.. तो तर करू शकतो.” निशा

“निशा तो पण असं काही करणार नाही आणि निशा तू काळजी करू नकोस ग. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तू स्वतःला त्रास देऊ नकोस, स्ट्रेस घेऊ नकोस. आम्ही बघून घेऊ काय करायचं ते.” मेघा

मेघाशी बोलल्यानंतर निशाला रिलॅक्स वाटलं.


रात्री निशा झोपलेली असताना तिला अचानक त्रास जाणवायला लागला.


“आई माझ्या पोटात थोडं दुखतंय.” निशा
“उठ उठून बस. हे पाणी घे आधी.” निर्मलाने तिला बसवलं आणि पाणी दिलं.


“तू इथे थोड्या वेळ फिर. पाय मोकळे कर, बघू काही रिलॅक्स वाटतंय का? नाहीतर मग मी डॉक्टरांना फोन करते.” 

निशा बाहेर हवेशीर फिरायला गेली. चालता चालता ती रस्त्यावर गेली. पोटात थोडं दुखणं जाणवत होतं. मन वळावं  म्हणून तिने मोबाईल वर गाणे लावले आणि ईअरफोन अटॅच केला आणि कानात ईअरफोन टाकून गाणे ऐकू लागली.

“मन जडले असे
घडले हे कसे..
मन जडले असे
घडले हे कसे..
लागे मनाला जीवाला
ओढ हृदयाची
तुझिया विना
सूर सुना
येशील ना...
कुठला गुन्हा
घडला असा
सांगून जा...
मन जडले असे
घडले हे कसे..
लागे मनाला जीवाला
ओढ हृदयाची...
ओढ हृदयाची....”


मोबाईलवर गाणं सुरू होतं आणि निशाच्या मनाची घालमेल सुरू झाली.
डोळे पाणावले, हृदयाची स्पंदने वाढली. आपसूकच अश्रू गालावर ओघळलेे.


स्वतःच्याच धुंदीत निशा रस्त्यावर बेभान चालली होती.


रस्ता सुनसान होता फक्त मोठी वाहने काय ती जात होती.
रस्त्यावर एक माणूस त्याच्या गाडीजवळ उभा होता. त्याचं निशा कडे लक्ष गेलं, त्याला स्पष्ट चेहरा दिसला नाही कुणीतरी बाई आहे एवढं लक्षात आलं होतं. निशा स्वतःच्याच विचारात चालली होती. त्याला दूरवरून एक ट्रक येताना दिसला. त्या व्यक्तीने जोरजोराने निशाला आवाज दिला.


“ओ बाई ट्रक येत आहे, बाजूला व्हा. ओ बाई बाजूला व्हा.”
त्याने बरेचदा आवाज दिला, हातवारे केले. पण निशाच लक्षच गेलं नाही.
ट्रक जवळ यायला लागला, ड्रायव्हरचं लक्ष गेलं, ट्रक ड्रायव्हरने हॉर्न वाजवला.  तो बाजूने गेलाही असता पण निशा एकदम रस्त्याच्या मधोमध चालली होती. निशा फक्त तिच्याच विचारात गुंतलेली होती. तो व्यक्ती प्रयत्न करून थकला आणि शेवटी हातातून वेळ निसटून जाईल या विचार मनात येताच तो व्यक्ती धावला. ट्रक, तो व्यक्ती आणि निशा.. धडधड वाढली.


ट्रक जवळून गेला आणि काळजाचा ठोका चुकला. त्या व्यक्तीने धावून निशाला बाजूला ढकललं.


ट्रक न थांबता निघून गेला. निशा एका बाजूला जाऊन पडली, तो व्यक्ती पण थोडा दूर जाऊन पडला. बराच वेळ शांतता पसरली होती. अर्धा एक तास तिथे कुणीही पोहोचलं नाही. काही वेळाने तिथून एक माणूस जात होता त्याच लक्ष निशाकडे गेलं, तो माणूस लगेच धावला. त्याने निशाच्या नाकाजवळ हात नेऊन चेक केलं. श्वास सुरू आहे लक्षात येताच बॅग मधून पाण्याची बॉटल काढून निशाच्या चेहऱ्यावर थोडं पाणी टाकलं. तरीही निशा शुद्धीवर आली नव्हती. त्याने इकडे तिकडे बघितलं कुणाला तरी मदतीसाठी आवाज देता येईल. बाजूला मोबाईल पडला दिसला. त्याने पटकन उठून मोबाईल उचलला. बघितलं तर मोबाईल सुरू होता.

काहीतरी मदत होईल म्हणून त्याने फोन लावण्याचा विचार केला.
‘इथे पहिला नंबर जो डायल केला असेल तोच नंबर डायल करतो’ मनातल्या मनात विचार करून मोबाईल ओपन केला, पण तो लॉक होता.


त्याने खूप प्रयत्न केला आणि शेवटी लॉक उघडला. डायल नंबर मध्ये पहिले जे नाव होतं त्यावर कॉल केला.


“हॅलो, मेघा बोलताय का?”
“हॅलो.. कोण बोलतंय.” मेघा


“अहो इथे एक अक्सिडेंट झालाय, एक प्रेग्नेंट बाई आहे, हा त्यांच्याच मोबाईल आहे, तुमचा नंबर दिसला म्हणून तुम्हाला फोन केला. मी तुम्हाला लोकेशन पाठवतो प्लिज तुम्ही लवकर या.” इतकं बोलून त्याने फोन ठेवला.


मेघा ऐकताच सुन्न झाली, तिच्या हातातून मोबाईल खाली पडला. आवाजाने सुशीला बाहेर आली.


“काय ग, काय झालं?” सुशीलाने विचारलं.
“आई निशा..निशा..” मेघा रडायला लागली.


“अग समोर बोल की.” सुशीला
“आई मेघाचा अक्सिडेंट झाला. मला जावं लागेल.” तिने मोबाईल उचलला आणि धावत निघाली.


सुनसान रस्त्यावरून रपरप रस्ता कापत मेघा धावत सुटली होती. अनवाणी धावत असल्याने खडे गोटे पायाला टोचत होते. एकदा  धावता धावता  ढेच लागून पडली देखील. तिला कसही करून निशा जवळ पोहोचायचं होतं.


त्या माणसाने पुन्हा दूरवर नजर टाकली तर त्याला निशाला वाचवणारा माणूस पडलेला दिसला. तो तिथे धावत गेला. तो माणूस शुद्धीत नव्हता. त्याला प्रचंड मार लागलेला होता. रक्तस्त्राव खूप झालेला होता.


त्याने त्याला हलवून बघितलं पण काहीच उपयोग झाला नाही.
त्या व्यक्तीने लगेच अँबुलन्सचा नंबर डायल केला.
काही वेळात मेघा तिथे पोहोचली. आणि निशाला तश्या अवस्थेत बघून तिने जोरात किंचाळी फोडली.


क्रमशः

🎭 Series Post

View all