काटेरी वाटेवरून चालताना... भाग 29

Nishachya dohal jewnacha karykram karnyach tharal

काटेरी वाटेवरून चालताना भाग 29


आधीच्या भागात आपण पाहिले की,


मेघा इंटरव्यूला गेली पण तिला खूप वाईट अनुभव आला. त्यातून ती कशीबशी सावरली. निशा आणि निर्मला बाहेर गेलेल्या असताना त्या दोघींसोबत एक वाईट प्रसंग घडला.
निशा चेकअपसाठी डॉक्टरकडे गेली, डॉक्टरांनी तिला सोनोग्राफी करायला सांगितली. डॉक्टरांनी सांगितले की निशाला ट्विन्स आहेत.

निशाला हे ऐकून खूप आनंद झाला.
निर्मलाने आर्थिक अडचण बघता एका घरी काम करायला जायला लागली आणि निशा ही तिला न सांगता कामावर जायला लागली.


एक दिवस निशा कामावर गेली असताना तिला फोन आला.

आता पुढे,


निशाने फोन उचलला आणि लगेच फोन तिच्या हातातून खाली पडला. बाजूला बसलेल्या मॅडमने तिला विचारलं,
“निशा काय झालं गं?”


“मॅडम मला घरी जावं लागेल, आई चक्कर येऊन बेशुद्ध झाली आहे. मला जावं लागेल.” निशा घाबरत बोलली.

“ठीक आहे तू निघ.”


निशा घरी गेली तर निर्मला बेशुद्धावस्थेत होती. बाजूला शेजारच्या काकू बसलेल्या होत्या आणि डॉक्टर नुकतेच तपासून गेले होते.


“काय झालं काकू आईला? काय झालं हिला? अशी चक्कर येऊन का पडली? आणि डॉक्टर काय म्हणाले?” 


“निशा तुला तर माहित आहे की तुझ्या आईची तब्येत बिघडली होती तेव्हापासून तिचं शरीर थकलयं. शरीर साथ देत नाही, तिच्याने जास्त काम होत नाही तरी पण बघ ना आता ती कामावर जायला लागली. उन्हातून जाणं-येणं करते, त्यामुळे तिला ऊन लागली असावी आणि ती चक्कर येऊन पडली असावी. डॉक्टरांनी औषधे दिली आहेत पण तिची काळजी घे, वेळेवर औषध दे, मी जाते.” असं म्हणून शेजारच्या काकू निघून गेल्या.


निशाला या सगळ्या गोष्टींचं आश्चर्य वाटलं. 


‘आई कामावर जाते आणि मला माहितही नाही. जशी मी तिला न सांगता जाते ना, तशी ती मला न सांगता जाते. आता मला काहीतरी विचार करावाच लागेल.’ ती मनातल्या मनात बोलली.
थोड्यावेळाने आई शुद्धीवर आली.


“आई हे सगळं काय आहे? का स्वतःला त्रास करुन घेतेस? असं करत जाऊ नकोस ग. तुला काही झालं तर मी कुणाकडे बघायचं. तू कामावर जात होतीस ते ही मला न सांगता.”
“मी बरी आहे, तू उगाच चिडचिड करू नकोस आणि मला न सांगता तू कामावर जातेस ते चालतं तुला.”

“आई.. तुझं वय झालं. तु घरी राहून घर सांभाळतेस हेच खूप आहे माझ्यासाठी आणि यानंतर तू कुणाच्या इथे कामावर जायचं नाही मी आधीच सांगून ठेवते.”


निर्मलाने आराम केला. दोघीही आठ दिवस कामावर गेल्या नाही, त्यामुळे त्यांचं काम सुटलं.


“आई आज मी बाहेर जाणार आहे. बघते कुठे काय काम मिळते का? तू घरी आराम करायचा, तू कुठेही जायचं नाही. मी काही ठिकाणी व्याकन्सी बघितलेली आहे, बघते तिथे काही काम होईल तर. तू काळजी घे मी येते.” असं म्हणून निशा बाहेर गेली.


निशाने दोन-तीन ठिकाणी प्रयत्न केला पण कुठल्याही गोष्टीचा अनुभव नसल्यामुळे तिला नोकरी मिळाली नाही. चार-पाच दिवसांनी तिला एक घरगुती काम मिळालं.


एक कुटुंब होतं जिथे नवरा-बायको कामाला जात असत आणि घरी एक वृद्ध आई आणि एक छोटेसं बाळ राहायचे. त्या दोघांना सांभाळायचं काम निशाला मिळालं.


निशा सकाळी सगळे काम करून, जेवण करून तिथे जायची. पहिला दिवस छान गेला पण दुसऱ्या दिवसापासून तिथल्या वृद्ध बाईने निशाला त्रास द्यायला सुरुवात केली. निशाने चहा बनवून दिला तर हा असा चहा बनवतात का? तुझ्या आईने असा चहा शिकवला का? असं म्हणून त्या बाईने गरम गरम चहा निशाच्या तोंडावर फेकला.


निशाचा चेहरा थोडा भाजला, तिने लगेच नळाखाली चेहरा धुतला.  पण चेहऱ्याची आग काही थांबतं नव्हती. ती दवाखान्यात गेली तर डॉक्टरांनी तिला क्रीम आणि गोळ्या लिहून दिल्या. तिने त्या घेतल्या आणि ती पुन्हा त्यांच्या घरी गेली.


तिथे तिने तिथल्या कपलला घडलेली सगळी घटना सांगितली. त्या बाईने तिच्या सासूला खूप रागावलं आणि निशाला यानंतर कामावर येऊ नकोस असं सांगितल.

हळूहळू दिवस सरकायला लागले.
बघता बघता निशाला पाच महिने पूर्ण झाले आणि सहावा महिना सुरू झाला. आता निशाला बसायला, उठायला थोडा त्रास जाणवायचा. त्यामुळे ती आईला कामात जास्त मदत करू शकत नव्हती. आर्थिक चणचण बघता कामवाली पण ठेवू शकत नव्हती, घरी सगळे काम दोघीच करायच्या.

निशाला बाळाची हालचाल जाणवायची, ती तासनतास गप्पा मारत बसायची. तिला बाळा सोबत गप्पा मारायला खुप आवडायच्या. मुलगा-मुलगी होतील तर काय नाव ठेवायचे? मुले होतील तर काय नाव ठेवायचे? आणि दोन्ही मुली होतील तर काय नाव ठेवायचे? इथपर्यंत सगळ्यांचा निशाने विचार करून ठेवलेला होता.

ती रोज रात्री बाळांना गोष्टी सांगायची. त्यांच्याशी गप्पा मारायची. निशा सकाळी उठून देवपूजा करायची, गायत्री मंत्र म्हणायची. गायत्री मंत्र म्हटल्यामुळे तिला दिवसभर खूप शांत शांत वाटायचं.


बाळासाठी हे करायचे आहे, बाळासाठी ते करायचे आहे, सगळ्या सगळ्या गोष्टींचा विचार तिच्या मनात सुरु राहायचा. बाळाची खोली कशी सजवायची?  त्यांना कुठे ठेवायचं? खेळणे कोणते आणायचे?  दिवस-रात्र हेच विचार तिच्या डोक्यात सुरू असायचे.


एका रात्री तिला स्वप्न पडलं तिच्या दोन्ही  बाळांना कुणीतरी तिच्यापासून दूर नेलं. निशा पासून लांब नेलं आणि खूप खूप खूप दूर गेले आणि निशा त्यांच्या मागे मागे धावत धावत गेली. निशा दचकून उठली आणि तिच्या लक्षात आलं की हे एक स्वप्न होतं. 


निशाला चटर-पटर खायची खूप इच्छा व्हायची, एकदा निशा आईला न सांगता बाहेर पाणीपुरी खायला गेली. तिला खूप मस्त वाटलं, दोन ते तीन दिवस ती कंटिन्यू पाणीपुरी खायला गेली. पण चौथ्या दिवशी तिला खूप त्रास झाला. छाती जळजळ करायला लागली, पोटात दुखायला लागलं.

डॉक्टरांकडे गेली आणि त्यांना सांगितलं तर डॉक्टर खूप रागावले बाहेरचं काही खायचं नाही आधीच इतकी नाजूक आहेस आणि त्यात भर म्हणजे जुळे बाळ आहेत, त्यामुळे तुला जास्त काळजी घ्यावी लागेल. उगाच बाहेरचं खायचं नाही, यातलं काही खावसं वाटलं तर घरी बनवायचं. डॉक्टरांनी निशाला ताकीद देऊन ठेवली.


त्या दिवसापासून निर्मला तिला काही ना काही करून द्यायची. निशाला आंबट चिंबट खाण्याचे डोहाळे लागले होते.
“निशा आता आपल्याला तुझं डोहाळे जेवण करावं लागेल.” निर्मला

“डोहाळजेवण? पण  अशा परिस्थितीत?” निशा
“तर काय झालं? डोहाळे जेवण पहिल्या प्रेग्नेंसीच्या वेळेसच करतात. नंतरच्या प्रेग्नेंसी मध्ये नाही करत. त्यामुळे हे आपण करायचं. तुझी पहिली डिलिव्हरी आहे तर आपण तुझे डोहाळे जेवण करूया. तुझा सातव्या महिन्याचा कार्यक्रम छान करूया.” निर्मला


“कोणी काही बोललं तर?” निशा
“आपण आपल्या आनंदाचा विचार करायचा. मला तुझं सगळं सगळं करू देत. पहिल्या पोरीचं करण्याचं भाग्य लाभलं नाही. आता हे तरी करू देत.” निर्मला

निशाने छान हिरवाकंच रंगाची काठापदराची साडी घेतली. त्यावर हिरवा चुडा.  निशा खूप आनंदात होती डोहाळे जेवणाचे स्वप्न रंगवू लागली होती. निर्मला पण कार्यक्रमाची तयारी करायला लागली. कोणा कोणाला बोलवायचं? काय बनवायचं? कशी तयारी करायची? याचं सगळं प्लॅनिंग सुरू झालं. 

बघता बघता सहा महिने पूर्ण झाले. सातवा महिना लागला आणि सातव्या महिन्याचा कार्यक्रम करण्याचं ठरलं.


निशाने पूर्ण हॉल फुलांनी सजवलेला होता.  एक पाळणा तयार करून तो पाळणा पण फुलांनी सजवलेला होता. त्यावर वेगळ्या पानांची वेल लावलेली होती. पाळण्यावर मऊ कापडाचा गालिचा टाकलेला होता. पूर्ण भिंती फुलांनी सजवलेल्या होत्या.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी निर्मलाने सगळ्यांना आमंत्रण दिलेलं होतं.


कार्यक्रमाचा दिवस आला, शेजारच्या काकू वगैरे मदतीसाठी आल्या होत्या.


निशा सकाळी उठली, आज तिला खूप भारी वाटत होतं मनोमन ती खूप खुश होती. आज पाळण्याचा कार्यक्रम होणार याच विचाराने खूप आनंदीत होती. चेहऱ्यावर गोड स्माईल होती, आरशात स्वतःला न्याहाळत असताना फोन वाजला. नाव बघून निशाच्या चेहर्‍यावरचे हावभाव बदलले.


क्रमशः

🎭 Series Post

View all