काटेरी वाटेवरून चालताना... भाग 72

Anandi matra jau ki nako ya vicharat hoti

काटेरी वाटेवरून चालताना भाग 72


आधीच्या भागात आपण पाहिले की,

आनंदीला लग्नाला स्थळ यायची पण निशाच्या भूतकाळामुळे सगळे आनंदीला नकार द्यायचे. याचं टेन्शनमुळे निशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

विक्रमने तिला हॉस्पिटलला नेलं. ट्रीटमेंट सुरू झाली. आता निशा आऊट ऑफ डेंजर होती. पण या घटनेमुळे विक्रम आणि आनंदीला खूप त्रास झाला. दोघेही एकमेकांजवळ रडायला लागले.

आता पुढे,

काही तासानंतर निशाला शुद्ध आली, तिने आजूबाजूला बघितलं तर तिला कुणीही दिसलं नाही. तिने स्व:ताच्या नाकावरचा मास्क काढला आणि पुन्हा स्वतःला संपविण्याचा विचार करू लागली. तितक्यात नर्स आली, तिने बघितलं आणि तिने लगेच मास्क वरती केला.

“अहो काय करताय तुम्ही? तुम्हाला कळतय का? आता तुमचा श्वास बंद झाला असता, काय करताय तुम्ही?” नर्स तिच्यावर ओरडत होती. तितक्यात विक्रम तिथे पोहोचला. नर्सने विक्रमला सगळं सांगितलं. निशा आता फक्त गप्प डोळे मिटून होती. विक्रमला निशाचा खूप राग आलेला होता पण त्याला तिच्यावर चिडायचं नव्हतं. तो शांतपणे तिच्या बाजूला जाऊन बसला.


“का असं करतेस निशा? असं काय झालं? की तू इतकं मोठं पाऊल उचललं. हे सगळं करण्याआधी आमचा विचार तरी तुझ्या मनात आला का? आम्हाला एकदा तर सांग  काय चाललंय तुझ्या मनात? सांग ना मला सांग, आनंदीला सांग. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. का असं स्वतःला एकटी समजतेस?” विक्रम बोलत राहिला आणि निशा शांतपणे त्याचं सगळ ऐकत होती.

तिचे डोळे पाणावलेले होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. असं वाटत होतं ती गप्प असूनही खूप काही बोलत आहे. तिच्या मौनामध्ये दुःख लपलेलं आहे असं जाणवत होतं.


“काय झालं निशा बोलशील का? का एवढा त्रास करुन घेतेस स्व:ताला?” विक्रम समोर काही बोलणार तो निशा बोलायला लागली.

अगदी हळू आवाजात तिने बोलणं सुरु केलं.

“विक्रम मला आनंदीसाठी खूप वाईट वाटतंय. माझ्या मुलीचं आयुष्य विखरायला नको रे. इतके वर्ष तिला खूप जपलं, तिचा सांभाळ केला, सगळ एकटीने सहन केलं पण आज मी तिच्यासाठी घातक ठरलेले आहे. माझ्यामुळे तिचं लग्न जमत नाहीय. माझ्यामुळे तिला त्रास होतोय आणि हे मला बघवतं नाहीये. मला त्याचा खूप त्रास होत आहे.” निशा

“म्हणून तू हे पाऊल उचललं?” विक्रम 

निशाने होकारार्थी मान हलवली.
“वेडाबाई अश्या वागल्याने तिचा त्रास कमी होणार आहे का? तुझ्या अशा वागण्याने तिला खूप जास्त त्रास झाला आहे. यानंतर असं वागायचं नाही आणि तुझ्यामुळे काहीही घडत नाहीये. ज्याच्या नशिबात जे असतं तेच घडतं. तिची रेशीमगाठ वरती बांधलेली असेल, तिच्या नशिबाचे असेल तर तो नक्की मिळेल. स्वतःला त्रास करून घेतल्याने काहीही फरक पडणार नाहीये.” असं म्हणून विक्रमने तिला समजावले.


आनंदी रात्रभर निशाजवळ बसून होती. दुसर्‍या दिवशी ती ऑफिसला गेली, खरंतर तिला अभिजीतला सांगायचं होतं किती आठ दिवस येणार नाही. ती फोनवर सांगू शकली असती पण अभिजीतला ते आवडत नाही म्हणून ती स्वतः ऑफिसला गेली.

अभिजीतच्या केबिनमध्ये गेली,

“मे आय कम इन सर.”

“येस.”
आनंदी आत गेली.
“सर मला काही दिवसाच्या सुट्ट्या हव्या होत्या.”

“का? पुन्हा तुम्हाला लग्नाला जायचंय मैत्रिणीच्या.”

“नाही सर आईला  हॉस्पिटलाईज केलंय. डॉक्टर म्हणाले अजून आठ दिवस तरी ठेवावे लागेल आणि तिच्या देखरेखीसाठी कोणीच नाही म्हणून मला सगळं बघावं लागेल म्हणून सर मला सुट्टी हवी होती.”

आनंदी हे सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू आले. तसा अभिजीत त्याच्या जागेवरून उठला. आनंदी जवळ  गेला, तिच्या समोर रुमाल ठेवला.

“मिस आनंदी प्लिज तुम्ही रडू नका, सगळं नीट होईल. तुमच्या आई लवकर बरे होतील तुम्ही निश्चिंतपणे जा. इथली काही काळजी करू नका, आपलं काम होईल. तुम्हाला जेवढे दिवसाच्या सुट्या हव्या तेवढ्या घ्या.”

“थँक यु सर, थँक यु सो मच.” आनंदी तिथून निघाली.

आनंदी आणि विक्रम निशा जवळचचं बसून होते, तिने अजून काही करायला नको म्हणून तिला स्वतःच्या नजरेआड होऊ देत नव्हते.
आठ दिवस गेले, आठ दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. सगळे घरी आले आनंदीने निशाचा औक्षण करून तिला घरात घेतलं.
पुढचे काही महिने कुणीच काही बोललं नाही, कुणीच लग्नाचाही विषय काढलेला नाही. आनंदी ऑफिसला जायला लागली. हळूहळू अभिजीत आणि आनंदी मधला संवाद वाढत गेला. दोघेही मीटिंग दरम्यान एकमेकांशी भेटू लागले तासनतास त्यांच्या मिटिंग व्हायच्या त्यानंतर सोबतच डिनर व्हायचं. दोघेही एकमेकांना गोष्टी शेअर करू लागले. एकमेकांविषयी माहिती सांगू लागले. अशातच अभिजीतला आनंदीविषयी सगळी माहिती मिळाली. निशाच्या लाईफ मध्ये काय झालं हे त्याला कळलं आणि त्याने आनंदीला शब्द दिला की यानंतर तुझ्या लाईफमध्ये असं काही होणार नाही. सगळं व्यवस्थित होईल.


दिवसामागून दिवस जात गेले आणि एक दिवस अभिजीतने त्याच्या चुलत भावासाठी (निनाद) आनंदीचं स्थळ सुचवलं. अभिजीतचा चुलतभाऊ चांगल्या हुद्यावर होता. त्याला अभिजीतने सगळ्या गोष्टीची कल्पना दिलेली होती. दोघे एकमेकांना साजेसे दिसणार होते. म्हणून अभिजीतने हे पाऊल उचललं.

अभिजीतने पुढाकार घेतला आणि कांदे-पोहयाचा कार्यक्रम झाला  सविस्तर सगळा कार्यक्रम पार पडला. 

त्यानंतर दोन दिवसांनी मुलाकडून होकार आला. होकार आल्याचा सगळ्यात जास्त आनंद निशाला झाला होता. आता आनंदीच्या जीवनात सगळ छान होणार या विचाराने तिला खूप बरं वाटलं.
निशा आणि विक्रम मुलाच्या घरी गेले, मुलाचं घर बघून आले. त्यांची फॅमिली कशी आहे? किती लोक आहेत? सगळं बघून आले आणि दोन दिवसानंतर एंगेजमेंटची तारीख ठरवली.

निनाद आणि आनंदी एंगेजमेंटच्या शॉपिंगसाठी सोबतच गेले. दोघांनी शॉपिंग केलं आणि दोन दिवसानंतर घरच्या मुख्य लोकांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला. 

आता निनाद आणि आनंदी वरचेवर भेटायला लागले. सगळं खूप छान छान व्हायला लागलं. हळूहळू लग्नाची तयारी सुरू व्हायला लागली. निशाने सगळ्यांना फोन करून आनंदाची बातमी सांगितली. आनंदीने पण तिच्या मैत्रिणींना कॉल करून सांगितलं. सगळं खूप छान चाललं होतं. लग्नाची तारीख महिन्याभरात काढली. कारण निनाद एक महिन्यानंतर फॉरेनला जाणार होता. त्याआधी त्यांना लग्न पार पाडायचं होतं. 


निशाने सायली अभिषेक आणि मेघाला फोन करून सांगितलं. त्यांनाही लग्नाच्या आठ दिवस आधी यायला सांगितलेलं होतं.

लग्नाची धूम तयारी सुरू झाली. आनंदीच्या पसंतीने लग्नाचे कपडे खरेदी केले. हळूहळू लग्नाचा दिवस जवळ आला. लग्नाच्या चार दिवस अगोदर सायली अभिषेक आणि त्यांची मुलगी, मेघा आणि तिच्या दोन मुली असे सगळेजण निशाकडे आले.

ते आल्या आल्या सगळ्यांच्या गप्पा रंगल्या, त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. रात्री जेवण करून मेघा सायली आणि निशा तिघ्याही टेरेसवर जाऊन बसल्या.

तिघ्याही आपापल्या आयुष्याबद्दल एकमेकींशी शेअर करू लागल्या. सायलीचं समाजकार्य खूप छान पद्धतीने चाललेलं होतं, अभिषेक तिला तिच्या कार्यात मदत करायचा. त्यांची मुलगी पण आता मोठी झालेली होती. मेघाच्या दोन दत्तक घेतलेला मुली त्या उच्च पदावर नोकरीला होत्या. मेघाच्या मुली पण लग्न न करता एकट्या राहून तिच्या पावलावर पाऊल टाकणार होत्या. त्यांनी पण लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला होता. तिघांच्याही रात्रभर गप्पा रंगल्या.

निनादने आनंदीला कॉल केला, तो तिच्या घरासमोर येऊन उभा होता.
“हॅलो आनंदी, जरा खाली ये ना, मला तुला भेटायचंय आहे.” निनाद

“आत्ता नको, खूप रात्र झाली आहे. बाबा रागवतील.” आनंदी


“असं काय करतेस? आता आपलं लग्न जमलं ना, मग ये ना खाली.” निनाद तिला रिक्वेस्ट करू लागला.
आनंदी मात्र जाऊ की नको या विचारात होती.

क्रमश:

🎭 Series Post

View all