काटेरी वाटेवरून चालताना... भाग 66

Mazi aai maza abhiman aahe

काटेरी वाटेवरून चालताना भाग 66


आधीच्या भागात आपण पाहिले की,


निशाने आनंदीला हॉस्टेलवर  राहण्यासाठी परमिशन दिली, दोघेही तिला होस्टेलला सोडून आले. निशाला एकट एकट वाटायला लागलं. आनंदीचं कॉलेज सुरू झालं.

सगळं छान व्यवस्थित चाललेलं होतं. एक दिवस तिच्या क्लासच्या एका मुलाने राजीवने तिला प्रपोज केल आणि लग्नाची मागणी घातली. आनंदीने त्याला थोडा वेळ मागितला आणि विक्रमला सगळं सांगितलं. निशाला हे कळले आणि तिला खूप वाईट वाटलं कारण आनंदी तिच्याशी काही शेअर करत नव्हती. 

आता पुढे,

दोन दिवस निशा विक्रमशी बोललीच नाही. विक्रम विचार करत असे की ही माझ्याशी बोलत का नाहीये. तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा पण ही मान फिरवून बाजूला सरकायची किंवा त्याच्याशी बोलायचीच नाही. दोन दिवस असचं चालत राहिलं. विक्रमने निर्मलाला पण विचारलं तिलाही काही माहिती नव्हतं.
शेवटी निशा चिडली,

“तुला माहितीये का तू खूप दुष्ट आहेस. तू मला माझ्या मुलीपासून दूर केलंस. आनंदी तुझ्याशी बोलते पण माझ्याशी काहीच शेअर करत नाहीत. ती मला कुठल्याच गोष्टी सांगत नाही. का? सांग ना?. तू माझ्या मुलीला माझ्यापासून दूर  केलंस. तू दुष्ट आहेस विक्रम, दुष्ट आहेस.” निशा रागाच्या भरात खूप काही बोलून गेली.

“निशा अग शांत हो, असं काहीही नाही आहे. आनंदी तुझी मुलगी आहे फक्त तुझीच आहे. तिला तुझ्यापासून कुणीही लांब नेऊ शकत नाही. तिला माझ्याशी कम्फर्ट वाटत असेल म्हणून ती माझ्याशी शेअर करते.” 
विक्रमचं बोलणं पूर्ण होऊ न देता निशा पटकन बोलली.


“का मी कन्फर्म नाहीये? इतक्या वर्षापासून मी तिच्या सोबत राहते. लहानपणापासून ती माझ्याशी सगळ शेअर करते आणि आता इतक्यात तू आलेला आता ती तुला सांगायला लागली आहे, मला सांगत नाही. एखादा मोठा डिसिजन जरी घ्यायचा असेल तरी त्यात मला सांगणार नाही, तुला आधी सांगेल.”


“निशा तू चुकते आहेस, इतके वर्ष तू तिच्याजवळ तिची आई आणी तिचे बाबा दोन्ही बनून तिच्या आयुष्यात आनंद दिला आहेस पण तुला एक सांगू का आता ती मला बाबा म्हणायला लागली आहे, ती माझ्यात तिच्या बाबा शोधते. इतक्या वर्षात तिला जे बाबासोबत शेअर करता आलं नाही ना, तिला इतक्या वर्षात त्याला काही सांगता आलं नाही ना म्हणून कदाचित. तिच्या ज्या काही भावना, अपेक्षा आहेत त्या तिला आत्ता पूर्ण कराव्या वाटत असतील म्हणून पण तू या सगळ्याचा उलट अर्थ काढत आहेस. मी तुझ्या आनंदीला तुझ्यापासून कधीही दूर नेणार नाहीये आणि तुझं जो काही डिसिजन असेल त्यात मी अडथळा आणणार नाही आहे.” असं म्हणून विक्रम ऑफिसला गेला.


त्यानंतर विक्रम दोन दिवस निशा सोबत बोललाच नाही. निशाला तिची चूक उमगली आणि तिने त्याला सॉरी म्हटलं.
दोघांचं भांडण लवकर मिटलं. खरंतर विक्रम खूप चांगला होता, समजूतदार होता.

सुट्ट्यांमध्ये आनंदी घरी आली तेव्हा तिने राजीवबद्दल निशाला, विक्रमला आणि निर्मलाला सविस्तर माहिती दिली. तिने राजीवचा फोटोही दाखवला आणि त्याच्याबद्दल माहिती दिली.

घरच्यांना राजीव चांगला मुलगा वाटला, त्यांनी आनंदीला सांगितलं आम्हाला काही हरकत नाही, आपण त्यांच्याशी बोलूया बघूया. त्यांचा काय विचार आहे हे जाणून घेऊया.


निशा कॉलेजला गेल्यानंतर तिने राजीवला सगळं सांगितलं. राजीवने त्याच्या घरी सांगितलं आणि त्यानंतर बघण्याचा कार्यक्रम ठरला.
पहिल्याचं बघण्यात राजीवच्या घरच्यांनी आनंदीला पसंत केलं. सगळे छान झालं. 


दोघेही कॉलेजला जायला लागले, त्यानंतर राजीवच्या आई बाबांना निशा बद्दल, तिच्या पूर्वायुष्याबद्दल जे काही माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी आक्षेप ठेवला आणि आनंदी आणि राजीवचं लग्न मोडलं.


राजीवच्या घरच्यांनी कळवलं नाही, हे सगळं राजीव आनंदीला बोलला. आनंदीने घरी सांगितलं. त्यांनी लग्न मोडण्याचं कारण देखील सांगितलं नाही शेवटी विक्रमने त्यांना फोन केला.
“नमस्कार कुलकर्णी साहेब मी आनंदीचा बाबा बोलतोय विक्रम.”

“विक्रम साहेब.. बोला, कसा काय फोन केला?”

“तुम्ही लग्नाला नापसंती दिलीत, आम्हाला काही कारण कळू शकेल का? म्हणजे आधी तुम्ही लग्नाला होकार दिला आणि आता नकार देत आहेत म्हणून विचारलं.”

“हो कारण आम्हाला आधी तुमच्या बद्दल काहीच माहीत नव्हतं,पण आता सगळं कळलंय. अशा घरातली मुलगी आम्हाला सून म्हणून नको.”


“एक्सक्युज मी, अशा घरातली म्हणजे?” विक्रमचा आवाज वाढला.

“खरं तर तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही आहे कारण तुम्ही आनंदीचे बाबा नाहीच आहात हो ना? आम्हाला आनंदीच्या फॅमिली बद्दल सगळं कळलय आणि सिंगल मदरच्या मुलीला आम्हाला सून बनवून घ्यायची नाहीये.” आता राजीवच्या बाबांचा पण आवाज वाढला.


“तुम्ही काय बोलताय कुलकर्णी साजेब तुम्हाला तरी कळतय का? तुम्ही कोणत्या विश्वात जगत आहात? आनंदी हा प्रेझेंट आहे आणि निशाच्या आयुष्यात जे काही घडून गेलंय तो तिचा भूतकाळ आहे. तुम्ही कोणते तर्क वितर्क जोडत आहात.” विक्रम

“ते जे काय असेल पण आम्हाला हे नातं नकोय, जी बाई दोन नवरे करू शकते, तिची मुलगी पण काहीही करू शकते. अशा बाईच्या घरी आम्हाला संबंध जोडायचे नाही आहेत.”

“तोंड सांभाळून बोला कुलकर्णी साहेब, निशाच्या आयुष्यात काय घडलं याची तुम्हाला साधी पुसटशी कल्पना देखील आहे का? कुणाच्या जखमांवर मलम लावता येत असेल ना तर त्या कुरेदू नये. त्यांच्या आयुष्यात काय घडलं काय नाही तुम्हाला काय माहित आहे. वरवरच्या दोन गोष्टी ऐकल्या म्हणून त्यावरून तुम्ही त्यांच्यावर आरोप लावू शकत नाही आणि तो अधिकारी तुम्हाला नाहीच. हे नातं तुमच्याकडून नाही तर हे नातं मीच  तोडतोय. तुमच्यासारख्या विचार करणाऱ्या लोकांच्या घरी मला माझी मुलगी द्यायची नाहीये.” असं म्हणून विक्रमने फोन ठेवला.

मागे निशा उभी होती, तिने सगळं ऐकलं. ती काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिली आणि नंतर त्याच्या मिठीतच गेली. तिला विक्रमचा अभिमान वाटत होता, तो तिच्या बाजूने बोलला. विक्रम भक्कमपणे तिच्या पाठीशी उभा आहे आणि समोरही राहील हा विश्वास तिला त्याच्या आणखी जवळ घेऊन आला.

विक्रमने हे सगळं आनंदीला सांगितलं, हे ऐकू तिलाही थोडं विचित्र वाटलं.


आईच्या आयुष्यात जे काही घडलं ते तिने स्वतः जवळून बघितलं होत, त्याची सगळी कल्पना तिला होती. त्यामुळे तिला तिची आई चुकीची आहे असे जर कोणी म्हटले तर तिला आवडणार नव्हतं.

दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमध्ये गेली, राजीवशी बोलली. तिच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना त्याला सांगितल्या. तिच्या आई बद्दल सांगितलं, त्यानंतर त्याच्या बाबांनी फोन करून जे जे काही बोलले ते सगळं सांगितलं आणि आनंदी राजीवला बोलली.

“राजीव मला अश्या घरात लग्न करायचं नाही आहे, ज्या घरातील लोकांची मानसिकता विकृत असेल तिथे मला यायचंच नाही आहे. माझी आई माझा अभिमान आहे. तिच्यासाठी मी काहीही करू शकते. मला लग्न मोडते आहे अशा घरात मला जायचं नाहीये. तू सांग तुझ्या बाबांना तुमच्याकडून नाही तर हे लग्न माझ्याकडून मोडलंय. मी तुला नकार देते तू खूप चांगला आहेस राजीव पण तुझ्या घरच्यांची मानसिकता चांगली नाहीये आणि अशा घरात मला सून बनून यायचं नाही आहे. सो सांग तुझ्या बाबाला की आनंदीने नकार दिलाय.


हे सगळे ऐकून राजीवला खूप वाईट वाटलं कारण राजीव खरंच तिच्या प्रेमात पडला होता. त्याला ती खूप आवडायची. त्याने त्याच्या घरी त्याच्या आई-बाबांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ते ऐकले नाही. राजीवने हट्ट केला होता लग्न करीन तर फक्त आनंदीशी नाही तर कुणाशीच नाही. पण त्याच्या आईवडिलांनी हे ठरवलं होतं की दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करून देईल पण आनंदीशी नाही.
बरेच महिने उलटले.


दोघांचही कॉलेज संपलं आणि दोघेही एकमेकांच्या नजरेआड झाले.


क्रमशः

🎭 Series Post

View all