काटेरी वाटेवरून चालताना...भाग 59

Tuzya aaichya jivnat pan kumachi tri sath asayala havi

काटेरी वाटेवरून चालताना भाग 59


आधीच्या भागात आपण पाहिले की,


विक्रम निशाच्या घरी गेला, त्याने निशाला काहीही कळवलेले नव्हते. त्याने विचार केला की आपण काकूशी बोलावं. तो गेला, निर्मला किचनमध्ये चहा आणायला गेली आणि ते घेऊन येत असताना ती खाली कोसळली. त्याचा सगळा दोष निशाने विक्रमवर लावला पण विक्रमने सांगितले की मी असं काहीही केलेलं नाही, मी काहीही बोललेलो नाही. विक्रम निर्मलाला हॉस्पिटलला घेऊन गेला.


निर्मलाला मायनर अटॅक आलेला होता, पण आता ती आऊट ऑफ डेंजर होती. विक्रम रात्री जेवणाचं पार्सल घेऊन आला, तिघेही जेवले त्यानंतर विक्रम तिथून निघून गेला.

आता पुढे,

निशा रात्रभर निर्मलाजवळ बसून होती, आनंदी पण बाजूला चेअरवर बसून झोपली होती. निशाला खूप काळजी वाटत होती पण तिला राहवून राहवून विक्रमचे विचार येत होते.
‘विक्रमने आपल्याला अडचणीच्या वेळेस किती मदत केली तरी मी त्याच्याशी तुसडेपणाने वागले. मला असं वागायला नको होतं. फोन करू का त्याला. नाही नाही फोन केला तर तो काहीतरी वेगळाच अर्थ काढेल.’


निशाने पर्स मधून मोबाईल काढला, त्याचा नंबर डायल केला पण एक रिंग जाताच कट केला.


‘नको मी कशाला फोन करू? त्याला अस वाटेल की माझ्याकडून होकार आहे. नको नको मला त्याला फोन करायला नको’ असे म्हणत तिने मोबाईल पुन्हा पर्समध्ये ठेवला.
विक्रमला निशाचा मिस कॉल दिसला. त्याने लगेच कॉलबॅक केला पण निशाने कॉल रिसीव नाही केला.


त्याने पुन्हा कॉल केला, मोबाईल वाजल्यामुळे आनंदीची झोपमोड झाली, तिला जाग आली.


“आई फोन उचल ना, कधीचा फोन वाजतोय.” ती बोलतच असताना पुन्हा फोन वाजला. आनंदी उठली तिने निशाच्या हातून मोबाईल घेतला आणि रिसीव केला.
“हॅलो..”

“आनंदी बेटा विक्रम अंकल बोलतोय, निशा फोन का उचलत नाही.” विक्रम

“मी झोपले होते आणि आईचं मला काय माहिती नाही.” आनंदी


“अग मला फोन आला होता, काही इमर्जन्सी तर नाही आहे ना? काकू बऱ्या आहेत ना? मला काळजी वाटत होती म्हणून मी फोन केला, तर निशा फोन उचलेना.” विक्रम
“अंकल आजी बरी आहे.”

“ओके चल भेटू सकाळी गुड नाईट.” विक्रम

दुसर्‍या दिवशी विक्रम डॉक्टरांशी बोलला, आता सगळं व्यवस्थित होतं. एक-दोन दिवस ठेवून निर्मलाला सुट्टी मिळणार होती. तीन दिवसानंतर निर्मलाला सुट्टी मिळाली.
निशा निर्मलाला ऑटोमध्ये बसवून घरी निघून गेली. तिने विक्रमला एकही फोन केला नाही ज्यावेळी विक्रमला कळलं की सुट्टी  झाली, तो डायरेक्ट निशाच्या घरी गेला आणि निशा वर खूप चिडला.

“काकूला  ऑटोमध्ये आणण्याची काय गरज होती? मला फोन केला असतास तर मी गाडी घेऊन आलो असतो ना. इतका काय ग तुला माज आलाय? कशाचा घमंड करतेस ग? जर रस्त्यात काकुला काही झालं असतं तर? माझ्या गाडीने आली असतीस तर काय बिघडलं असतं.” विक्रम खूप चिडला आणि खूप काही बोलून गेला. निशा मात्र स्तब्ध उभी होती.

निर्मला आता नॉर्मल व्हायला लागली. ती रोज व्यायाम करायची, फिरायला जायची. 
एक दिवस पार्कमध्ये निर्मलाला विक्रम भेटला.
“अरे काकू सकाळी सकाळी तुम्ही इकडे?”

“मी तर रोज फिरायला येते, पण तू मला आजच दिसतो आहेस.” निर्मला
“मला कळलं की तुम्ही इथे रोज फिरायला येता म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलोय. घरी आलो असतो तर निशा असती मग मला बोलता आलं नसत. मला तुम्हाला काही सांगायचं होतं.”

“बोल ना आता काय बोलायचं आहे?” निर्मला

“तुम्ही शांतपणे ऐकून घ्या त्यानंतर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बोला”
विक्रमने बोलायला सुरुवात केली,
“काकू मी माझ्या घरातला एकुलता मुलगा, घरी गावाकडे आई बाबा, चुलते सगळे राहतात.  माझं पूर्ण शिक्षण शहरातच झालं.  चांगल्या नोकरीवर लागलो आणि रीतीप्रमाणे लग्न झालं,  खूप छान सुखी संसार चालला होता, पण अचानक माझ्या सुखी संसाराला कुणाची नजर लागली काय माहीत? माझ्या डोळ्यांदेखत माझी बायको मला सोडून गेली. ती परत कधीच आली नाही. कुठे गेली? कोणासोबत गेली? काहीच माहिती नव्हतं, सगळे लोकं चर्चा करायला लागले की एका मुलासोबत पळून गेली. तिचा कुणीतरी बॉयफ्रेंड होता. त्याच्या बरोबर पळून गेली.


तिचा बॉयफ्रेंड होता नव्हता मला माहीत नाही, पण ती माझं आयुष्य उध्वस्त करून गेली. त्या प्रकरणानंतर मी पूर्णपणे हरलो होतो, तिच्या आठवणीत गुंतलो होतो. पण माझ्या मित्रांनी मला सावरलं, त्यातून बाहेर काढलं. मी ठरवलं आता फक्त काम आणि काम आणि कामच करायचं. आणि आजपर्यंत मी तेच करत आलोय. फक्त कामावर माझा फोकस असतो.


मी जरा कुठेही लक्ष देत नाही पण इथे आल्यानंतर ना, का कुणास ठाऊक पहिल्याच दिवशी मला निशामध्ये काहीतरी जाणवलं. तिची काम करण्याची पद्धत, तिच्यात असणारी जिद्द, सगळचं मला भावून गेलं. नंतर मला निशा बद्दल हळूहळू माहिती मिळत गेली. निशा एकटी संघर्ष करून इथपर्यंत पोहीचली. एकटीने सगळे कष्ट केले. तिच्या जीवनात तुमच्या दोघी शिवाय कुणीच नाही. काकू  म्हणून मी एक पाऊल समोर येण्याचा विचार करतोय. कुणावर उपकार वगैरे असं काही नाही ह खरंच मला निशा मनापासून आवडते आणि ती माझी लाईफ पार्टनर बनून माझ्या आयुष्यात आली तर मला खूप आवडेल. तुम्हाला काय वाटते काकू? तुम्ही तुमचा मत सांगा, तुम्हाला जर पटत असेल तर मी तुमच्या घरी निशाला मागणी घालायला येईल नाहीतर मग ही गोष्ट आपण इथेच थांबवूया.”


“पोरा, किती आनंदाची गोष्ट आहे.  किती वर्षापासून या गोष्टीची वाट बघत होते, की माझ्या लेकीच्या जीवनात कोणीतरी यावं आणि तिचे आयुष्य आनंदाने फुलून जावं. या म्हातारीला अजुन काय हव रे. मला ही वाटतं माझ्या मुलीने आनंदी राहावं, सुखात रहावं. पण तिच्या आयुष्यात इतकी सारी वादळ आली की तिने कधी दुसऱ्याचा विचारच केला नाही. माझ्याकडून तरी होकार आहे. मला आवडेल सगळं पण मी निशाच नाही सांगू शकत, ती काय बोलेल.”

“निशाशी माझं बोलून झालंय, तिला नाही पटलं म्हणून तिने माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. पण जर तुमची साथ असेल तर मी पुन्हा बोलेल तिच्याशी. पण हा काकू अजून एक गोष्ट निशाशी बोलण्याआधी मला एकदा आनंदीला पण सगळ सांगावं लागेल. कारण माझं नातं फक्त निशाशी जुळत नाही आहे तर तुमच्याशी आणि आनंदीसोबत पण जुळतय. तिला हे नातं पटायला हवं, तिने पण या नात्याचा स्वीकार करायला हवा. तरच हे नातं बहरेल. कुणाला दुःखवुन मला हे नातं जोडायचं नाहीये.” एवढं बोलून विक्रम तिथून निघून गेला.

त्यानंतर ऑफिसला जायच्या आधी विक्रम आनंदीच्या कॉलेजमध्ये गेला. त्याने आनंदीला गाठलं.
“हाय आनंदी.”

“अरे विक्रम अंकल तुम्ही इथे?”

“ हो मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. महत्त्वाच आहे, घरी बोलू शकलो नसतो म्हणून इथं आलोय, मी बोलू शकतो ना तुझ्याशी.”

“हो, का नाही.. चला आपण कँटीनमध्ये बसूया.”
आनंदी विक्रमला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली, दोघे बसले.

“बोला ना काय बोलायचं तुम्हाला?”

“आनंदी आता तू मोठी झालीस, लहानपणापासून बघतेस तुझी आई निशा किती सगळ काय काय करते तुमच्यासाठी? आयुष्य एकटीने जगली कुणाची मदत न घेता. तुला मोठं केलं, निर्मला काकूंना सांभाळल. आता बेटा तू ही काही वर्षाने लग्न होऊन सासरी जाशील. आजी पण काही वर्षे आहे त्यानंतर नाही. पण त्यानंतर तुझी आई....तीच काय? ती तर एकटी पडेल. मला काय वाटते माहितीये का तुझ्या आईलाही कुणाची तरी साथ असावी. तुझ्या आईच्या जीवनात पण कुणीतरी असायला हवा. तुला वाटतं का तुझ्या आईला पण कुणाची तरी साथ असायला हवी, तिलाही कोणाचा तरी आधार असायला हवा, गरज पडल्यास तिने कुणाच्यातरी खांद्यावर डोकं ठेऊन रडावं, कुणाच्या तरी हातात हात देऊन हसावं. बोल आनंदी तुला असं सगळं वाटू शकतं का?”
आनंदीसाठी हे सगळं खूप वेगळं होतं. तिला काय बोलावं कळेना, ती गप्प बसून होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all