काटेरी वाटेवरून चालताना... भाग 49

Prem hi khup sundar bhavana aahe

काटेरी वाटेवरून चालताना भाग 49


आधीच्या भागात आपण पाहिले की,

रागिणी आणि नितिन परीकडे जर्मनीला गेले, दोघेही खूप आनंदात होते पण तिथे गेल्यावर जे बघितलं त्यावर विश्वास बसेना. परी तिच्या बॉयफ्रेंड सोबत एका खोलीत नको त्या अवस्थेत दिसली. 
दोघेही खूप हताश झाले,रागिणीने तर रडून रडून हाल केले. परीने विश्वास दिला की तो चांगला मुलगा आहे आधी तुम्ही त्याला भेटा तुम्हाला जर तो नाही आवडला तर तुम्ही ज्या मुलाशी म्हणाल त्या मुलाशी  लग्न करायला तयार आहे.

आता पुढे,


परी ऑफिसला निघून गेली. 


“रागिणी शांत हो, किती त्रास करून घेणार आहेस?” नितिन
“नितिन आपण जाऊया परत, मला इथे राहायचं नाही आहे.” रागिणी

“अग पण आता...आपल्याला त्या मुलाला भेटायला हवं ना. काय मॅटर आहे ते सोडवावं लागेल ना.” नितिन

“ती तिचं बघून घेईल, आता आपल्याला काहीही करायची गरज नाही आहे. आपण आजच निघतोय.”

नितिनने  रागिणीला समजावलं पण ती काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
संध्याकाळी दोघेही जायला निघाले,ते निघणार तेवढ्यात परी ऑफिसमधून आली.
बाबांच्या हातात बॅग बघितली आणि
“हे काय? तुम्ही कुठे निघालात बॅग वगैरे घेऊन?” परी

“बॅग घेऊन निघतोय म्हणजे परत जातोय एवढं न समजण्याइतकी तू खुळी नाही.”रागिणी
“हे बघा आई बाबा तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, द्या ती बॅग माझ्याकडे.”
परीने नितिनच्या हातात असलेल्या बॅगला खेचलं तस नितिनने तिच्या थोबाडीत मारली.
“तुझी हिम्मत कशी झाली माझ्या हातून बॅग हिसकायची? आम्ही आमचं बघू काय करायचं ते.”

नितीन आणि रागिनी तिथून निघाले, परी त्यांच्या मागेमागे गेली. तिने लगेच तिच्या बॉयफ्रेंडला फोन केला.
“हॅलो सॅम, लवकर ये.. आई बाबा निघाले. ते परत जात आहेत, आपल्याला त्यांच्याशी बोलावे लागेल, त्यांना थांबवावं लागेल. तू प्लीज लवकर ये.” परी

सॅम लगेच एअरपोर्टवर पोहचला. त्या दोघांनी नितिन आणि रागिणीला खूप समजावलं पण रागिणी आणि नितिन थांबले नाहीत, ते तिथून निघून गेले.

“मग काय झालंय? केलं त्या दोघांनी लग्न?” आनंदीचा निरागस प्रश्न

“हो, लग्न केलं त्यांनी. पण यांनी संबंध तोडले, तिला कधीच फोन केला नाही आणि कधी भेटायला गेले नाहीत. किती केलं या दोघांनी तिच्यासाठी पण बघ ना परी काय करून बसली. अशी स्वार्थी मुले असण्यापेक्षा नको असलेली बरी, काय अर्थ आहे याला?.” निशा

“आई प्रेम करणं चुकीचं असतं का?” आनंदीने पुन्हा निशाला प्रश्न केला.

“नाही ग बेटा, प्रेम करणं चुकीचं नसतं, प्रेम ही एक सुंदर भावना आहे. एक निर्मळ भावना आहे, अथांग सागरात बुडालेली, समुद्राच्या पलीकडली आणि प्रेमाची भावना मनापूर्ती असली तर ठीक शरीरापर्यंत गेलं की ते प्रेम प्रेम राहत नाही. कुठलीही अपेक्षा न ठेवता एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे खुप कठीण असतं. असा जो असेल तो निर्मळ मनाचा माणूस असेल असे समजावे.” निशा

“आई आता रागिणी मावशी कुठे असते?”

“त्या दोघांनी मिळून एनजीओ उघडलं आणि स्वतः ते तिथेच राहतात. सगळ्यांची काळजी घेतात, त्या एनजीओ मधली मुलं त्यांचे जीवन आहेत. 
बोलणं झालं तुझं आता जाऊन झोप, तुला उद्या सकाळी कॉलेजला जायचं ना, आता उरलेल्या गप्पा उद्या.”

“नाही आत्ता लगेच फोटो बघायचे आहेत.” आनंदी

“नाही उद्या बघशील आणि पुन्हा कोणाच तरी काहीतरी विचारत बसशील आणि पुन्हा उशीर होईल, आता नको आपण उद्या बघूया चालेल.?” निशा

“ओके बाय गुड नाईट.” आनंदी तिच्या रूममध्ये झोपायला गेली.
निर्मला टीव्ही बघता बघता झोपली पण निशाला काही झोप येईना. रागिणीच्या विचारात ती गर्त झाली होती. निशाने रागिणीला फोन केला.

“हॅलो रागिणी कशी आहेस?

“अरे वा निशा आज तुला माझी आठवण आली? काय ग आज कशी काय आठवण काढली माझी?” रागिणी

“काही नाही ग, कशी आहेस?” निशा

“मी मस्त, अगदी मस्त ठणठणीत तू सांग तू कशी आहेस? आनंदी कशी आहे? रागिणीचे प्रश्न सुरू झाले.

“सगळे खूप छान आहेत.”
“बोल कसा काय फोन केलास? रागिणी

“काही कारण असेल तरच फोन करायचा का तुला? काही नाही ग अल्बम बघत बसले होते. तुझा विषय निघाला तुझ्याशी बोलावसं वाटलं म्हणून फोन केला.” निशा

“हो का, काय म्हणते आनंदी? कशी आहे?” रागिणी

“मस्त आहे, आता लेक शाळेतून कॉलेजला गेली, त्यामुळे खुश आहे. आज पहिला दिवस होता ना मूळ छान होता तिचा.” निशा
“अरे वा..” रागिणी

“परी बद्दल विचारत होती.” निशा

“तू काय सांगितलं?” रागिणी
“काय सांगणार बरं, खरं खरं सांगितलं. आता आनंदी पण मोठी व्हायला लागली तिला काही गोष्टी कळायला हव्यात. काय चूक काय बरोबर हे तिला स्वतःला कळायला हवं. कोणीतरी येऊन आपल्याला चार शब्द सांगावे आणि मग ते आपण करावे असे नको व्हायला. काय चुकीच आहे काय बरोबर आहे, कोण व्यक्ती चांगला कोण वाईट आहे, हे तिला समजायला हवे. मी किंवा इतर कुणी सांगून उपयोग नाही.” निशा

“बरोबर आहे तुझं, बघ ना माझा किती विश्वास होता पण काय केलं तिने?” रागिणी
“तुला एक विचारू का? एकदा तरी फोन करून बोल तिच्याशी. लग्न केले तिने, इतक्या लांब असते, कधी काही गरज पडली तर, एकदा तरी तू फोन करावं असं मला वाटतं.” निशा

“नाही निशा, आता ते शक्य नाही. आता अजिबात काही शक्य नाही. नितिन मला असं काही करू देणार नाही. मी खूप जिद्दीने तिथून परत आले होते. त्याने मला खूप समजावलं होतं पण मी नाही ऐकले. आणि मी आता पुढाकार घेतला तर ते त्याला आवडणार नाही, आता मला माझ्या नितिनची साथ हवी आहे.” रागिणी

“पण तरीही रागिणी मला असं वाटतं की तू या गोष्टीचा विचार करावा. परी मोठी झाली असली तरी अनुभवाचे चार शब्द आपण तिला सांगायला हवे.” निशा

“कुठल्या तोंडाने  अनुभवाचे चार शब्द सांगू, मीच लव मॅरेज केले ना, तिला कुठल्या तोंडाने सांगू? मी पण निखिल सोबत पळून जाऊन लग्न केले. आता तिला कुठल्या तोंडाने सांगू ती तु करु नकोस.” रागिणी

“पण तिला तुमच्याबद्दल नाही माहित आहे तेवढं.” निशा

“असं आपल्याला वाटतं, मुली मोठ्या झाल्या की त्यांना गोष्टी कळतात.” रागिणी

“मला नाही वाटत असं काही असेल, मी नितिनशी बोलून बघते, माझं बोलून झालं की मी तुला फोन करून कळवते.” रागिणी

“ओके ठीक आहे, बाय गुड नाईट.” निशा

खूप वेळानंतर निशाला झोप लागली, आनंदीला मधेच जाग आली आणि ती पण तिच्या विचारात गुंतली,
‘खरंच कुणावर तरी प्रेम होऊ शकतं का? असा कोणी व्यक्ती असेल ज्याच्यावर आपलं प्रेम होऊ शकतो? मी असं काही करणार नाही, आणि कुणी आवडला तर, नको बाबा तो मुलगा चांगला नसला तर, त्याने माझ्याशी काही वाईट केलं तर, नको रे बाबा.’ आनंदी स्वतःच्याच विचारात गुंग झालेली. स्वतः प्रश्न निर्माण करून स्वतःच उत्तर देऊ लागली आणि स्वतः हसली.


दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी कॉलेजला जायला तयार झाली, आज तिची बेस्ट फ्रेंड प्रिन्सि तिला न्यायला आली.
“हाय आनंदी गुड मॉर्निंग.” प्रिन्सि

“तू सकाळी सकाळी इकडे कशी?” आनंदी

“तुला न्यायला आले.” प्रिन्सि
“मला पाय नाहीत का चालायला.” आनंदीने उलट उत्तर दिलं.
“असं काय करतेस? मी खरच तुला न्यायला आले, आपण सोबत जाऊया कॉलेजमध्ये, मी गाडी आणली आहे.” प्रिन्सि हसून बोलली.

आतून निशाचा आवाज आला
“कोण आलंय आनंदी?”

“आई तुझी लाडकी प्रिन्सि आली.” आनंदी
“प्रिन्सि आली काय? काय खाणार आहेस ग?” निशा

“ऑंटी काहीही नकोय, कॉलेजला जायला उशीर होतो आहे.” असं म्हणत प्रिन्सिने आनंदीचा हात पकडला आणि दोघेही पळत पळत गेटच्या बाहेर गेल्या.

क्रमश:

🎭 Series Post

View all