काटेरी वाटेवरून चालताना... भाग 39

Nitin ne tila mithit ghetl ani dhir dila

काटेरी वाटेवरून चालताना भाग 39


आधीच्या भागात आपण पाहिले की,


रागिणी आणि नितिन परीला बाहेर फिरायला घेऊन गेले. परीने खूप धमाल केली. खूप एन्जॉय केलं. निशाने नोकरी करण्याचं ठरवलं पण शिक्षण पूर्ण नसल्यामुळे तिला नोकरी मिळाली नाही. निशाने पुन्हा शिक्षण सुरू केलं आणि कॉलेजमध्ये टॉप केलं.


आता पुढे,

निशा आणि निर्मला दोघी खूप आनंदात होत्या. निर्मला आणि निशा आनंदीला घेऊन मंदिरात गेल्या. देवाला नमस्कार करून आशीर्वाद घेतला. मंदिरातून निघाल्या, वाटेत त्यांना मेघा दिसली. निशाने आवाज दिला. दोघींची भेट झाली.


“हाय निशा, अग कशी आहेस? ये माझं गोड पिल्लू, कसा आहे माझा पिल्लू?” मेघाने आनंदीला हातात घेतलं.

“अग मी मस्त आहे. आणि आनंदी पण मस्त आहे.”
मेघाने आनंदीला हातात घेताच ती रडायला लागली. 
“अलेले  काय झालं माझ्या गोडुलीला?” मेघा
“तिला तुझा राग आलाय.” निशा

“का?” मेघा
“किती किती दिवस मावशी घरी येत नाही. ती तर रागावणारच ना.” निशा

निशाने आनंदीला मेघाकडून घेतलं. आनंदीच रडणं बंद झालं.
“वा, किती शहाणी ग तुझी मुलगी. मावशी जवळ रडली आणि आई जवळ अगदी शांत.” मेघा

“आता घरी चल, आरामात बसून बोलू आणि मला तुला अजून काही सांगायचं आहे.” निशा
तिघीही घरी गेल्या.  आरामात बसल्या.
निशाने मस्त चहा बनवला. 


आईला आणि मेघाला दिला.
“मेघा मी कॉलेजमध्ये टॉप केलंय.” निशा

“हे कधी झालं? तू मला काहीच सांगितलं नाहीस.” मेघा

“तू आजीच्या गावाला होतीस ना म्हणून नाही सांगता आलं, इथे असतीस ना तर लगेच तुझ्या घरी आले असते.” निशा
“किती मस्त ना ग, सगळ्यांच सगळं छान सुरू आहे. माझंच कशात काही नाही.” मेघा


“असं का बोलतेस, तू पण समोर शिक्षण सुरू ठेव. मी इन्ट्रान्स साठी फॉर्म भरणार आहे. तू पण भर, दोघी मिळून मस्त अभ्यास करूया.” निशा

“नाही ग, आई नाही म्हणतेय. तीच आता लग्नाचं सुरू आहे. माझ्यासाठी मुलगा शोधत आहे.” मेघा

“पण तू शिक्षण सुरू ठेऊ शकतेस.” निशा

“बोलते मी आईशी.” मेघा

“मेघा शिक्षण खूप गरजेचं आहे, आपल्याला आपल्या नकळत्या वयात काहीच कळत नाही, त्यावेळी शिक्षणाचं महत्व कळत नाही. पण मला आत कळतंय की शिक्षण किती गरजेचं आहे. आज मी माझ्या पायावर उभी असेल तर मी माझ्या मुलीला चांगलं भविष्य देऊ शकेल. तीच भविष्य घडवायचं असेल तर मला आर्थिकदृष्ट्या भक्कम राहायला लागेल. तू बोल तुझ्या आईशी, समजावं त्यांना. लग्नानंतर तू चूल आणि मूल एवढंच करणार आहेस का?” निशाने मेघाला समजावलं.

“हो ग मी बोलते आईशी.  यावेळी तरी तिने मला समजून घ्यावं.” मेघा उदास झाली.
“अग अशी उदास होऊ नकोस,आधी प्रयत्न तर कर. तू बिनधास्त बोल, मी आहे तुझ्यासोबत.” निशाने तिला धीर दिला.
मेघा तिच्या घरी गेली.


“आई मला तुला काही विचारायचं आहे. पण आधी तू माझं पूर्ण म्हणणं ऐकायचं, उगाच मधात बोलायचं नाही आणि रागवायचं तर अजिबात नाही.”  मेघाने आईला ताकीत दिली.

“मेघु तू मला विचारत आहेस की धमकावत आहेस?” सुशीला
“नाही ग, मला फक्त विचारायचं आहे.”
दोघीही हॉलमध्ये जाऊन बसल्या.
“हम्म बोल.”
“आई मला समोर शिकायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे.” मेघा

“आता झालं तेवढं पुरे नाही का?” सुशीला

“आई अग मी पीजी केलं तर मला चांगली नोकरी मिळेल. आणि चांगली नोकरी असली तर स्थळही चांगली येतात. तुला माझं लग्न करायचं आहे ना, आई पाहिजे तेवढी चांगली स्थळ येणार नाहीत. आणि आली तरीही माझं समोर शिक्षण होईल की नाही सांगता येणार नाही. आई मला फक्त चूल- मूल एवढंच करायचं नाही आहे ग.”  मेघा

“बघू, मी आताच तुला काही सांगून ठेवत नाही, चांगलं स्थळ आलं तर त्याचाही विचार करायला हरकत नाही.”

मेघा उदास होऊन खोलीत जाऊन बसली.

.....................................

रागिणी आणि नितिनने जेवण केलं. रागिणीने परीला आधीच जेवण भरवून तिला झोपवलं होतं.
नितिन टि व्ही बघत बसलो होता.
रागिणी किचन आवरून खोलीत गेली. थोडी रिलॅक्स व्ह्यायला  बेडवर लेटली आणि सहज तिने परीच्या माथ्यावरून हात फिरवला. रागिणीने झटक्याने हात बाजूला केला. परिचं अंग तापाने गरम झालं होतं.

“नितिन..नितिन लवकर ये, परीचं अंग खूप गरम आहे.”
नितिन धावत खोलीत गेला.
“काय ग,काय झालं?” नितिन
“परिच अंग खूप तापतय, मगाशी तर छान होती. आता काय करायचं? दवाखान्यात न्यायचं का?” रागिणी खूप घाबरली होती.
अशी परिस्थिती कशी हाताळायची याचा अनुभव तिला नव्हताच.


“आधी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवूया, बघूया काही ताप उतरतो का.”


रागिणीने थंड पाणी आणि रुमाल आणलं. तिने परिच्या माथ्यावर पट्ट्या ठेवायला सुरुवात केली. 


रागिणी एकही मिनिटं स्वस्थ बसली नाही. थोड्या थोड्या वेळाने ताप कमी झाला का बघत होती. नितिन बाजूला बसून घोरत होता. रागिणीने बघितलं, तिचा पारा चढला. 
तिने हाताने त्याला धक्का दिला.


“काय कुंभकर्नासारखा झोपला आहेस, उठ..मी एकटीच जागते आहे.”
“रागिणी थकलोय ग मी, झोपू दे ना थोडा वेळ. उतरला का परिचा ताप?” नितिन

“नाही ना अजून उतरला नाही, मला काळजी वाटते. एक तास झाला मी पट्ट्या ठेवत आहे पण ताप उतरत नाही आहे. आपण नेऊया का दवाखान्यात?” रागिणीला परिची खूप काळजी वाटत होती.


“आता झोप, सकाळी घेऊन जाऊ.” नितिन
नितिन झोपला, पण रागिणीला झोप लागेना. ती परी जवळ बसून होती.


काही वेळाने रागिणीला झोप लागली, अचानक परी खोकलायला लागली. तिला दम येऊ लागला. रागिणी खूप घाबरली, तिने परीला पाणी दिलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला. परी शांत झाली आणि ती रागिणीच्या कुशीत शिरली. तिचा पदर घट्ट पकडला, जणू तिला कशाची भीती वाटत होती.  


रागिणीने तिला तिच्या कुशीत झोपवलं, ती मात्र रात्रभर जागी राहिली.

सकाळी नितिन चहाचा कप घेऊन खोलीत आला. 
रागिणी बेडला टेकून लेटली होती. नितिनने तिच्या खांद्यावर हात ठेवला. 
तिला जाग आली, तिने नितिनकडे बघून स्माईल दिली.
“चहा घे.” 
रागिणीने इशाऱ्याने परीकडे बघितलं.
“दे मी घेतो तिला, तू उठ फ्रेश हो सनी चहा घे.” नितीनने परीला घेतलं. रागिणी फ्रेश होऊन आली. दोघांनीही चहा घेतला.
“आपण जाऊया दवाखान्यात.”  रागिणी

“हो आपण निघू आता.”  नितिन
“आधी मी परीला जेवण भरवते. मग निघुया.” रागिणी

रागिणीने परीला उठवून फ्रेश केलं, तिला जेवण भरवून दिलं. 
तिघेही जायला निघाले.
दवाखान्यात पोहोचले. डॉक्टरशी भेट झाली.
“बोला काय झालं.” डॉक्टर
“रात्रीपासून ताप उतरत नाही आहे मुलीचा.” रागिणीने काळजीने सांगितलं.
डॉक्टरने तपासणी केली. 


“मी तीन दिवसांच औषध देतोय, त्यांनतर पुन्हा घेऊन या.” 
नितिनने बाजूच्या मेडिकल मधून औषध घेतलं आणि घरी गेले. 
रागिणी दिवसभर परी जवळ बसून होती, तिचं खाणं पिणं, तिच्या औषधी सगळं दिवसभर केलं. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. परिचा ताप काही उतरेना. तिचा तो केविलवाणा चेहरा रागिणीला बघवत नव्हता.


रागिणी हताश झाली. नितिन हॉलमध्ये बसून काही काम करत होता. रागिणी त्याच्या बाजूला जाऊन बसली. त्याच्या हातात हात घातला, त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू लागली.


“रागिणी अग काय झालं? का अशी रडतेस.”
रागिणी ढसाढसा रडायला लागली.


“परिचा ताप उतरत नाही आहे. मला ना खूप खूप भीती वाटते आहे.”


“रागिणी काळजी करू नकोस, आपण तिला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ.”

“ती ना रात्री दचकून उठते, मधातच काहीतरी बळबळते, पण मला कळत नाही ती काय बोलते. तिला कुठल्यातरी गोष्टीचा त्रास होत असेल का?” रागिणी

“तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल.” 
नितिनने तिला मिठीत घेतलं आणि धीर दिला.

क्रमशः


 

🎭 Series Post

View all