काटेरी वाटेवरून चालताना... भाग 37

Dev kunala khup kahi deto ani kunala kahich nahi

काटेरी वाटेवरून चालताना... भाग37
आधीच्या भागात आपण पाहिले की,


निशाला तिच्या मृत बाळाबद्दल कळलं, तिने हंबरडा फोडला.
पण आहे त्या बाळासाठी तिने स्वतःला सावरलं. पाच दिवसानंतर डिस्चार्ज मिळाला, निशाच्या मैत्रिणींनी वेलकम करण्यासाठी खूप सुंदर तयारी केलेली होती.


पूर्ण घर फुलांनी सजवलेलं होतं. अंगणात, दारात सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या. नातेवाईकांचे फोन यायला लागले, कुणी चांगले बोलायचे, कुणी वाईट बोलायचे.


निशाने ठरवलं कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. तिने नोकरी शोधायला सुरुवात केली.


आता पुढे,


निशाचा पूर्ण दिवस तिच्या बाळामध्ये जायचा.  तिच्यासोबत वेळ कसा जायचा दोघींनाही कळायचं नाही.
निशाची मुलगी सव्वा महिन्याची झाली.


“निशु तुझ्या या गोडुलीच नावं ठेवायला हवं आता. मी काय म्हणते आपण थोडक्यात नामकरण विधी सोहळा करूयात.” निर्मला
“चालेलं आई.” निशा
“हो, अग पण नावाचा विचार केलास का?”


निर्मलाने गोडुली बाळाला हातात घेतलं. 


‘काय बर नाव ठेवायचं आपल्या गोडुलीचं.’असं म्हणत निर्मलाने नातनीचे लाड केले.
निशाने नाव शोधायला सुरूवात केली.


“आई बरेच नाव शोधून झाले पण मला ना सगळ्यांमध्ये आनंदी नाव खूप आवडलं. तुला कस वाटतंय.” निशा
“चांगलं आहे..” निर्मला


“आई हिच्यामुळेच तर आपल्या जीवनात आनंद निर्माण झाला. म्हणून ही आनंदी..” निशा खूप खुश होती.


निशाने नामकरणची पूर्ण तयारी केली.  चारही मैत्रिणींनी मिळून खूप छान नामकरण विधी सोहळा उत्साहाने साजरा केला.


निशा खोलीत गेली. कपाटातून फोटो काढला. 
तो भिंतीवर टांगला आणि आनंदीला त्या फोटोसमोर घेऊन गेली.


“रोहित आज तुझी मुलगी सव्वा महिन्याची झाली, तिचं नाव आनंदी ठेवलं. तू तर अफाट दुःख देऊन गेलास पण तिच्या येण्याने मला जो आनंद झाला तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. असो तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही.”
निशा पलटली, मागे निर्मला उभी होती.


रोहितच्या टांगलेल्या फोटोकडे बघून,
“हे काय आहे निशा?
“रोहितचा फोटो लावला आहे.” निशा


“ते तर मला दिसतंय पण का लावला आहेस?” निर्मला

“रोहित आता या जगात नसला किंवा असता कुठेतरी किंवा माझ्यासोबत नसता तरी मला वाटतं आनंदीचा बाबा तिच्या जवळ असावा, या फोटोतून का असेना पण तो तिच्या नजरेसमोर असावा अस वाटतं. आणि मी जेवढा तिरस्कार रोहितचा केला ना, मला माझ्या आनंदीच्या मनात तिरस्काराची भावना जागृत करायची नाही आहे, तो तिरस्कार काय असतो? द्वेष काय असतो? राग, लोभ काय असतो? हे सगळं मला तिला नाही शिकवायचं. आई मला तिला फक्त प्रेम देणे आणि प्रेम घेणे फक्त प्रेमाची भावना शिकवायची आहे. ती जशी मोठी होईल ना त्या फोटोकडे बघेल. त्या फोटोकडे बघून बघून ती मोठी होईल. मला तिच्या मनात तिच्या बाबाची प्रतिमा खराब करायची नाही. तिचा बाबा खूप चांगला व्यक्ती होता हेच तिला सांगायचंय.” निशा

“अगं पण त्याच्याने काय होईल? ती तुला विचारेल कि बाबा कुठे गेला? कसा गेला? काय उत्तर देणार आहेस तू?” निर्मला

“आई तुझ्या प्रश्नाचे उत्तर आता माझ्याजवळ नाहीये, पण बघूया त्यावेळी मला जे सूचेल मला जे पटेल ते मी करेल. या वरती मी तुला काही सांगू शकत नाही.”

असं म्हणत निशा खोलीतून बाहेर गेली.

.............................

नितिन आणि रागिणी निशा कडुन गेल्यानंतर त्यांनी अकॅडमी पुन्हा सुरू केली.
एक दिवस रागिणी क्लासला जायला निघाली. रस्त्यात तिला एक मुलगी दिसली. अंदाजे चार ते पाच वर्षाची असेल. मळलेला फ्रॉक, विस्कटलेले केस, ती मुलगी एका कोपऱ्यात रडत बसली होती. रागिनी तिच्याजवळ गेली.

“काय झाल बाळा? का रडतेस?”

“आई... माझी आई हरवली. माझी आई मला दिसत नाहीये.”

“तू कुठे राहतेस? काय नाव आहे तुझं? रागिणीने विचारलं.
ती मुलगी काहीच बोलायला तयार नव्हती. तिच्याकडे बघून रागिणीला खूप दया आली. काय करावं काही सुचेना, ती त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनला गेली.


तिथे तिच्या आईची मिसिंग तक्रार नोंदवली आणि पोलिसांना विचारलं,
“जर तुमची हरकत नसेल तर तिचे आई-बाबा भेटेपर्यंत माझ्यासोबत ठेवू शकते का?”

“हे बघा मॅडम, असं करता येत नाही पण तुम्ही एवढी रिक्वेस्ट करत आहेत तर ठीक आहे, पण हो मॅडम तिला कुठलाही त्रास होता कामा नये.”
रागिणीने शाश्वती दिली की त्या मुलीला कुठलाही त्रास होणार नाही.

ती त्या मुलीला घरी घेऊन जायला निघाली. वाटेत घरी जाताना रागिणीने तिच्यासाठी नवीन कपडे घेतले.

घरी गेल्यानंतर त्या मुलीला छान आंघोळ घालून दिली, तिला नवीन कपडे घालून दिले. छान तयारी करून दिली, तिला खायला दिलं. रागिणीने तिला तिचं नाव विचारलं पण कदाचित तिला ते बोलता येत नव्हतं.

काही वेळाने नितिन घरी आला. रागिणीने घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला? 

“कुठे आहे ती?
“आत झोपली आहे.”

नितिन आत गेला, त्या मुलीच्या चेहर्‍याकडे बघितलं, तो निरागस चेहरा त्याला खूप भावला. तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

“काय नाव ग हीच?”

“तिला तिचे नाव आठवत नाहीये.” रागिणी

“काही हरकत नाही, आपण तिला नवीन नाव देऊया. तुला चालेल?”
“हो चालेल.” रागिणी

“काय नाव द्यायचं पण तिला. झोपलेली असताना किती गोड दिसते ना आपण तिला परी म्हणूया का?” नितिन
रागिणीने हसून
“चालेल..”

“आणि हो नितिन संध्याकाळी खेळणे घेऊन ये, तिला खेळायला खेळणी लागतील ना.” रागिणी

“हो, मी जाऊन घेऊन येतो.”
नितिन छान खेळणी घेऊन आला.
ती जागी झाली, उठून बाहेर आली. या दोघांकडे बघून ती घाबरली. नितिन आत फ्रेश व्हायला गेला.

“ये बाळा घाबरू नकोस, ये जवळ ये.” रागिणीने तिला जवळ घेतलं. तिच्या गालाचे चुंबन घेतले.
“अग घाबरू नकोस.”

“तुम्ही कोण आहात?”

“हम्म कोण म्हणायचं?” रागिणी

“आता मी तुम्हाला काय हाक मारू?”

“तुला जे वाटलं ना त्या नावाने हाक मार.” रागिणी

“आई.. आई म्हणू मी तुम्हाला? मला माझ्या आईची खूप आठवण येते आहे.”

तिचे हे वाक्य ऐकून रागिणीचे डोळे पाणावले.
“हो नक्की बाळा, आईच म्हण मला. असं म्हणून रागिणीने तिला जवळ घेतलं, तिला कुशीत घेतलं, आणि तिचा लाड केला. थोड्या वेळाने नितिन फ्रेश होऊन आला. 

“अरे उठली का माझी परी? त्याने दारातूनच परीला आवाज दिला, त्याच्याकडे बघून परी पुन्हा घाबरली.
“बाळा घाबरू नकोस, बाबा आहे तुझा. मला आई म्हणालीस ना मग हा तुझा बाबा झाला.” रागिणीने परीला सांगितलं.

“परी बघ मी तुझ्यासाठी काय आणलय? खेळणी...”

खेळणी बघून ती त्याच्याकडे उत्साहाने धावली, त्याला बिलगली.

नितिनने तिला कडेवर घेतलं, गालाची गोड गोड पप्पी घेतली. त्याने तिच्या हातात खेळणी दिली. आली ती खूप खुश झाली. पण थोड्याच वेळात तिचा चेहरा उतरला.

“काय झालं बाळा? आत्ताच आनंदात होतीस ना.” रागिणीने विचारलं.

“माझी आई कुठे गेली? माझी आई मला सापडत नाहीये?”

“हे बघ  बाळा तू काळजी करू नकोस, आम्ही पोलिसांना सांगितलय. ते तुझ्या आईला शोधत आहेत आणि जोपर्यंत तुझी आई सापडत नाहीना तोपर्यंत तू आमच्या सोबत रहा. तुला आवडेल आमच्या सोबत रहायला. तिने होकारार्थी मान हलवली.

रागिणी आणि नितिनला खूप आनंद झाला. परी त्यांच्या आयुष्यात आली आणि त्यांचे आयुष्य बदलून गेलं. परीचा खेळणे खेळत असताना खूप आनंदात दिसत होती.

“नितिन किती आनंदात आहे रे ती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झालाय, हो ना? रागिणी

“तिच्याजवळ कुठे तेवढी खेळणी असतील? तिला कधी कोणी काही देत नसेल. बघ ना कोणाकोणाचे काय नशीब असतात देव कुणाला खूप देतो आणि कुणाला काही देत नाही. त्यांचे त्यांचे नशीब अजून काय?” नितिन

“पण ती आपल्या जवळ जोपर्यंत आहे ना नितिन तोपर्यंत आपण तिला खूप प्रेम देऊ. तिला जे जे पाहिजे ते सगळ देऊ. तिला कुठल्याच गोष्टीची कमी पडू द्यायची नाही.” रागिणी
“हो ग..” असं म्हणून नितिनने रागिणीला मिठीत घेतलं.

क्रमश:

🎭 Series Post

View all