काटेरी वाटेवरून चालताना... भाग 31

Mi adhi nokari karel ani tyanantar lagn

काटेरी वाटेवरून चालताना...भाग 31


आधीच्या भागात आपण पाहिले की,


निशाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला, शेजारच्या बाया जमलेल्या होत्या. काहींनी कौतुक केलं तर काहींनी खच्चीकरण केलं. पण तरीही कार्यक्रम छान झालाय.


सायलीला दिवसभर अस्वस्थ वाटत होतं, ती प्रथमेशची वाट बघत बसली होती. तो खूप उशिरा आला आणि ड्रिंक करून आला, सायलीने त्याला घराबाहेर काढून आतून दार लावून घेतलं.


रागिणी आणि नितिनने डान्स अकॅडमी सुरू केली. एक दिवस रागिणी बाहेर जाण्यासाठी तयारी करत असताना दारावरची बेल वाजली. रागिणीने दार उघडला.


आता पुढे,


रागिणीने दार उघडलं, समोर बघितले तर ती आश्चर्यचकित झाली. दारावर रागिणीचे आई-बाबा उभे होते. त्यांना बघताक्षणी रागिणीच्या हातातली पर्स खाली पडली. पाठीमागेहुन आवाज आला,


“काय झालं रागिणी? काय पडलं? कशाचा आवाज येतोय? असं म्हणत नितिन बाहेर आला. त्याचही लक्ष रागिणीच्या आईबाबांकडे गेलं आणि तो बघतच राहिला.
“आई बाबा तुम्ही?  या ना आत या.” रागिणीने त्यांना आत बोलावलं.


दोघेही न बोलता आत आले.
“बसाना मी पाणी आणते.”
रागिणी आत पाणी आणायला गेली. नितिन मात्र एका बाजूला खाली मान घालून उभा होता. 


बाबांनी बोलायला सुरुवात केली,
“काय नितिनराव कसं काय चाललंय?”
बाबांचा आवाज कानावर पडताच नीतिनने आनंदून उत्तर दिलं.


“खूप छान चालले बाबा.” असं म्हणत दोघांच्या पाया पडला.
“आज तुम्ही इथे आलात आम्हाला खरंच खूप आनंद झाला.” रागिणीने पाणी आणलं, ते दिलं. ती पण आई बाबांच्या पाया पडली. आईजवळ बसली आणि आईला मिठी घातली.
“आई मला तुझी खुप आठवण येत होती गं.”


बाबांनी त्या दोघांसाठी आणलेली वस्तू त्यांच्या हातात दिली.
“हे तुमच्या दोघांसाठी.”


“बाबा हे काय आहे? याची काय गरज होती?”
“पहिल्यांदाच मुलीच्या घरी आलोय, खाली हाताने येणार होतो का?”
रागिणीचे डोळे पाणावले,


“थँक्यू बाबा..”


“खरं तर मी येणारच नव्हतो. तुझी आई मागे लागली, तिला तुझी खुप आठवण येत होती. इतके महिने झाले तू कधी कॉल केला नाहीस तुला तुझ्या आई बाबांची आठवण नाही आली ना.”

“असं नाही आहे बाबा, मला रोज तुमची आठवण यायची पण तुमच्या रागामुळे मी फोन करू शकत नव्हते. आणि खरं सांगू का बाबा नितिन मला खूप सांभाळतो, तुमची आठवण आली की तो मला बाहेर घेऊन जायचा, माझं मन वळवण्याचा प्रयत्न करायचा.. मला हवं नको ते सगळं बघायचा. बाबा नितिन खरच खूप चांगला मुलगा आहे.”

“माहितीये मला, ही एक परीक्षा होती समज. तुझ्या परीक्षेत तू पास झालीस पोरी. खरं तर मी तुला न्यायला आलो होतो आपल्या घरी.”

“पण बाबा, मी आता तुमच्या सोबत नाही येऊ शकणार.”
“का, काय झालं?” आता आईबाबांच्या घरी यायचं नाही तुला?”

“नाही बाबा तसं काही नाही. नितीन चा एक्सीडेंट झाला होता ना, त्याच्या पायाला दुखापत आहे. मी जास्त दिवस त्याच्याशिवाय नाही राहू शकणार, आता सध्या त्याला माझी गरज आहे. त्यामुळे काही दिवसांनी आम्ही दोघे येऊ तुम्हाला भेटायला. पण आता तुम्ही आलात  तर रहा दोन-चार दिवस.”

“नाही आम्ही परत जाणार आहोत.”


“बाबा हे तुमच्या मुलीचं घर आहे, तुमच्या हक्काचे घर आणि तुम्ही इथे राहू शकता.”
चौघांच्या गप्पा रंगल्या, रागिणीच्या बाबांनी राग सोडला यातच सगळं आलं..

.............................


सायलीने प्रथमेशला बाहेर काढून आतून दार लावून घेतला. प्रथमेशने बाहेरून खूप आवाज दिला.


“सायली दार उघड ग, दार उघड ग..”
सायलीने दार उघडलंच नाही.


प्रथमेश रात्रभर बाहेर होता. सकाळ झाली, अजूनही दारू उघडला नाही म्हणून प्रथमेशने दार ठोठावनं सुरू केलं. समोरून काहीच प्रतिसाद येत नव्हता आता मात्र प्रथमेश घाबरला.


आतून आवाज कसा काय येत नाहीये? तो भानावर आला, उठला. त्याने खिडक्यावर थापा मारल्या, दारावर जोरजोरात थापा मारल्या. पण काहीच प्रतिसाद येत नव्हता. प्रथमेशने बाजूच्या लोकांना आवाज देऊन दार तोडून घेतलं. आत गेला तर सायली बेडवर पडून होती. प्रथमेश तिच्या जवळ गेला.


“सायली सायली काय झालं? उठ ना, डोळे उघड. डोळे , हे काय केलस तू? डोळे उघडत नाही आहेस, बोल ना. प्रथमेश अगतिक झाला, त्याला खूप रडायला येत होतं. काय करू नी काय नाही असं वाटत होतं. त्याने लगेच तिला उचललं आणि गाडीत नेऊन बसवलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेला.


“डॉक्टर डॉक्टर बघाना ही डोळे उघडत नाहीये. काय झाल प्लीज चेक करा ना.”


“तुम्ही शांत बसा, मी बघते काय झालं?”
डॉक्टरने सायलीला तपासणीसाठी आत नेलं, तपासणी केली आणि काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आल्या.


“काय झालं डॉक्टर? सायली डोळे का उघडत नव्हती.”


“हे बघा त्या बेशुद्ध पडल्या होत्या, विकनेस मुळे असू शकते, त्यांच्या पोटात काही नसल्यामुळे असे होऊ शकते. त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला असावा आणि त्या बेशुद्ध झाल्या. काळजी करण्यासारखं काही नाही. त्या शुद्धीवर आल्या की आपण एक दोन टेस्ट करूया, त्यानंतर मी तुम्हाला काही गोष्टींच कन्फर्मेशन देते.”

प्रथमेश सायली जवळ जाऊन बसला
“सॉरी ग, सॉरी सायली मला माफ कर. तू दिवसभर माझी वाट बघत बसली होतीस आणि काही खाल्लं नाहीस. म्हणून तुझी ही अशी अवस्था झाली आहे. मला माफ कर ग.”

प्रथमेश सायलीजवळ बसलेला असताना तिथे नर्स आली.
“ही काही मेडिसिन्स आणायची होती, प्लीज तुम्ही घेऊन या.”
“ओके..” असं म्हणत प्रथमेश बाहेर गेला.


थोड्यावेळाने सायली शुद्धीवर आली, डॉक्टरने  टेस्ट केली आणि त्यानंतर सायली जवळ आल्या.
“अभिनंदन तुम्ही आई होणार आहात.”


“सायलीचा चेहरा अगदी खुलला. थोड्या वेळाने प्रथमेश मेडिसिन घेऊन आला. सायली उठून बसली होती, प्रथमेश तिच्या जवळ आला, आणि तिला


“बरं आहे ना आता? बरी आहेस ना तू? का असं करतेस ग? दिवसभर माझी वाट बघत बसली होतीस ना आणि काय खाल्लं नाही. बघ कशी बेशुद्ध झाली होतीस. यानंतर मी असं नाही करणार आणि सॉरी यानंतर ड्रिंक करून कधीच येणार नाही.


“खरंच..” सायलीने विचारलं.
“अगं खरच सांगतोय..”


“बघ बदलायचं नाही यानंतर. खरं सांग बाळाची शप्पथ.” 
हे ऐकताच प्रथमेश विचारात पडला.


“काय? काय बोलतेस तु?
सायलीने होकारार्थी मान हलवली.


“खरंच खरंच खरंच सांगतेस. थँक यु थँक यु सो मच. तुला नाही माहित तू मला किती आनंदाची बातमी दिली आहेस. मला खूप खूप आनंद झाला. थँक यु थँक यु सो मच असं म्हणत प्रथमेश सायलीला बिलगला.

सायलीने लगेच तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केला. सगळ्यांचं निशाच्या घरी भेटण्याचं ठरलं.


आठ दिवसानंतर सगळ्या मैत्रिणी निशाच्या घरी जमल्या. सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या. निर्मला पण खूप खुश होती. सगळ्या मैत्रिणी जमल्या आणि निशा आनंदात होती हे पाहून तिला बरं वाटलं.


सायलीने त्यांना तिची आनंदाची बातमी सांगितली.
“काय रागिणी आता तू पण गुड न्यूज दे लवकरात लवकर आम्हाला.” निशाने तिला चिडवलं.


“हो ग पण सध्या नाही, सध्या माझी डान्स अकॅडमी सुरू आहे. काही वर्षाने विचार करीन मी.


“मेघा तुझं काय? तू कधी लाडू चारतेस तुझ्या लग्नाचे?” रागिणीने विचारलं.


“नाही मी आताच लग्न करणार नाही, आधी नोकरी मग लग्न. उगाच मला नवऱ्याचा त्रास सहन करायचा नाहीये.”
“तुला कोणी सांगितलं  नवरा त्रास देतो?” सायलीने विचारलं

“कोणी सांगायला काय पाहिजे? आजूबाजूला बघतेच की मी. मी आधी नोकरी करणार आणि मग लग्न, माझं ठरलं. खरं सांगू का मला बाहेरचं जग बघायचं आहे. बाहेरच्या जगाचे अनुभव घ्यायचेत. आपल्याला बाहेरच्या जगातलं काहीच कळत नाही. त्या दिवशी मी इंटरव्यूला गेले आणि बॉस कसा असतो ते कळलं.”


“अरे पण सगळेच तसे नसतात.” निशा बोलली.


मेघाने तिचा अनुभव मैत्रिणीशी शेअर केला. त्याही ऐकून अवाक झाल्या..


क्रमशः

🎭 Series Post

View all