काटेरी वाटेवरून चालताना... भाग 26

Nitin cha chotasa accident zala raginila kay karav kalena

काटेरी वाटेवरून चालताना...भाग 26


आधीच्या भागात आपण पाहिले की,

निशाला तीन महिने पूर्ण झाले, काकूंनी तिला चेकअप साठी नेलं, डॉक्टरने सांगितलं थोडा प्रॉब्लेम आहे, काळजी घ्यावी लागेल.


निशाच्या बाबांचं हार्ट अटॅकने मृत्यु झाला. आईने निशाला फोन करून कळवलं. निशा, मीनल आणि काकू निशाच्या घरी गेल्या. सौरभला फोन करूनसुद्धा तो आलेला नव्हता.


निशानेच सगळा विधी पार पाडला. तिनेच मुखाग्नी दिली. ती आईच्या कुशीत झोपली असताना अचानक किंचाळून उठली.

आता पुढे,


निशा झोपेतून किंचाळून उठली.


“काय झालं निशु?” निर्मला


“आई भयानक स्वप्न होतं. आई कुणीतरी माझ्या बाळाला मारायला आलं होतं, मला चेहरा नीट दिसला नाही. तो म्हणाला मी तुझ्या बाळाला मारून टाकेन, त्याला हे जग बघू देणार नाही.” निशा


“अग वाईट स्वप्न होतं. तू झोप बाळा.” निर्मला


आईने तिच्या डोक्यावरून  मायेने हात फिरवला. आणि तिला झोप लागली.


बघता बघता दोन आठवडे गेले. निशाच्या बाबांचा चौदावीचा कार्यक्रम झाला. तेव्हाही नातेवाईकांची कुजबुज सुरूच होती. आधी सौरभला बोलायचे आत निशा जवळ आली तर तिला बोलायला लागले.
आता निशा आईकडेच राहायला लागली. 


मेघाकडून रोहितला कळलं की निशा तिच्या घरी राहायला गेली. एक दिवस संधी साधून तो घरी आला. रोहितने निर्मलाला बाहेर जाताना बघितलं आणि त्याने दारावरची बेल वाजवली.


“आता ही काय विसरली?” या विचारात तिने दार उघडला. निशाला वाटलं आई परतली, दारात रोहितला बघून तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.


ती स्तब्ध उभी होती, रोहितने तिच्या वाढलेल्या पोटाकडे बघितलं. त्यांनतर तिच्याकडे बघून
“कशी आहेस निशा?” रोहित


“तू इथे? इथे काय करतोस? माझ्यासमोर यायची तुझी हिम्मत कशी झाली? चालता हो इथून. मला तुझं तोंडही बघायचं नाही आहे.” निशा


“निशा मला तुझ्याशी बोलायचं आहे.” रोहित


“बोलायला काही उरलय का? तू जा इथून.” निशा


निशा दार लावणार तोच त्याने दार आत ढकलला.
निशा जोरात ओरडली.
“रोहित, काय करतोस?”


“मी सांगतोय ना,मला तुझ्याशी बोलायचं आहे. निशा अग मी तुला विसरलेलो नाही आहे, माझं तुझ्यावर आजही तितकंच प्रेम आहे. मला आजही तू हवी आहेस निशा.” रोहित
“पण मला तू नको आहेस, मी तुला तुझ्या प्रेमाबद्दल विचारलेलंच नाही आहे. त्यामुळे तुला काहीच सांगायची गरज नाही आहे. तू जा रोहित.” निशा


रोहित चवताळला, निशाच्या अंगावर धावून गेला, तिच्या गालाला जोरात पकडलं.


“कशाचा माज करतेस ग तू? मी तुला न्यायला आलोय, माझ्यासोबत चल आणि हे जे तुझं सोंग सुरू आहे ना ते एकदाच बंद कर. मला हे मुल नकोय, मला फक्त तू हवी आहेस, कळलं?” रोहित


निशाने त्याचा हात झटकला.


“शक्यच नाही आहे हे आणि तुझ्यासारख्या माणसासोबत राहण्यापेक्षा मेलेलं बर. मी आणि माझं बाळ, आम्ही राहू दोघेही. मला तुझी गरज नाही, तेव्हा तू इथून निघून जा.”निशा


“मेघा बोलली होतीच की निशा असं काही करणार नाही. आणि  तेच खरं होतंय. मी असं होऊ देणार नाही.” रोहित


“एक मिनिटं, इथे मेघाचा काय संबंध? तू तिला कधी भेटलास. आणि काय बोलली ती तुला?” निशा


रोहित काही बोलणार तेव्हा कुणाचा तरी आवाज आला आणि रोहितने तिला ढकललं आणि तो पळाला.
निशा सोफ्यावर  जाऊन पडली तितक्यात निर्मला तिथे आली आणि तिने निशाला सावरलं.


“काय ग,कोण होता तो? आता इथून पळाला.” निर्मला
“आई तो रोहित होता.” निशा
“काय, मला कसा कळला नाही. त्याने तुला काही केलं तर नाही ना.” निर्मला
“नाही आई, त्यात तेवढी धमक नाही. बरडला आणि गेला.” निशा


“निशु मला भीती वाटायला लागली, मी घरात नसताना त्याने घुसून काही केलं तर.” निर्मला


“आई काहीही झालेलं नाही आहे,उगाच टेन्शन घेऊ नको. तू बस शांत, आताच बाहेरून आलीस ना.” निशा


“नाही मी आधी पाणी आणते.”
निर्मला पाणी घेऊन आली.
“हे घे बाळा, आधी पाणी पिऊन घे.”


निशा आत आराम करायला गेली.
निर्मला मात्र विचार करत बसली.


थोडया वेळाने अचानक निशाला जाग आली आणि तिला रोहितचं बोलणं आठवलं की तो मेघाबद्दल बोलत होता.
ती उठली, तिने लगेच मेघाला कॉल करून बोलवून घेतलं.
थोडया वेळात मेघा पोहोचली.


“काय झालं निशा असं अचानक बोलवून घेतलंस?” मेघा
“मला खूप महत्वाचं बोलायचं आहे. तू रोहितला कधी भेटलीस आणि माझ्याबद्दल त्याला का सांगितलंस? मी इथे राहते हे त्याला का सांगितलंस? तू ही सामील झालीस का त्याच्या प्लॅनमध्ये? पण मी माझ्या बाळाला काहीही होऊ देणार नाही आहे. तू हे समजू नकोस की माझ्या जवळ कुणी नाही तर मी अबला आहे.” निशा


“निशा शांत हो, अग आधी इथे बस शांत हो” मेघाने तिला बसवलं.


“मी तुला सगळं सांगणार होते पण काकांच असं झालं आणि मग मी गप्प राहिले. आज तू विषय काढलास म्हणून मी तुला सगळं सांगते. तुला कुसुम आठवते, ती माझी मावशी नाही. ती एका माणसासाठी काम करत होती आणि तिला कळलं की व्यक्ती रोहित आहे. तिने मला कळवलं आणि मी त्या ठिकाणी गेले, मी तिथे अडकले होते. तिथे मला रोहित भेटला गनिमी त्याच्याशी बोलले. निशा त्याला तू हवी आहेस. त्याच्या बंगल्यावर tuzi मोठी फोटो आहे. पण मी त्याला सांगितलं निशा तिच्या बाळाला मारून टाकणार नाही. बघ हे असं झालं सगळं.” मेघा

निशासाठी हा एक धक्काच होता. इतकं सगळं घडून गेलं.
“शांत हो निशा.”


“सॉरी मेघा मी तुला खूप बोलली.”


दोघीही नॉर्मल झाल्या आणि त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. गप्पा मस्त रंगल्या, खूप दिवसानंतर अश्या मनसोक्त बसल्या होत्या. निर्मलाने गरमागरम कॉफी आणली आणि तिघीही गप्पा मारत बसल्या.

.................................

नितिन आणि रागिणी दुसऱ्या शहरात गेले. तिथे नितिनने नवीन नोकरी शोधली. दोघांनी फ्लॅट  घेतला. रागिणी पण एका कॉलेजमध्ये शिकवायला जायची. दोघांचे दिवस छान चाललेले असताना अचानक एक दुर्घटना घडली. नितिनच्या गाडीचा अक्सिडेंट झाला.


त्याच्या पायाला आणि डोक्याला जबर मार लागला होता. रागिणीने लोकांच्या मदतीने नितिनला ऍडमिट केलं. डॉक्टरने प्राथमिक उपचार सुरू केले. 


काही तासानंतर डॉक्टर आले


“ त्यांच्या डोक्याला मार लागलाय, त्वरित ऑपरेशन करावं लागेल. तुम्ही पैशाची व्यवस्था करा, फॉर्म भरा आणि लगेच कळवा मग आम्ही ऑपरेशनची तयारी करतो.” डॉक्टर


ऑपरेशनला खूप खर्च येणार होता. रागिणीला काहीच कळत नव्हतं काय करावं? तिने माहेरी फोन केला बाबांना विनवणी केली पण ते पैसे द्यायला तयार झाले नाहीत. तिने सासरी फोन केला, पण तिथूनही काही मदत मिळाली नाही.  


रागिणी हताश झाली. तिने लगेच तिच्या जीवापाड मैत्रिणींना फोन केला. आणि एका फोनवर सगळ्या धावून आल्या.
मेघा, निशा आणि सायली तिघीही पोहोचल्या.


त्या तिघींना बघून रागिणी ढसाढसा रडायला लागली.
तिघींनीही जमेल तेवढे पैसे आणले आणि डॉक्टरला विनंती केली.


“डॉक्टर साहेब तुम्ही ऑपरेशन सुरू करा. आम्ही आता थोडे पैसे भरतो आणि पुन्हा पैशाची व्यवस्था करतो पण डॉक्टर प्लिज तुम्ही ऑपरेशनची तयारी करा.” रागिणी


डॉक्टरांनी तयारी सुरू केली.  काही वेळाने ऑपरेशन सुरू झालं.


दोन तासानंतर डॉक्टर बाहेर आले.


“ऑपरेशन व्यवस्थित झालंय, चोवीसतास काहीही सांगता येणार नाही. त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल.” डॉक्टर


“थँक यू डॉक्टर.” रागिणी


आनंदाची बातमी ऐकून सगळ्यांची काळजी मिटली. त्या थोडया रिलॅक्स झाल्या. चौघींनी  चहा घेतला.
“माझं नशीब बघ ना,आज माझ्या मैत्रिणी माझ्या जवळ आहेत मी त्यांना घरी नेऊ शकत नाही. आपली भेट झाली तीही अशा अवस्थेत.” रागिणी


“रागिणी उगाच काही बोलू नको. आणि कुठल्याही गोष्टीच टेन्शन घेऊ नको, आम्ही तुझ्या सोबत आहोत.” मेघा
चौघ्याही एकमेकींच्या गळयात हात टाकून बिलगल्या.


क्रमशः

🎭 Series Post

View all