काटेरी वाटेवरून चालताना... भाग 3

Nishane tichya hya nirnyala pathimba dila

काटेरी वाटेवरून चालताना… भाग 3


आधीच्या भागात आपण पाहिले की,


निशा आणि पायलची छान मैत्री झाली. निशाला भेटायला पायल तिच्या घरी गेली. निशा घरी नव्हती. तिच्या भावाने म्हणजेच सौरभने पायलला आत बोलावून नाश्ता आणि ज्यूस दिला.

ज्यूस मध्ये गुंगीची गोळी मिक्स करून दिली. त्यामुळे पायलला भुवळ आली. सौरभने याच परिस्थितीचा फायदा घेत तिच्यावर दुष्कर्म केले आणि काहीही न झाल्यासारखं चित्र उभ केलं. निशा आल्यानंतर तिची भेट घेऊन पायल निघाली.


आता पुढे,

पायल चालता-चालता थबकली. तिला काहीतरी विचित्र जाणवलं. तिच्या चेहर्‍यावरचे हावभाव बदलले. निशाने तिला विचारलं.


“काय झालं? तुला बरं वाटतं नाही आहे का? मी येऊ का सोडायला? एक काम कर तू दादा सोबत जा, तो सोडेल तुला.”  निशा काळजीने सगळं बोलून गेली.

पण पायलने नकार दिला. ती तिथून निघाली. पायल घरी गेली. फ्रेश व्ह्यायला बाथरूम मध्ये गेली तेव्हा तिला विचित्र काहीतरी जाणवलं. आपल्यासोबत काहीतरी घडलं असा तिला संशय आला. पण तिला कळत नव्हतं की तिच्या सोबत काय घडलं कारण ती या सगळ्यापासून अनभिज्ञ होती.


असेच दिवस पुढे सरकत होते. सगळ्यांचं छान चाललं होतं.

कॉलेजमध्ये धमाल-मस्ती, अभ्यास सगळं सुरू होतं. पायल हळूहळू सगळ्यांसोबत समरस होऊ लागली होती. एक दिवस कॉलेजमध्ये पुन्हा पायल तशीच हिरमसून बसलेली निशाला दिसली. निशा तिच्या जवळ गेली.


“काय झालं पायल? अशी का बसली आहेस? काही प्रॉब्लेम झालायं का?”

पायलने कागदावर लिहून दिले की,


“मला या महिन्यात पाळी आलेली नाही. मला खूप भीती वाटते आहे. काय करू? काही दिवस थांबू की डॉक्टरांकडे जाऊन बघू.”


पायलने लिहिलेलं निशाने वाचलं.


“पायल इट्स नॉर्मल, कधी कधी मागे पुढे होऊ शकतं. त्यात एवढं घाबरण्यासारखं काही नाही.” निशाने तिला समजवलं. 
पण पायलची अगतिकता बघून निशा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. निशाने डॉक्टरांना सगळं सांगितलं. त्यांनी टेस्ट करायला सांगितली. 


टेस्ट शब्द ऐकताच निशाला खूप राग आला.ती डॉक्टरांवर खूप चिडली.


“अहो डॉक्टर तुम्ही काय बोलताय? ती मुलगी आहे. तिचं लग्नही झालेलं नाही आहे. हे सगळं कसं शक्य आहे.”

“रिलॅक्स आपण फक्त  टेस्ट करतोय, जस्ट कुल डाऊन. डॉक्टर शांतपणे बोलले.


पायलने टेस्ट केली आणि दुर्दैवाने ती टेस्ट पॉझिटिव्ह आली.
पायल गर्भवती आहे यावर त्यांचा विश्वास बसेना. पायल आणि निशा दोघींसाठीही हा खूप मोठा धक्का होता. कारण हे सगळं विचारापलिकडचं होतं.


“पायल तुझा कुणी बॉयफ्रेंड आहे का?.” निशाने  काळजीने विचारलं.
पायलने रडत रडत नकारार्थी मान हलवली.


“मग कुणी केलं हे? कसं घडलं सगळं? कुणाचं बाळ आहे हे? पायल मला सगळं खरं खरं सांग.” निशाने तिला हलवून विचारलं. पण पायल काहीही न बोलता फक्त रडत होती.
पायलच्या घरी काय सांगायचं? कसं सांगायचं? हा खूप मोठा प्रश्न होता. या बाळाचे वडील कोण? हा त्याहून मोठा प्रश्न निर्माण झाला होता.


निशा आणि पायल हतबल होऊन निशाच्या घरी गेल्या.
निशाने आईला सगळं सांगितलं. काय करावं कोणाला सुचेना. 
खूप हिम्मत करून निशा आणि पायल पायलच्या घरी गेल्या. पायलच्या आई-वडिलांना सगळं सांगितलं. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. आपली मुलगी बोलू शकत नाही, त्यात आता हे सगळं घडलं. त्यामुळे पायलच्या आईला धक्काच बसला. ती जोरजोरात रडायला लागली.


“काय झालं माझ्या पोरीसोबत? हे कुणी केलं असेल? कधी झालं पोरी तू तरी सांग.?”


पायलची आई तिला विचारू लागली.


पण पायलला काहीच माहित नसल्यामुळे ती काहीच बोलू शकली नाही. सगळ्यांनी तिलाच दोष द्यायला सुरुवात केली. तिचं कॉलेजला जाणं बंद झालं. घरच्यांनी तिचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. पण पायल या गोष्टीला तयार नव्हती.


“कुणाचं का असेना, पण त्या निष्पाप जीवाची काय चूक? त्या निष्पाप जीवाचा बाप कोण आहे? हे मला माहित नाही पण तरीही मी त्या निष्पाप जीवाला मारणार नाही.” पायलने निर्णय घेतला.


निशाने तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. ती तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. पायलने कॉलेज जॉईन केलं. निशा कॉलेजमध्ये तिची काळजी घ्यायची. तीन महिन्याचा कालावधी गेला. पायलचं पोट दिसायला लागलं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर पायलला अवघडल्यासारखं व्हायचं.


कॉलेजमध्ये कुजबुज व्हायला लागली. सगळे तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होते, तिलाच दोषी ठरवत होते. या सगळ्याचा पायलला खूप मानसिक त्रास झाला आणि त्याचाच परिणाम अखेर पायलने कॉलेजच्या बिल्डिंगवरून खाली उडी घेतली. तो दिवस पायलच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला. निशासाठी  हे खूप भयानक होतं. निशाला सावरायला थोडा काळ जाऊ द्यावा लागला.


........................

सायलीकडे आज बघण्याचा कार्यक्रम ठरला. खरं तर सायलीची अजिबात इच्छा नव्हती.


“आई माझं कॉलेज तरी पूर्ण होऊ द्यायचं ना ग. हे मध्येचं लग्नाचं काय काढलस?” सायलीने आईला सांगितलं.


“सयु तुझं कॉलेज सुरूच राहणार आहे. अग आता फक्त दाखवण्याचा कार्यक्रम आहे. अगदी बघताक्षणी तुझं लग्न जमेल असं नाही ग आणि बाळा लग्न तर करावंच लागतं ना. तुझं शिक्षण अपूर्ण राहणार नाही.  लग्नानंतरही तू तुझं शिक्षण सुरू ठेऊ शकतेस. जा तयारी कर, छान साडी नेसून ये.” आईने सायलीला समजावलं.


सायली आत गेली. छान साडी नेसून तयार होऊन आली. तोवर पाहुण्यांचे आगमन झाले. सायलीच्या आई बाबांनी त्यांचं आदरातिथ्य केलं.


मुलगा, मुलाचे आई-वडील असे तिघे जण आलेले होते. सगळ्यांची ओळख झाली. सायली नाश्त्याची प्लेट घेऊन आली. तिच्या बाबांनी तिला त्यांच्या जवळ बसवलं. मुलाच्या बाबाने सायलीकडे बघून प्रश्न केला.


“नाव काय मुली तुझं?”
“सायली  प्रभाकर पेडणेकर”
“शिक्षण?”
“बी कॉम. द्वितीय वर्ष.”


“अच्छा, आमचा मुलगा एम.कॉम झालाय. उच्चपदावर नोकरीला आहे.” मुलाच्या वडिलांनी सांगितलं.
त्यावर सायलीचे बाबा बोलले.


“हो आमच्या मुलीला पण समोर शिक्षण घ्यायचे आहे. तिला पण नोकरी करायची इच्छा आहे.”


त्यावर लगेच मुलगा बोलला.
“पण मला नोकरी करणारी मुलगीच हवी आहे.”
“हो आमच्या मुलीचं शिक्षण पूर्ण झालं की तीही करेल की नोकरी.” सायलीच्या बाबा बोलले.


पण मुलाला आता नोकरी सुरू असणारी मुलगी हवी होती म्हणून त्याने सायलीला नकार दिला.


आई बाबांना थोडं वाईट वाटलं पण
सायलीला खूप बरं वाटलं. 


“आई अशी स्थळ आणत जाऊ नका. तो मुलगा काही मला समोर शिकू देणारा नव्हता. आई माझ्यासाठी माझं शिक्षण गरजेचं आहे त्याशिवाय आयुष्यात काहीच नाही ग.” सायलीने आईला सांगितलं.


“बरोबर आहे पोरी.” आईला तिची चूक कळली. त्यांनतर तो विषय काही काळासाठी बंद झाला.


...........….................

निशा हिरमसून खोलीत बसलेली, तिचा भाऊ सौरभ खोलीत आला.
“निशु किती दिवस घरी बसून राहणार आहेस. कॉलेज करायचं नाही आहे का तुला?” सौरभने तिला विचारले.
पण निशाने न ऐकल्यासारखं केलं आणि तशीच बसून राहिली.

दुसऱ्या दिवशी निशा पायलच्या म्हणजेच तिच्या सोडून गेलेल्या मैत्रिणीच्या घरी गेली.


“काकू आत येऊ?.”
“ये बेटा, आज इकडे कशी काय आलीस?”


निशा आत गेली. हॉलमध्ये लावलेल्या पायलच्या फोटोसमोर जाऊन उभी झाली. पायलचा तो हसरा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत होता. निशाच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली.
 निशा एकटक तिच्या फोटोकडे बघत होती. पायलची आई आली तिने निशाच्या खांद्यावर हात ठेवला.


तसाच निशाच्या अश्रूंचा बांध फुटला. ती ढसाढसा रडायला लागली.


“पोरी शांत हो, रडू नकोस. का इतकं मनाला लावून घेतेस? अग जे घडायचं ते घडतचं. त्याला कुणीही थांबवू शकत नाही. ते सगळं आपल्या हातात नसतं, सगळी देवाची इच्छा असते. कर्ताकरवीता तर तोच आहे.पण पोरी आम्हाला कुठे ना कुठे या सगळ्याची कल्पना होतीचं.” पायलच्या आईने निशाला शांत केलं.


पायलच्या आईच्या या वाक्यावर निशा अचंबित झाली.
“म्हणजे? तुम्हाला कल्पना होती याचा अर्थ काय?” निशाने आश्चर्याने विचारलं.


पायलची आई मात्र गप्प झाली.


क्रमशः

🎭 Series Post

View all