Aug 05, 2021
कथामालिका

काटेरी वाट...प्रेमाची !!! भाग - ३

Read Later
काटेरी वाट...प्रेमाची !!! भाग - ३
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

© मधुनिता

© सुनीता मधुकर पाटील

काटेरी वाट.....प्रेमाची !!! - भाग  ३

सुकृत दोन दिवसात परत येतो म्हणुन गावी गेला. सुरभि खुप खुश होती. ती एकटी कधी राहिली नसल्यामुळे दोन दिवस ही तिला एखाद्या युगा सारखे वाटत होते. मुकपणे वाट पाहण्यात ही एक मजा असते नाही. उद्याच्या सुंदर सोनेरी क्षणाची स्वप्ने रंगवत, कल्पनेच्या कुंचल्यानी मनभावक चित्र रेखाटतं सुरभि सुकृतची वाट पाहत होती.

दोन दिवसासाठी गेलेला सुकृत चार दिवस झाले तरी  परतला नव्हता. सुरभिला काळजी वाटत होती. असेल काहीतरी काम किंवा आईबाबांना समजावणे थोडं कठीण झालं असेल म्हणुन थांबला असेल, तिने स्वतःची समजूत काढून घेतली. तिने त्याला फोन केला असता त्याचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे असं सांगितलं जात होतं. काय करावं, गावी काय झालं असेल, आईबाबा समजुन घेतील का? तिला ते बाळासहीत सून म्हणून स्वीकारतील का? आशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनात दस्तक द्यायला सुरवात केली होती. 

वाट पाहणे किती जीवघेणे असते हे तिला आता कळतं होतं. एकटेपणा, वाट पाहणे म्हणजे कधीच न संपणारी अंधारी वाट असं तिला आता वाटू लागलं होतं. अगदी डोळे शिणले तरी मन काही ऐकत नव्हतं. खरे तर वाट पाहणेसुध्दा सुख देते. भविष्यकाळावर आंधळा विश्वास ठेवून उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्ने बघत वाट पाहणे म्हणजे प्राण कंठाशी येणे.

मनात शंका असताना केली जाणारी प्रतीक्षा जीवघेणी असते. प्रेम सुंदर, मोहक असते असे सुरुवातीला वाटत असते खरे पण नंतर लक्षात येते की ते अवघड आणि निर्दयीसुध्दा आहे. प्रेमाचे हे रूप सहन करणे, त्याच्या यातना सहन करणे खुप कठीण असते आणि याच यातना सुरभि अनुभवतं होती.

सुकृतला जाऊन आता जवळजवळ पंधरा दिवस होत आले होते. सुरवातीला त्याचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर तरी होता पण आता तर तो अस्तित्वातच नव्हता. सुरभिची जीवघेणी तळमळ, आपण आपलं मानलेलं माणुस आपलं नाही आणि सर्वस्व उजाडले गेल्याची जाणीव आणि फसवलो गेल्याची भावना तिचं मन पोखरत होतं. तिचं कशातच मन लागत नव्हतं. दिवसरात्र सुकृतचेच विचार. अजुनही तो परत नक्की येईल ही वेडी आशा होती तिला.

आंधळा विश्वास दाखवला होता तिने सुकृतवर आणि याच आंधळ्याविश्वासाने आज तिचा घात केला होता. त्याच्या कुठल्याच मित्राची माहिती तिला नव्हती. तो कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डर जवळील कुठल्यातरी गावात राहतो इतकंच तिला ठाऊक होतं. त्याच्या गावाचं नाव विचारण्याची तसदी देखील तिने कधी घेतली नव्हती. तिनेही कधी विचारलं नाही आणि त्यानेही स्वतः तिला कधी स्वतःबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला नाही.

वाट पाहुन हताश झालेली सुरभि शेवटी पोलिस स्टेशन गाठते. तिथे जाऊन ती सुकृतबद्दल सगळी माहिती पोलिसांना देते आणि त्याचा शोध घेण्यासाठी त्यांना विनंती करते.

" मॅडम तुम्ही तुमच्या मर्जीने घरातुन त्या पोरासोबत पळुन आलात, त्यात आता आम्ही काय करणार. तुम्ही सज्ञान आहात. चांगलं काय, वाईट काय हे पारखण्याची बुद्धी तुमच्याकडे आहे. आता तो तुम्हाला धोका देऊन पळुन गेला त्यात आम्ही काय करू. हा तुमच्या आपसातला मामला आहे तुमचं तुम्ही बघुन घ्या. आम्ही काहिही करू शकत नाही." म्हणत पोलीस तिला तक्रार न नोंदवताच माघारी पाठवुन देतात.

आता तर तिची उरलीसुरली आशा देखील मावळली होती. दोन महिने झाले त्याचा काही थांगपत्ता नव्हता. जवळचे पैसे संपले होते. दिवसभर वेड्यासारखी रस्त्यावर त्याला शोधत फिरायची. ना खानापिण्याची शुद्ध ना कपडेलत्त्याची. या दरम्यान तिला आईबाबांची आठवण सारखी छळत होती. तिच्या डोळ्यातील पाणी ही आता आटत चाललं होतं. आपण घर सोडून खूप मोठी चूक केली हे तिला आता कळलं होतं. 

घरी परत गेलो तर आईबाबा नक्की आपल्याला माफ करून घरात घेतील यात तिला काही शंकाच नव्हती पण घरी जाणार तर कुठल्या तोंडाने. खूप मोठा विश्वासघात केला होता तिने त्यांचा. घरी जाणे म्हणजे आपल्या कर्माची फळ त्यांना भोगायला लावण्यासारखे होते. आपल्यामुळे त्यांना जिवंतपणी नरक यातना भोगाव्या लागतील असे तिला वाटायचं. आईबाबांची मनातुन सारखी माफी मागत असे, " चुकले मी आई-बाबा मला माफ करा. " म्हणत ती ढसाढसा रडायची.

खुप वेळा तिच्या मनात आत्महत्येचा विचारसुद्धा डोकावून गेला, तसा तिने खुपदा प्रयत्न ही केला पण तिची हिम्मत कधी झाली नाही. तिला प्रत्येकवेळी आतुन तिच्या बाळाची आर्त साद ऐकू येई आणि मग हळवी होऊन ती बाळासाठी आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त होई.

एक दिवस घरमालक येऊन तिने दोन महिन्यांचं भाडं दिलं नसल्यामुळे तिचं सगळं सामान उचलुन बाहेर फेकून देतो. आणि तिचा हात पकडून तिला घराबाहेर ढकलून देतो. ती गयावया करत असते. मला थोडे दिवस इथे राहुद्या म्हणुन विनंती करत असते, त्याच्या पाया पडत असते. पण तो तिचं काही ऐकत नाही. आता तर तिच्या डोक्यावर छप्पर देखील उरलेलं नसतं.

पोटाला पोटभर अन्न नाही की अंगावर धड कपडे नाहीत. वेड्यासारखी रस्त्यावर बेचैन होऊन सुकृत...सुकृत म्हणत भटकायची. कधीतरी मध्येच उद्विग्नावस्थेत खिन्न मनाने आई म्हणुन मोठ्याने टाहो फोडायची तर कधी उगीचच पोटावरुन हात फिरवत एकटीच बडबडायची. येणाजाणाऱ्या लोकांचे चेहरे न्याहाळायची. प्रत्येक चेहऱ्यात ती सुकृतचा चेहरा शोधायची. तिची मानसिक स्थिती ढासळत चालली होती. कधी कोणीतरी वेडी समजुन दोन पैसे तिच्या पुढ्यात टाकायचे. कोणी काही दिलं तर दोन घास खायची नाहीतर अशीच उपाशी रहायची.

एकतर गरोदर आणि त्यात खाण्यापिण्याची आबाळ यामुळे दिवसेंदिवस ती अधिकच अशक्त आणि कृश होत चालली होती.

एक दिवस अशीच रोडवर भटकत असताना तिला सुकृतसारखा कोणीतरी मुलगा पाठमोरा दिसतो आणि ती हवालदिल होऊन त्याच्या पाठीमागे धावत सुटते. गाड्या, रोडवरील ट्राफिक कशाचीच पर्वा न करता त्याला हाका मारत पळतं असते आणि अचानक एका गाडीपुढे आडवी येते. तिला जोरदार धडक बसते, ती खाली कोसळते आणि बेहोष होते. तिच्या हाता-पायातून रक्त वाहत असतं. मुका मारही भरपूर लागलेला असतो.

प्रेमभंगाच दुःख पचवणं अवघड असतं, ते प्रत्येकालाच जमतं असं नाही. विरहाचा दुःख पदोपदी छळतं असतं. मनातील स्पंदणाचे काहुर ऐकायला कोणीच नसतं. स्पदंनाचेे बंधन क्षणात तोडुन तो गेला होता तिला एकटीला काटेरी वाटेवर सोडून !!! एकलेपणात सार भान हरपलं होतं तिचं. त्याच्या आठवणीचां विंचू रोज तिला डंक मारायचा. तिचे  प्राण त्याच्यात गुंतले होते. त्याच्या विरहाचं गाणं आता तिला रोजच लिहायचं होतं तिच्या आसवांनी. त्याच्या विरहात तिला एकटीनेच चालायचे होते प्रेमाच्या काटेरी वाटेवर जीवनभर !!!

पुढे सुरभि सोबत काय होणार ? सुकृत परत येईल का ? ती पुन्हा नव्याने जीवनात उभी राहू शकेल का ? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे पाहुयात पुढील भागात.

क्रमशः

© सुनिता मधुकर पाटील.

Copy right 

All right reserved.

कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासहित शेअर करावी. 
साहित्यचोरी हा एक गुन्हा आहे.

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sunita Madhukar Patil

Self employed

I seem like a strict soul.... Yet I am a child at heart.... In my mind thoughts take a stroll.... And reach out in the form of an art....????