कस्तुरी भाग ४

मुलांच्या भविष्यासाठी आई-वडीलांनी त्यांना दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला तो अगदी योग्य होता असे मुलांची शाळेतील प्रगती पाहून आई-वडीलांना वाटले.
कस्तुरी
भाग..४)

दिवसभर आपले पडलेले चेहरे घेऊन तिघा भावांनी आपापल्या बॅगा भरल्या. पण अधून मधून आईकडे पळत जाऊन तिच्या पदरात तोंड खुपसून रडत होते. आईला आपल्याला न लावून देण्यासाठी विनवण्या करत होते. पण आईपण यावेळी थोडी कठोरच झाली होती.खरे म्हणजे तिचे अंतर्मन आतून रडत होते पण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तिला हे पाऊल उचलावे लागले होते.

रुपा पण आपली भावंडे रडत आहेत हे पाहून रडू लागली. तिच्याकडे पाहून ," तू का रडतेस ? तुला तर आनंद व्हायला हवा. आम्ही जाणार न दुसऱ्या शहरात. आता काय तुझेच राज्य." असे म्हणत हे तिघे भाऊ.तिला मारायला जाऊ लागले.हे पाहून रुपा घाबरून जाऊन आईला बिलगुन उभी राहिली.

जड अंतःकरणाने आई आपल्या मुलांना रेल्वे स्टेशनवर घेऊन आली. तिला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हे पाऊल उचलावे लागले होते. रुपा पण आपल्या आईचा हात धरून उभी होती. रेल्वे सुरू झाली.," हे बघा बाळांनो तिथे जाऊन इथल्या सारखे दंगामस्ती भांडणं करत जाऊ नका. अभ्यासात लक्ष केंद्रित करा. तुमच्या बाबांचे स्वप्न पूर्ण करा." असे म्हणत आईने तिघांच्या डोक्यावरून हात फिरवला. मुलांनी भरलेल्या डोळ्यांनी आईचा निरोप घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी हे तिघे आपल्या वडिलांबरोबर शहरात पोहोचले. तिथे रेल्वे मधून उतरून स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीने शाळेत प्रवेश घेण्यासाठी निघाले. टॅक्सी मधून बाहेर शहरातील मोठमोठ्या इमारती बघून तिघेजण खुप खुश झाले. मोठमोठी दुकाने,हाॅटेल्स पाहून मनात म्हणू लागले, \"बरे झाले इकडे आलो आपण. किती मोठं शहर आहे. इथे कुठेही कितीही खेळलो तर कोणाला कळणार आहे.\" हे तिघे भाऊ आपल्या मनात आनंदाने मनोरे रचत होते.

एका मोठ्या शाळेच्या इमारतीसमोर टॅक्सी थांबली.," लो साब आ गया स्कूल."
" चला रे आपापल्या बॅगा घ्या." वडील म्हणाले.
शाळेच्या बाहेर शिपाई उभा होता. त्याला रुपाच्या वडिलांनी आपण नवीन प्रवेश घेण्यासाठी आलो आहोत असे सांगितले. हे ऐकून त्याने शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे त्यांना नेले.
मुख्याध्यापिकांनी या तिघांचे रिपोर्ट कार्ड बघितले.," हुं .तर यांना इथे प्रवेश हवा आहे का? पण इथे प्रवेश घ्यायचा तर मार्क चांगले हवेत. आमच्या शाळेचे नियम आहेत. हुशार मुलांनाच आम्ही प्रवेश देतो. तुमच्या मुलांची गुणवत्ता इतकी चांगली नाही आहे.कसा काय इथे प्रवेश मिळेल यांना..!"

" मॅडम काही पण करा पण प्लिज यांना इथे प्रवेश द्यावा. मी खूप लांबून आलो आहे. तुमच्या शाळेची ख्याती ऐकून. इथे मुलांना शिक्षणाच्या बाबतीत अगदी डोळे झाकून विश्वास ठेवावा असे शिक्षण आपण देतात हे मला खूप जणांनी सांगितले म्हणून मी इथे आलो आहे. आशा आहे निराशा होणार नाही."

" ठिक आहे पण यांची पूर्व परीक्षा घेतली जाईल. जर हे तिघे पास झाले तर यांचा प्रवेश निश्चित."

रविवारी यांची परीक्षा होणार होती. या तीन दिवसांत त्यांचा अभ्यास पुरेपूर घेण्याची जवाबदारी वडिलांनी आपल्यावर घेतली. बापलेक शाळेजवळील एका हाॅटेलमध्ये राहायला गेले.
" हे बघा पोरांनो हा तुम्हाला शेवटचा चान्स देत आहे मी. आता जर तुम्ही मन लावून अभ्यास केला नाही आणि या परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाले नाहीत तर तुम्हाला मी इथेच रिमांड होम मध्ये टाकेन. तुमच्याबरोबर कायमचे नातेच तोडून टाकेन. मग बसा हमाली करत रेल्वे स्टेशनवर.आता माझ्या समोरुन जर हलललात तर एकेकाचे तांगडे तोडेन.मी अभ्यास करून घेतो तुमचा. मुकाट्याने बसा माझ्या समोर. आता तुम्हाला वाचवायला तुमची आई नाही समोर याद राखा." असे जरा कठोरपणे वडिलांनी सांगितले. हे ऐकून तिघेजण घाबरून जाऊन वडिलांसमोर गरीब गायीसारखे बसले आणि वडिल जे शिकवतील ते मन लावून अभ्यास करायच्या प्रयत्न करु लागले.

रविवारी तिघांची परीक्षा झाली. दुसऱ्या दिवशी निकाल आला. हे तिघे थोड्या का होईना पण कमी मार्क घेऊन पास झाले. शेवटी कसेबसे करून वेळप्रसंगी मुख्याध्यापिकांच्या पाया पडून तिघांना त्या शाळेत प्रवेश मिळाला.शाळेचेच वसतिगृह होते. तिथे यांचे साहित्य ठेवून दिले. तिघा मुलांना व्यवस्थित राहून फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायचे वचन घेऊन वडिल आपल्या घरी परत फिरले.

घरी आल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला मुलांना शाळेत प्रवेश मिळाला आता खरोखरच आपली काळजी मिटली. दर तीन महिन्यांनी आपण जाऊन त्यांना भेटून येऊ असे सांगितले. हे ऐकून आईने साखर देवासमोर ठेवली आणि मनोमन प्रार्थना केली," देवा परमेश्वरा माझी चारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये. चौघेही चांगले शिक्षण घेऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ दे."

आता रुपाची पण शाळा नियमितपणे सुरू झाली होती. आपली चारी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जितकी मेहनत घेता येईल तितकी मी घेणार या जिद्दीने रुपाचे वडील आपल्या फॅक्टरी मध्ये रात्रंदिवस काम करत होते.फॅक्टरीमध्ये त्यांच्या हाताखाली काम करत असलेली मंडळी पण त्यांना मनापासून काम करण्यासाठी मदत करत होती. फॅक्टरी मध्ये मी मालक आहे माझेच ऐकावे मी म्हणेन तसेच करावे अशा अटीतटीची भाषा कधीच न वापरल्यामुळे फॅक्टरी मध्ये खेळीमेळीचे वातावरण असायचे. कोणाला कधीही कसलीही गरज भासली तर जो तो आपापल्या परीने त्याला मदत करण्यासाठी धाव घेत होते. सर्व जण एक परिवार आहोत असेच रहायचे. फॅक्टरी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा पन्नास टक्के खर्च रुपाचे वडील आपण स्वतः देत असत.\"मालक नाही तुम्ही देवता आहात \" असेच त्यांना सर्व कामगार म्हणायचे.

आता तिघेही मुले मनलावून शाळेत अभ्यास करु लागले. सुट्टी मध्ये घरी आल्यावर आता ते शहाण्या मुलासारखे वागत होते. त्यांच्या मध्ये खूप सुधारणा झाली होती.बघता बघता तीन वर्षे पूर्ण झाली.तिघांचे प्रार्थमिक शिक्षण पूर्ण झाले.मुलांनी चांगल्याप्रकारे अभ्यास करून चांगले मार्क्स घेऊन आपापल्या वर्गात पहीला नंबर पटकावला. मुलांचे यश पाहून आई-वडीलांना आनंद झाला .\" आपण त्यांच्यासाठी घेतलेला निर्णय योग्यच होता असे वाटले.आता पुढचे शिक्षण पण असेच मन लावून अभ्यास करून पूर्ण केले तर त्यांचे आयुष्य बदलून जाईल .\"असे मनात दोघेही म्हणत होते.

सारे काही सुरळीत सुरू होते. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात हे दोघे व्यस्त होते. मोठा मुलगा दहावीत,दुसरा आठवीत,तिसरा सहावीत आणि रुपा चौथी इयत्तेत शिकत असताना नियतीने आपला डाव साधला.त्या रात्री उशिरापर्यंत फॅक्टरी मध्ये काम करत असताना अचानक जोरदार हवा सुटली आणि हवेचे रुपांतर वादळात कधी झाले हे कळलेच नाही. वादळाने एकदमच रौद्र रूप धारण केले. मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विजा कडाडू लागल्या आणि एक विज जोरात कडाडून फॅक्टरीवर पडली . संपूर्ण फॅक्टरी विजेच्या धक्क्याने जळून नष्ट झाली यामध्ये रुपाचे वडील आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे सगळे कामगार जागेवरच मृत्यू पावले.अगदी एका क्षणातच होत्याचे नव्हते झाले. कोणाला कळायच्या आतच सर्व काही धुळीस मिळाले. कोण कोणाला मदतीस धावून जाण्याची वेळ पण या नैसर्गिक आपत्तीत मिळाली नाही. आता शिल्लक राहीलेले होते ते म्हणजे फक्त आणि फक्त धगधगत्या आगिच्या डोहातून बनलेले राखेचे डोंगर आणि त्यामध्ये जळलेल्या देहांच्या हाडाचे जळके सापळे.

अगदी मन हेलावून टाकणारे भयंकर दृश्य .

क्रमशः
©® परवीन कौसर

🎭 Series Post

View all