कस्तुरी भाग.८

माजी विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भाषणे झाली. ती भाषणे ऐकून रुपाला पण आपण ही असेच शिकून मोठे व्हावे असे वाटले.


कस्तुरी
भाग..८

सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत झाले . सर्वांचा परिचय करून देण्यात आला. सर्व शिक्षक कौतुकाने आपल्या माजी विद्यार्थ्यांना बघत होते. त्या विद्यार्थ्यांना आपण जेव्हा समजावून शिकवत होतो वेळप्रसंगी मार पण दिला होता तेव्हा ती लहान मुले आज इतक्या उंच आकाशात झेप घेतली हे पाहून नकळतच त्यांचे डोळे पाणावले होते. या मुलांमध्ये कोणी खोडकर मुले पण होती पण आज त्याच मुलांमध्ये खूप शहाणपण आले होते. एकंदरीतच सर्व जण आपल्या भूतकाळात गेले होते.

सर्वांना आपले मनोगत व्यक्त करायला सांगितले.आता एकेक करून सर्व जण आपापले आपापल्या शाळेच्या आठवणी त्यानंतर आपले अनुभव जे आपण शिक्षणासाठी कसे धडपडलो कोणी कसे केव्हा अभ्यासात मदत केली . किती तरी चढ उतार पाहिले. किती वेळा घसरण झाली पण तरी देखील न घाबरता न डगमगता पुढे पुढे चालत गेल्यावर हवे होते ते उंच शिखर गाठले. अशी प्रेरणादायी भाषणे सर्वांनी केली. सर्वात आधी आपण काय होणार आहोत याचा विचार न‌ करता आपण काय होऊ शकतो या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे आणि आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी जितके लागतील तितके परिश्रम करावे. आपले ध्येय एकच असते .ते जर आपण पूर्ण नाही केले तर काय फायदा न.असे सर्व जण सांगत होते.

सर्वांचे प्रेरणादायी भाषणे झाली . रुपा अगदी मन लावून सर्व ऐकत होती. आता सरांनी माईक आपल्या हातात घेतला आणि म्हणाले," मुलांनो तुम्हाला काही शंका, काही प्रश्न आहेत का विचारायचे ? विचारू शकता तुम्ही. ज्याला विचारायचे आहे त्याने हात वर करा माईक तिथे देण्यात येईल."

यावर एकेक करून मुले हात वर करु लागली. जो तो आपल्या मनातील शंका, प्रश्न विचारू लागले. त्यांच्या सगळ्या शंकांचे निरसन करून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना जो तो अगदी उत्साहात होता. याचबरोबर आपल्या काही गोड कटू अनुभव पण सांगत होते.

रुपाच्या मनात स्टेजवर बसलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना पाहून ,\" मी पण अशीच पुढे चालत जाईन का ? माझी पण अशीच प्रगती होईल का ? माझे शिक्षण पूर्ण होईल का ? माझी पण अशा मोठ्या पदावर नियुक्ती होईल का ?\" अशा एक ना अनेक प्रश्नांनी डोक्यात काहूर माजवत होते.नकळतच तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या . तिने हळूच कोणी पहायच्या आत आपल्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा अलगद पुसल्या . पण तिचे पाणावलेले डोळे तिची मैत्रिण नेहा आणि तिचे वर्ग शिक्षकांपासून लपले नाही .

" आता मी स्टेजवर येण्यासाठी रुपाला आमंत्रित करत आहे . आपल्या शाळेतील एक हुशार आणि कर्तबगार मुलगी. जी आपल्या आई आजीची सेवा करत आपला अभ्यासपण अगदी व्यवस्थित करते आणि वर्गात पहिल्या नंबरने पास होते. रुपा ये बाळा ." सरांनी अनाउन्समेंट केली. रुपा हे ऐकून एकदम दचकलीच . \" अरे....! मी...!...मला...! सर ...!\"
" हो हो ये बाळा." सरांनी पुन्हा एकदा म्हटले.

रुपा घाबरत घाबरत स्वतः ला सावरत सावरत स्टेजवर हळूहळू चढत गेली.

सरांनी रुपाच्या हातात माईक दिला आणि म्हणाले ," रुपा तू जो विचार तिथे बसून करत होती तोच विचार इथे सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न कर . घाबरु नकोस बाळा ‌. हे सर्व तुझे दादा , ताईच आहेत . बोल तू बिनधास्त ."

रुपाने माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली " आज मी आपणा सर्वांचे अनुभव आपले विचार आपली मते ऐकली. आपल्या सर्वांच्या प्रेरणादायी भाषणे ऐकून मला देखील तुमच्या सारखे पुढे खूप शिकण्याची इच्छा आहे . पण...! माझेही स्वप्न आहे मी देखील अशीच शिकून मोठ्या पदावर कार्यरत व्हावे . माझ्या शिक्षणासाठी माझे दादा आज खूप काबाडकष्ट करतात त्यांच्या कष्टाचे चीज झाले असे म्हणता येईल . आई आमची आजारी असते तिला उत्तमोत्तम डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊ. आमच्या बाबांची फॅक्टरी जी नैसर्गिक आपत्तीत गेली ती पुन्हा नव्याने उभी करुन दोन्ही लहान भावंडांच्या हाती सुपूर्द करु देऊ.यासाठी लागतील तितके कष्ट घेण्यासाठी मी तयार आहे. असलेला अभ्यास पण मनःपूर्वक करून मी सर्व परीक्षा उत्तीर्ण होईन पण....! हा पण...! माझ्या आयुष्यात पडलेले एक कटू सत्य आहे. पण...! मला पुढचे शिक्षण पूर्ण करण्यास मिळणे कठीणच आहे." म्हणता म्हणता रुपाला हुंदका फुटला ती रडू लागली.

तिला तिथे असलेल्या एका माजी विद्यार्थ्यांनींने आपल्या जवळ घेतले आणि तिचे डोळे पुसत म्हणाली," राणी तुझ्या डोळ्यात हे अश्रू बरे वाटत नाहीत ‌. बघं बरं या टपोऱ्या डोळ्यात किती स्वप्ने तराळत आहेत ‌. अगं तुझ्या सारख्या हुशार मुलींची तर गरज आहे आपल्या देशाला. तू काही काळजी करू नकोस. तुझे पुढील शिक्षण आम्ही सर्व जण मिळून पूर्ण करणार . आणि तू तुझी स्वप्न पूर्ण करण्याची तयारी करून घे . " हे ऐकून रुपाने एकदम त्यांच्या पायावर हात ठेवले तोच तिने तिला तशीच उभी करून आपल्याबरोबर गळाभेट घेतली आणि म्हणाली," अगं पाया काय पडतेस . तू माझी धाकटी बहीण आहेस तू मला गळाभेट द्यायची. हक्काने माझ्या गळ्यात पडून जे हवं ते सांगायचं. वेडू बाई. हे बघ माझे नाव नीता आहे. सर्व जण मला नीतू म्हणातात. आजपासून मी तुझी नीतू ताई." असे म्हणत नीताने रुपाचा गोड गालाचा पापा घेतला.

हे सर्व बघून नेहाने आनंदाने जोरजोरात टाळ्या वाजवल्या. "रुपा तू आता खरंच खूप प्रगती करणार. अभिनंदन गं रुपा. आता तर खरेच माझ्या डोळ्यासमोर ते सर्व दृश्य दिसत आहेत. तुझे स्वतःचे केबीन आहे तिथे एका मोठ्या खूर्चीवर अगदी रुबाबात तू बसलेली आहेस. म्हणजे सिनेमात दाखवतात न ग तसेच . एकदम भारी ग. पण रुपा तेव्हा तू मला ओळख दाखवशील न ग ." नेहा बोलत होती.
" चल काय तरी काय बोलतेस तू नेहा. अगं इतकं सोपं आहे का हे सगळं. " रुपा म्हणाली.
" का नाही होणार रुपा. माझे मन सांगते की हे नक्की होणार . तू खूप खूप यशस्वी होणार . तू खूप मोठी होणार रुपा...! चल जरा हास बघू. इतक्या सुंदर चेहऱ्यावर असे शून्य भाव चांगले दिसत नाही गं माझी राणी .....!" असे नेहा रुपाचा हात आपल्या हातात घेत म्हणाली.

तोच
" हुं...! काय तरी अभिनंदन. काय केले म्हणून अभिनंदन या भिक्कारड्या मुलीचे. आणि हो या नीता की नीतू ताई कोण त्या आज आहेत उद्या कुठे येणार आहेत का परत . हा..हा..हा..खूप मोठा विनोद झाला आहे आज कार्यक्रमात...!" असे म्हणत कामिनी टाळ्या वाजवून जोरजोरात छद्मी हास्य करत होती.तिच्या हास्याचे पडसाद रुपाच्या कानावर कानठळ्या बसतील असे वाटत होते. रुपाने एकदमच आपले दोन्ही हात आपल्या कानावर ठेवले आणि आपले डोळे घट्ट मिटून घेतले .


" ताईसाहेब उठा की . बघा की केव्हाचा घड्याळाचा गजर होतो आहे. रात्री वेळाने झोपला होता की काय ? अजून उठला नाही ते. चला केव्हाची मी वाट पाहतेय . तुम्ही उठलात की गरमागरम चहा आणि पोहे करायचे. रात्री न जेवताच झोपला न तुम्ही . लवकर निघायचे आहे न आपल्याला. तुमच्या बॅगा व्यवस्थित भरून घेतल्या न ?" शांतामावशीच्या आवाजाने रुपा एकदम दचकून जागी झाली.

क्रमशः

©® परवीन कौसर...

🎭 Series Post

View all