Login

कस्तुरी..भाग ७

गोष्ट अलवार प्रेमाची


लग्नाला आठ महिने झाले होते. दोघे कुठेही फिरायला गेले नव्हते त्यात विजयच्या आई पाय घसरुन पडल्याने महिनाभर बेडरेस्ट वर होत्या. कस्तुरी स्वतः जातीने लक्ष देत होती त्यांच्याकडे. कस्तुरी बायको म्हणून राहिली नसली तरी सून म्हणून तीच आणि आईच नात खूप छान होत. बाहेर एकत्र गेल्या की अनोळखी माणसांना वाटणार नाही या दोघी सासू सूना आहेत ते.
***********
"विजय..बाबांनी अस अचानक जेवायला का बोलावलं आहे काही माहीत आहे का तुला?" गाडीत लावलेल्या गाण्याचा आवाज थोडा कमी करत कस्तुरीने विचारलं.

"नाही, म्हणजे मला काही बोलले नाही ते. ऑफिसमधे घरच्या गोष्टी बाबांना विचारायला मला आवडत नाहीत म्हणून मी तिकडे सुद्धा काही विचारलं नाही." विजय बोलला.
कस्तुरी गाणं ऐकता ऐकता सारखी विजयकडे बघत होती. तिरक्या नजरेने विजयने हे पाहिलं होत.

"काही बोलायचं आहे का?" विजयने विचारलं.

"ते..मगाशी मी पाहील..तुझ्या डोळ्यात पाणी होत. का? म्हणजे सहज विचारते. सांगायचं असेल तर सांग." कस्तुरी बोलली

"एवढ्या महिन्यात पहिल्यांदाच तुला इतक्या जवळून पाहील होत. कदाचित मी अजूनही तुला आवडत नसेन या विचाराने डोळ्यात पाणी आल." त्याने उत्तर दिलं आणि ब्रेक दाबून कार जागीच उभी केली.

ती त्याच्याकडे काहीच न बोलता एकटक बघत होती आणि तो निर्विकारपणे समोर बघतच बोलला \"घर आल\". तशी ती गडबडून खाली उतरली.

घरी पोचल्यावर सगळ्यांना भेटून.. सगळ्यांशी गप्पा मारत जेवणं उरकली.

"आज्जी, काय ग तू फिरत नाहीस का हल्ली. उठताना सारखी गुडघे धरून उठत असतेस ती. चल आपण बाहेर एक राऊंड मारून येऊ." कस्तुरी बोलली.

"जा बाई जा..तुझ तरी ऐकतात म्हणून नशीब आमचं. आम्ही किती गळा काढून बोललो तरी त्यांना ऐकू जातच नाही." शालिनी ताई बोलल्या.

कस्तुरी आज्जी सोबत बाहेर आली.

"बोल, काय झालं?" आज्जीने विचारलं

"तुला कसं कळलं मला काही बोलायचं आहे ते!" कस्तुरीने आश्चर्याने विचारल.

"आज्जी आहे तुझी. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत. बोल आता काय झालय?" आज्जी

"आज्जी..म्हणजे..ऐक ना मी जे बोलेन ना ते आपल्या दोघींमध्ये ठेव हा. आईला यातलं काहीच बोलू नको बर." कस्तुरी

"नाही सांगणार बोल." आज्जी

"आज्जी..आमच्या लग्नाला आठ महिने झाले पण मी अजूनही विजयला स्वीकारू शकले नाही. मी स्वतः या लग्नाला तयार झाले होते पण मी त्याची बायको नाही होऊ शकले. आज्जी.. तो माझ्यासाठी खूप करतो. बाबांनी खरच खूप चांगला मुलगा शोधला माझ्यासाठी पण मला भीती वाटते की.. मी त्याच्याजवळ गेले आणि त्याला काही चुकीचं वाटल तर? म्हणजे मी फालतू मुलगी आहे वैगरे अस काही. आज तर माझ्यासाठी त्याच्या डोळ्यात पाणी होत आज्जी. मी त्याला मगाशी विचारलं तेंव्हा मला बोलला की आज पहिल्यांदा त्याने मला इतक्या जवळून पाहिलं होत म्हणून डोळ्यात पाणी आल. मला खूप अपराधी वाटल ग आज्जी." कस्तुरी बोलली

"बाळा.. सगळ्यात आधी तर अपराधीपणाची भावना डोक्यातून आणि मनातून काढून टाक. तूच बोललीस ना विजय खूप चांगला मुलगा आहे मग एक काम कर आता तू लगेच निघ आणि कुठेतरी शांत ठिकाणी गाडी थांबवून त्याचशी बोलून घे. मला सांग..विजय तुला आवडायला लागला आहे का?" आज्जीने विचारलं.

"हो आज्जी." काहीशी लाजत आणि हसतच कस्तुरी उत्तरली.

"तुझ्या मनातल त्याला बोलून दाखव आज. विजय थोडा अबोल आहे. त्याला तुझ्या मनातल सांगून तो आनंद दे..ज्याची तो वाट बघतोय. त्याच तुझ्यावर किती प्रेम आहे हे त्याच्या डोळ्यात आणि त्याच्या वागण्यात दिसून येत आता तुझी वेळ आहे." आज्जी बोलली.

दोघीही आत आल्या. कस्तुरीने निघायची गडबड केली. सगळ्यांना भेटून दोघेही निघत होते. विजय आज्जीच्या पाया पडायला खाली वाकला. आज्जीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत सगळ्यांच्या नकळत त्याच्या हातात एक छोटी डब्बी दिली. तुझ्या बायकोला दे आज. मंद स्मित करत त्या बोलल्या.
दोघेही सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले.
कस्तुरीचा बदललेला मुड विजयच्या लगेच लक्षात आला.

"आईबाबा आणि आज्जीना भेटून आज खूपच आनंद झालेला दिसतोय." विजय

"हो, कारण मला आज माझं मन गवसल आहे." काहीशी लाजतच ती बोलली आणि गाडीबाहेर हात काढून चांदण्या रात्रीचा आनंद घेत होती ती. वाऱ्याने उडणारे तिचे केस सावरण्याचा तिचा प्रयत्न तो मधून मधून पाहत होता आणि तिचा तो अवखळ पणा पाहून तो ही खुश होत होता.

"थांबव थांबव..." एका ठिकाणी गणपतीचं मंदिर पाहून ती अक्षरशः ओरडलीच..
त्याने घाबरतच करकचून ब्रेक दाबला.

"आपण मंदिरात जाऊया.." कस्तुरी

"आता? त्यापेक्षा सकाळी येऊया.

"नाही, आत्ताच जायचं आहे आणि तिकडे बघ कुल्फिवाला पण आहे. मला खूप आवडते. प्लीज प्लीज..

एवढ्या महिन्यात पहिल्यांदा तिने त्याच्याजवळ हट्ट केला होता. त्यालाही तो हट्ट मोडवला नाही.

दोघेही मंदिरात गेले. बाप्पाच दर्शन घेतल आणि तिथेच एका बाजूला दोघेही बसले.

"विजय.. मला तुझ्याशी बोलायचं आहे." कस्तुरी त्याचा हात हातात घेत बोलली.

तिच्या अशा अचानक हात पकडल्याने तो गोंधळला आणि ती पुढे काय बोलणार आहे त्याकडे कान देऊन बसला.

क्रमशः
@श्रावणी लोखंडे.

🎭 Series Post

View all