कस्तुरी भाग ५

आपल्या भावंडांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठ्या भावाने आपल्या शिक्षणाला पूर्ण विराम दिला.


कस्तुरी

भाग...५)

अचानक आयुष्यात आलेल्या इतक्या मोठ्या संकटामुळे रुपाच्या आईच्या डोक्यावर परिणाम झाला. ती जागच्याजागी स्तब्ध होऊन बसली. तिची वाचा जवळजवळ गेलीच आणि ती एकदमच हसायला लागली. नंतर ती रडायला लागली. तिला असे काय होतं आहे हे मुलांना काही कळतच नव्हते. चौघेही आपल्या आईजवळ जाऊन ," आई...! ये आई....! बघं न इकडे...! बोल न आमच्या बरोबर. आई गं ये आई....! " असे म्हणत जोरजोराने रडू लागली. पण मुलांच्या रडण्याने आई जरा देखील सावरु शकली नाही ‌ ती जशीच्या तशी मुर्ती सारखी शून्य नजरेने पाहत बसली.हे दृश्य पाहून जमलेल्या लोकांनी आपापल्या डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

इतक्यात शेजारच्या आजी रुपाच्या आईच्या अशा वागण्याने मुलांवर काय परिणाम होईल हा विचार करुन रडत रडतच येऊन साऱ्या मुलांना आपल्या जवळ घेतले. मुलांच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली," बाळांनो काय ही वेळ आली रे तुमच्यावर. कालचे हसते खेळते घर आज स्मशान भूमी झाले आहे. कोणाची तरी दृष्ट लागली रे बाळांनो .पण तुम्ही काही काळजी करू नका मी आहे तुमच्यासोबत.चला मी घरी जाऊन आमटी भात बनवते तुम्ही या जेवायला." असे म्हणत आपल्या बरोबर मुलांना आपल्या घरी घेऊन गेली.मुले जेवण्यासाठी तयार नव्हती पण जबरदस्तीने आजीने सर्वाना भात आमटी जेवायला लावले.
" बाळांनो हे एक मोठे संकट आले आहे आणि यातून निश्चितच मार्ग निघणार पण तुम्ही घाबरून जाऊ नका. आपण करु काही तरी. आज पासून मी तुमची आजी आहे. तुम्हाला जे काही आणि जेव्हा ही लागेल ते माझ्या जवळ मागत जा. मी आहे तुमच्या सोबत." असे आजी या चौघांना समोर बसवून बोलत होती‌.

रुपा जरी सर्वात लहान होती पण आपल्यावर उद्भवलेल्या प्रसंगामुळे ती घरात सर्वांपेक्षा मोठीच झाली. सकाळी लवकर उठून आईला शेजारच्या आजींना सोबत घेऊन कशीबशी आंघोळ घालायची. आईची आंघोळ झाल्यावर आजीकडून भात आमटी बनवायचे शिकून ते बनवू लागली. तिचे भाऊ पण आपल्या शाळेतून दाखला काढून आणून घराजवळच्या शाळेत प्रवेश मिळविला. रुपा पण आपली घरची कामे करून शाळेला जाऊ लागली.

शाळा, घरकाम ,आईची सेवा अगदी मनापासून करणारी लेकरे बघून आजीच्या डोळ्यात पाणी यायचे.ती मनात देवाचा धावा करत म्हणायची,\" देवा परमेश्वरा का अशी परीक्षा घेत आहेस तू या लेकरांची. काय पाप केले रे या पोरांनी तुझे म्हणून अशी कठोर शिक्षा करत आहेस यांना. बालपण सारे कोमेजून गेले न रे देवा यांचे. आता तर मला प्रश्न पडला आहे की तू खरंच आहेस का ? की उगीचच आम्ही दगडाला पूजतो आहोत .जरा तरी मुलांकडे बघ रे बाबा तू. बघं त्यांचे ते निरागस चेहरे ते हरवलेले बालपण परत कर त्यांचे.\" असे मनात म्हणत डोळ्यांना पदर लावून हळूच आपले डोळे पुसायची.

कसेबसे एक वर्ष पूर्ण झाले.आता पुढच्या वर्षासाठी शाळेसाठी फी कशी अन् कोठून आणायची हा यक्षप्रश्न आ वासून मुलांसमोर उभा राहिला.फॅक्टरी जळाली आणि आई अशी वेडी झाली यामुळे या मुलांना आपल्या आई-बाबांनी भविष्य निर्वाह निधी कुठे आणि किती ठेवली आहे हे कळायला मार्ग नव्हता. कपाटात आईचे दागिने होते पण त्याचे आता काही करु नका असे त्या आजींनी बजावले होते.थोडे फार पैसे होते ते आईच्या औषधाला खर्च केले होते.

मोठ्या भावाचा दहावीचा निकाल लागला. तो बऱ्या पैकी मार्क घेऊन पास झाला होता.आता पुढील शिक्षण पूर्ण करायचे तर फीसाठी भरमसाठ पैसे लागणार आणि आपल्या शिक्षणासाठी पैसे कुठून तरी आणले तर ते फेडायचे कसे ? यानंतर पाठोपाठ हे दोघे भाऊ पण दहावी पास होतील मग त्यांचे शिक्षण ....! इतका खर्च पैसे आणायचे तरी कोठून ? या प्रश्नाचे एकच उत्तर म्हणजे आपण शिक्षण इथेच बस करायचे आणि कुठेतरी छोटीमोठी नोकरी करायची . आपल्या पगारामध्ये आपल्या भावंडांचे शिक्षण पूर्ण करायचे असा मनाशी पक्का निश्चय करुन त्याने शाळा बंद करून कुठेतरी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या ओळखीचे एक सद्गृहस्थ होते त्यांना भेटून एका दुकानात काम मिळविले.त्याच्या पाठोपाठ या दोघा भावांनी पण शाळा सुटली की संध्याकाळी दोन तीन तास साड्यांच्या दुकानात जाऊन काम करायला सुरुवात केली.

तिघे भाऊ महीनाभर काम करत कमवू लागले. आता रुपाने पण पाचवी इयत्ता चांगल्या मार्काने पास केली. तिने आपल्या भावंडांचे होणारे कष्ट पाहून पुढचे शिक्षण पूर्ण न करण्याचा निर्णय घेतला. हे ऐकून तिची मैत्रीण नेहा रडायला लागली. ," नको न ग शाळा सोडू रुपा. आपण दोघी खूप मन लावून अभ्यास करुया . तुला काही हवं असेल तर मला सांग. मी माझ्या आईला सांगेन. ती तुला आणून देईल ग. पण खरंच ग तू शाळा सोडू नकोस गं." नेहा रडत रडत म्हणाली.
" अगं नेहा माझे तिघे भाऊ दिवसभर राबराब राबतात तेव्हा रात्रीचे जेवण बनते . त्यांचे कष्ट बघवत नाहीत गं. आणि तुला माहित आहे का आईचे औषध किती महाग आहेत. एका दिवसाचा पण खंड पडू देत नाही आम्ही . मग तीन महिन्यांनी फेर तपासणी . तेव्हा डॉक्टरांची फी आईला रिक्षातून न्यायचे तो खर्च. किती ग ठिगळे जोडून करायचे हे. आता मी हायस्कूल मध्ये गेले तर युनिफॉर्म, पुस्तके, वह्या , दप्तर एक म्हणजे एक खर्च वाढणारच. तसे माझे स्वप्न आहे मी शिकून मोठे व्हावे. मोठ्या पदावर काम करायचे. आईला चांगले पदार्थ खायला द्यावे. भावांना आराम द्यावा. बाबांची जळलेली फॅक्टरी पुन्हा नव्याने उभी करायची. जे जे लोक तिथे कामाला होते त्यांच्या घरातील स्त्रियांना कामावर घ्यायचे‌ . अशी आणखी खूप स्वप्ने आहेत ग माझी. पण.....! पण....!" असे म्हणत रुपा नेहाच्या गळ्यात पडून रडू लागली.

रात्री रुपाने आपल्या आईला भात भरवला. आईचे जेवण झाल्यावर हे सगळेजण जेवायला बसले तोच," रुपा...रुपा...हेच घर का रुपाचे?" असा आवाज आला.
" कोण...?" रुपाच्या भावाने विचारले.
" मी नेहाची आई."
" या या काकू." रुपा म्हणाली.

"रुपाने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आहे हे ऐकून मी इथे आली आहे. का बाळ शाळा सोडतेय. अगं मी नेहाचीच नाही तुझी पण आई आहे. हक्काने मला सांग न तू. पण बाळ शाळा सोडू नकोस. "
" नाही काकू इतकी फी कुठून देणार दादा. त्याच्या पैशात आईचे औषधच होत नाही. मग माझा का खर्च देऊ त्याला."
" इतक्या लहान वयात किती शहाणपण ग तुला बाळा.अगं आपल्या समाजात असे काही लोक आहेत जे हुशार मुलींना शिक्षणासाठी पैसे देतात.तशाच एका समाजसेविकेला मी ओळखते. त्या न तुझ्या सारख्या हुशार मुलींना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मदत करतात. त्या करतील तुला मदत. त्यांच्या कडून तुला मी स्काॅलरशिप मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते जर ती तुला मिळाली न तर तुझी फी माफ होईल. मग तू तुझे शिक्षण पूर्ण कर आणि त्याचबरोबर तुझी सारी स्वप्ने पण. घे उंच भरारी आकाशी.आता तरी हास बाळं. किती रे देवा परमेश्वरा या मुलांना दुःख दिलेस तू." असे म्हणत नेहाच्या आईने आपले डोळे पुसले.

नेहाची आई गेली तशी रुपाने आपल्या भावाकडे पाहून डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.हे पाहून तिचा मोठा भाऊ तिच्या जवळ गेला आणि तिच्या ड़ोक्यावरुन हात फिरवत म्हणाला," काही काळजी करू नकोस रुपा. मी आहे न . अजून दोन तास जास्त काम करेन पण तुझे शिक्षण पूर्ण करणारच." हे ऐकून दोघे लहान भाऊ पण म्हणाले ," आम्ही सर्व जण मिळून मेहनत करुन तुझे शिक्षण पूर्ण करणारच."

क्रमशः
©® परवीन कौसर...

🎭 Series Post

View all