कस्तुरी भाग ४०

तिघी मैत्रीणी काॅलेजच्या आवारात आल्या बरोबर मागून कोणीतरी वागळे की दुनिया असे म्हणाले


कस्तुरी
भाग ,४०

" घर विकणे आहे . चौकशीसाठी दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधावा. ही पाटी पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी जवळजवळ या धक्क्याने भोवळ येऊन खाली पडलेच असते पण कसेबसे स्वतःला सावरुन तो फोन नंबर पटकन लिहून घेण्यासाठी पर्समध्ये पेन शोधू लागले. पण म्हणतात ना घर फिरले की त्याचे वासे देखील फिरतात. तसेच झाले नेहमी माझ्या पर्स मध्ये पेन असतो पण नेमका त्याच वेळी पेन नव्हता. मग मी पळतच जवळच्या दुकानात जाऊन पेन विकत घेऊन आली आणि तो नंबर लिहून घेतला. यानंतर जवळच असलेल्या टेलिफोन बूथ वरून फोन करण्यासाठी गेले. तिथे जाऊन तो नंबर डायल केला . तर तो नंबर शशांकच्या शेजारी राहणाऱ्या कर्नल अंकलचाच होता. मी त्यांच्याजवळ शशांक आता कुठे आणि कसा आहे याची चौकशी केली तर त्यांनी आधी उत्तर द्यायचे टाळले पण मी जेव्हा त्यांना शशांकच्या परिक्षेच्या निकालाबद्दल सांगायचे आहे असे खोटेच सांगितले तेव्हा त्यांनी मला सांगितले की आता शशांक आपल्या वडिलांसोबत अमेरिकेत निघून गेला आहे तो ही कायमचाच.यानंतर ते काय बोलत होते ते मला काहीच ऐकू आले नाही माझ्या कानावर एकच वाक्य वारंवार ऐकू येत होते शशांक अमेरिकेला निघून गेला कायमचाच. मी तिथे तशीच किती वेळ अगदीच पुतळ्यासारखी उभी होती. टेलिफोन बूथ बाहेर आलेल्या एका मुलीने जेव्हा त्या केबीनचे दार वाजवले तेव्हा मी शुद्धीवर आली. तिला सॉरी म्हणुन मी बाहेर पडले.

मी चालत तर होती पण एक निर्जीव देह जणू. मला काहीच सुचत नव्हते. माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त शशांकचाच चेहरा येत होता. त्याच बरोबर डोक्यात प्रश्नांचे काहूर. का ???? मला न भेटता न बोलता तो इथून गेला. मी कोणता गुन्हा केला होता की माझ्या हातून अशी कोणती चूक झाली ‌ ? मी अजाणतेपणी काही बोलले का त्याला ? असा तो का वागला माझ्या बरोबर ? का ??? का ???? का ???? आणि मी भोवळ येऊन खाली पडले.

जेव्हा मी शुद्धीवर आली तेव्हा माझ्या समोर एक महिला उभी असलेली दिसली. मी डोळे उघडताच तिच्या चेहऱ्यावर हलकेच हास्य उमटले . तिने वर आकाशात पाहून हात जोडून नमस्कार करत ," देवा परमेश्वरा पोरगी सुद्धीवर आली बाबा." असे म्हणत माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तशी मी एकदम घाबरून उठून बसले. मी काही बोलणार इतक्यात तीच म्हटली," घाबरू नगस बाळ . तू तिथे समोर रस्त्यावर चालता चालता पडली. तरी बरं मी तिथेच कचरा गोळा करत होती. माझी नजर पडली तुझ्या जवळ आणि मी तशीच पळत पळत जाऊन तुला उचलून इथे माझ्या झोपडीत आणले. जेवली नव्हती की काय सकाळपास्न . काय बाई आजकालच्या पोरी जाड होतात म्हणून जेवणच करत नाहीत. आता घरी आई बाबा तुझे काळजी करत असतील की न्हाई. चल हे घे चा केला हाय. एक घोट भर पी अन् हे बिस्कुट हाय ते खा. मग मी तुझा हात धरुन सोडायला येते तुझ्या घरी. " असे म्हणत एक फुटक्या कपात तिने मला चहा दिला. मी रडत रडतच चहा प्यायले. मग तिने मला हात धरून घरापर्यंत सोडले . मला तिला आत या असे सांगायला पण सुचले नाही.

तो संपूर्ण आठवडा मी कॉलेजला गेलेच नाही. घरात देखील कोणाबरोबर बोलले नाही की जेवण बरोबर केले नाही. या आठ दिवसांत मी फक्त आणि फक्त शशांकचाच विचार करत होती. घरात सर्वांना माझी परिक्षा जवळ आली असेल असेच वाटले. तरी एक दोनदा आजीने विचारले देखील, "की काही झाले आहे का ? अशी शांत नसतेस तू कधी ." पण मी तिला काही उत्तर दिले नाही.

रविवारी दुपारी मी शशांकच्या घरी जायचे ठरविले होते. त्याचप्रमाणे मी दुपारी तिथे गेले. दारावर कुलूप नव्हते. हे बघुन मला जरा हायसे वाटले. मी आनंदाने गडबडीने जाऊन दारावर थाप दिली. आतून," हो आले आले.." असे म्हणत एका महिलेने दार उघडले.

तिने मला पहाताच प्रश्नार्थक चेहरा केला. ती काही विचारणार तोच मीच बोलले," शशांक आहे का घरात?"

" कोण शशांक ? मला माहित नाही हो. आम्ही कालच इथे शिफ्ट झाले आहोत." ती म्हणाली.

हे ऐकून मी काय समजायचे ते समजून तिथून हताश होऊन जड पावलांनी परत घरी आले.त्या रात्री माझी अगदीच द्विधा मनस्थिती झाली होती. शशांकसाठी विरहात आपले आयुष्य जगायचे कसे ? प्रेम आम्ही दोघांनीही केले होते असे तर नाही ना की माझे हे एकतर्फी प्रेम होते. प्रेमाच्या आणाभाका आम्ही दोघांनीही घेतल्या होत्या. त्याला काही वर्षे आपल्या वडिलांना घेऊन अमेरिकेत जायचे होते तिथून आला की लग्न करायचे असे ठरवले होते. मला भारतात रहायचे आहे हिच एकच अट घातली होती मी ती पण त्याने मान्य केली होती. इतके सगळे आमचे ठरले होते तर तो असा कसा निघून जातो???

मला काहीच सुचत नव्हते. मी शून्य नजरेने एकसारखी वर आकाशाकडे बघत बसली होती. तोच एकदमच अचानक जोरात हवा सुटली आणि एकदमच टपटप करत पावसाचे थेंब पडू लागले. जसजसे पावसाचे थेंब तापलेल्या जमीनीवर पडू लागले तसतसे भिजलेल्या मातीचा सुगंध चहुकडे दरवळू लागला. मातीच्या सुगंधाने आणि बरसणाऱ्या धारा मध्ये भिजायचे माझे मन झाले. मला शशांक बरोबर भिजलेल्या पावसाची आठवण झाली. तोच माझ्या कानावर एका गाण्याचे बोल ऐकू आले

" लगी आज सावन कि फिर वो झड़ी है
वहीं आग सीने में फिर जल पड़ी है
कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम मिले थे
चमन में नहीं फुल दिल में खिले थे "

हे गाणे ऐकताच मी तडक छतावर जाऊन स्वतः ला मनसोक्त पावसात चिंब भिजवून घेतले. एकेक वेळी असे भासले की मी एकटी नसून शशांक पण माझ्या सोबत भिजतो आहे. या पावसाच्या धारांमध्ये माझ्या अश्रूंचा बांध फुटला. पावसाच्या बरसणाऱ्या धारा त्यामध्ये माझे अश्रू या दोघांचे मिलन होत होते. जरी पाऊस थांबला होता तरीही मी तशीच उभी होती. इतक्यात मला," अगं रुपा ....!!!! पोरी अशी भिजलेल्या कपड्यात उभी आहेस. चल आत अंग पुसून कपडे बदल . अशाने आजारी पडशील बाळ. परीक्षा तोंडावर आली आहे. बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे न बाळ." आजीच्या आवाजाने मी भानावर आले. तशीच तडक आत खोलीत गेले. तिथे आरशासमोर उभे राहून स्वतः ला निहारले आणि स्वतः लाच प्रश्न विचारला," रुपा हि तूच आहेस न ? जी बालपणापासून बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती कष्ट घेतले. शिक्षण पूर्ण करण्यासाठी दादाने किती कष्ट घेतले. आईचे आजारपण, आजीची मिळालेली साथ , शाळेत जाण्यासाठी केलेली धडपड, किती जणांनी कळत नकळत दिलेला मदतीचा हात, नैसर्गिक आपत्तीत गेलेले सगळे विश्व पुन्हा पूर्ववत आणायला केलेली मेहनत हे सगळे एका शशांक च्या मागे पाण्यात सोडणार का ? सर्वांनी पाहिलेल्या स्वप्नाला तू त्या एका शशांक च्या प्रेमात तिलांजली देणार का ? जर तो तुला खरोखरच प्रेम करत होता तर असे न भेटता कसा गेला. काही ही न बोलता गेला कसा ? अशा मुलाच्या मागे लागून तू आपले भविष्य बिघडवून घेणारी आहेस का ? अशी तर तू नव्हतीस कधी. ही तूच आहेस की दुसरी कोणी? \" असे म्हणत मी माझ्या कानावर हात ठेवले . नंतर मनामध्ये ठरवले की आता आपल्या आयुष्यात परत कोणी पुरुष येणार नाही. मी फक्त आणि फक्त माझे आयुष्य माझ्या ध्येयापासून भरकटत जाऊ देणार नाही. मी माझे जे ध्येय आहे तेच पूर्ण करणार. मी मनापासून प्रेम केले शशांकला. त्याचेही तेवढेच प्रेम होते माझ्यावर पण काय झाले हे कळले नाही. असो तो जिथे आहे तिथे सुखी असुदे त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ दे. आजपासून नाही आत्तापासूनच मी पुन्हा तीच पहिली रुपा झाली आहे. मी माझे ध्येय पूर्ण करणार म्हणजे करणारच.\" असे मनात म्हणत मी माझे डोळे पुसले आणि एका नव्या रुपामध्ये जन्म घेतला.

यानंतर मी मागे वळून एकदाही पाहिले नाही. मी माझा अभ्यास आणि माझे ध्येय याचबरोबर बाबांचे स्वप्न यावरच लक्ष केंद्रित केले. आणि खरे सांगू का मला जेव्हा जेव्हा एकटी आहे असे भासू लागले तेव्हा तेव्हा मी शहराजवळ असलेल्या एका निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भागामधील टेकडीवर जाऊन निवांत बसते. काही वेळ डोळे गच्च मिटून घेतले की मला माझ्या अवतीभोवती शशांकचा भास जाणवतो. मग तिथल्या रम्य वातावरणात मी मला स्वतःला थोडा वेळ देते. यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जाते. मनातील क्षीण निघून जातो. यानंतर घरी परतताना या सुंदर जीवनात आनंद निर्माण झाले असेच म्हणत गाणे गुणगुणत येते.

रुपा बोलत होती तशी कामिनी आणि नेहा दोघीही आपापल्या डोळ्यांतून अश्रूंना थांबवू शकत नव्हत्या.हे पाहून रुपा दोघींना म्हणाली," अगं वेड्यांनो का रडतात दोघी. हे बघा मी आहे ना बरी. जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण होणार की नाही याची मला शाश्वती नव्हती ते स्वप्न पूर्ण झाले . हा पण आईबाबा आणि आजी हे नाहीत याची खंत वाटते मला. पण हे सगळे माझे यव त्यांच्या आशीर्वादानेच तर शक्य झाले आहे नाही का ....!!!!"

" अगं हो गं. पण या वयात तुला एकटीला जगावे लागते. अगं आम्ही आमचे शिक्षण पूर्ण केले नोकरी पण केली पण आम्ही आमच्या संसारात रममाण होऊन गेलो ग . तसं तुझं काही नाही झाले न. बघं रुपा अजूनही वेळ गेलेली नाही. तू विचार कर आम्ही तुझ्या साठी तुझ्या योग्य वर शोधतो. अगं आयुष्याच्या संध्याकाळी कोणीतरी हक्काचा असावा लागतो ग." नेहा म्हणाली.

यावर कामिनी ने ही होकारार्थी मान डोलावली.

" छे गं...!! आता नाही ग. नकोच ग. आहे ही अशी मी बरी आहे. अरे हो मी तर विसरूनच गेले गं विचारायचे. उद्या गेट टुगेदर साठी ड्रेस कोड आहे का. रंग कोणता आहे. मी आता जास्त तर साड्याच नेसते त्या देखील कॉटनच्या. तसे ड्रेस आहेत म्हणा पण आता सारखे फॅन्सी नाही हो." रुपाने हसत हसत म्हटले.

" नाही ग ड्रेस कोड वगैरे काही नाही. " कामिनी म्हणाली.

" अच्छा.मग आज न आपण तिघी एकसारखे ड्रेस घालून जाऊया. आठवते न ग कॉलेजच्या पहिल्या दिवशी आपण कसे गेलो होतो तसेच. मी आपणा तिघींना एकसारखे ड्रेस आणले आहेतच." रुपा म्हणाली.

" अगं बाई खरंच की काय. हे बरे झाले. आपण आपल्या त्यावेळच्या प्रत्येक आठवणीतच जायचे आहे न. आता मात्र खरी मज्जा येणार." नेहा म्हणाली.

रुपाने आपल्या मोबाईल मध्ये ड्रेसचे फोटो दाखविले उद्या येईल ड्रायव्हर घेऊन असे म्हणत दोघी मैत्रिणी कडे आनंदाने पाहिले.

बोलता बोलता रात्र कशी गेली हे तिघींना कळलेच नाही. कॉलेजमध्ये बरोबर अकरा वाजता जायचे होते. तिघींनी कॉलेजला जायची तयारी सुरू केली. तोच दारावर टकटक झाली.

" अरे बापरे इतक्या लवकर हा आला देखील." असे म्हणत नेहाने दार उघडले.

" चला ग मुलींनो गरमागरम इडली डोसा खाऊया." नेहाने दार बंद करून म्हटले.

" अरे व्वा मस्तच. मला इडली खुप आवडते." रुपा म्हणाली.

" हो आणि मला डोसा." कामिनी हसत हसत म्हणाली.

" हो ग म्हणूनच तर मी आॅर्डर दिली होती." नेहा म्हणाली.

तिघींनी नाश्ता केला. रुपाने घरी फोन लावून शांता मावशी आणि ड्रायव्हर या दोघांचा चहा नाश्ता झाला का ही चौकशी केली त्याचबरोबर ड्रायव्हरला कॉलेजमध्ये सर्वांना द्यायला आणलेल्या भेट वस्तू घेऊन नेहाच्या घरी बोलावले.रुपाने सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हर अगदी वेळेवर नेहाच्या घरी आला. रुपाने आणलेले ड्रेस दोघींना दिले. तिघींनी ते एकसारखे ड्रेस परिधान केले.

रुपा , कामिनी आणि नेहा तिघी मैत्रीणी गाडीमध्ये बसून कॉलेजला गेल्या.
काॅलेजच्या गेटमधून आत जाताना या तिघींच्या अंगावर शहारे आले. तिघींना ही आपले काॅलेज लाईफ आठवले. तिघींनी ही एकदम आपापले डोळे मिटून घेतले आणि एक दिर्घ श्वास घेतला.

कॉलेजच्या आवाराच्या गार्डनमध्ये मोठ्ठाच्या मोठ्ठा मंडप सजविला होता. सुंदर कमानीचे पडदे लावून स्टेज सजवलेले होते.समोरच सुंदर सुंदर झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या. रंगबिरंगी फुलांची सजावट केली होती. समोरच रांगोळी काढली होती.गेटमधून एकेक करून काही पुरुष मंडळी त्याचबरोबर महिला पण येत होत्या. त्यावेळीची अल्लड,बडबड करणारी तरुण पिढी आज काहीशी प्रौढावस्थेत गेली होती.जवळजवळ सर्व विद्यार्थ्यी आले होते. या तिघीपण गाडीतून उतरून मंडपात प्रवेश करणार तोच ," हाय वागळे की दुनिया गर्ल्स." असा आवाज आला. आवाजाच्या दिशेने तिघींनी पाहिले तर तिथे समोर एक मुलगी उभी होती.

" अरे हि कोण ? आपल्या वयाची पण नाही ही ? मग हिला कसे माहित आपल्याला वागळे की दुनिया म्हणत होता शशांक ?" नेहाने प्रश्नार्थक मुद्रेने त्या मुलीला पाहून म्हटले.

रुपा कामिनी या दोघीही अचंबित झाल्या होत्या. नेहा तिला बोलायला म्हणून समोर गेली तोच ती तिथून पटकन पळून स्टेजजवळ गेली.

" कोण आहे काय माहित ? पण आहे चुणचुणीत. मला तर वाटते आपल्या वर्गातील कोणाची तरी मुलगी असावी." कामिनी म्हणाली.

" हम्म्म. पण येवढी मोठी ...!!!" नेहाने शंका दर्शविली.
तोच आलेल्या महिलांमधून काही जणी अगदी पळत पळत येऊन रुपा,नेहा कामिनीला गळाभेट देऊ लागल्या तर काही समोर येऊन उभारुन," अगं बाई अजून ही आहे तशीच आहे न तू काही फरक पडला नाही तुझ्यामध्ये." असे म्हणू लागल्या.

समोरच काही पुरुष एकमेकांना हाय हॅलो करत हस्तांदोलन करू लागले. एकंदरीत वातावरण आनंदाचे निर्माण झाले होते.

इतक्यात स्टेजवर माईक हातात घेऊन एक तरुण मुलगा उभा राहिला.

" हॅलो, हॅलो वन टू थ्री माईक टेस्टींग माईक टेस्टींग....!!!! अटेंशन प्लिज. " तसे सर्व जणांच्या नजरा स्टेजवर गेल्या. तेव्हा त्याने सर्वांना बसण्यासाठी सांगितले. सगळेजण एकेका खुर्चीवर जाऊन बसले. रुपा नेहा कामिनी मधोमध असलेल्या खुर्चीवर जाऊन बसल्या.

स्टेजवर टेबल खुर्ची ठेवण्यात आले. आताचे असणारे शिक्षक शिक्षिका स्टेजवर येऊन बसल्या. तेव्हा त्या मुलाने आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

" अरे बापरे बघ रुपा मॅडम आहेत तशाच दिसत आहेत न ग." कामिनी म्हणाली.

" हो न ग." नेहा पण आनंदाने टाळ्या वाजवत म्हणाली.

यानंतर मॅडमनी चार शब्द बोलावे अशी विनंती केली.

मॅडमनी आपल्या वेळच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आठवून त्यांची नावे घेत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. बोलता बोलता त्या थोड्या हळव्या झाल्या नकळतच सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. यानंतर एकेक करून सर्व जणांनी जाऊन एक दोन शब्दात आपल्या आठवणींना उजाळा दिला. तर काही जणांनी आठवणीतली गाणी म्हणत डान्स केला. यानंतर स्टेजवर आग्रहाचे निमंत्रण रुपाला मिळाले. तिचा कॉलेजतर्फे सत्कार करण्यात आला. सर्व प्रथम तिने आपल्या मॅडमच्या पाया पडल्या. तेव्हा मॅडमनी तिला भरभरून आशीर्वाद देत तिची गळाभेट घेतली. तेव्हा दोघींनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यानंतर रुपाने आपले चार शब्द सांगण्यास सुरुवात केली. तिने आपल्या काही आठवणी विसरता येत नाहीत असे म्हणत हळूच डोळे पुसले. तोच अचानक सुंदर बासरीचे सूर ऐकू आले. सर्व जण कुठून येत आहेत हे सूर हे बघू लागले. पण कोणीच दिसेना. रुपा पण अचानक ऐकू आलेल्या सुरामध्ये थोडीशी गडबडली गेली. पण पुन्हा ती आपले मनोगत व्यक्त करु लागली. तिने आपल्या काही मित्र मैत्रिणींची नावे घेत त्यांच्याविषयी असलेल्या भावना व्यक्त करु लागली तेव्हा नकळतच तिच्या तोंडातून शशांक हे नाव आले.आणि ती एकदमच स्तब्ध होऊन उभी राहिली. तोच पुन्हा एकदा बासरीचे सूर ऐकू आले पण आता ते एकदमच जवळून आणि अगदीच स्पष्ट. हळूहळू ते सूर जवळ जवळ येत होते. आणि एकदमच मंडपामध्ये एक पुरुष हातात बासरी घेऊन वाजवत हळूहळू थोडासा एक पाय ओढत येत होता आणि त्याच्या जवळ एक मुलगी त्याला थोडासा आधार देत येत होती. सगळेजण बासरीवादकाला बघून उभे राहिले आणि जोरजोराने टाळ्या वाजवत एकसुरात," शशांक....!!!!! शशांक....!!!! शशांक....!!!! " असे म्हणू लागले.

रुपा तर एकदमच भांबावली गेली. तिला काहीच समजेना की काय करु. तिला आपल्यावर झालेल्या आनंद वर्षावात चिंब चिंब भिजलेले भासू लागले. परत एकदा हे खरे आहे की स्वप्न असे ती स्वतः ला चिमटा काढून बघू लागली.

नेहा कामिनी तर पळत पळत शशांक जवळ गेल्या. त्याला बघून या दोघींना इतका आनंद झाला होता की आकाशच ठेंगणे झाले होते.

शशांक हळूहळू स्टेजवर गेला. तिथे जाऊन त्याने अदबीने मॅडमना नमस्कार केला पाया पडण्यासाठी वाकणार तोच ," नो डॅड. तुला त्रास होईल." असे म्हणत त्या मुलीने शशांकचा हात धरला.

" डॅड....!!!!!!" हे ऐकताच रुपा दोन पावले मागे सरकली.तिचा चेहऱ्यावर आलेले हास्य एकदमच विरघळून गेले.

नेहा कामिनी पण " डॅड" ऐकून आ वासून उभ्या राहिल्या.

" हो बेटा काही नाही होत ग मला आता.‌" असे म्हणत शशांकने मॅडमच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला तोच ," आई ग ....!!!" असा विव्हळला. हे ऐकून रुपा त्याला धरायला सरसावली. तिने हळूच त्याला धरून उभे केले.हे पाहून ती मुलगी एकदम शशांक चा हात सोडून मागे सरकली आणि म्हणाली ," बघितल न डॅड. अजूनही रुपा मॉमचे तुझ्यावर तितकेच प्रेम आहे जितके तेव्हा होते. तुला मी म्हणाले होते की चल आपण जाऊन भेटू तिला. ती अजून तुझी वाट पाहत आहे. पण तूच नको म्हटलास न." असे म्हणत तिने पटकन माईक हातात घेऊन बोलण्यास सुरुवात केली.

" नमस्ते माझ्या डॅडच्या जीवलग मित्र मैत्रिणींनो . आज मी तुम्हावर एक जवाबदारी सोपवणार आहे ती म्हणजे माझ्या डॅडचे लग्न रुपा मॉमबरोबर करून द्यावे. माझा डॅड या गैरसमजामुळे अजून होता की रुपा मॉमचे लग्न झाले आहे ती तिच्या संसारात सुखी आहे पण मला इथे येऊन कळले की रुपा मॉमने लग्न केलेच नाही. डॅडचा जेव्हा अपघात झाला तेव्हा तो आतून खचला होता. त्याला आपले अपंगत्व रुपावर लादायचे नव्हते म्हणून तो इथून आजोबांना घेऊन अमेरिकेत आला. तिथे त्याचे पायाचे आॅपरेशन केले. त्याचा एक निकाम्या पायावर जयपूर फूट लावला गेला. तो जरा जरा चालत होता पण त्याचे आतून खचलेले मन काही त्याला जगू देत नव्हते. असे अपंगत्व घेऊन लाचारी जीवन जगण्यापेक्षा मृत्यूच्या छायेत गेलेले बरे असे म्हणत याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.याला आजोबांनी दवाखान्यात दाखल केले. तिथे याच्यावर औषधोपचार केले. याला जगायचे नव्हते. एकतर याने रुपाला तिथे भारतात न बोलता तिचे मन दुखावले होते त्याचबरोबर आता असे एका पायावर आयुष्य जगायचे कसे. जरी जयपूर फूट असला तरी तो कृतिमच न. म्हणून त्याला जगायचे नव्हते. त्याने दवाखान्यातून रात्री आजोबांना झोप लागली हे खोलीच्या बाहेर पडला. हळूहळू तो लिफ्ट जवळ आला. लिफ्ट मधून वर टेरेसवर गेला. तिथे जाऊन स्वतःला खाली झोकून देणार इतक्यात मी तिथेच बसलेली होती मी याला बघून पळत पळत जाऊन हाताला धरून मागे ओढले.

का आत्महत्या करत आहेस असे विचारले असता याने सर्व सांगितले. ते ऐकून मी म्हटले," हे बघ इथूनच माझी आई स्वतः ला खाली झोकून देऊन जीवन संपवून दिले कारण माझा बाप तिला मला देऊन पळून गेला होता. इथे परदेशात आईचे कोणीच नव्हते. तिने आपल्या आईवडिलांचे न ऐकता एका परदेशी मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले होते. आता तिला परत कोण घेणार घरी म्हणून तिने मला इथे सोडून स्वतः ला संपवले. यामध्ये तिला काय निष्पन्न झाले का ? मग तू का आपले आयुष्य संपवतो आहेस. मी याला बोलत होते तोच मागे आजोबा पळत पळत आले होते.त्यांनी एकदम मला जवळ घेऊन माझे पापे घेतले आणि मला म्हणाले ,"तू एंजल आहेस गं पोरी. माझ्या लेकाला जीवनदान दिले तू. आजपासून तू आमच्या घरी राहायची. तू माझी नात आहेस." तेव्हा पासून मी यांच्या घरी राहायला गेली. मी तेव्हा लहानच होते. पण जेव्हा मी थोडी मोठी झाली तेव्हा डॅडने आपल्या आयुष्यात जे काही घडले ते सगळे सांगितले.त्यावेळीच आम्ही इकडे येणार होतो पण अचानक आजोबा आजारी पडले आणि त्यातच त्यांना देवाज्ञा झाली.मग अशीच काही वर्षे निघून गेली. मी रोज संध्याकाळी डॅडला एकांतात बसुन हळूच आपले डोळे पुसतो हे बघत होती. मग मी विचारायची," डॅड रुपा मॉमची आठवण येते न रे. चल जाऊ भारतात."
हे ऐकून हा म्हणायचा," छे गं. तिची कशाला आठवण येईल."

तेव्हा मला असे वाटतच होते की रुपा मॉम डॅडची वाट पाहत असणार.ती कस्तुरी आहे. ती आपल्या हातांनी दुसऱ्यांचे आयुष्य सुगंधीत करणारी कस्तुरी आहे कस्तुरी.ती का माझ्या डॅडचे आयुष्य सुखी करणार नाही. ती नक्कीच हो म्हणेल. मी फक्त इकडे यायची संधीच पाहत होती. तोच इथे गेटटूगेदर ठरवले गेले. तेव्हा मी सर्व फोन नंबर मधून रुपा मॉमचा नंबर शोधून घेतला. तिची चौकशी केली. तेव्हा मला कळले की हीने लग्न केले नाही. म्हणून मी तिला फोन केला पण बहुतेक नेटवर्क इश्यू असेल. काही ऐकू येत नव्हते. मग मी मेसेज केला पण तिचा रिप्लाय आला नाही. मग म्हटले बहुतेक सुट्टी मध्ये फोन वापरत नसेल ही. जाऊ दे सरळ कार्यक्रमामध्ये भेटून माझ्या डॅडसाठी मागणी घालते.

तर मग काय विचार आहे.बनणार न माझ्या डॅडची दुल्हनियाँ." असे म्हणत तिने रुपा जवळ शशांकचा हात नेला.

" रुपा हो म्हण यार...!!!" एकच आवाज सर्व जणांचा.

रुपाने काहीशी लाजत काहीशी घाबरत घाबरत शशांकचा हात आपल्या हातात घेतला .

समाप्त
©® परवीन कौसर
बेंगलोर

🎭 Series Post

View all