कस्तुरी.. भाग ३

गोष्ट अलवार प्रेमाची


"कस्तुरी..मी ऑफिसला जातोय. बाबांनी जेवायला बोलावलं आहे आज. तू रेडी रहा. ठीक सहा वाजता मी तुला घ्यायला येईन." विजय बोलला आणि बॅग घेऊन ऑफिसला निघून गेला. आज तरी बाय करायला बाहेर येईल या आशेने नेहमीसारखच त्याने दारावर पाहिलं पण ती तिथे नव्हती.
****
"विजय..मिस्टर. मेहता आणि कुंभारांची फाईल घेऊन माझ्या केबिन मधे ये." नुकतेच ऑफिस मधे आलेले श्रीपतराव केबीनकडे जाता जाता बोलले.

"हो सर.."आपल्या डेस्क जवळच उभ राहून तो बोलला आणि लगेच दोन्ही फाईल घेऊन दारावर टकटक करत त्याने विचारलं.

"मे आय कम इन सर?"

"येस..कम इन."

"सर..या फाईल. कुंभाराना मी मेल केल आहे त्यांनी मीटिंग साठी परवाची डेट दिली आहे आणि मेहतांनी मेलला अजून काही उत्तर दिलेल नाहीये." विजय हातातल्या फाईल्स टेबलवर ठेवत बाकी सगळी डिटेल्स देत बोलला.

"ओके.. मीटिंगसाठी त्यांना आपल्या फार्म हाऊस वर यायला सांग म्हणजे.. नंतर दुसरा मेल बनवून पाठव आणि त्यात ते मेंशन कर की मीटिंग फार्म हाऊस वर असेल आणि अड्रेस पण मेंशन कर."श्रीपतराव बोलले.

"ओके सर, आणखी कुठली इन्फॉर्मेशन हवी आहे का?" दोन्ही हात समोर एकावर एक ठेवत उभ राहूनच त्याने विचारले.

"अं..नाही..थँक्यू. या तुम्ही." श्रीपतराव बोलले. ओके सर म्हणत विजय सुद्धा त्यांच्या केबिनमधून बाहेर पडला.

"अरे विजय, साल्या..तू या कंपनीचा सी. ई. ओ आहेस तरी देखील साध्या डेस्क वर बसतोस? काय यार तु पण..एवढी भारी केबिन दिली आहे तुला. फुल्ल ए.सी.. हां म्हणजे आम्ही पण ए.सी मधेच असतो पण तुझ्यासाठी एकदम खास सर्व्हिस तरी तू हा असा.. इथे. ते म्हणजे.. तुझी गत कशी झाली आहे..समोर मटण दम बिर्याणीची हांडी ठेवली आहे आणि तुला खिचडीच ताट हवय!" विजय चा कलिग त्याला बोलत होता.

"सी. ई. ओ झालोय पण ते कस्तुरीशी लग्न झालंय म्हणून. अस मला वाटतेय. मी तिला माझी बायको मानतो, पण ती जर अजूनही मला नवरा मानत नसेल तर मी ती पोस्ट का घेऊ. यावेळीच्या प्रमोशनसाठी माझं नाव आधीपासून लिस्ट मधे होत हे आपल्या सगळ्यांनाच माहीत होत पण त्या लिस्ट मधून मी निवडलो गेलोय म्हणजे माझ्या कामामुळे मी या पोस्ट वर आलोय की माझ्यावर मेहरबान होऊन ती मला दिली गेली आहे ते मलाही माहित नाही. मी सरांना याबद्दल विचारलं होत पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही." कॉम्पुटर वर नजर रोखून तो बोलला.

"काय? म्हणजे तुमच्यात अजून नवरा बायको अस काहीच नाही?"बाजूची खुर्ची खेचून त्यावर बसत त्याच्या कलिगने प्रश्न केला.
त्याने पण फक्त नकारार्थी मान डोलावली.

"लग्नाला आठ महिने झाले आणि तू ही गोष्ट आत्ता संगितोयस. आपण सगळ करत असताना बायकोने दुर्लक्ष करणे काय असत हे मला विचार. माझ्या एका चुकीमुळे मी माझा संसार उद्धवस्त होताना पाहिलं आहे पण तू..तू का झेलतोस हे सगळ? विजय..माझ्या मते तू सगळ्यांशी एकदा बोलावं..म्हणजे तिची फॅमिली, तू आणि काकू."

"काय बोलायचं बसून. कस्तुरी माझ्याशी बायको सारख वागत नसली तरी ती आईशी कधीच चुकीची वागली नाही. आईला खूप जपते ती. गेल्या महिन्यात आईला बेड रेस्ट सांगितली होती. नर्सचा खर्च मला परवडत होता, तरी तिने सगळ स्वतः करण्याचा निर्णय घेतला का तर म्हणे या जागी माझी आई असती तर मी केलच असत ना...ती खूप चांगली आहे पण फक्त मी आवडत नाही तिला."

"विजय..मला वाटत..सुचेत अजूनही तिच्या मनातून गेलेला नाहीये. तुझ्याशी झालेलं तीच लग्न ही एक जबरदस्ती होती तिच्यावर. तू एकदा बोलून बघ आणि अस मनात साचवून ठेऊ नको यार,बोलत जा. मन मोकळं होते बोलल्याने." त्याने खांद्यावर हलकेच हात थोपटत त्याला सांगितले आणि तो त्याच्या डेस्क वर निघून गेला.

इकडे विजय बोलावं की नाही याचा विचार करत होता पण त्याला त्याच्या आईने सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. तुझी खास जागा तिच्या मनात नक्कीच यावी पण जोर जबरदस्ती न करता अलवार प्रेमाने. तुझा चांगलुपणा असाच कायम ठेव कधीतरी तिला तू नक्की आवडू लागशील आणि ती स्वतःहून तुझ्या प्रती असलेलं तीच प्रेम व्यक्त करेल. काही चांगल हवं असेल तर आधी निखाऱ्यावर चालावच लागत. त्याने सगळ मागे टाकत पुन्हा स्वतःला कामात झोकून दिलं.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे


🎭 Series Post

View all